चवळी : (आळसुंदे हिं. लोबिया, लोटा गु. छोला, छोरा क. अळसंदी, तडगुणी सं. राजमाष इ. काऊ-मार्बल काचांग, काचांगपी लॅ.विग्ना काचांग कुल-लेग्युमिनोजी). ⇨गोकर्ण, ⇨उडीद, ⇨अगस्ता यांच्या उपकुलातील (पॅपिलिऑनेटी) ही शिंबावंत (शेंगा येणारी) व अर्धवट वेलीप्रमाणे वाढणारी वनस्पती भारतातील उष्ण भागांत, विशेषतः दक्षिणेत, दुय्यम (मिश्र) पीक म्हणून भरपूर पिकविली जाते. इतर देशांतही हिच्या अनेक प्रकारांची लागवड खत व वैरणीकरिता आहे. ती रानटी अवस्थेत आढळत नाही. पाने एकाआड एक, संयुक्त, त्रिदली व पातळ असतात फुलोरे कक्षास्थ (बगलेत) (परिमंजरीप्रमाणे) व फुले निळसर, पिवळट किंवा लालसर असतात. शिंबा (शेंग) ९–६० X १·२५–२ सेंमी., गोलसर, टपोरी आणि बी (चवळी) लांबट, पांढरट असून नाभी पिंगट असते. हिरव्या व वाळलेल्या चवळ्या (आळसुंदे) उसळीकरिता व पाला भाजीकरिता तसेच गुरांना चारण्याकरिता उपयुक्त असतात. बी रुक्ष, सारक, अम्लीय, क्षुधावर्धक, रूचकर, मूत्रल (लघवी साफ करणारे), वाजीकर (कामोत्तेजक), कफ-पित्तनाशक व पचनास जाड असते काळसर हिरवी शेंग आणि पांढरट पण अधिक लांब जाड शेंग असे दोन प्रमुख प्रकार सामान्य आहेत. ॲस्परॅगस बीन (विग्ना सायनेन्सिन ) या जातीत शेंगा ६०–९० X १·२५ सेंमी. आकारमानाच्या असतात. या जातीचे मूलस्थान मध्य आफ्रिका असून ती सु. २,००० वर्षांपासून आग्नेय आशियात पिकविली जात आहे.

पहा : लेग्युमिनोजी.

परांडेकर, शं. आ.

हे खोल मुळांचे व कमी पावसात तग धरणारे, शेंग वर्गातील जमीन सुधारणारे पीक आहे. हे हंगामी पीक असून त्याच्या वेलीसारख्या वाढणाऱ्या, पसरणाऱ्या अथवा सरळ वाढणाऱ्या अशा निरनिराळ्या जाती आहेत. त्या निरनिराळ्या विभागांत आढळतात. शेंगांची लांबी, दाण्यांचा रंग, पीक तयार व्हावयाला लागणारे दिवस वगैरेंवरून चवळीची जात ओळखतात. लवकर तयार होणाऱ्या जाती दाण्यासाठी किंवा हिरवळीच्या खतासाठी पेरतात. उशिरा तयार होणाऱ्या जाती मिश्रपीक म्हणून खरीप ज्वारी, मका व इतर तृणधान्य पिकांबरोबर पेरतात. अमेरिकेत महत्त्वाचे वैरणीचे पीक म्हणून आणि हिरवळीच्या खतासाठीही लावतात. शेंगभाजीसाठीही ती लावतात.

हवामान : उष्ण हवामानात चवळी चांगली वाढते. दमट हवामानात तिच्यावर निरनिराळे कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग पडतात म्हणून तेथे चवळीची लागवड यशस्वी होत नाही. जास्त थंड हवामानही या पिकाला मानवत नाही. जास्त पर्जन्यमानात हे टिकून राहते.

हंगाम : हे मुख्यतः खरीप हंगामातील पीक आहे, तरी पाण्याची सोय असल्यास उन्हाळ्यातही लावता येते.

जमीन : हलक्या रेताड ते भारी काळ्या अशा सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते. चांगला निचरा असणारी जमीन जास्त मानवते. फार सुपीक जमिनीत वेलांची वाढ खूप होते, परंतु शेंगा कमी लागून दाण्याचे उत्पन्न कमी येते. भात खाचरातील भाताचे पीक काढून घेतल्यानंतर जर त्या खाचरात ओल पुष्कळ दिवस राहण्यासारखी असेल, तर त्या जमिनीतही चवळी दुसोट्याचे पीक म्हणून लावतात.

मशागत : साधारणतः मिश्रपीक म्हणून घेतले जात असल्यामुळे मुख्य पिकासाठी करण्यात येणाऱ्या सर्व मशागतीचा फायदा या पिकाला मिळतो. स्वतंत्र पीक म्हणून चवळी लावावयाची असल्यास एक नांगरट आणि दोन-तीन कुळवण्या देऊन जमीन तयार करतात. जमिनीचा पोत चांगला असेल आणि तिच्यात तण नसेल, तर विशेष मशागत न करताही चवळी पेरता येते.

खत : हेक्टरी २५ टनांपर्यंत शेणखत देतात. भारी प्रकारच्या जमिनीत नायट्रोजनयुक्त खते देण्याची जरूरी नसते. हलक्या जमिनीत मात्र थोड्या प्रमाणात नायट्रोजन दिल्यामुळे फायदा होतो. फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांनी वैरणीचे त्याचप्रमाणे दाण्याचेही उत्पन्न जास्त येते.

पेरणी : जेव्हा मिश्रपीक म्हणून केलेले असते तेव्हा हेक्टरी ६-७ किग्रॅ. पर्यंत चवळीचे बी पेरतात. स्वतंत्र पिकात दोन ओळींत ६० सेंमी अंतर आणि ओळीतील दोन रोपांमध्ये २२ सेंमी. अंतर ठेवतात. दाण्यासाठी लावलेल्या पिकाकरिता हेक्टरी २५ ते ३८ किग्रॅ. व वैरणीसाठी किंवा हिरवळीच्या खतासाठी ५०–७५ किग्रॅ. पर्यंत बी पेरतात. बी फोकूनही पेरतात व वखराने जमिनीत मिसळून घेतात. पाभरीने पेरलेले बी रासणी नावाच्या हलक्या औताने झाकून घेतात. शेंगभाजीकरिता चवळी फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात केव्हाही पेरतात. पेरणीपासून अडीच ते तीन महिन्यांत भाजीयोग्य शेंगा तयार होतात.

आंतर मशागत : पाभरीने पेरलेल्या पिकात आवश्यकतेप्रमाणे निंदणी करून दोन-तीन कोळपण्या देतात. पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी देतात. पीक फुलावर आले की, कोळपणी बंद करतात. पेरणीपासून साधारणतः सहा आठवड्यांनी त्याला फुले येऊ लागतात. फुले येणे अखेरपर्यंत चालू असते.

काढणी : हे जवळजवळ चार-पाच महिन्यांचे पीक आहे. फुले आल्यापासून तीन-चार आठवड्यांत शेंगा तयार होतात. शेंगा पक्व झाल्या म्हणजे वाळू लागतात. लवकर तयार होणाऱ्या जातीमध्ये ७०–८० दिवसांत शेंगा पक्व होतात. पिकाच्या सर्व शेंगा एकाच वेळी पक्व होत नसल्यामुळे त्या जशा पक्व होतील तशा तोडाव्या लागतात व पिकातील निम्म्याच्यावर शेंगा पक्व झाल्याचे दिसून आले म्हणजे ते पीक कापून घेतात. शेंगांची तोडणी आठवड्यातून दोन वेळा याप्रमाणे दीड महिना चालते. वाळलेली वैरण तयार करण्यासाठीच लावलेले पीक त्याच्या शेंगांचा पहिला बहर पक्व होण्याच्या सुमाराला कापून घेतात. हिरवळीच्या खतासाठी लावलेले पीक फुलावर आल्याबरोबर कापून नांगराने जमिनीत गाडून टाकतात.

कोष्टक क्र. १. चवळीच्या हिरवळीच्या खतातील पोषक द्रव्ये (शेकडा प्रमाण). 

चवळीच्या झुडपाचा भाग

नायट्रोजन

फॉस्फरस

पोटॅश

खोड, फांद्या वगैरे जमिनीवरील भाग

१·५६

०·५१

१·९३

मुळे

१·१८

०·५५

०·९३

मळणी : तोडून घेतलेल्या पक्व शेंगा अथवा शेंगांसह कापून घेतलेले पीक खळ्यात वाळवून, मोगऱ्यांनी बडवून अगर त्यावर बैलाची पात धरून मळणी करतात आणि तो माल उफणून, दाणे साफ करून पोत्यात भरून ठेवतात. भुसकट गुरांना चारतात.


उत्पन्न : प्रतिहेक्टर ३७०–५०० किग्रॅ. वाळलेल्या दाण्याचे उत्पन्न येते. वैरणीसाठी लावलेल्या पिकाची दर हेक्टरी ७५०–१,००० किग्रॅ. वाळलेली वैरण मिळते आणि दर हेक्टरी ५,०००–६,००० किग्रॅ. हिरव्या शेंगा मिळतात.

सुधारित जाती : नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने चवळीच्या पुढील सुधारित जातींची शिफारस केली आहे.

कोष्टक क्र. २. हिरव्या व वाळलेल्या चवळीच्या दाण्यांचे पृथक्करण (शेकडा प्रमाण)

दाणे

प्रथिने

स्टार्च

वसा

राख

हिरवे

९·४

२३·०

०·५

१·४

वाळलेले

२१·४

६०·८

१·४

३·४

पुसा बरसाती : काहीशी पसरणारी, कमी उंचीची. शेंगा २०–२५ सेंमी. लांब, फिकट हिरव्या रंगाच्या खरीप हंगामासाठी चांगली, ४५ दिवसांत तयार होते. हेक्टरी ३,५००–५,५०० किग्रॅ. कोवळ्या शेंगाचे उत्पन्न येते.

पुसा फाल्गुनी : झाड बुटके व झुडपासारखे. शेंगा १२ सेंमी. लांब, गडद हिरव्या. १२० दिवसांत तयार होते. उन्हाळी पिकासाठी उत्तम आहे.

पुसा दो फसली : झाड बुटके, शेंगा १८–२० सेंमी. लांब, हिरव्या. डोंगराळ व सखल प्रदेशांसाठी चांगली. ४० दिवसांत फुलावर येते, खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामांसाठी चांगली, उत्पन्न चांगले येते.

ग्वाल्हेर – के १४ : मध्य प्रदेश कृषी विभागाने शिफारस केलेली. दाणे मध्यम आकाराचे, पांढरे. हेक्टरी १,२५० किग्रॅ. उत्पन्न येते.

संदर्भ : Kumar, L. S. S. and others, Agriculture in India, Bombay, 1963.

नानकर, ज. त्र्यं चौधरी, रा. मो.