रताळे :(हिं. मीठा आलू, शकरकंद गु. साकरिया, कणांगी क. गेणसू सं. रक्त्तआलू, पाटलाम इं. स्वीट पोटॅटो लॅ. आयपोमियाबटाटाज कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशातील असून ती बहुधा पॅसिफिक बेटांद्वारे भारतात आली असावी. ही बारीक जमिनीसरपट वाढणारी अथवा आरोही, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधीय [⟶ ओषधि] वेल असून मुळे ग्रंथिल (मांसल) आणि पिठूळ असतात. पाने साधी, एकाआड एक, भिन्न आकारांची, अंडाकृती-हृदयाकृती, २·५ ते ८·७५ सेंमी. लांब, खंडित अथवा अखंडित असतात. फुलोऱ्याचा देठ पानाच्या देठाइतका किंवा अधिक लांब असतो फुले पांढरी अथवा जांभळ्या रंगाची, नसराळ्याच्या आकाराची, ५ सेंमी. लांब, एकाकी अथवा वल्लरीत येतात. फळ (बोंड) गोल अथवा अंडाकार, तपकिरी असून बिया २–४, लहान, काळ्या व काहीशा चपट्या असतात.

ग्रंथिल मुळे (रताळी) मुख्य खोडाच्या तळाशी अथवा जमिनीवर सरपटत वाढणाऱ्या वेलीच्या पेऱ्यांशी येतात. एका झाडाला ४०–५० निरनिराळ्या आकारांची रताळी येतात. त्यांची लांबी ६-७ सेंमी. पासून ३० सेंमी.पर्यंत असून त्यांचा आकार सूताच्या गिरणीतील चातीसारखा अथवा गोल असतो. पृष्ठभाग गुळगुळीत वा खडबडीत असतो. सालीचा रंग पांढरा, मलईसारखा पिवळा, तपकिरी, सोनेरी, बिरंजी, लाल, जांभळा अथवा गुलाबी व मगज (गर) पांढरा, पिवळा, लाल अथवा जांभळ्या रंगाच्या छटांनी युक्त असतो. एका रताळ्याचे वजन ५० ते १०० ग्रॅ.पासून १ किग्रॅ.पर्यंत अगर त्याहीपेक्षा जास्त असते. सुपीक जमिनीत १·५ ते ६ किग्रॅ. वजनाची रताळी आढळून येतात.

हे कंदमुळाचे पीक आफ्रिका खंडातील उष्ण कटिबंधात सर्वत्र आणि उपोष्ण कटिबंधातील काही भागांत, तसेच भारत, चीन, जपान, मलेशिया, पॅसिफिक बेटे, अमेरिका खंडाच्या उष्ण कटिबंधातील देश व अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांत लागवडीत असून बटाट्याच्या खालोखाल त्याला महत्त्व देण्यात येते. ३५ उ. अक्षांशापलीकडील प्रदेशात या वनस्पतीला फुले येत नाहीत. ३० ते ३५ उ. अक्षांशाच्या प्रदेशात लागवडीच्या विशिष्ट पद्धतीतच फुलापासून बी मिळते. उष्ण कटिबंधातील प्रदेशात या वनस्पतीला फुले येतात व बीजधारणाही होते. [⟶ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी मूळ-२].                                 

                                                                                                                                                                                                                                                                 जमदाडे, ज. वि.

भारतात रताळ्याची लागवड बहुतेक सर्व राज्यांत कमीजास्त प्रमाणात होते. देशातील कंद पिकांत रताळ्याला बटाट्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. १९८०-८१ साली भारतात या पिकाखाली २,८०,१२० हे. क्षेत्र आणि १४,८३,४९० टन उत्पादन होते. बिहार, उत्तर प्रदेश व आसाम या तीन राज्यांत देशातील एकूण क्षेत्रापैकी सु. ५०% क्षेत्र होते. कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्र ही राज्ये क्षेत्राच्या बाबतीत वरील राज्यांच्या खालोखाल महत्त्वाची असली, तरी वरील तीन राज्यांच्या तुलनेने या राज्यांतील क्षेत्र पुष्कळच कमी होते. महाराष्ट्रात त्या वर्षी ६,६०० हे. क्षेत्र आणि ९०,००० टन उत्पादन होते. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जिल्ह्यांत या पिकाची लागवड केली जाते परंतु सातारा, सोलापूर, पुणे, नासिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त क्षेत्र आहे.

रताळ्यचे सुधारीत प्रकार : (अ) पुसा सफेद (आ) पुसा लाल

प्रकार :भारतात लागवडीत असलेले रताळ्याचे प्रकार मुख्यत्वेकरून पांढऱ्या अथवा लाल सालीचे असतात (क्वचित तपकिरी सालीचीही रताळी आढळून येतात). मगजाचा रंग पांढरा असतो. लाल सालीची रताळी पांढऱ्या सालीच्या रताळ्यांपेक्षा जास्त गोड असतात व त्यांचा मगज रेषाळ नसतो. पांढऱ्या सालीची रताळी बहुधा एकसारख्या आकाराची असून ती जास्त दिवस टिकतात. उत्तर भारतात लाल आणि दक्षिण भारतात पांढरी रताळी जास्त पसंत करतात.

नवी दिल्ली येथील इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने पुसा सफेद (अथवा व्ही – २), पुसा लाल व पुसा सुनहरी या सुधारित प्रकारांची लागवडीसाठी शिफारस केली आहे. पुसा सफेद हा पांढऱ्या सालीचा व पांढऱ्या मगजाचा प्रकार असून रताळी लांबट आकाराची व टिकण्यास चांगली असतात. शिजल्यावर मगज मलईच्या रंगाचा व गोड असतो परंतु रेषाळ नसतो. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत हा प्रकार लागवडीस योग्य आहे. पुसा लाल या मुळच्या जपानी प्रकाराची रताळी लाल सालीची, मध्यम आकारमानाची व मध्यभागी फुगीर असतात. मगज पांढरा असतो. रताळी साठवणीत चांगली टिकतात. बी. ४००४ हा अमेरिकन रताळ्याचा निवड पद्धतीने विकसित केलेला प्रकार महाराष्ट्र राज्यात लागवडीत आहे. ही रताळी लांब, आकारमानाने मोठी, चातीच्या आकाराची व पांढऱ्या सालीची असून त्यांवर दोन्ही टोकाकडे लाल अथवा जांभळट रेषा असतात. त्रिवेंद्रम येथील सेंट्रल ट्यूबर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे एच. ४२ हा संकरित प्रकार लागवडीसाठी देण्यात आला आहे. कोकणाच्या हवामानात संकरित एच. २६८ हा नवा प्रकार स्थानिक प्रकारांपेक्षा २०% जास्त उत्पन्न देतो.

 


हवामान :रताळ्याच्या वाढीसाठी ४ ते ५ महिन्यांपर्यंत उबदार व दमट हवामानाची जरूरी असते. पीक तयार होण्याच्या सुमारास हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी असावे. सरासरी तापमान सु. २४ से.च्या वर व विभागून पडणारा ७५ ते ९० सेंमी पाऊस असलेल्या प्रदेशात या पिकाची वाढ चांगली होते. हवेचे तापमान हिमतुषाराच्या पातळीपर्यंत खाली गेल्यास या पिकाला अपाय होतो परंतु अवर्षणाच्या काळात हे पीक तग धरून राहते. पाऊस फार कमी असलेल्या भागात पाणी देण्याची सोय असणे आवश्यक असते.

हंगाम :रताळ्याची वनस्पती बहुवर्षायू असली, तरी लागवडीखाली ती वर्षायू असते. उत्तर भारतातील उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात या पिकाची उन्हाळी हंगामात लागवड करण्यात येते. बिहार व बंगालच्या काही भागांत वर्षातून दोन पिके घेतात. दक्षिण भारतातही या पिकाची लागवड निरनिराळ्या हंगामांत जवळजवळ वर्षभर करण्यात येते. जास्त पावसाच्या प्रदेशात हे पीक डोंगराच्या उतारावर अथवा पावसाळ्याच्या शेवटी घेतात.

जमीन :हे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत घेता येते परंतु मध्यम कसाची, पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत जमीन या पिकाला चांगली मानवते. मातीचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ५·८ ते ६·७ असावे. उथळ किंवा फार भारी जमीन उपयुक्त नसते. भारी जमिनीत पालेवाढ फार होऊन रताळी कमी लागतात आणि ती ओबडधोबड व वेड्यावाकड्या आकाराची असतात. योग्य प्रमाणात भरखत व कृत्रिम खत दिल्यास हलक्या प्रकारच्या जमिनीमध्येही या पिकाची वाढ चांगली होते. एकाच शेतात हे पीक सतत घेत नाहीत कारण ते जमिनीतील अन्नांश झपाट्याने शोषून घेते.

मशागत :जमीन सु. १५ सेंमी.पर्यंतच खोल नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करतात. जास्त खोल नांगरल्यास रताळी लांब वाढून बारीक राहतात. कुजलेले शेणखत हेक्टरी ७·८ टन (हलक्या जमिनीत २५ टन) शेतात पसरून कुळवाच्या पाळ्या घालून जमिनीत मिसळतात. हिरवळीचे खत केलेल्या जमिनीत हे पीक चांगले येते. भारी जमिनीत अथवा पूर्वीच्या पिकाला भरपूर खत दिले असल्यास रताळ्याच्या पिकाला कोणतेही खत देण्याची सहसा जरूरी नसते.

लागवड :वर उल्लेख केल्याप्रमाणे जमीन तयार केल्यानंतर सु. ४५–६० सेंमी. अंतरावर २५ ते ३५ सेंमी. खोल सऱ्या पाडतात. जमिनीच्या उताराप्रमाणे सऱ्यांची लांबी २-३ मी. ठेवून वाफे तयार करतात.

महाराष्ट्रात रताळ्याची लागण साधारणपणे मार्च, जुलै व नोव्हेंबर या महिन्यांत करतात. बेण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या रताळ्याच्या रोगमुक्त वेलीच्या शेंड्याकडील भागाचे, साधारणतः चार ते सहा डोळे असलेले व २०–२५ सेंमी. लांबीचे तुकडे घेतात. पाणी सोडून भिजविलेल्या सऱ्यांमधील वरंब्याच्या दोन्ही बाजूंच्या उताराच्या मध्यावर बेणे खोचून लावतात. बेणे लावताना त्याचा मध्यभाग भिजलेल्या मातीत हळुवारपणे खोचून त्यावर ओली माती दाबतात. बेण्याची दोन्ही बाजूंची टोके जमिनीवर उघडी राहतात व बेण्याचा सु. एक तृतीयांश भाग जमिनीत पुरला जातो. बेण्याची लागण वरंब्याच्या दोन्ही बाजूंना परंतु एकाआड एक अशी करतात. दोन बेण्यांत २५–३० सेंमी. अंतर ठेवतात. लागवडीसाठी लागणाऱ्या बेण्याचे प्रमाण जमिनीचा प्रकार, रताळ्याचा प्रकार, दोन सऱ्यांतील व झाडांतील अंतर यांवर अवलंबून असते. सामान्यतः हेक्टरी ४०,००० ते ७५,००० बेणे लागते.

वरखत :लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी हेक्टरी ७५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट दिल्याने रताळ्याचे उत्पन्न वाढते. हलक्या जमिनीत हेक्टरी २७५ किग्रॅ. सुपरफॉस्फेट व १२५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट देतात.

आंतरमशागतवपाणी :लागणीनंतर साधारणतः १५ दिवसांत बेण्याला मुळे फुटून कोंब येतात. पुढे एक महिन्यानंतर कोंबातून निघालेल्या वेलींची वाढ जोरात होऊ लागते. दोन ते अडीच महिन्यांत वेली लांबवर पसरू लागतात. अशा वेळी शेतात उंच वाढलेली तणे उपटून काढतात. वेलींनी जमीन झाकून गेल्यावर तणांची वाढ होत नाही. वेल स्वैरपणे पसरू दिल्यास पेरावर मुळे फुटून रताळी पुष्कळ लागतात परंतु ती बारीक असतात. यासाठी वेलींची उलथणी करून त्या सरीच्या माथ्यावर मोकळ्या करून टाकतात. असे करण्यामुळे वेलीला वरंब्यामध्ये मुळाजवळ लागलेली रताळी चांगली पोसतात. काढणीपर्यंत वेली २-३ वेळा उलथून टाकाव्या लागतात. तसेच लागलेली रताळी उघडी पडू न देता ती माती घालून झाकून टाकतात. उघडी पडलेली रताळी किडतात व त्यामुळे खाण्यास योग्य नसतात.

पिकाला लागणीच्या वेळी पहिले पाणी दिल्यावर चारपाच दिवसांनी दुसरे पाणी देतात. नंतर जरूरीप्रमाणे दर दहा दिवसांनी पाणी देतात. कोरड्या हवामानात लागणीपासून काढणीपर्यंत ८ ते २० वेळा पाणी द्यावे लागते.

वेल लावल्यापासून तिसाव्या व पंचेचाळीसाव्या दिवशी सायकोसील हे वृद्धिनियंत्रक द्रव्य एक दशलक्ष भाग पाण्यात ५०० ते १,००० भाग या प्रमाणात मिसळून फवारल्यास पालेवाढ कमी होऊन रताळ्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे आढळून आले.

रोग :भारतात रताळ्याच्या पिकावर आढळून येणारे कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे होणारे) रोग विशेष महत्त्वाचे नसतात. ऱ्हायझोक्टोनियासोलॅनीया कवकामुळे खोडकूज हा रोग होतो. वेलीची पाने पिवळी पडतात व खोडाचा आतील भाग काळा पडतो. रोगाचा प्रसार जमिनीमधून किंवा रोगट खोडामार्फत होतो. रोगप्रतिकारक प्रकाराची लागवड करणे हाच एक खात्रीशीर उपाय आहे.

किडी :टोका (सायलासफॉर्मिकॅरिअस) नावाच्या किडीमुळे रताळ्याच्या पिकाचे फार नुकसान होते. या पिकावरील ही सर्वांत महत्त्वाची कीड आहे. किडीच्या अळ्या वेलींना व रताळ्यांना भोके पाडतात. त्यामुळे वेली मरतात व रताळ्यांवर काळे डाग पडतात. डाग पडलेली रताळी लवकर कुजतात. उपाय म्हणून दूषित वेली व रताळी नष्ट करतात, तसेच पीक काढल्यावर शेतातील पिकाचे अवशेष जमा करून ते नष्ट करतात. किडीपासून मुक्त असे बेणे घेऊन ते लावण्यापूर्वी तंबाखूच्या काढ्यात अथवा २% डीडीटीच्या विद्रावात बुडवून काढतात. बेणे लावण्यापूर्वी सरीमध्ये व पिकावर २% डीडीटी भुकटी फवारतात. रताळी किडू नयेत म्हणून ती मातीने झाकण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. वेली लावल्यानंतर एक महिन्याचा कालावधी सोडता दर महिन्याला कार्बारिल ०·१% या प्रमाणात फवारल्यास या किडीचे प्रमाण कमी होते.

काढणी :वेलीची पाने पिवळी पडून गळू लागली म्हणजे पीक तयार झाले असे समजतात. वेली लावल्यापासून साधारणपणे चार ते साडेपाच महिन्यांत पीक तयार होते. पीक तयार झाले किंवा नाही हे ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे रताळे खणून काढून मोडले असता मोडलेल्या भागातील द्रव पदार्थ त्याचा रंग न बदलता वाळतो. असे झाल्यास रताळे काढणीस तयार झाले असे समजतात. रताळे तयार झाले नसल्यास मोडलेल्या भागातील द्रव पदार्थाचा रंग काळा अथवा हिरवट होतो. तयार पिकाच्या वेली प्रथम कापून घेतात. नंतर सु. एक आठवड्यानंतर रताळी खणून काढतात. यामुळे रताळ्याची गोडी वाढते. रताळी खणून काढतेवेळी जमीन कोरडी असणे व खणताना रताळ्यांना जखम होणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक असते. कारण जखम झालेल्या भागातून सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होऊन रताळी कुजतात.


 

उत्पन्न :हे पीक निरनिराळ्या हंगामांत लावले जात असल्याने आणि रताळ्याचा प्रकार, जमीन, खत, पाणी इ. गोष्टींतील फरकांमुळे उत्पन्नात फरक पडतो. सर्वसाधारणपणे हेक्टरी १० ते ३० टन उत्पन्न मिळते. पुसा सफेद या प्रकारचे हेक्टरी उत्पन्न ४० टन मिळाल्याची नोंद आहे. भारतातील रताळ्याचे सर्वसाधारण उत्पन्न जपानच्या एक तृतीयांशच असते.

साठवणी :शेतातून काढलेली रताळी ७ महिन्यांपर्यंत चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात. अमेरिकेत यासाठी रताळी प्रथम ३०  से. तापमान व ८५% हवेतील सापेक्ष आर्द्रता असलेल्या खोलीत ८ ते १० दिवस ठेवतात. त्यानंतर खोलीचे तापमान १० ते १३ से.पर्यंत हलके हलके खाली आणतात. सापेक्ष आर्द्रता ८०% ते ८५% ठेवतात. अशा स्थितीत रताळी ३ ते ७ महिन्यांपर्यंत चांगली राहतात.

भारतात रताळी काढल्यावर ती दिवसा उन्हात वाळवून रात्री ताडपत्रीने झाकतात. सुमारे ८ दिवस अशा तऱ्हेने वाळविल्यानंतर ती हवेशीर खोलीत ठेवतात व खराब झालेली रताळी वेळोवेळी वेचून काढतात. रताळी वाळूत अगर गवतात अथवा खड्ड्यात राखेच्या थरात साठविण्याची पद्धत काही ठिकाणी आढळून येते. त्यांचे काप करून ते उन्हात वाळवून ठेवणे हाही साठवणीचा प्रकार आहे.

रासायनिकसंघटनवउपयोग:रताळ्यात जलांश ६८·५%, प्रथिने १·२%, वसा (स्निग्ध पदार्थ) ०·३%, कार्बोहायड्रेटे २८·२% आणि खनिज पदार्थ १ % असतात. तसेच त्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. त्यातील प्रथिने चांगल्या प्रकारची असून त्यात महत्त्वाची सर्व ॲमिनो अम्ले असतात. साठवणीमध्ये स्टार्चाच्या काही भागाचे शर्करांत रूपांतर होते. तसेच रताळी उकडल्यामुळे त्यांची गोडी वाढते. ती कच्ची, भाजून किंवा उकडून खातात. तसेच त्यांचे काप करून ते वाळवून पीठ करून खातात.

रताळे सारक असून पौष्टिक व बलवर्धक आहे. विंचवाच्या दंशावर त्याचा पाला वाटून लावतात. रताळ्यात व वेलीत कवकनाशक व सूक्ष्मजंतूनाशक गुणधर्म आढळून येतात.

वेल जनावरांना खाऊ घालतात. त्यामुळे दुभत्या जनावरांचे दूध वाढते असे म्हणतात.

अमेरिकेत रताळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते व त्याचा उपयोग औद्योगिक अल्कोहॉल, सरबत, स्टार्च, व्हिनेगर, यीस्ट वगैरेंच्या उत्पादनासाठी करतात. स्टार्चाचा उपयोग कागदाला व कापडाला लावण्याच्या खळीमध्ये करतात. धुलाईच्या धंद्यात रताळ्याचा स्टार्च इतर स्टार्चापेक्षा सरस असल्याचे आढळून आले आहे. तसेच स्टार्चाचा उपयोग बेकरी उत्पादनांत, तयार खाद्यपदार्थांत व सौंदर्य प्रसाधनांतही केला जातो.

संशोधन : त्रिवेंद्रम येथील सेंट्रल ट्यूबर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इतर कंद पिकांबरोबर रताळ्यासंबंधी संशोधन होते. ही संस्था १९६३ मध्ये स्थापन झाली व केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, आसाम व मेघालय या राज्यांत संशोधन केंद्रे आहेत.

संदर्भ :1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

            2. Thomson, H.C. Kelly, W.C. Vegetable Crops, New York, 1957.

           ३. अरकेरी, एच्‌. आर्‌. भाषांतर-पाटील, ह. चिं. पिकांच्याउत्पादनाचीतत्त्वेआणिप्रघात, नागपूर, १९६०.

खुस्पे, व. सी. रुईकर, स. के. गोखले, वा. पु.