नांगर : बी पेरण्यापूर्वी जमीन फोडून (नांगरून) मऊ भुसभुशीत करण्याकरिता सामान्यपणे नांगर हे औत वापरतात. येथे फक्त जनावरांच्या साहाय्याने ओढण्यात येणाऱ्या नांगरांचे वर्णन केलेले आहे. शक्तिचलित नांगरांच्या वर्णनासाठी ‘ट्रॅक्टर’ ही नोंद पहावी. नांगराचा वापर भूतलावर मानवी संस्कृतीचा उदय झाला तेव्हापासून केला जात आहे. मानव समाज करून, स्थायिक होऊन आपल्या उन्नतीकरिता झटू लागला त्या काळी जमिनीच्या मशागतीसाठी या औताचा शोध लावण्यात आला असावा. नाईल व युफ्रेटीस या नद्यांच्या खोऱ्यांत प्राचीन शेतीप्रधान संस्कृतीचे भग्नावशेष दृष्टीस पडतात, त्यामुळे त्या भागात नांगराचा शोध लागला असावा, असे मानले जाते. इ. स. पू. सु. ३००० च्या सुमारास बैल जुंपलेला लाकडी नांगर तेथे वापरात आला होता. ईजिप्तमधील बैलांना वशिंड नसल्याने जू शिंगांनाच बांधत असत. भारतात यादव कुलातील बलरामाचा नांगर सांस्कृतिक उत्क्रांतीचे प्रतीक मानतात. प्राचीन काळी भारतात नांगर शुभवस्तू समजून तिचा नामनिर्देश अत्यादराने केला जात असे. ऋग्वेदात नांगराचा ‘लांगल’ व ‘सीरा’ या नावांनी उल्लेख केल्याचे आढळते. इंग्रजी वाङ्‌मयात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (१) लॅटिन प्लाऊ, (२) ट्युटॉनिक प्लाऊ आणि (३) रशियन प्लाऊ असे तीन प्रकारचे नांगर अस्तित्वात होते, असा उल्लेख आढळतो. हे प्रकार भारतातील कुडावण्याच्या तत्त्वाप्रमाणे तयार केलेले असत. हे प्राथमिक औत फाटे फुटलेल्या झाडाच्या फांदीपासून तयार केले गेले. त्यासाठी खालीवर २–३ फाटे फुटलेली काही ठराविक लांबीची फांदी निवडून घेत. तिच्या खालच्या बाजूची उपशाखा ठराविक लांबी ठेवून तोडून टोकदार बनवीत. वरच्या बाजूस असलेली दुसरी उपशाखा ठराविक अंतरावर छाटून रुमण्यासारखी वापरीत. मधली भक्कम फांदी ३–४ मी. लांब ठेवून तिचा औत ओढण्यासाठी दांडी म्हणून उपयोग करीत. तेव्हा हे औत माणसाकडूनच ओढले जात असे. पुढे मानवाच्या सुधारणेबरोबर या औतांतही सुधारणा होत गेली आणि आज वापरात असलेला, बैलाकडून ओढला जाणारा लाकडी देशी नांगर कापीव लाकडापासून प्रमाणबद्ध बनविला जाऊ लागला. काही ठिकाणी घोडा, उंट, रेडा इ. प्राणीही नांगर ओढण्यासाठी वापरतात.

आ.१.लाकडी नांगर (पुणे) : (१) आकडा, (२) तळभाग, (३) दांडी, (४) फाळ, (५) रुमणे, (६) मूठ.

लाकडी नांगर: यात फाळ आणि वसू हे दोन भागच लोखंडाचे असतात परंतु सर्वसाधारणपणे तो लाकडी नांगर या नावाने ओळखला जातो. या नांगराचे निरनिराळे भाग पुढे दिले असून आ. १ मध्ये ते दाखविले आहेत.

(१) आकडा : हा साधारण चौरस लाकडाचा तुकडा असून त्याचे मोजमाप नांगराच्या प्रकाराप्रमाणे असते. याचे मुख्य काम नांगराचे दुसरे भाग धारण करणे हे असते. याला खोडही म्हणतात. (२) तळभाग : हा खोडाला जोडलेला माथ्याला रुंद आणि खाली निमुळता होत गेलेला मुख्य खोडाचाच भाग असतो किंवा कोन करून खोडाला जोडलेला लाकडाचा स्वतंत्र तुकडा असतो. तास रुंद करणे, माती बाजूला सारणे ही कामे तळभाग करतो. जमिनीवर घासल्या जाणाऱ्या भागाला तळवा म्हणतात. याची झीज जास्त होते. (३) दांडी : ही २·७५–३ मी. लांब, बाकदार किंवा सरळ लाकडाची असते. विशिष्ट कोन करून हिचा बुंधा तळभागात बसवितात. (४) फाळ : लोखंडी भाग चपटा अणकुचीदार टोकाचा वसूच्या साह्याने तळभागावर घट्ट बसविलेला असतो. नांगर चालू असता जमिनीत घुसून ती फाडतो. (५) रुमणे : नांगर चालू असताना त्याचा तोल सांभाळण्याचे साधन. (६) मूठ : रुमणे धरण्यासाठी त्याला जोडलेला लहानसा लाकडी भाग.

आ.२. लाकडी नांगरांचे काही प्रकार : (अ) कोकण, (आ) खानदेश, (इ) गुजरात (खेडा), (ई) आसाम (काचार).

जमिनीच्या प्रकाराप्रमाणे देशी नांगरामध्ये हलका, मध्यम आणि भारी असे प्रकार आहेत. हलके नांगर ओढावयाला २ बैल व मध्यम ओढावयाला २–४ बैल लागतात. भारी नांगर वजनाने फार जड असतात. त्यांना ओढावयाला ६ ते ८ बैलजोड्या जुंपाव्या लागतात. जमीन २० ते २५ सेंमी. खोल नांगरली जाते. एक हेक्टर क्षेत्र नांगरावयाला ५–६ दिवस लागतात.

कोकणाच्या भातशेतीतील नांगर फार हलका असतो. तो ओल्या जमिनीत वापरतात. बाकीचे नांगर जमीन वाफश्यात आल्यावर वापरतात. जमीन फार वाळली म्हणजे नांगरटीचे काम अतिशय कठीण जाते. विशेषतः चिकणवट भारी जमिनींत ते कष्टदायक ठरते.

सर्व लाकडी नांगरांची बनावट बहुतेक सारखीच असते. फरक निरनिराळ्या भागांच्या आकारमानांत आणि वजनांत असतो.

उत्तर भारतात लाकडी नांगरांचा उपयोग बी पेरण्यासाठी देखील करतात. महाराष्ट्रातही वालाचे अगर हरभऱ्याचे बी पेरण्यासाठी लाकडी नांगर वापरतात. एकंदरीत भारतामध्ये हे औत जमीन व हवामानानुसार योग्य ठरल्यामुळे आजतागायत टिकून राहिले आहे.

देशी नांगराने जमीन फाडली जाते. कापून माती उलटून टाकली जात नाही. ओढ जास्त लागते. सोलापूर, अहमदनगर, धारवाड वगैरे भागांत भारी काळ्या चिकणवट जमिनी नांगरण्यासाठी भारी नांगर वापरावे लागतात. त्यांच्या वजनामुळे नांगरट खोल होते, परंतु बैल जास्त जोडावे लागतात. बैलांची संख्या वाढल्यामुळे त्यांना वळविण्यात वेळ मोडतो. कामात सुटसुटीपणा राहत नाही. जमिनीचा चिकटपणा आणि बैलांची ताकद यांच्याप्रमाणे मध्यम प्रकारच्या नांगराला कधीकधी ४ बैल जोडावे लागतात. हलक्या नांगराला ओढ (कर्षणबल) ५६ ते ९० किग्रॅ. पर्यंत लागते. भारी नांगराला त्याच्या ४–५ पट अधिक लागते. भारी लाकडी नांगर लव्हाळा, कुंदा आणि हरळी यांच्यासारखी जमिनीतील बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) नुकसानकारक तणे नाहीशी करण्यासाठी उपयुक्त ठरतो, कारण त्याने २० ते २५ सेंमी. पर्यंत खोल नांगरट होते. या तणांची जमिनीत वाढणारी खोडे उघडी पडतात. ती वेचून त्यांचा नाश करता येतो.

लाकडी नांगर बहुतेक बाभूळ किंवा खैराच्या लाकडापासून तयार करतात. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या भागांत लाकडी नांगराचे आयुष्य ५ ते १० वर्षांपर्यंत धरतात. आसाम, ओरिसा, त्रावणकोर या भागांत १ ते २ वर्षे व मध्य प्रदेश, कर्नाटक वगैरे भागांत २ ते ३ वर्षे धरतात.

हलक्या नांगराचे वजन प्रदेशानुरूप २० ते २५ किग्रॅ. भरते. भारी नांगराचे वजन याच्या ४–५ पट अधिक भरते.

आ.३. लोखंडी दुतर्फी नांगर : (१) फाळ, (२) तक्ता, (३) खोड, (४) हात (रुमणे), (५) मूठ, (६) दांडी, (७) उभी खाचपट्टी, (८) आडवी खाचपट्टी, (९) कडी, (१०) चाक, (११) चाकपट्‌टी.

लोखंडी नांगर: देशी नांगराच्या बाबतीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न भारतात एकोणिसाव्या शतकापासून करण्यात येऊ लागले. याच सुमारास पाश्चात्त्य देशांत लाकडाऐवजी लोखंडापासून नांगर बनविण्यात येऊ लागले होते. डच लोकांनी प्रथम जमीन उलटविणारे नांगर शोधून काढले. १६३० च्या सुमारास लोखंडी टोक असलेल्या बाकदार तक्त्याचा हात असलेला नांगर बनविण्यात आला. १७६३ साली स्कॉटलंडमध्ये जेम्स स्मॉल यांनी लोखंडी नांगर तयार केला. नंतर त्यात सुधारणा करून माती उलटून टाकण्याचे काम चांगले होईल असे बदल केले. १७८५ च्या सुमाराला इंग्लंडमधील रॉबर्ट रॅनसम यांनी बिडाचे फाळ बनविले. १७९७ मध्ये चार्ल्‌स न्यूबोल्ड यांनी तक्ता व फाळ एकसंध ओतून नांगर बनविला.

आ.४. लोखंडी नांगर (कोकण)

१८१३ सालात चिनवर्थ यांनी यात सुधारणा केली. त्यांनी फाळ व तक्ता यांचे ओतकाम पृथकपणे करून ते एकमेकांनी जोडून नांगर तयार केला. १८५५ मध्ये ज़ॉन ऑलिव्हर यांनी एकदम थंड केलेल्या लोखंडापासून नांगर तयार केला. याप्रमाणे पाश्चात्य देशांत नांगरात सुधारणा होत होत्या आणि नांगर मोठ्या प्रमाणावरही तयार केले जात होते व त्यांचा प्रसारही होत होता. त्याची माहिती भारतीयांनाही मिळत होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ते नमुन्यादाखल महाराष्ट्रात आणवून कोणत्या प्रकारच्या जमिनीत कोणत्या प्रकारचे नांगर उपयुक्त ठरतील, त्याची चाचणीही घेण्यात आली. ते उपयुक्त असल्याचे निदर्शनास आल्यावरून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यांत दोन बैली हलक्या नांगरांपासून ८ बैली भारी नांगरापर्यंतचे सारे प्रकार असत परंतु त्यांच्या किंमती सामान्य शेतकऱ्यांच्या त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे झेपण्यासारख्या नसल्य़ामुळे त्यांना नांगर विकत घेणे परवडत नसे.

आ. ५. सऱ्या पाडण्याचा लोखंडी नांगरत्यामुळे उपयुक्त असतानाही त्याचा प्रसार अपेक्षेप्रमाणे होत नव्हता म्हणून सरकारी शेतकी खात्यामार्फत ते नांगर सामान्य शेतकऱ्याला देखील वापरावयाला मिळावेत म्हणून अगदी माफक दराने भाड्याने देण्यासाठी ठिकठिकाणी त्यांची संग्रहागारे (डेपो) उघडली होती. अशा प्रकारे नांगर भाड्याने देण्यासाठी सहकारी संस्थाही काही ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे लोखंडी नांगर लोकप्रिय होत असलेले पाहून तसे नांगर भारतातच तयार करण्याच्या उद्देशाने किर्लोस्कर बंधूंनी सांगली जिल्ह्यात १८८८ साली सुरुवात केली. त्यानंतर वेळोवेळी बनावटीमध्ये सुधारणा केली व ते अद्ययावत बनविले. ते आज सर्वत्र वापरात असल्याचे आढळते. भारतात आज बऱ्याच ठिकाणी लोखंडी नांगर बनविण्याचे कारखाने निघाले आहेत. परदेशी नांगरांची आयात आता बंद झाली आहे.

लोखंडी नांगरात प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात. एक कायम तक्त्याचे किंवा एकतर्फी नांगर आणि दुसरा फिरत्या तक्त्याचे किंवा दुतर्फी नांगर (आ. २). कायम तक्त्याच्या नांगरात तक्ता बदलता येत नाही. हे नांगर फारसे वापरात नाहीत. फिरत्या तक्त्याच्या नांगरात तक्त्याची बाजू बदलता येते. त्यामुळे कायम तक्त्याच्या नांगराप्रमाणे नांगर गोल गोल चालवावा लागत नाही. त्यामुळे नांगरणीचे काम सुलभ होते. तिसरा प्रकार सरी नांगराचा. यात दोन तक्ते दोन्ही बाजूंना कायम जोडलेले असतात.

लोखंडी नांगराच्या निरनिराळ्या भागांचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. (१) फाळ : धारदार कडांचा जमिनीत घुसणारा भाग. (२) तक्ता (पंखा) : याला फाळ बसवितात. हा चालू नांगराने कापलेला जमिनीचा पट्टा अंगावर घेऊन पालथा करून फेकतो. त्यामुळे फुटून ढेकळाचा भगरा होतो. तक्ते ३–४ प्रकारचे असतात. एकतर्फी आणि दुतर्फी नांगरांच्या तक्त्यांत फरक असतो. तक्ते बिडाचे किंवा पोलादी असतात. पोलादी चांगले असतात. (३) खोड: मुख्य भाग. यालाच दुसरे भाग जोडलेले असतात. (४) हात (रुमणे) : हात एक किंवा दोन असतात. चालू नांगराचा तोल सांभाळण्यासाठी आणि त्याची उचलठेव करण्यासाठी उपयुक्त. (५) मूठ. (६) दांडी : बैलांनी लावलेली ओढ दांडीमधून नांगरांच्या बुडाला जोडली जाते. भारी नांगरात बाकदार आणि हलक्या नांगरात दांडी सरळ असते. (७, ८) आडवी, उभी खाचपट्टी : दांडीच्या टोकाला जोडलेला भाग आडव्या खाचपट्टीने तासाची रुंदी कमीजास्त करता येते. उभ्या खाचपट्टीने तासाची खोली कमीजास्त करता येते. (९) कडी :खाचपट्टीपुढील औताला साखळ्या जोडण्याचा भाग. (१०) चाक : नांगर चालू असताना तोल सांभाळणे, मार्गदर्शन करणे यांसाठी जोडलेला भाग. (११) चाकपट्टी : चाक नांगराला जोडून धरण्यासाठी पट्टी. लोखंडी नांगरामुळे जमीन सर्वत्र समान खोलीवर सारखी नांगरली जाते. तास समद्विभुज चौकोनाच्या आकाराचे पडून तासाची माती उलटवून टाकली जाते आणि नांगरलेल्या जमिनीचे पट्टे लाकडी नांगरांतल्यासारखे या नांगराने नांगरलेल्या जमिनीत रहात नाहीत. नांगर जमिनीत स्थिरपणे चालतो. लाकडी नांगरासारखा तो हेलपाटत नाही. काम चांगले होते. चालवावयाला शक्ती कमी लागते व नांगर पुष्कळ दिवस टिकतो.

आ. ६. लाकडी व लोखंडी भाग असलेला मध्यम प्रकारचा नांगर

हलक्या, मध्यम व भारी जमिनींसाठी अनुक्रमे २, ४ आणि ८ बैली लोखंडी नांगर वापरतात. लोखंडी व लाकडी भागांचा उपयोग करून लोखंडी नांगराचा दणकटपणा व लाकडी नांगराचा साधेपणा असलेले मध्यम प्रकारचे नांगर उपलब्ध आहेत. या प्रकारच्या नांगराला तक्ता नसल्यामुळे तासातील माती उलटून टाकली जात नाही. नांगराचे वजन ४०–४५ किग्रॅ. असून चालवावयास २ बैल पुरेसे होतात. नांगरटीचे तास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५ ते २० सेंमी. खोल व २२ ते २५ सेंमी. रुंद पडते.

पहा : ट्रॅक्टर शेतकामाची अवजारे व यंत्रे

संदर्भ : 1. I.C.A.R. Indigenous Agricultural Implements of India, New Delhi, 1962.

             २. आरकेरी, एच्. आर. अनु. पाटील, ह. चिं. शेतीची साधी यंत्रसामुग्री, मुंबई.

             ३. कुलकर्णी, कृ. सु. आमची शेती, पुणे, १९५०.

सोमण, ना. श्री.