पीक संरक्षण : मानवाने इ. स. पू. १५००० ते १२००० या काळात पध्दतशीर शेती सुरू केली आणि जवळजवळ त्या वेळेपासूनच पीक संरक्षणाची समस्या निर्माण झाली असे मानतात. मध्यपूर्वेतील तृणधान्यांची लागवड करणाऱ्या इतिहासकालीन शेतकऱ्यांना टोळधाड आणि तांबेरा रोग [→ तांबेरा ] यांमुळे पिकांचे फार नुकसान होते, ही गोष्ट माहीत होती परंतु तपशीलवार माहिती उपलब्ध होण्यास पुष्कळ वर्षे लोटली. खत, पाणी आणि उत्तम मशागत यांमुळे शेतामध्ये जेवढे पीक निघू शकते त्याचा काही भाग जंगली जनावरे, पक्षी व इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी कीटक आणि इतर अपृष्ठवंशी प्राणी निरनिरळ्या प्रकारचे रोग आणि तणे यांच्या पायी नष्ट होतो. केवळ कीटक व रोग यांमुळे निरनिरळ्या पिकांचे किती नुकसान होते याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने काही पिकांच्या जागतिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे : गहू ३५ %, बटाटे ४० %, ऊस २४ %, सफरचंद ३० %, कापूस ६०%, तंबाखू ६२ % (पिकांचे सैध्दांतिक उत्पन्न पायाभूत धरून नुकसानीचा अंदाज करण्यात आला आहे). महापूर, वादळ, अवर्षण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे प्रसंगविशेषी सर्व पीकच नष्ट होते परंतु प्राणी आणि रोगांपासून करावयाच्या पिकांच्या संरक्षणाचाच सर्वसाधारण विचार प्रस्तुत नोंदीत केलेला आहे.

नुकसान करणारे प्रमुख प्राणी व वनस्पती : (अ) प्राणी (१) जंगली जनावरे : हत्ती, रानडुक्करे, कोल्हा, साळ, हरीण, सांबर, नीलगाय आणि अस्वल ही प्रमुख आहेत. (२) इतर पृष्ठवंशी प्राणी : मोकाट जनावरे, ससा व तत्सम प्राणी, माकड, उंदीर, पक्षी (भोरडा, पोपट, कावळा, चिमणी, कबुतर). (३) अपृष्ठवंशी प्राणी : गोगलगाय व तत्सम प्राणी, खेकडे, माइट (उदा., बटाट्यावरील लाल कोळी), सूत्रकृमी (नेमॅटोड) आणि कीटक. (आ) वनस्पती : निरनिराळी तणे, परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) सपुष्प वनस्पती (उदा., बांडगूळ, अमरवेल इ.), कवक (बुरशीसारख्या हरित द्रव्यरहित वनस्पती), सूक्ष्मजंतू आणि सजीव व निर्जिव यांच्या सीमेवर असणारे व्हायरस.

जंगली जनावरे : जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती काटेरी तारेचे कुंपण घालणे आवश्यक असते. बाभूळ, बोर, करवंद वगैरेंसारख्या काटेरी झाडांच्या फांद्या वापरून हंगामी कुंपण करतात. कुंपण नसल्यास त्यांना मिळेल त्या साधनाने हुसकावून लावणे अगर ठार मारणे हेच उपाय आहेत. मोकाट जनावरांचा उपद्रव सर्वच ठिकाणी असतो व तो गावातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्याने सोडविणे जरूर असते. ससे जाळ्यात (फासात) पकडून किंवा बंदुकीने ठार करतात. मोठा आवाज काढून माकडांना हुसकावून लावतात अथवा त्यांना पकडून दूरच्या जंगलात सोडून देतात. कोल्हे मारण्यासाठी कुचल्याचे विष मांसात घालतात.

पक्षी : पाखरांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रश्न जगभर फार महत्त्वाचा समजला जातो. भारतातही पाखरे धान्याची पिके (विशेषत: ज्वारी व बाजरी) आणि अंजीर, पेरू, द्राक्षे, आंबे व पपई यांसारखी मऊ सालीची फळे यांचे फार नुकसान करतात. कणसातील दाणे तयार होऊ लागल्यापासून पीक काढून घेतले जाईपर्यंत आरडाओरडा करून व गोफणीने दगड मारून पाखरांना हुसकावून लावतात. वटवाघळे रात्रीच्या वेळी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यांनाही उखळीबाराच्या बंदुकीने किंवा डबे वाजवून हूसकावून लावतात.

उंदीर : हे शेतातील व साठविलेल्या पिकांचे फार नुकसान करतात. त्यांचा उपद्रव विशेषेकरुन भात, गहू, भुईमूग व नारळ या उभ्या पिकांना जास्त होतो. गहू व भात या पिकांच्या पक्व ओंब्या तोडून ते शेतातील बिळांत साठवितात. भारतात उंदीर दरवर्षी सु. २३ लक्ष टन धान्य खातात असा अंदाज आहे. उंदरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी (अ) प्राणघातक औषधाच्या गोळ्या पिकात जागोजागी पसरवून ठेवणे, (आ) उंदरांच्या बिळांत विषारी वायू अथवा विषारी भुकटी सोडून त्यांचा नाश करणे [→ कृंतकनाशके] आणि (इ) पिंजरे अगर सापळे पिकात योग्य जागी ठेवून त्यांत सापडलेले उंदीर मारणे हे उपाय आहेत. माडावरील नारळांचे उंदरांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी खोडाच्या साधारणपणे मध्यावर गुळगुळीत पत्र्याची २० ते २५ सेंमी. रुंदीची पट्टी खोडासभोवार खिळे ठोकून बसवितात. पत्र्याची खालची कड खोडापासून १०–१५ सेंमी. दूर असते [→ नारळ].

कीटक : पिकांचे नुकसान करणाऱ्या पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये कीटक सर्वांत जास्त नुकसानकारक आहेत. त्यांची संख्या जमिनीवरील इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे. प्राण्यांच्या एकूण ९ लक्ष जाती आहेत व त्यांपैकी फक्त कीटकांच्याच ६,२५,००० जाती आहेत. त्यांची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणावर होते व ते ध्रुवाजवळील बर्फमय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत सर्वत्र आढळून येतात. मनुष्य, पाळीव पशू आणि वनस्पती यांना सर्वांत हानिकारक या दृष्टीने कीटकांचे महत्त्व एकोणिसाव्या शतकातच सर्वमान्य झाले परंतु सुरुवातीच्या काळात कीटकांच्या जीवनक्रमाचा अभ्यास करण्यापलीकडे विशेष प्रगती झाली नाही, कारण विशेष परिणामी असे कीटकनाशाचे उपचार त्या वेळी उपलब्ध नव्हते.

तणे : पाणी, पोषकद्रव्ये आणि सूर्यप्रकाश यांच्या बाबतीत तणे पिकांशी स्पर्धा करतात. काही तणांच्या मुळांतून बाहेर पडणाऱ्या विषारी पदार्थांमुळे पिकांची वाढ खुंटते व इतर अनेक प्रकारांनी तणे पिकांचे नुकसान करतात.

कवक, सूक्ष्मजंतू व व्हायरस : यांच्यामुळे पिकांचे अनेक रोग उद्‌भवतात परंतु कवकीय रोगांमुळे पिकांचे सर्वांत जास्त नुकसान होते व त्याच्या खालोखाल व्हायरसजन्य रोगांचा क्रमांक लागतो [→ वनस्पतिरोगविज्ञान].

पिकांवरील कीटक, तणे व रोग यांच्या नियंत्रणाच्या पध्दती : यांत्रिक व भौतिकीय पध्दत : यांत्रिक पध्दतीमध्ये कीड व रोग लागलेली झाडे उपटून काढणे, कीटकांची अंडी, अळ्या व कोश गोळा करून त्यांचा नाश करणे, निरनिरळ्या साधनांनी कीटक गोळा करून मारणे. रोगट व वनस्पतीचा रोगग्रस्त भाग कापून काढणे यांचा समावेश होतो. कीटक अथवा रोगाची उत्पत्ती होते तेथेच त्यांचा नाश करणे व त्यांच्या प्रसाराला आळा घालणे हा यांत्रिक पध्दतीचा हेतू असतो. रोगट झाडे अथवा बांधावरील तणे गोळा करून ती जाळणे, सूर्याच्या उष्णतेने अथवा गरम पाण्याने कीटकांचा व रोगजंतूंचा नाश करणे इ. उपायांचा भौतिक पध्दतीत समावेश होतो.

मशागत पध्दत : मशागतीच्या निरनिरळ्या पध्दतींत फेरबदल करून कीटक व रोगांचे नियंत्रण करणे हा या पध्दतीचा उद्देश आहे. पिकाच्या कापणीनंतर नांगरणी करून कीटकांची अंडी, अळ्या व कोश उघड्यावर आणणे, पिकाच्या पेरणीच्या हंगामात बदल करणे, पिकाच्या ओळींत योग्य अंतर ठेवणे, आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करून जमिनीतील जास्त पाण्याचा निचरा योग्य तऱ्हेने करणे, कीटक व रोग यांना आश्रय देणारी तणे व इतर वनस्पती यांचा नाश करणे, एका पिकावरील कीटक व रोग पुढील पिकावर पसरणार नाहीत अशा तऱ्हेने पिकांची फेरपालट करणे इ. उपायांचा समावेश या पध्दतीत होतो.


जैव पध्दत : या पध्दतीत कीटक, तण अथवा रोगकारकांच्या नैसर्गिक शत्रूंच्या वाढीला प्रोत्साहन देतात अथवा त्यांची कृत्रिम रीत्या वाढ करून ते पिकात सोडतात. नैसर्गिक शत्रू प्राणी, कवक, सूक्ष्मजंतू अथवा व्हायरस या प्रकारातील असून त्यांच्यामुळे कीटक, तण अथवा रोगकारकाचा नैसर्गिक पध्दतीने समूळ नाश करणे अगर त्यांची संख्या कमी करणे हा उद्देश असतो. काही बाबतींत हा प्रयोग पुष्कळच यशस्वी झाला आहे. उदा., केन्यातील कॉफीच्या झाडांवरील पिठ्या कीटकांच्या नियंत्रणास ही पध्दत पुष्कळशी कारणीभूत आहे. फिजी बेटांतही या पध्दतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ऑस्ट्रेलियात आणि भारतात शेतजमिनीत वाढणाऱ्या निवडुंगाचा नाश कॉकस कॅक्टी जातीचे कीटक झाडांवर सोडून करण्यात आला. हवाई बेटांत घाणेरी (टणटणी) नावाच्या वनस्पतीचा टेलिओनेमिया लॅन्टानी जातीचे कीटक वापरून नाश करण्यात यश मिळाले आहे. हवाई व फिजी बेटांत घाणेरी (टणटणी) या वनस्पतीचा ऑर्थेझिया इनसिग्निस, ऑफिओमाइया (अँग्रोमायझा) लॅन्टानीटेलिओनेमिया स्कूप्यूलोझा या जातींंचे कीटक वापरून नाश करण्यात यश मिळालेले आहे. हे कीटक घाणेरीच्या खोड, पाने, फुले व बिया या भागांवर उपजीविका करीत असल्याने या वनस्पतींच्या वाढीला प्रतिबंध होतो. कीटकांमुळे झाडांची वाढ खुंटते व काही वर्षांनी ती झाडे मरतात असे आढळून आले आहे. कीटकांप्रमाणे कवक, सूक्ष्मजंतू आणि व्हायरस यांचाही उपयोग जैव पध्दतीत करण्यात येतो.

जैव पध्दतीचा वापर फार विचारपूर्वक व पूर्ण संशोधनानंतरच केला पाहिजे. या पध्दतीत वापरले जाणारे कीटक, कवक, सूक्ष्मजंतू अथवा व्हायरस अन्य पिकांची अथवा इतर उपयोगी वनस्पतींची नासाडी करणार नाहीत याबद्दल खात्री करून घ्यावी लागते.

कीटक–अथवा रोग–प्रतिकारक्षम प्रकारांची लागवड : भारतात पिकांचे कीटक प्रतिकारक्षम प्रकार फारच थोड्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तुडतुड्यांना प्रतिकार करणारे कापसाचे काही प्रकार आणि माव्याचा प्रतिकार करणारे बटाट्याचे काही प्रकार उपलब्ध झाले आहेत. खोडकिड्यांना प्रतिकार करणारे मक्याचे प्रकार अमेरिकेतून आणवून त्यांचा उपयोग भारतातील मक्याच्या प्रकारांमध्ये प्रतिकारक्षमता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. कवकजन्य रोगप्रतिकारक्षम प्रकरांमुळे कापूस, गहू, भात, जवस, भुईमूग, केळी, लाख, ऊस इ. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर वाचविण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. रोगप्रतिकारक्षम प्रकारांची लागवड करण्यात मुख्य फायदा असा की, त्यामुळे कीटक अथवा कवकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.

कीटकनाशके, तणनाशके व कवकनाशकांचा वापर : वर लिहिलेले सर्व उपाय जेथे लागू पडत नाहीत अथवा अपुरे पडतात तेथे ⇨ कीटकनाशके, तणनाशके [→ तण] अथवा ⇨ कवकनाशके यांचा वापर करणे आवश्यक असते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फक्त लेड आर्सेनेट (जठरविष) आणि रॉकेल तेल यांचा वापर कीटक नियंत्रणासाठी करण्यात येई. क्वचित प्रसंगी फळझाडे कपड्याने झाकून त्यांत पोटॅशियम सायनाइड वायू सोडण्यात येई, पंरतु पोटॅशियम सायनाइड फार विषारी असल्यामुळे आता कोणतेही शासन त्याचा अशा प्रकारे वापर करू देत नाही. दुसऱ्या महायुध्दानंतर कीटकनाशकांत व कवकनाशकांत क्रांतिकारक प्रगती झाली आणि त्याचबरोबर ही औषधे (रसायने) बियांना चोळण्याच्या अथवा पिकांवर फवारण्याच्या अगर पिस्कारण्याच्या यंत्रसामग्रीतही पुष्कळच सुधारणा झाली. एकच उदाहरण द्यावयाचे झाल्यास फक्त १४० ग्रॅ. प्रभावी कीटकनाशक ११·२५ लि. विद्रावकात (विरघळविणाऱ्या द्रवात) मिसळून ते विमानातून फवारल्यास एका हेक्टरमधील सर्व नाकतोडे मरतात व त्यांची पुढील उत्पत्ती थांबते. हवामान चांगले असल्यास एका तासात ४०० हेक्टर क्षेत्रावर विमानाने फवारणी करता येते. पिकांच्या सुधारित प्रकारांच्या लागवडीसाठी जादा खत व पाणी यांचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर पीक संरक्षणासाठी पुरेसा खर्च न केल्यास बी, खत व पाणी यांवरील खर्च वाया जातो. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, कीटकनाशकांचा गैरवापर करणे इष्ट नसते. त्यांचा वापर इतर उपायांबरोबरच करणे इष्ट असते.

पीक संरक्षणात कायद्याचा वापर : रोगकारक, कवक, सूक्ष्मजंतू, व्हायरस, तणे आणि उपद्रवी कीटक यांचा प्रसार थांबविण्यासाठी अथवा मोठ्या प्रमाणावर कीटक, तण व कवकनाशकांची फवारणी करण्यासाठी कायद्याचा वापर करणे विशिष्ट परिस्थितीत आवश्यक असते. रोगट बी–बियाणे अथवा वनस्पती आणि तणे यांच्या आयात-निर्यातीवर निर्बंध असूनही बाजरीवरील अरगट रोग व गाजर गवत यांची अलीकडील काळात परदेशातून नकळत भारतात आयात झाली. हे निर्बंध नसल्यास किती कीटक अथवा रोगकारकांची आयात-निर्यात होईल याची कल्पना करता येते. बाहेरून आयात झालेल्या लिंबावरील खैरा रोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या कामी उत्तर अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्याने फार मोठे यश मिळविले. यासाठी कायद्याचा वापर करावा लागला. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या देशांनीही कायद्याचा वापर करून रोगनिर्मूलनाच्या बाबतीत यश मिळविले आहे. दक्षिण भारतात वेलदोड्याच्या पिकावरील कट्टे या व्हायरस रोगाचे निर्मूलन करण्यात भारताने यश मिळविले आहे. देशात अस्तित्वात नसलेले परंतु परदेशात आढळणारे उपद्रवी कीटक व रोगकारक कवक, सूक्ष्मजंतू व व्हायरस यांची आयात झाल्यास फारच नुकसान होईल. या दृष्टीने बी अथवा वनस्पतींच्या द्वारे अशा कीटकांची व रोगकारकांची आयात थांबविण्यासाठी कायद्याचा वापर व त्याची योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

पहा : कवकनाशके कीटकनाशके कीटक नियंत्रण कृंतकनाशके तण धूम्रकारी पदार्थ पीडकनाशके वनस्पतीरोगविज्ञान.

संदर्भ : 1. Jones, F. G. W. Jones, M. G. Pests of Field Crops, London, 1964.

     2. Reddy, D. B. Plant Protection in India, Bombay, 1968.

     3. Rose, G. J. Crop Protection, London, 1963.

     4. Stapley, J. H. Gayner, F. C. H. World Crop Protection, Vol. I, London, 1969.

पाटील, ह. चिं. गोखले, वा. पु.