आंबा : (हिं. आम गु. आम्री, आंबो क. माविण हण्णु सं. चूत, आम्र इं. मँगो ट्री लॅ. मँजिफेरा इंडिका, कुल–ॲनाकार्डिएसी). एक प्रसिद्ध, सदापर्णी, १५-२५ मी. उंच वृक्ष. घेर ४-५ मी. व आकार घुमटासारखा. साल जाड, गर्द करडी किंवा काळपट, खरबरीत, भेगाळ, खवलेदार. पाने साधी, कोवळेपणी लालसर, नंतर तपकिरी, शेवटी गर्द हिरवी, चकचकीत, लांबट भाल्यासारखी, एकाआड एक, चिवट फुले एकलिंगी व द्विलिंगी, एकाच झाडावर, लहान, लालसर किंवा पिवळट व तिखट वासाची, परिमंजरीत (मोहोर) जानेवारी-मार्चमध्ये येतात. संदले व प्रदले ४-५ सुटी केसरदले ४-५ पण एकच फलनक्षम व बिंबाच्या आत किंजपुटात एकच कप्पा व एक बीजक [→ फूल]. फळे अश्मगर्भी (कोय असलेली), गोलसर, पिकल्यावर पिवळी लालसर किंवा फिकट हिरवी व गोड रसाळ असून मे-जूनमध्ये येतात बी एक, फुगीर, चपटे व मोठे असते.[ॲनाकार्डिएसी].

भारतात आंब्यांची लागवड सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून होत असावी व त्याचे मूलस्थान आसाम, ब्रह्मदेश किंवा सयाम असावे, असे मानतात. हल्लीची लागवडीतील जाती ही मँजिफेरा इंडिकाव मँ. सिल्व्हॅटिका यांची संकरज (मिश्र संतती) असावी. हिचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आंबा फळ भारतात अत्यंत लोकप्रिय असून जगातल्या उत्कृष्ट फळांपैकी एक आहे. हिंदूंच्या अनेक धार्मिक विधींत याची पाने, मोहोर व फळे पवित्र व आवश्यक मानतात. कच्ची फळे (कैऱ्या) लोणची, मुरंबे व पन्हे यांकरिता आणि पक्की फळे खाण्यास व मिठाईकरिता उपयुक्त. खोडाच्या सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमावण्यास आणि रेशीम, सूत व लोकर रंगविण्यात वापरतात. लाकूड- बांधकाम, शेतीची अवजारे, खोकी इत्यादींकरिता उपयोगी पडते. पक्व फळ सारक, मूत्रल व गर्भाशयातून किंवा फुप्फुसातून होणाऱ्या रक्तस्रावावर उपयुक्त बिया दम्यावर फळाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) उत्तेजक व शक्तिवर्धक. गुरे पाला आणि फळांच्या साली खातात.

जमदाडे, ज. वि.

भारतात आंब्याची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचा पुरावा संस्कृत वाङ्मयातून मिळतो. आग्नेय आशियामधील सर्व देशांत, विशेषत: भारत, मलाया आणि फिलिपीन्समध्ये त्याला महत्त्व आहे. ऑस्ट्रेलिया, आग्नेय आफ्रिका, हवाई, मध्य व द. अमेरिका, ईजिप्त, इझ्राएल या प्रदेशांतही आंब्याची लागवड होते.

आंबा. (१) परिमंजरीसह फांदी, (२) फूल (वंध्य केसरदले दाखविलेली नाहीत, फक्त उपयुक्त असे एकच केसरदल दाखविले आहे), (३) फुलाचा उभा छेद, (­­­­­­­­­४) अश्मगर्भी फळाचा उभा छेद.

आंब्याचे मुख्य भेद दोन, एक रायवळ किंवा गावठी व दुसरा कलमी. जाती अनेक आहेत. काही तज्ज्ञ इससाल नावाच्या चांगल्या जातीच्या बीच्या रोपापासून तयार केलेला आणखी एक प्रकार असल्याचे सांगतात. तो महाराष्ट्रातच असावा. रायवळ झाडाचा विस्तार वाढून तो मोठा वृक्ष बनतो. फळांचा आकार, स्वाद, रंग, गराची सांद्रता (दाटपणा) वगैरे गुण प्रकाराप्रमाणे निरनिराळे असतात. झाडे शेकडो वर्षे जगतात. कलमाची झाडे रायवळासारखी होत नाहीत. कलमीतही अनेक प्रकार आहेत. कलमीचे आयुष्य सु. शंभर वर्षांपर्यंत असते. नामवंत व्यापारी जातींची  लागवड कलमांनीच करतात. एकट्या भारतातच १,००० च्या वर प्रकार लागवडीखाली आहेत. भारतातील निरनिराळ्या राज्यांत हजारो हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशाचा क्रमांक पहिला लागतो. महाराष्ट्रातील हापुसाची ख्याती जगभर असून त्याचा अमेरिका, इंग्लंड, रशिया वगैरे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत शिरकाव झालेला आहे. आंबा प्रामुख्याने उष्ण प्रदेशातील असून त्याला अतिशीत हवामान किंवा थंडीचा कडका सोसवत नाही. समुद्रसपाटीपासून १,५०० मीटरांपेक्षा जास्त उंचीवरील कडक थंडी असलेल्या जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील टेकड्यांचे प्रदेश सोडून बाकीच्या सर्व भारतात आंब्याची लागवड होते.

जमीन: आंबा अनेक प्रकारच्या जमिनींत वाढतो. निचऱ्याची खोल जमीन त्याला चांगली मानवते. गाळवट खोल जमीन व जांभ्या खडकाची जमीन आंब्यासाठी उत्तम. लवणयुक्त, खडकाळ जमीन अयोग्य. महाराष्ट्राच्या देशभागातील मध्यम काळ्या, निचऱ्याच्या, खोल आणि खाली मुरमाचा थर असलेल्या जमिनीत आंब्याची लागवड यशस्वी होते.

लागवड: रायवळ आंब्याची, रोपे लावून आणि उत्कृष्ट जातीची रायवळ आंब्यावर केलेली कलमे लावून, लागवड करतात. आंब्याचे रोप लावले असता त्याची फळे मातृवृक्षाच्या फळासारखीच सर्वगुणयुक्त निघत नाहीत. म्हणून रोपाऐवजी ज्या गुणधर्माची फळे हवी असतील तशीच फळे येणाऱ्या झाडापासून निरनिराळ्या प्रकारची कलमे करून घेऊन लावावी लागतात. आंब्याच्या कलमांचे (१) डोळ्याचे फोरकर्ट कलम, (२) भेट कलम, (३) खुंटीचे कलम, (४) बगल कलम, (५) आंब्याच्या तोडलेल्या फांद्यांच्या फुटीवरील कलम, (६) खोगीर कलम आणि (७) जिभली कलम असे प्रकार आहेत. यांपैकी भेट कलम आणि फोरकर्ट कलम हे प्रकार जास्त प्रचारात आहेत [कलमे].

कलमे ९ – १० मी. अंतरावर आणि रायवळ रोपे १२ ते १८ मी. हमचौरस अंतरावर लावतात. आंब्याची कलमे लावण्यासाठी सु. १ X १ X १ मी. मोजमापाचे खड्डे उन्हाळी हंगामात खणून पावसाळा सुरू होईपर्यंत उघडे ठेवून उन्हात तापू देतात. पाऊस सुरू होण्यापूर्वी खड्ड्याच्या तळाशी शेणखत, राख, हाडांचा चुरा घालून खड्डा खणताना निघालेली माती खड्ड्यात जमिनीचा सपाटीच्या १०–१५ सेंमी. येईल इतकी घालून खड्डा भरतात. पावसाने खड्ड्यातील माती दबून बसून तिच्यामध्ये पोकळी राहत नाही. या खड्ड्यात ऑगस्टअखेर पाऊस कमी झाल्यावर कलम लावतात. त्याच वेळी ते वाऱ्याने हेलपाटून त्याला अपाय होऊ नये म्हणून त्याच्याजवळ काठी रोवून तिला ते बांधतात. लावल्याबरोबर पाणी देतात. नंतर काही दिवसांनी कलम करताना जोडावर बांधलेली सुतळी सोडवून टाकतात. ती न काढल्यास अपाय होऊन कलमाची वाढ खुंटते.

भारतातील आंब्याच्या काही नामांकित जाती व त्यांच्या लागवडीचे मुख्य प्रदेश

खत : भारी पावसाच्या प्रदेशात एक वर्षाच्या कलमाला ४­­­­­­­­­·५ किग्रॅ. शेणखत., ०­­­­­­­­­·४५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट, २­­­­­­­­­·२५ किग्रॅ. हाडांचा चुरा आणि ०­­­­­­­­­·४५ किग्रॅ. पोटॅशियम सल्फेट याप्रमाणे खतमिश्रण सप्टेंबरमध्ये घालतात. देशावर ते जून-जुलैमध्ये घालतात. हे प्रमाण पुढे दर वर्षाला ४­­­­­­­­­·५ किग्रॅ. शेणखत, ०­­­­­­­­­·४५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट, ०­­­­­­­­­·२५ किग्रॅ. हाडांचा चुरा आणि ५५ ग्रॅं. पोटॅशियम सल्फेट प्रमाणे दर झाडाला वाढवीत जाऊन १० व्या वर्षी ४५ किग्रॅ. शेणखत ,४­­­­­­­­­·५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट, १ किग्रॅ. पोटॅशियम सल्फेट आणि ४­­­­­­­­­·५ किग्रॅ. हाडांचा चुरा देतात. पुढे अखेरपर्यंत हे प्रमाण कायम ठेवतात. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये हाडांचा चुरा आणि पोटॅशियम सल्फेट वापरीत नाहीत.

पाणी : लागवड केल्यानंतरची पहिली काही वर्षे पाऊस न पडणाऱ्या काळात ८ ते १० दिवसांनी पाणी देतात. पुढे जरूरीप्रमाणे. जेथे जास्त पाऊस पडतो व हवामान दमट असते अशा भागांत मोठ्या वाढलेल्या झाडांना पाणी देण्याची प्रथा नाही.

आंतरमशागत: लागवडीनंतरची पहिली ४-५ वर्षे लागवडीमध्ये पोटपिके घेतात. त्यांना दिलेल्या आंतरमशागतीचा फायदा आंब्याच्या पिकाल मिळतो.

उत्पन्न : कलमी आंब्यांच्या लागवडीमध्ये केलेल्या भाजीपाल्याच्या पोटपिकांच्या विक्रीपासून मालकाला काही उत्पन्न मिळते. कलमांची निगा मात्र चांगली राखली जाते. या चार वर्षाच्या काळात कलमाला आलेला मोहोर काढून टाकतात. कलमाच्या वाढीप्रमाणे चौथ्या किंवा पाचव्या वर्षी आलेला मोहोर राखतात. त्यापासून मिळालेली फळे अगदी थोडी असतात. पुढे त्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत जाऊन पंधराव्या वर्षापासून पुढे २५ –३० वर्षे उत्पन्न चांगले येते. त्यानंतर ते कमी कमी होत जाऊन ७०–७५ वर्षे वयाच्या कलमापासून किफायतशीर उत्पन्न मिळेनासे होते. वीस वर्षांच्या कलमाला कोकणात एका हंगामात १,००० ते २,००० आंबे येतात. कोकणभागात आंब्याला जास्त फळे लागतात. समुद्रकिनाऱ्यापासून आतल्या भागात सरासरीने हापूसला  ५०० ते १००० आणि पायरील ८०० ते १,५०० फळे दर झाडाला एका हंगामात येतात. आंब्याच्या झाडाला नियमितपणे दर वर्षी फळ लागत नाही. याला अपवाद तोतापुरी आणि निलम हे प्रकार होत. या प्रकारांना नियमितपणे दरसाल फळे लागतात. कलमी आंब्यांना एक वर्षी पुष्कळसे फळ लागले तर दुसऱ्या वर्षी कमी लागते. तिसऱ्या वर्षी त्याच्याहून कमी लागते अगर बिलकूल लागतच नाही. सामान्यत: आंब्याला मोहोर यावयाचा काळ उत्तर भारतात फेब्रुवारी आणि महाराष्ट्रात भूभागाप्रमाणे नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने असा असतो. मोहोर फुटण्याच्या वेळी हवामान कोरडे असावे लागते. मोहोर निघाल्यापासून ४-६ महिन्यांत आंबे पक्व होतात. पक्वता ओळखण्याचे लक्षण म्हणजे फळांचा हिरवा रंग बदलून फिकट पिवळ्या रंगाची झाक त्यांच्यावर येते. काही प्रकारांत निरनिराळ्या रंगाच्या छटा फळावर दिसू लागतात. पाडाला (पिकण्याच्या अवस्थेला) आलेले आंबे सुरक्षितपणे झाडावरून उतरवून घेण्याकरिता जाळीची पिशवी करून तिचे उघडे तोंड लोखंडी कड्याला शिवतात. त्यावर दोन लोखंडी पट्ट्या एकमेंकीनां मध्यभागी ४५ कोन करतील अशा ठेवून त्याची चारही टोके कड्याला भक्कमपणे बांधून ते कडे लांब बांबूच्या टोकाला घट्ट बांधून‘झेली’ नावाचे साधन तयार करतात. माहीतगार माणूस आंब्यावर चढून या झेलीने तयार झालेले आंबे अलगदपणे काढून घेऊन एका पोत्यात घालून झाडाखालच्या माणसाकडे देतो. ते पुढे बंदिस्त जागेच्या जमिनीवर पसरलेल्या पानांच्या थरावर दोन दिवस पसरून ठेवून टणक असतानाच भाताचा पेंढा भरलेल्या करंडीत अगर लाकडी खोक्यात मोजून भरतात व विक्रीकरिता पाठवितात. यात जखमी फळ घेत नाहीत कारण ते वाटेत नासून जाते. मालाच्या निर्यातीसाठी करंड्यापेक्षा खोकी चांगली असून त्यांतील फळे प्रवासात खराब होत नाहीत. तसेच खोकी पुन्हा वापरता येतात.

उपयोग : रायवळ आंब्यातही काही झाडे रसाळ व मधुर फळांची असतात. त्यांच्यातील बऱ्याच जातींचा गर पातळ असतो. असले आंबे गर चोखून खाण्यासाठी, आंबरसपोळी करण्यासाठी किंवा गोड खाद्य म्हणून वापरतात. रायवळ जातींतही काही पक्व फळांचा दाट रस वा फोडी निघतात. कलमी झाडांची पक्व फळे फोडी करून खातात. आंब्याचा रस काढून तो हवाबंद बाटल्यात अगर डब्यात भरून साठवून आंब्याच्या हंगामानंतरच्या काळात वापरतात. पक्व कलमी आंब्याचा गर घट्ट व मधुर असतो. आणि त्याच्यामध्ये तंतू नसतात. तोतापुरी, नीलम वगैरे प्रकारच्या आंब्यांचा गर फार घट्ट आणि टणक असतो. असले आंबे जास्त दिवस टिकतात, पण ते हापूस, लंगडा, फर्नोदीन वगैरेपेक्षा स्वाद व गोडीच्या दृष्टीने कमी प्रतीचे गणले जातात. आंब्याच्या रसात साखर आणि अ व क जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात. कोयीमधील डाळिंब्या (दळे) आदिवासी लोक भाजून किंवा वाळवून पीठ करून खातात. अन्न म्हणून भाताइतक्या  त्या उपयुक्त असतात. त्यांच्यामध्ये मांसोत्पादक घटक (प्रथिने) जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या गुरांच्या खुराकासाठी उपयुक्त असतात. मोठ्या झाडांच्या ओंडक्यामधून करवतून काढलेल्या फळ्या होड्या बांधण्यासाठी व इतर वस्तूंसाठी आणि बाकीचे लाकूड सरपणासाठी वापरतात.

पाटील, ह. चिं.

कीड: (१) खोडकिडा: कीटकाच्या मादीने झाडाच्या सालीवर घातलेल्या अंड्यातून निघालेल्या पिवळसर रंगाच्या अळ्या सालीखालचे खोडही पोखरतात. अळीने गाभा पोखरल्यामुळे फांदी किंवा खोड वाळून झाड मरते. उपाय म्हणून साधे पेट्रोल किंवा दोन भाग कार्बन डायसल्फाइड, एक भाग क्लोरोफॉर्म व क्रिओसोटाचे मिश्रण अळीने पाडलेल्या भोकात पिचकारीने मारून भोक चिखलाने बंद करतात. विषारी वाफेने अळ्या मरून जाऊन झाड वाचते.


(२) तुडवडे: तुडवडे आणि त्यांची पिल्ले कोवळ्या पानांतील आणि फुलातींल रस शोषून घेतात. मोहोर येण्याच्या सुरूवातीला या कीटकांचा उपद्रव ऊद्भवतो त्यामुळे मोहोर गळून पडतो. ह्याच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट गोड पदार्थावर बुरशी वाढते. त्यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के डीडीटी+गंधक, मिश्रण प्रमाण १: ४ किंवा ०­­­­­­­­­·०२ टक्के एंड्रीन+गंधक समप्रमाण मिश्रण घेऊन मोहोर निघाल्याबरोबर त्यावर पिस्कारतात.

यांशिवाय फळमाशी, वाळवी, सोंडकिडे, देवीकिडे वगैरे कीटकांपासूनही आंब्याच्या पिकाला नुकसान पोचते.

दोरगे, सं. कृ.

रोग : आंब्यावर मोहोरावरील भुरी, काजळी, करपा व पानावरील डाग असे रोग पडतात. (१) भुरी : हा रोग ओइडियम मँजिफेरी  कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) डिसेंबर-फेब्रुवारीच्या दरम्यान मोहोरावर पडतो. रोगामुळे मोहरावर व दांड्यावर कवकाची पांढुरकी वाढ होते. ढगाळ व दमट हवा पडल्यास रोग वाढतो. या सुमारास तुडतुड्यांचाही उपद्रव होतो. व या दोहोंमुळे मोहोरातील रस शोषला जाऊन तो जळतो व त्यामुळे उत्पन्न घटते. यासाठी ३०० मेश (मेश हे कणांच्या आकारमानाचे माप आहे.) गंधक व दहा टक्के डीडीटी समप्रमाणात मिसळतात व ते मिश्रण डिसेंबर, जानेवारी व फेब्रवारीत नवीन मोहोरावर दर झाडास दर वेळी दीड किग्रॅ. या प्रमाणात २-३ वेळा मारल्याने भुरी रोगाचा व तुडतुड्यांचा नाश होतो. तुडतुड्यांच्या अंगातून स्रवणारा गोड व चिकट रस पानांवर गळतो. त्यावर कॅप्तोडियम किंवा मेलिओला जातीचे कवक वाळते. त्यासच ‘काजळी’ म्हणतात. त्यासाठी तुडतुड्याचा नाश करतात. (२) करपा :हा रोग कॉलिटॉट्रिकम ग्लिओस्पोरिऑयडिस तसेच फोमॉप्सीस जातीच्या कवकामुळे होतो. रोगामुळे फारसे नुकसान होत नाही. (३) पानांवरील डाग : हा रोग स्यूडोमोनस मँजिफेरी इंडिकी या सूक्ष्मजंतूमुळे होतो. रोगामुळे फारसे नुकसान होत नाही. (४) बांडगुळे : ही आंब्यावर वाढल्यामुळे फळाचे उत्पन्न घटते. उपाय म्हणून संबंधित फांद्या छाटतात.

कुलकर्णी, य. स.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth  of  India, Raw Materials Vol, VI, New Delhi, 1962.

2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.

3. Sing. L. B. The Mango, London, 1960.

४. नागपाल, र. ला. अनु. पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्धती, मुंबई, १९६१.