आ. १. जिरे (फळे)जिरे : (गोडे जिरे हिं. झिरा गु. जीरू क. जिरिगे सं. जीरक, दीर्घक इं. क्यूमीन, व्हाइट जीरा लॅ. क्युमीनम सायमियम कुल-अंबेलिफेरी वा एपिएसी). गाजर, कोथिंबीर, ब्राह्मी, हिंग , बडीशेप, ओवा इ. नावांनी परिचित असलेल्या वनस्पतींच्या कुलातील (चामर कुल) ही वर्षायू (एक वर्षभर जगणारी) ओषधीय [→ ओषधि] वनस्पती मूळची भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशांतील असून तेथे हल्लीही मोठी लागवड आहे ती हिमालयात २,१७० ते २,७९० मी. उंचीपर्यंत जंगली अवस्थेत आढळते. यूरोपात फार प्राचीन काळापासून जिरे माहीत असल्याचा व इंग्‍लंडमध्ये सतराव्या शतकात जिरे मसाल्यात वापरीत असल्याचा उल्लेख आढळतो. बायबलात जिऱ्याचा उल्लेख सापडतो. ईजिप्त व पॅलेस्टाइन येथे फार प्राचीन काळापासून त्याची लागवड आहे. सुवासिक बियांकरिता (फळे) हिची लागवड द. यूरोप, उ. आफ्रिका, आशिया, अरबस्तान, चीन, मेक्सिको वगैरे प्रदेशांत झाली आहे. भारतात हिची बंगाल व आसाम यांखेरीज इतर राज्यांत (विशेषत: उ. प्रदेश व पंजाब येथे) बरीच लागवड करतात. हे रोपटे सु. ३० सेंमी. उंच असून त्याच्या अनेक फांद्यांवर अतिखंडित नाजूक पाने एकाआड एक असतात. सर्वसामान्य लक्षणे चामर गणात [→ अंबेलेलीझ] वर्णिल्याप्रमाणे. या वनस्पतीला चवरीसारख्या फुलोऱ्यांवर (संयुक्त चामर) लहान, पांढरी किंवा गुलाबी फुले येतात. पालिभेदी फळे [→ फळ] टोकदार, फार लहान आणि शुष्क असून तडकून त्याचे दोन लांबट (०.६ सेंमी.) भाग (फलांश) होतात आणि प्रत्येकावर नऊ उभ्या रेषा (कंगोरे) व खोबणी असून आत एक बी असते. फळे काहाशी कडवट व स्वादयुक्त असतात खोबण्यांत तैलनलिका असून त्यांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल २–४ % व स्थिरतेल १०% असते फळे मसाल्यात व स्वयंपाकातील इतर पदार्थांत (कढी, सार, लोणची, केक, पाव इ.) घालतात. तसेच ती  उत्तेजक, स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी ), वायुनाशी, शीतक (थंडावा देणारी), रक्तशुद्धी करणारी, दाहशामक, भूक वाढवणारी, दुग्धवर्धक व प्रमेह (परमा) नाशक आहेत. मद्यांच्या काही प्रकारांत जिऱ्यातील तेल घालतात, तसेच सुगंधी द्रव्यातही ते वापरतात पशुवैद्यकात बियांचा बराच वापर आहे तसेच तेल काढून राहिलेला चोथा गुरांना खाऊ घालतात.

आ. २. कडू जिरे : फुलोऱ्यासह फांदीजिऱ्याच्या पिकासंबंधीची आकडेवारी (क्षेत्रफळ, उत्पादन इ.) अधिकृत रीत्या फारशी उपलब्ध नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या प्रदेशांत जिऱ्याचे पीक काढतात. तमिळनाडूत काही ठिकाणी (कोईमतूर, कडप्पा व कुन्नूर) हिची लागवड आहे. लागवडीकरिता सौम्य हवामान व सकस, दुमट व निचऱ्याची जमीन आवश्यक असते. खताचा पुरवठा भरपूर लागतो, पण तो जिऱ्याच्या पिकापूर्वीच्या पिकाला द्यावा लागतो. कर्नाटक व तमिळनाडूत जिऱ्याचे पीक बागाईत म्हणून मर्यादित प्रमाणावर काढतात पिकाचे संवर्धन फार काळजीपूर्वक करावे लागते. नैर्ऋत्य मॉन्सूनच्या आधी वा ईशान्य मॉन्सूननंतर हे पीक काढतात. प्रत्यक्ष पीक वाढताना उन्हाचा कडाका, हवेतील ओलावा किंवा पावसाचा मारा त्याला सहन होत नाही. उन्हाळी पिकाची पेरणी एप्रिलअखेर व हिवाळी पिकाची ऑक्टोबरअखेर करतात. दर हेक्टरी सु. चाळीस किग्रॅ. बी फेकून पेरतात त्या वेळेपासून ते फलधारणेपर्यंत पाण्याचा पुरवठा नियमितपणे पण मर्यादित करावा लागतो. साधारणपणे ६०–९० दिवसांत पीक तयार होते दर हेक्टरी सु. ३२० किग्रॅ. जिऱ्याचे उत्पादन होते जास्तीत जास्त ५०० किग्रॅ. उत्पन्न मिळते जयपुरात थोडे अधिक (५५० किग्रॅ.) मिळते. 

या पिकावर भुरी रोग पडतो त्यामुळे पाने काळी पडतात आणि सुकतात त्यावर गंधकाची पूड फवारणे हा उपाय आहे. खैरा जिल्ह्यात करपा रोगही पडतो पण तो फारसा हानिकारक नाही. 

जबलपूर, रतलाम, गंगापूर व जयपूर ही जिऱ्याची भारतातील प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत भारतातून श्रीलंका, मलाया, पूर्व आफ्रिका, इराणच्या आखातातील देश इ. प्रदेशांत जिऱ्याची निर्यात होते तर अफगाणिस्तानातून खुष्कीच्या मार्गाने त्याची आयात होते. 

शहाजिरे (ब्‍लॅक कॅरॅवे) या नावाने ओळखण्यात येणारी वनस्पती दुसऱ्या वंशातील परंतु चामर गणातीलच आहे [→ शहाजिरे]. 

क्षीरसागर, ब. ग. परांडेकर, शं. आ.

कडू जिरे : [हिं. काली जिरी काठे. काली जिरी गु. कडवा जिरी क. काळा (कडु) जिरिगा सं. वनजीरक, सोमराज, अग्‍निबीज इं. पर्पल फ्लीबेन लॅ. व्हर्नोनिया अँथेल्‍मिंटिका कुल कंपॉझिटी]. ही सरळ व सु. ६०–९० सेंमी. उंच, बळकट व वर्षायू ओषधी भारतात सर्वत्र व श्रीलंकेत आढळते. तिची लागवडही करतात. पाने एकाआड एक, भाल्यासारखी, साधी, साधारण दातेरी किनारीची व दोन्ही बाजूंस केसाळ असतात. सु चाळीस फुलांची स्तबके अर्धवट गुलुच्छ फुलोऱ्यावर [→ पुष्पबंध] डिसेंबर ते फेब्रुवारीत येतात. कृत्‍स्‍नफळ [ शुष्क व एकबीजी फळ, → फळ] लांबट दंडासारखे व त्यावर दहा उभ्या शिरा आणि केस असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे सूर्यफूल कुलात [→ कंपॉझिटी] वर्णिल्याप्रमाणे व ⇨सहदेवीप्रमाणे असतात.

बिया तिखट, कृमीनाशक व रेचक असून दमा, उचकी, त्वचाविकार, पांढरे कोड इत्यादींवर उपयुक्त शिवाय त्या पौष्टिक, दीपक (भूक वाढविणाऱ्या), मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) असून दाहक सुजेवर उवा मारण्यास व विंचवाच्या विषावर वापरतात त्यांतील कडू व राळेसारखे द्रव्य सूत्रकृमीवर गुणकारी ठरले आहे. 

आ. ३. काळे जिरे : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) फळे.काळे जिरे : (हिं. काला जिरा, कलोंजी, मुग्रेला गु. कलोंजी, काला जीरू क. कारिजिरिगे सं. कृष्णजीरक इं. ब्‍लॅक क्युमीन, स्मॉल फेनेल लॅ नायगेला सॅटिव्हा कुल-रॅनन्‍क्युलेसी). सु. ४५ सेंमी. उंच वाढणाऱ्या या ओषधीचे मूलस्थान पश्चिम आशिया ( लेव्हँट) असून ही पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाम ह्या प्रदेशांमध्ये लागवड केलेली किंवा शेतात तणासारखी वाढलेला आढळते. हिची पाने दोनदा किंवा तीनदा पिसासारखी पण अंशतः विभागलेली असून त्यांचे खंड रेषाकृती असतात. फुले द्विलिंगी, फिकट निळी व लांब देठावर एकेकटी येतात छदमंडल नसते. परिदले बाहेरची पाच पाकळ्यांसारखी व आतील आठ मधुप्रपिंडयुक्त असतात. केसरदले अनेक व किंजदले पाच ते सात जुळलेली असून किंजपुट ऊर्ध्वस्थ व पाच कप्प्यांचा असतो [→ फुल]. फळ बोंडाप्रमाणे आणि बिया काळ्या, त्रिधारी व अनेक असतात.

बियांचे वाफेने ऊर्ध्वपातन करून पिवळसर भुरे, बाष्पनशील आणि दुर्गंधी तेल मिळते त्यात ४५–६० टक्के कारव्होन, डी-लिमोनीन व सायमीन असते. बिया दाबून काढलेले तेल खाण्यासाठी वापरतात. बियांमध्ये निगेलीन हे कडू द्रव्य असते. सामान्य शारीरिक लक्षणे मोरवेल गणात [→ रॅनेलीझ] वर्णिल्याप्रमाणे असतात. 

काळे जिरे वायुनाशी, उत्तेजक, मूत्रल, आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे) असून स्त्रियांना दूध येण्यात मदत करते प्रसूती ज्वरावर देतात बियांचे चूर्ण तिळाच्या तेलातून पुरळ व तत्सम चर्मरोग यांवर लावण्यास उपयुक्त असते, जास्त प्रमाणात बिया गर्भपातक असतात त्यांचे चूर्ण विंचवाच्या दंशावर लावतात. कपड्यांत बिया ठेवल्यास किडीपासून ते सुरक्षित राहतात. बिया मसाल्यात वापरतात 

जमदाडे, ज. वि.

संदर्भ : Aiyadurai, S. G. A Review of Research on Spices and Cashewnut in India, Ernakulam, 1966.