डेझी : (इं. इंग्लिश डेझी लॅ. बेलिस पेरेनिस कुल-कंपॉझिटी). सूर्यफूल कुलातील शोभिवंत किरण-पुष्पके [⟶ कंपॉझिटी ॲस्टरेसी] असलेल्या फुलोऱ्याच्या [ स्तबकाच्या ⟶ पुष्पबंध] काही वनस्पतींच्या जातींना हे सामान्य इंग्लिश नाव दिलेले आढळते. कंपॉझिटी कुलातील दोन उपविभागांपैकी ट्युबिफ्लोरी ह्या एका उपविभागातील ॲस्टरी या गटात अंतर्भूत होणाऱ्या बेलिस वंशात इंग्लिश डेझीचा समावेश करतात त्याच गटातील ⇨ ॲस्टर वंशात ख्रिसमस व मायकेल्मस डेझीचा समावेश होतो. शास्ता डेझी, आफ्रिकन डेझी व ऑक्ससाय डेझी यांचा अंतर्भाव अन्य वंशात केला जातो. बेलिस वंशात एकूण दहा जाती असून त्यांचा प्रसार यूरोप व भूमध्य सामुद्रिक प्रदेशात विशेष आहे. 

इंग्लिश डेझी (बेलिस पेरेनिस)

बेलिस पेरेनिस ही सामान्य किंवा खरी डेझी असून अमेरिकेत ती बागेत (उन्हाळ्यात) बरीच लावतात. ब्रिटिश बेटात हीच एक जाती आढळते यूरोपात बहुतेक सर्वत्र हिरवळीत, कुरणात व नद्यांच्या किनाऱ्यावर ती विपुल वाढलेली आढळते. ही ओषधीय [⟶ ओषधि] व अनेक वर्षे जगणारी असली, तरी बागेमध्ये ती एकच वर्ष किंवा दोन वर्षे ठेवून पुनःपुन्हा लावतात. हिचे खोड लहान असून त्याचा जमिनीतील भाग [ मूलक्षोड ⟶ खोड ] तपकिरी व रांगता असतो. तिची उंची ८–१५ सेंमी. (क्वचित २० सेंमी.) असून तळाशी जमिनीवर अनेक साध्या चमच्यासारख्या अगर व्यस्त अंडाकृती, काहीशा केसाळ आणि टोकाजवळ दातेरी असलेल्या चकचकीत पानांचा झुपका असतो. त्यामधून वाढणाऱ्या दांड्यावर ( इंग्लंडमध्ये मार्च ते नोव्हेंबरमध्ये क्वचित हिवाळ्यातही) एकाकी, एकेरी किरण-पुष्पके असलेला आणि २·५–५ सेंमी. व्यासाचा फुलोरा येतो. किरण-पुष्पके जिभेसारखी, स्त्रीलिंगी, पांढरी किंवा गुलाबी असून बिंब-पुष्पके नलिकाकृती, द्विलिंगी व पिवळी धमक असतात. किरण- पुष्पके पांढरी व बिंब-पुष्पके लाल असाही एक प्रकार आढळतो. प्रत्येक स्तबकाला एक किंवा दोन छदमंडले असतात. कृत्स्नफळांवर केसांचा झुबका बहुधा नसतो. स्तबकाचे आणि वनस्पतीचे आकारमान जमिनीवर अवलंबून असते. नवीन लागवड बियांपासून करतात. बागेतील मार्गांच्या दुतर्फा लावल्यास शोभा वाढते. लागवडीत अनेक प्रकार वापरतात. संध्यासमयी आणि ढगाळ हवा पडल्यास किरण-पुष्पके आतील बाजूस वळून फुलोरा मिटतो.

 फ्रान्स, स्कॉटलंड व यॉर्कशर येथे ही वनस्पती भिन्न नावांनी ओळखतात. ‘डबलडेझी’ (बे. पेरेनिस फ्लोरेप्लेनो) या प्रकारात स्तबकातील किरण-पुष्पकांची दोन मंडले असतात. एटना, डबल-क्विल्ड, ॲलाइस, लाँग फेलो आणि ब्राइड हे प्रकार अमेरिकेतील नगरोद्यानांत विशेषकरून लावलेले आढळतात. उ. अमेरिकेतील बहुतेक भागांत दर दोन वर्षांनी त्यांची पुन्हा लागवड करतात कारण दहिवर त्यांना सोसत नाही. आदल्या वर्षी पेरलेल्या बियांची रोपे पुढील वसंतात बाहेर लावतात. त्यांना अधिक उष्णता सोसत नाही, परंतु अनुकूल परिस्थितीत पुढल्या हिवाळ्यापर्यंत फुलांचा मोसम चालू राहतो. भारतात थंड हवेच्या ठिकाणी इंग्लिश डेझीची लागव़ड करतात. मुळाजवळच्या फुटव्यांपासून नवीन लागवड करता येते. सौम्य उन्हाळी हवा चालते असे आढळल्यास तेथेच दुसरा बहार घेता येतो तथापि पहिला बहार संपल्यावर फुटवे काढून घेऊन दुसऱ्या बहाराकरिता लागवडीस घेणे फायद्याचे असते. भरपूर ओलावा असलेली, निचऱ्याची व खतावलेली सकस जमीन या वनस्पतींना मानवते. काहीशी सावलीत, पेट्यांत किंवा उथळ थाळीसारख्या परडीत बिया पेरून रोपे बनवितात व ती सु. पाच सेंमी. उंच झाली म्हणजे वाफ्यात लावतात. लावणी केल्यापासून सु. चार महिन्यांनी फुले येऊ लागतात. विशेष गंभीर स्वरूपाचे रोग किंवा कीड यांपासून या वनस्पतींना फारशी इजा पोहोचत नाही. खडकाळ जमिनीत लावलेल्या कित्येक मांसल व काटक वनस्पतींबरोबर इंग्लिश डेझीची रोपेही लावतात, त्यामुळे ते मिश्रण शोभिवंत दिसते.

संदर्भ : Desai. B. L. Seasonal Flowers, New Delhi, 1962.

चौधरी, रा. मो. परांडेकर शं. आ.