ताग : (हिं. पाट, तीतापाट, नार्चा गु. मोटी छूंछ क. शण,सणवू सं. ज्योत,पट्ट,जूट इं. ज्यूट लॅ. कॉर्कोरस कॅप्सुलॅरिस दुसरी जात : मीठापाट किंवा कोष्ट, लॅ. कॉर्कोरस ओलिटोरियस कुल–टिलिएसी).पृथ्वीवरील अनेक वनस्पतींच्या धाग्यांचा उपयोग मनुष्याच्या गरजेच्या उत्पादनासाठी केला जात आहे, त्यात खोडावरील सालीपासून काढलेल्या धाग्यांत तागाचा धागा सर्वांत महत्त्वाचा आहे व वनस्पतींपासून काढलेल्या धाग्यांच्या जागतिक उत्पादनात त्याचा कापसाच्या धाग्याच्या खालोखाल क्रमांक लागतो. त्याचा मुख्य उपयोग शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने साठविण्यासाठी अगर वेष्टनासाठी मजबूत आणि स्वस्त साधने तयार करण्याकडे होतो. तसेच दोर, दोरखंडासारख्या इतर अनेक उत्पादनांसाठीही तागाचा उपयोग केला जातो. तसे पाहिल्यास तागाच्या धाग्याचा रंग पिवळसर तपकीरी असतो. त्यावर पाण्याचा अनिष्ट परिणाम होतो व त्याचे विरंजन (रंग काढून टाकण्याची क्रिया) करून तो स्वच्छ पांढरा करणे सोपे नसते तो भरड असून फार मजबूतही नसतो. परंतु विणण्यासाठी तो सर्वांत स्वस्त धागा असल्यामुळे त्याचा वरील कारणांसाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

ईजिप्त, सिरिया, भारत इ. देशांत तागाच्या कोवळ्या पानांचा भाजीसाठी फार पूर्वीपासून उपयोग करीत होते. तागाच्या धाग्याचा शोध इ.स. पू. ४००० या काळात लागला. हातमागावर कपडा व दोर यांच्या उत्पादनासाठी जंगली अवस्थेत वाढणाऱ्या तागाच्या झाडांचा उपयोग भारतात फार पुरातन काळापासून होत आला आहे. वासिष्ट धर्मशास्त्रात तागाच्या वस्त्रांचा उल्लेख आहे. संस्कृतमधील जूट (बांधलेले) शब्दावरून त्याची ओरिसातील जोट (jhot) अथवा जौट (jhout) ही नावे, तसेच ज्यूट हे त्याचे इंग्रजी नाव पडले असावे. ही वनस्पती मूळची भारत, श्रीलंका, मलेशिया, चीन या देशांतील असावी असे मानतात तथापि याबद्दल एकमत नाही. चीनमध्ये ती रानटी अवस्थेत आढळतेतेथून ती भारतात आलेली असणे शक्य आहे. अठराव्या शतकात पाश्चिमात्यांना ती परिचित झाली, पण तत्पूर्वी तिचा धागा व त्याचे कापड बंगालमध्ये काढीत असत. सोळाव्या शतकात बंगालमध्ये तागाच्या कापडाचा व्यापार होता, असे त्या काळच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतात. भारतात तागाची पद्धतशीर लागवड एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरू झाली नव्हती. आता सर्व उष्ण प्रदेशांत, विशेषतः भारतात (प. बंगाल, आसाम, बिहार, ओरिसा, उ. प्रदेश इ.) आणि बांगला देशात, तिची लागवड करतात. सध्या भारतात तागाच्या लागवडीत सु. २० लक्ष शेतकरी आणि कापड, पिशव्या, पोती व इतर वस्तू बनविण्याच्या कारखान्यात आणि निर्यात व्यापारात सु. ४ लक्ष लोक काम करीत आहेत. कच्च्या तागाच्या आणि तागाच्या उत्पादनांच्या निर्यात व्यापारापासून भारताला सर्वांत जास्त परकी चलन मिळते. ताग उद्योगात सु. २४० कोटी रु. भांडवल गुंतलेले आहे व प्रतिवर्षी सु. ५०० कोटी रुपयांच्या मालाची विक्री होते. गुंतविलेल्या भांडवलाच्या दृष्टीने तागाचा उद्योगधंदा हा भारतात तिसऱ्या क्रमांकाचा धंदा आहे (लोखंड व कापूस हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगधंदे आहेत).

महाराष्ट्रात वाख काढण्यासाठी किंवा हिरवळीच्या खतासाठी ‘ताग’ नावाच्या पिकाची लागवड करतात परंतु ज्यूट–तागाहून तो अगदी वेगळा आहे व तो ⇨ सनताग  या नावानेही ओळखण्यात येतो (इं. सनहेंप लॅ. क्रोटोलॅरिया ज्यून्सीया )त्याला सण असेही नाव आहे.

ताग : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) केसरदल, (४) किंजपुटाचा छेद, (५) अक्षलग्न बीजक विन्यास (बीजकांची मांडणी), (६) बोंड (कॉ. कॅप्सुलॅरिस), (७) बोंड (कॉ. ओलिटोरियस).

 वनस्पतीवर्णन : ही सु. २–४ मी. उंच वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी  आहे. तिचे खोड साधारण बोटाइतके जाडसरळ असून झाडे जवळजवळ वाढविल्याने ते फक्त टोकाकडे शाखायुक्त असते. पानांना उपपर्णे असतात. पाने लांबट आणि भाल्यासारखी ( ७·५–१० X २·३ सेंमी.), टोकदार, दातेरी असून पात्याच्या तळाशी दोन्ही बाजूंचे दात तंतूप्रमाणे असतात. फुले लहान, पिवळी, आखूड देठाची असून सप्टेंबरात वल्लरीवर येतात. सामान्य संरचना व इतर लक्षणे परुषक कुलात [→ टिलिएसी] वर्णिल्याप्रमाणे. संदले पाच, पाकळ्या पाच व सुट्या आणि केसरदले अनेक व त्यांची दोन वर्तुळे ऊर्ध्वस्थ किंजपुटात पाच कप्पे व अनेक बीजके मध्यवर्ती अक्षावर चिकटलेली असतात [→ फूल]. फळावर (बोंडावर) ठळक शिरा असून ते काहीसे गोलसर, सु. १२ मिमी. व्यासाचे, वरच्या बाजूस खाच असलेले असते व फुटुन त्यातून शंकूसारख्या अनेक पिंगट तपकिरी व गुळगुळीत बिया बाहेर पडतात. याच वंशातील दुसऱ्या जातीचे (कॉ.ओलिटोरियसाचे) बोंड लांबट (३–६·३ सेंमी. लांबीचे) असून त्यावर दहा कंगोरे असतात व फुटल्यावर त्याची शकले होतात. याच्या बियांमधून आडवे पडदे असतात आणि त्या निळसर हिरव्या ते काळ्या व तिकोनी असतात.


खोडात सालीच्या आत दृढसूत्रांचे ( बळकट धाग्यांचे) वलय असते व हेच व्यापारी महत्त्वाचे उपयुक्त धागे होत. धागा सु. १·८–३ मी. लांब असून दोऱ्या, सुतळी, गोणपाट, पोती इत्यादींकरता वापरतात.

औषधी गुणधर्म : तागाच्या पानांचा फांट यकृताच्या विकारांवर व हातापायाच्या जळजळीवर वापरतात तो कटू, पौष्टिक, सारक, क्षुधावर्धक व वायुनाशी आहे. कच्च्या फळांचा आणि सुक्या मुळांचा काढा अतिसारावर देतात आमांशावर सुकी पाने भाताबरोबर खातात.

कॉर्कोरस ओलिटोरियस या त्याच वंशातील जातीचा उपयोगही वरीलप्रमाणेच करतात. ही जाती सर्व उष्ण प्रदेशांत तणाप्रमाणे उगवते.

ज्यूट या इंग्रजी नावाखाली कित्येक वनस्पतींचे उदा., ⇨ अंबाडी,  ⇨ हेंप रोझेल,⇨ चिनी ताग,⇨ वनभेंडी  व ⇨चिकण्यासारखी दुसरी जाती, सिडा ऱ्हॉम्बि फोलिया  यांचे धागे खऱ्या ज्यूटऐवजी वापरतात.

लागवडीखालील दोन जातींची तुलना : लागवडीखालील तागाच्या दोन जातींना (कॉर्कोरस कॅप्सुलॅरिस  आणि कॉ. ओलिटोरिय) अनुक्रमे तीतापाट आणि मीठापाट ही बंगाली नावे आहेत. सर्वसाधारणपणे दिसावयास ह्या दोन्ही जाती सारख्या असल्या, तरी झाडांची उंची, पाने, फुले, बोंड, बी, धाग्याचा रंग व त्याची गुणवत्ता वगैरे बाबतींत त्यांमध्ये पुष्कळ फरक आहेत. तीतापाटाची झाडे मीठापाटापेक्षा ठेंगणी (३·५–४ मी.) असून पाने व फुले मीठापाटापेक्षालहान व पिवळी असतात. तीतापाटाची पाने कडू असतात, तर मीठापाटाची पाने बेचव अथवा गुळचट असतात. तीतापाटाची बोंडे गोलसर असून बिया तपकिरी रंगाच्या असतात. मीठापाटाची बोंडे लांब व दंडगोलाकृती असतात आणि बिया मीठापाटाच्या बियांपेक्षा लहान असून निळसर, हिरव्या ते करड्या अथवा काळ्या रंगाच्याही असतात. मीठापाटाची झाडे ४ ते ४·५ मी. उंच वाढतात व त्यांची फुले मोठी असून रंगाने तीतापाटापेक्षा जास्त पिवळी असतात. तीतापाटाचा वाख पांढरट रंगाचा असतो त्यावरून त्या वाखाला ‘पांढरा ताग’ असे नाव पडले आहे. मीठापाटाचा वाख पिवळ्या अथवा करड्या रंगाचा (कधीकधी लालसर रंगाचाही) असतो परंतु तीतापाटपेक्षा मीठापाटाचे तंतू जास्त बारीक, मऊ, मजबूत व चमकदार असतात. भारतातील तागाच्या क्षेत्रापैकी सु. ७५% क्षेत्र तीतापाटाचे असून त्याचे ३३ प्रकार लागवडीखाली आहेत. मीठापाटाचे क्षेत्र २५% असून त्याचे फक्त ५ प्रकार लागवडीखाली आहेत. तीतापाट कापणीला लवकर येतो व उत्पन्न कमी येते, तर मीठापाट कापणीला उशीरा येतो व उत्पन्न जास्त येते. तीतापाटाची उंचावरील व त्याचप्रमाणे खोलगट जमिनीत लागवड करता येते आणि त्याला पाणथळ जमीनही चालते. मीठापाटाची लागवड फक्त उंचावरील जमिनीतच होऊ शकतेपाणथळ जमिनीत तो वाढत नाही. तो खोडकूज रोग आणि टोका किडीला प्रतिकारक आहे. तीतापाटाचा विशेष फायदा असा की, मार्च–एप्रिलमध्ये पेरणी केलेले लवकर तयार होणारे पीक काढून घेतल्यावर त्यात शेतात भाताची रोपे लावून लागवड करता येते व अशा रीतीने जमिनीचा जास्त वापर करता येतो. मीठापाटाची कापणी ऑगस्ट–सप्टेंबर मध्ये होत असल्यामुळे नंतर त्या शेतात भाताचे पीक घेता येत नाही.

जागतिक क्षेत्र आणि उत्पादन : जगातील तागाचे सु. ९० टक्के क्षेत्र भारत व बांगला देश या दोन देशांतच आहे. ब्राझील, ब्रह्मदेश आणि नेपाळमध्ये प्रत्येकी १·५ ते २·५ टक्के क्षेत्र आहे. चीनमध्येही तागाची पुष्कळ क्षेत्रात लागवड होते. यांखेरीज पेरु, कंबोडिया व थायलंडमध्ये थोड्या क्षेत्रावर तागाची लागवड होते. जागतिक अन्न आणि शेतकी संघटनेच्या १९७० च्या आकडेवारीप्रमाणे निरनिराळ्या देशांतील क्षेत्र आणि उत्पादन कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहे. या कोष्टकावरून दिसून येईल की, लागवडीचे क्षेत्र व उत्पादन या बाबतीत १९७० साली भारताचा जगात दुसरा क्रमांक होता. १९७१ मध्ये बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर तेथील तागाच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे सध्या कच्च्या तागाच्या उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक व बांगला देशाचा दुसरा क्रमांक आहे. याशिवाय तागाच्या वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीतही भारताचा पहिला क्रमांक आहे. विविध देशांतील दरडोई तागाच्या वस्तूंचा वापर पुढीलप्रमाणे आहे (आकडे किग्रॅ. मध्ये): भारत ०·७२, ब्रिटन २·७४, अमेरिकेची संयुक्त संस्थाने २·८३, जपान १·३०, ऑस्ट्रेलिया ७·२४,रशिया ०·३६.


कोष्टक क्र. १. निरनिराळ्या देशांतील तागाच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन (१९७०). 

देश 

क्षेत्र (हेक्टर) 

उत्पादन (टन) 

कंबोडिया

चीन

थायलंड

नेपाळ

पू. पाकिस्तान

पेरु

ब्रह्मदेश

ब्राझील

भारत

१०,०००

२,२०,०००

१०,०००

३१,०००

९,८०,०००

३,०००

४३,०००

५२,०००

८,००,०००

११,०००

५,००,०००

१२,०००

३५,०००

११,७९,०००

३,०००

२४,०००

६०,०००

१०,८०,०००

कोष्टक क्र. २.भारतातील राज्यवार तागाचे क्षेत्र व उत्पादन (१९७२–७३). 

राज्य

क्षेत्र (हेक्टर)

उत्पादन (गाठी, प्रत्येकी १८० किग्रॅ.)

लागवडीचे प्रमुख जिल्हे

आसाम

उ. प्रदेश

ओरिसा

त्रिपुरा

प.बंगाल

बिहार

मेघालय

१,३४,०००

१४,१००

४१,६००

९,४००

३,६७,३००

१,३१,०००

४१,००० 

१०,१०,१००

१,२६,५००

२,२३,५००

६८,०००

२७,१२,३००

६,८७,५००

२,२३,५०० 

गोलाअपाडा, नौगाँग, कामरुप, दरंग.

खेरी

कटक

 –

मुर्शिदाबाद, हुगळी, २४–परगणा, माल्डा, नडिया, जलपैगुरी.

पूर्णिया

— 


 कोष्टक क्र. २ वरून प. बंगालमध्ये निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र व उत्पादन आहे, हे दिसून येईल. कोष्टकातील प्रत्येक राज्यातील अनुक्रमे तीतापाटाचे व मीठापाटाचे टक्केवारी क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे : आसाम व मेघालय ७५ व २५ उ. प्रदेश ९९ व १ ओरीसा ७५ व २५ त्रिपुरा ९८ व २ प. बंगाल ५५ व ४५ बिहार ७० व ३० भारतातील सरासरी हेक्टरी उत्पादन १,३०० किग्रॅ. आहे.

भारतातील लागवडीखालील प्रकार :तीतापाट: फान्दुक, धालेश्वरी आणि फुलेश्वरी हे पूर्वापार स्थानिक प्रकार आहेत. काक्याबोम्बाई, डी. १५४, आर. ८५, सी. २०६, सी. २१२, सी. ३२१, सी, ४१२, सी. ९१८ आणि ईसी. ४१४२ व ईसी. ४१४३ हे वेळोवेळी उपलब्ध झालेले सुधारित प्रकार आहेत.

मीठापाट : देशी, टोस्सा, चिन्सुराग्रीन, आर. २६. ओ. ६२०, ओ. ६३२ आणि ओ. ७५३ यांपैकी पहिले दोन प्रकार वगळता बाकीचे सुधारित प्रकार आहेत. मीठापाटाच्या क्षेत्रापैंकी सु. ७५ % क्षेत्र चिन्सुराग्रीन या प्रकाराखाली आहे.

हवामान : ताग हे पावसाळी हंगामात येणारे पीक आहे. या पिकाच्या वाढीच्या काळात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८° से. च्या वर आणि १५° से. च्या खाली सहसा जाऊ नये. सर्वसाधारणपणे ते २४° ते ३५° से. च्या दरम्यान असावे व हवेतील सापेक्ष आर्द्रता ९० टक्क्यांच्या आसपास असावी. वळवाचे पाऊस पिकाला फार उपयुक्त ठरतात, परंतु पीक लहान असताना सतत पाऊस पडल्यास पिकाची वाढ खुंटते. पीक मोठे झाल्यावर पुरामुळे पिकाचे विशेष नुकसान होत नाही. १,२५० ते २,५०० मिमी. वार्षिक पर्जन्यमानात हे पीक चांगले येते. मात्र त्यापैकी किमान २५० मिमी. पाऊस मार्च ते मे महिन्यांत पडला पाहिजे.

जमीन : तागाचे बहुतेक पीक गाळवट जमिनीत घेतात. या पिकाखालील क्षेत्राचे निरनिराळे प्रदेश नद्यांच्या मुखाशी असलेल्या त्रिभुज प्रदेशात आहेत. असे प्रदेश समुद्रसपाटीपासून उंच नसतात व कमी उताराचे असतात. या भागात पावसाळी हंगामात तागाच्या पिकात कमीजास्त पाणी असते. त्यातील थोड्या उंचावरील शेतांत ते तात्पुरते काही सेंमी. एवढेच असते मध्यम उंचीवरील शेतांत फक्त जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणी असते. खोलगट शेतात जूनच्या पुढे काही महिन्यांपर्यंत २ मी. खोलीपर्यंत पाणी राहते. तागाच्या लागवडीखालील जमिनीचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे. (१) उत्तर बिहारमधील हलक्या रंगाच्या बारीक पोताच्या चुनामिश्रित जमिनी. यांत फॉस्फोरिक अम्ल आणि नायट्रोजन यांचे प्रमाण कमी असते. (२) करड्या रंगाच्या जमिनी.यांत चुन्याचे प्रमाण फार थोडे अथवा मुळीच नसते. फॉस्फोरिक अम्ल पुरेशा प्रमाणात व पोटॅश भरपूर प्रमाणात असते. या तागाच्या लागवडीच्या नमुनेदार जमिनी असून तागाचे पुष्कळसे क्षेत्र या प्रकारच्या जमिनीत आहे. (३) जुन्या लाल रंगाच्या गाळवट जमिनी. बंगाल व आसामच्या बहुतेक गाळवट जमिनी या प्रकारच्या आहेत. काही ठिकाणी त्यांच्यावर काही सेंमी. चा करड्या रंगाच्या गाळाच्या जमिनीचा  थर बसला आहे. ही फार हलक्या प्रतीची जमीन आहे. तीत फॉस्फोरिक अम्ल नसते. पोटॅशही थोडे असते. या जमिनी फार लवकर वाळतात, त्यामुळे कोरड्या हवामानात पिकाची संपूर्ण वाढ होत नाही. यांचा पोत फार बारीक असतो आणि त्या ओल्या असताना चिकट असतात. लाल गाळवट जमिनीवर जेथे करड्या जमिनीचा थर असतो, अशाच भागात तागाचे पीक पुष्कळ प्रमाणात असते. इतर भागांतील जमिनीदेखील त्या त्या भागातील नदीच्या पुराने वाहून गेलेल्या गाळापासून बनल्या आहेत.

बांगला देशाच्या पूर्वेस व उत्तरेच्या भागातील हवामान व जमीन तागाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट आहेत.

पिकाची फेरपालट : खोलगट भागात ताग–पड–आमन भात ही पद्धत सर्वसाधारण रुढ आहे. परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तागाची कापणी झाल्यास ‘आमन’ भाताचे पीक रोपे लावून घेता येते व त्यात मागाहून लाखी डाळीचे बी पेरून तिसरे पीक घेता येते. सी. २१२ हा तागाचा प्रकार यासाठी उपयुक्त आहे. उंचावरील जमिनीत तागाबरोबर हरभरा, वाटाणा, कडधान्य, बटाटा, गहू, सातू, ओट, मोहरी अथवा ‘औस’ भात ही पीके फेरपालटाने घेतात. काही वेळा तागापूर्वी सनताग अथवा धैंचा ही हिरवळीची पिके घेतात.


पूर्व मशागत : फेब्रुवारीत पहिले पाऊस पडून गेल्यावर जमीन पाच–सहा वेळा खोल व उभी–आडवी नांगरतात. हलक्या जमिनीपेक्षा भारी जमिनीत जास्त वेळा नांगरणी करतात. ढेकळे फोडून जमीन भुसभशीत करतात आणि फळी फिरवून ती हलके दाबून घेतात.

खत : पुराच्या पाण्याने दर वर्षी गाळ बसत असलेल्या जमिनीला अथवा मागील पिकाला भरपूर खत दिले असल्यास तागाला वेगळे खत द्यावे लागत नाही परंतु इतर जमिनींत, विशेषतः जुन्या गाळाच्या जमिनीत, सेंद्रीय पदार्थ आणि नायट्रोजन यांची फारच कमतरता असल्यामुळे सेंद्रीय खतांचा व नायट्रोजनाचा पुरवठा करावा लागतो. मशागतीच्या वेळी हेक्टरी ४ ते ८ टन कंपोस्ट आणि पेरणीनंतर ६ व १० आठवड्यांनी प्रत्येक वेळी हेक्टरी १५ किग्रॅ. नायट्रोजन देतात. फॉस्फोरिक अम्ल व पोटॅश यांचा जमिनीत अभाव असल्यास पेरणीपूर्वी हेक्टरी प्रत्येकी ३० किग्रॅ.चा पुरवठा होईल एवढे खत देतात. अम्लधर्मीय जमिनीत पेरणीपूर्वी ३–४ आठवडे हेक्टरी ३–५ क्विंटल चुना घालतात. चुना आणि पोटॅशमुळे खोडकूज रोगाचा प्रतिबंध होतो, असे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.

पेरणी : पुराचे पाणी येणाऱ्या खोलगट भागांत फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत पेरणी करतात. मध्यम उंचीवरील भागांत मार्च मध्यापासून एप्रिल मध्यापर्यंत आणि जास्त उंचीवरील भागांत मे मध्यापासून जून मध्यापर्यंत पेरणी करतात. बिहार व उ. प्रदेशात जुलैच्या मध्यापर्यंत पेरणीचा हंगाम असतो. फोकून अथवा नांगरामागे उथळ सऱ्यांत ४ ते ५ सेंमी. अंतरावर हाताने बी पेरतात. पाभरीने समांतर ओळींत बी पेरल्यास निंदणीचा आणि पीक विरघळणीचा खर्च वाचतो. म्हणून हलके हलके या पद्धतीचा वापर वाढत आहे. तीतापाटाचे हेक्टरी ११·३ ते १७ किग्रॅ. आणि मीठापाटाचे ६·८ ते ११·५ किग्रॅ. बी फोकून अथवा नांगरामागे पेरण्यासाठी लागते. जमिनीत पुरेशी ओल असल्यास २–३ दिवसांत बी उगवून येते.

आंतर मशागत : तागाची रोपे ८–२२ सेंमी. उंच झाल्यावर पहिली कोळपणी ‘बिडा’ अथवा ‘अचरा’ या स्थानिक औताने करतात व त्यानंतर पंधरवड्याच्या अंतराने २ अथवा ३ वेळा कोळपणी करतात. पिकाला २–३ खुरपण्याही देतात. खुरपणीच्या वेळी कमजोर रोपे काढून टाकतात आणि क्रमाक्रमाने विरळणी करून शेवटी सर्वसाधारणपणे दोन रोपांत १०–१५ सेंमी. अंतर ठेवतात. पीक दाट असल्यास त्याची वाढ कमी होऊन उत्पन्न घटतेपरंतु दाट पीकातील झाडांचा वाख चांगल्या पोताचा व निर्दोष असतो. विरळणीच्या वेळी १ मी. पेक्षा जास्त उंच असलेली झाडे कुजवून वाख काढतात आणि तो‘बाचपाट’ या नावाने विकला जातो.

रोग : तागावर खोडकूज, ओली कूज, काळ्या पट्ट्याचा रोग इ. रोग आढळतात.

खोडकूज : हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलाय या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. त्याच्यामुळे वाखाच्या उत्पन्नावर व प्रतीवरही परिणाम होतो. रोग जमिनीतील रोगट पालापाचोळ्यातील कवकामुळे किंवा दूषित बियांद्वारा उद्‌भवतो. झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोग उद्‌भवू शकतो त्याच्यामुळे पानांवर डाग पडतात. ते नंतर देठ व खोडावर पसरतात. रोग तीव्र असेल, तर तो बोंडावरही पसरलेला असतो आणि बिया दूषित होतात. खोडावर मोठे काळपट चट्टे पडून खोडावरील साल तंतुमय बनते. यामुळे धाग्याची प्रत बिघडते. क्वचित रोग झाडाच्या मुळांवरही पसरतो. रोग निवारण्यासाठी पिकाची फेरपालट करणे आवश्यक असते. फक्त निरोगी, वजनदार बी पेरण्यासाठी घेतात आणि अशा बियांना पारायुक्त कवकनाशक भुकटी एक किग्रॅ. बियांना २ ग्रॅ. या प्रमाणात चोळून पेरतात.

ओली कूज : हा रोग पेल्लीक्युलेरिया रॉल्फ्साय  या कवकामुळे उद्‌भवतो. रोगाचे प्रमाण पीक काढण्याच्या वेळी जास्त असलेले आढळते. या रोगामुळे खोडावर पडणारे चट्टे बिलबिलीत असून त्यांच्यामध्ये मोहरीच्या आकाराच्या व रंगाच्या स्क्लेरोशिया (कवकतंतूंच्या गुठळ्या) सापडतात. रोग पडू नये म्हणून पिकांची फेरपालट करणे हितावह असते.

काळ्या पट्ट्यांचा रोग : हा रोग डिप्लोडिया कॉर्कोरी  या कवकांमुळे उद्‌भवतो. या रोगामुळे जमिनीपासून ६० ते ९० सेंमी. उंचीवरील खोडाच्या भागावर काळे पट्टे आढळतात. त्यामुळे झाडे सुकतात. यावर प्रभावी उपाय उपलब्ध नाही.

भुरी : हा रोग ओइडियम  वंशातील कवकांद्वारा उद्‌भवतो. पिकावर गंधक पिस्कारल्याने रोग आटोक्यात येतो. [→ भुरी].


कच्चा वाख, विणण्याचा दोरा, विणलेले कापड व पिशव्या यांच्या साठवणीमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के असल्यास बरेच नुकसान होते व त्यांत कवकांचा भाग फार मोठा आहे. त्यांत बुरशीकारक स्परजिलस आणि पेनिसिलियम  या वंशातील कवके सर्वसाधारणपणे आढळून  येतात व पेनिसिलियम सिट्रिनम  प्रामुख्याने असते.

कीड : टोका : (एपिऑन कॉर्कोरी ). ही कीड सर्वांत महत्त्वाची आहे. तंतुमय ऊतकांतून (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांतून) ही कीड अन्नशोषून घेते, त्यामुळे वाखाचे उत्पन्न व प्रत यांवर अनिष्ट परिणाम होतो. बोंड आणि बियांनाही या किडीपासून अपाय होतो. तण काढते वेळी कीड लागलेली झाडे उपटून काढणे,किडीच्या पर्यायी पोषणाच्या झाडांचा नाश करणे आणि वाढ झालेल्या किडीवर ५% बीएचसी उडवणे हे उपाय आहेत.

पिवळा कोळी : (हेमिटासॉनेमस लॅटस ). ही कीड झाडांतील अन्नरस शोषून घेते. झाडे रोगट दिसतात आणि त्यांची वाढ खुंटते आणि पर्यायाने उत्पन्न कमी होते. ३ : १ या प्रमाणात चुना–गंधक मिश्रण ३ दिवसांच्या अंतराने मारल्यास या किडीचे प्रमाण कमी होते.

यांशिवाय तागाच्या पिकाला तीन प्रकारच्या अळ्यांचा उपद्रव होतो. लॅफिग्मा एक्झीगुआ  ही अळी रोपांचे विशेष नुकसान करते. दुसरी डायक्रिसिया ऑब्लिक्व  ही केसाळ अळी पानांचा विशेषतः जून पानांचा खाऊन नाश करते. जून ते ऑगस्ट महिन्यात ही अळी प्रामुख्याने आढळून येते. नोमिस सॅबुलीफेरा  ही उंट अळी शेंड्यांचे कोंब व पाने खाते त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. ह्या सर्व अळ्यांवर डी. डी. टी. परिणामकारक आहे.

कापणी : तीतापाटाची कापणी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान व मीठापाटाची कापणी ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान करतात. तागाखालील उत्कृष्ट जमिनीचे पुष्कळसे क्षेत्र दुबार पिकाखालील असते. मार्च–एप्रिलमध्ये ताग पेरून तो जूलै–ऑगस्टमध्ये कापतात आणि जमिनीची मशागत करून तीत भाताची रोपे लावतात. जुलैच्या मध्यानंतर भाताची लागण केल्यास उशीर होणाऱ्या दर दिवसाला उत्पन्नात १ टक्का घट येते. यासाठी भाताचे जास्तीत जास्त पीक मिळावे म्हणून तागाची कापणी शक्य तितक्या लवकर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. सर्वसाधारणपणे ५०% झाडांना बोंड धरू लागल्यावर पिकाची कापणी करतातपरंतु वर लिहिल्याप्रमाणे परिस्थितीनुसार कापणीच्या वेळेत फेरबदल करावा लागतो. बोंडे तयार होण्याच्या सुमारास कापणी केल्यास वाख भरड प्रतीचा निघतो. पुरामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याची शक्यता दिसून आल्यास कळ्या फुटून उमलण्याअगोदर अगर पीक फुलावर असताना (अपक्व स्थितीत) ते कापतात त्यामुळे उत्पन्न कमी येते व शिवाय धागा कमकुवत असतो. पीक विळ्याने जमिनीबरोबर कापतात. कापणीच्या वेळी पुरामुळे पीक पाण्याखाली असल्यास कापणारे मजूर पाण्याखाली जाऊन पीक कापतात. शेतात अर्धा–एक मी. पाणी कापणीच्या वेळी असल्यास सबंध झाडे उपटून काढतात. खोलगट भागातील पीक कापल्याबरोबर पेंड्या बांधून कुजविण्याच्या जागी नेतात परंतु उंचावरील जमिनीतील पीक कापल्यावर ताटांच्या सु. २० सेंमी. व्यासाच्या पेंड्या बांधून त्या २–४ दिवस पाने झडण्यासाठी शेतातच उभ्या ठेवतात. पाने झडल्यामुळे पेंड्याचे वजन कमी होते व आकारमानही लहान होते. पाने झडलेली ताटे पाण्यात बुडविल्यावर त्यांत सूक्ष्मजंतूंचा प्रवेश सुलभ रीतीने होतो. ओरिसा भागात ८–१० सेंमी. लांबीचे बुडखे ठेवून कापणी करतात. यामुळे वाखाचे उत्पन्न कमी येते परंतु वाखात बुडख्याकडील सदोष वाखाचे प्रमाण अल्प असते व त्यामुळे किंमत जास्त येते.

ताटे कुजविणे : (रेटिंग). पीक कापल्यावर शेताजवळच्या पाण्यात पेंढ्या कुजत घालतात. बंगालच्या उत्तर आणि पश्चिम भागांत, बिहार व ओरिसात आणि आसाममध्ये उंचावरील भागांत कोंडलेल्या पाण्यात ताग कुजवितात. आसामच्या खोलगट भागात तो संथ वाहत्या पाण्यात कुजवितात.वेगाने वाहणारे पाण्याचे प्रवाह कुजविण्यासाठी योग्य नसतात कारण त्यांत ताटे कुजण्याची क्रिया लवकर होत नाही व पेंढ्या एकसारख्या कुजत नाहीत. कोंडलेल्या पाण्यात कुजविलेला ताग काळपट रंगाचा असतो. त्यामुळे अशा पाण्यात पेंढ्या कुजेपर्यंत सतत बुडवून न ठेवता अधूनमधून पाण्यातून काढून थोड्या दिवसांनंतर पुन्हा बुडवितात.

पाण्यात कुजविण्यासाठी पेंढ्या एकावर एक तीन थर करून थप्पी करतात, अशा थप्पीला स्थानिक भाषेत ‘जाक’ म्हणतात. जाकवर तण किंवा पालापाचोळा घालतात आणि मागाहून जाक पाण्यात बुडवून त्यावर वजनासाठी लाकडाचे ओंडके अगर केळीचे खुंट एवढ्या बेताने ठेवतात की, पेंढ्यांची थप्पी पाण्यात संपूर्णपणे बुडालेली असतेपरंतु फार खोलवर बुडालेली नसते. कुजण्याची क्रिया वरपासून खालपर्यंत सारखी व्हावी म्हणून पेंढ्या प्रथम सु. ०·७५ मी. पाण्यात २-३ दिवस उभ्या ठेवून नंतर त्या पाण्यात बुडवून ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.


पाण्याच्या व सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे खोडाच्या आतील काष्ठमय भागापासून वाख सलग सुटून येतो. कुजण्याच्या क्रियेसाठी लागणारा कालावधी ताटाच्या जाडीवर व इतर बाबींवर अवलंबून असतो व तो ८ ते ३० दिवसांपर्यंत असतो. शेंड्याकडील भाग संपूर्णपणे कुजण्यासाठी ५–६ दिवस, मधल्या भागासाठी ९–१२ आणि बुडख्याकडील भाग कुजण्यासाठी १५–२० दिवस लागतात. अपक्व झाडे लवकर कुजतात. पाण्याचे तापमान जास्त असल्यास अथवा त्याच पाण्यात पूर्वी ताग कुजविला असल्यास कुजण्याची क्रिया लवकर होते. जुलैच्या अखेरीस पाण्याचे तापमान सु. ३०° असते. अशा वेळी कुजण्याची क्रिया ८–१० दिवसांतच होते. यानंतर पाणी हलके हलके थंड होत जाते आणि त्यामुळे ताग कुजण्यास जास्त जास्त दिवस लागतात. सप्टेंबरच्या अखेरीनंतर ३–५ आठवडे लागतात. थंड हवामानाच्या महिन्यांत पाण्यात अमोनियम सल्फेट व हाडांचा भुगा थोड्या प्रमाणात मिसळल्यास सूक्ष्मजंतूंची वाढ पुष्कळ प्रमाणात होऊन कुजण्याची क्रिया लवकर होते.

तागाच्या झाडांत, विशेषतः मीठापाटात, टॅनीन असते आणि कुजण्याच्या क्रियेमध्ये ते पाण्यात विरघळते व पाण्यातील विद्राव्य स्थितीतील लोहाशी त्याचा संयोग होऊन वाखाला काळपट (पोलादाचा) रंग येतो. या रंगाला ‘श्यामला’ असे स्थानिक नाव आहे. त्याच पाण्यात पुनःपुन्हा ताग कुजविल्यास वाखाला क्रमाक्रमाने ‘श्यामला’ रंग वाढत्या प्रमाणात चढतो आणि त्यामुळे बाजारात किंमत कमी येते. केळीचे खुंट अगर नुकत्याच तोडलेल्या आंब्याच्या अगर बेलाच्या झाडांचे ओंडके पेंढ्यांवर ठेवल्यास श्यामला रंगाचे प्रमाण आणखी वाढते. २% चिंचेच्या अर्काच्या साहाय्याने वाखाचा हा काळपट रंग काढता येतो. तागाच्या कुजण्याची क्रिया पूर्ण झाली किंवा कसे हे जाणण्यासाठी दीर्घ अनुभव आणि काळजीपूर्वक निरीक्षण यांची जरूरी असते. उत्तम प्रतीचा तागाचा वाख निर्माण करणारे शेतकरी ताग कुजण्याची क्रिया पूर्ण होण्याच्या सुमारास रोज पाहणी करून वाख केव्हा काढायचा ते ठरवितात. कुजण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर शक्य तेवढ्या लवकर वाख काढणे आवश्यक असते नाही तर वाखाचा दर्जा कमी होतो.

वाख काढणे : कुजलेल्या ताटांपासून वाख सुट्टा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वसाधारण पद्धतीमध्ये पेंड्यांतील ताटे थोडी थोडी काढून त्यांचे बुंधे मोगरीने बडवून वाख प्रथम सुटा करून मग खोडापासून सोडवितात. नंतर तो पाण्यात स्वच्छ धुवून आणि काडीकचरा काढून बांबूवर उन्हात २–३ दिवस वाळवितात. उन्हात वाळविल्यामुळे वाखाचे विरंजन होते. वाळविल्यावर तो गुंडाळून गठ्ठे बांधतात, या गठ्ठ्यांना‘मोरा’ असे म्हणतात.

उत्पन्न : एका हेक्टरमधून तीतापाटाचा ९०० ते १,३५० किग्रॅ. व मीठापाटाचा १,३५० ते १,८८० किग्रॅ. वाख मिळतो. जमिनीची सुपीकता, पिकाच्या वाढीच्या काळातील हवामान व पाऊस, तागाचा प्रकार, पिकाची निगा, झाडांमधील अंतर, कापणीच्या वेळी पिकाच्या पक्वतेची अवस्था व रोग आणि किडी यांवर हेक्टरी वाखाचे उत्पन्न अवलंबून असते. पीक हिरवे असताना त्यात वाखाचे प्रमाण ४·५ ते ७·५% असते. सर्वसाधारणपणे ते ६% असते. ठेंगण्या व बारीकझाडांमध्ये वाखाचे प्रमाण कमी असते. वाखाच्या उत्पन्नाच्या दृष्टीने खोडाच्या उंचीपेक्षा जाडीला जास्त महत्त्व आहे. निमुळत्या खोडांपेक्षा एकसारख्या दंडगोलाकृती खोडांपासून जास्त वाख मिळतो. ताग पिकविणाऱ्या प्रत्येक राज्यातील शेतकरी तागाखालील काही क्षेत्र (सर्वसाधारणपणे ३·५८%) बियांसाठी ठेवतात. वाखासाठी पीक काढल्यानंतर ४–६ आठवड्यांनी बियांचे पीक तयार होते. हेक्टरी तीतापाटाचे ३६० ते ४५० आणि मीठापाटाचे २३० ते २७५ किग्रॅ. बी मिळते. बी काढल्यानंतर ते चांगले वाळवून हवाबंद डब्यात ठेवल्यास ४ वर्षांपर्यंत अंकुरणक्षम राहते.

वाखाची गुणवत्ता : वाखाची गुणवत्ता (दर्जा, प्रत) ठरविताना पुढील गोष्टी विचारात घेतल्या जातात :(१) मजबुती, (२) जाडी, (३) रंग आणि रंगाचा एकसारखेपणा, (४) चकाकी, (५) लांबी, (६) मुळाकडील काळपट भागाचे व जाड वाखाचे प्रमाण. तागाचा प्रकार, हंगाम, कापणीच्या वेळेची पिकाची अवस्था, तसेच ताटे कुजविणे, वाख काढणे आणि तो पाण्यात धुवून काढणे या क्रिया कशा व कोणत्या परिस्थितीत केल्या गेल्या यांवर वाखाची गुणवत्ता अवलंबून असते. मीठापाटाचा वाख सूत काढण्याच्या दृष्टीने तीतापाटापेक्षा सरस असतो. निरनिराळ्या हंगामांत लावलेल्या एकाच प्रकाराच्या तागाचा वाख सारखा असत नाही. हंगामाचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतोचपरंतु पाऊस कमीजास्त पडल्यास ताग कुजविण्यासाठी लागणाऱ्या पाण्यावरही (प्रवाहावरही) होतो. ताग कशा प्रकारे कुजविला जातो याला तागाच्या गुणवत्तेत फार महत्त्व आहे. कुजविण्याची क्रिया जास्त झाल्यास धागा कमजोर होतो. ब्रह्मपुत्रा व मेघना नद्यांचे पाणी स्वच्छ असल्याने या नद्यांच्या पाण्यात कुजविलेल्या तागाचा वाख पांढरा स्वच्छ असतो. याउलट गंगा व तिला मिळणाऱ्या नद्यांचे पाणी गढूळ असल्यामुळे मुर्शिदाबाद, नडिया, जेसोर, २४–परगणा, हुगळी या जिल्ह्यांतील वाख पिवळट तपकिरी अथवा (जास्त लोहाचा अंश असलेल्या पाण्यातील) पोलादी रंगाचा असतो. वाख कोणत्या भागातील आहे, यावरून व्यापारी लोक अनुभवाने वाखाची प्रत ठरवितात. खोडापासून सोडविलेल्या वाखाला कमीजास्त प्रमाणात सालीचे भाग चिकटलेले असतात. मीठापाटात त्याचे प्रमाण तीतापाटापेक्षा कमी असते. वाखामधील इतर अनेक दोषांमुळे बाजारात त्याची किंमत कमी होते.


वाखातील तंतूं ची रचना व त्यांचे गुणधर्म : तागाच्या खोडावरील साल या सर्वसाधारणपणे ओळखल्या जाणाऱ्या भागात परिकाष्ठाला (तयार केलेले अन्न वाहून नेणाऱ्या ऊतकाला) आधार देणारे मजबूत पेशींचे तंतू असतात. या तंतूंचे एकावर एक असे १३–१९ थर असतात. प्रत्येक तंतू ४ ते ५० पेशींचा मिळून बनलेला जुडगा असतो. या पेशी लांबट व दोन्ही टोकांकडे निमुळत्या असतात. प्रत्येक पेशीची लांबी २·५ मिमी. आणि व्यास १० ते ३० मायक्रॉन (सर्वसाधारण २० मायक्रॉन) असतो (१ मायक्रॉन = १०—३ मिमी.). वैयक्तिक पेशींना अंतिम धागे असेही म्हणतात. पेशीभित्ती जाड असतात व त्यांत लिग्निन नावाचा पदार्थ असतो. हे तंतू समांतर असावेत असे सकृदृर्शनी वाटते परंतु बारकाईने पाहिल्यास ते जाळीदार पेडांच्या स्वरूपात असतात. तागाच्या कुजविलेल्या ताटापासून सलग वाखाची फीत निघून येते. या फितीची सर्वसाधारण लांबी १·५–३·० मी. (कधीकधी सु. ३·५ मी. अथवा त्याहूनही अधिक) असते. मीठापाटाच्या वाखात तीतापाटाच्या वाखापेक्षा तांबूस रंगाची छटा जास्त असते. चांगल्या प्रकारच्या वाखाला एक प्रकारची नैसर्गिक चकाकी असते. तागाचा धागा फ्लॅक्स अगर गांजाच्या धाग्यापेक्षा कमी मजबूत असतो परंतु अंबाडी, लाल अंबाडी, (रोझेल) अथवा काँगो ज्यूट (युरेना लोबाटा ) यापेक्षा जास्त मजबूत असतो. मीठापाटचे सूत (टोस्सा प्रकारचे) तीतापाटाच्या सुतापेक्षा १० ते २०% जास्त बळकट असते. तागाच्या सुतातील तेल, चरबी आणि मेण काढून टाकल्यास सूत जास्त मजबूत होते.

तागाचा वाख इतर वाखाप्रमाणे हवेतील आर्द्रता शोषून घेतो. सर्वसाधारणपणे ७७% हवेच्या सापेक्ष आर्द्रतेत आणि २५° से. तापमानात तागाच्या धाग्यात निरार्द्र धाग्याच्या वजनाच्या १५ ते १६% पाण्याचा अंश असतो. हा पाण्याचा अंश २१·५% च्या वर असल्यास सूक्ष्मजंतूंमुळे धाग्यावर प्रतिकूल परिणाम होतो व वाखाचे अगर सुताचे गठ्ठे आतील भागात सडलेले आढळून येतात.

तागाच्या सुताला रंग देता येतो परंतु असे रंग तंतूत भिनणारे पण त्याचबरोबर तंतूंना इजा न करणारे असावेत. तागाच्या तंतूंवर हलक्या (सौम्य) छटांचे रंग देण्याकरिता त्यांचे विरंजन करावे लागते नाहीपेक्षा त्यांवर गडद प्रकारचे रंगच द्यावे लागतात. विरंजनाची क्रिया करतानाही फार काळजी घ्यावी लागते.

रासायनिक संघटन : तागाच्या तंतूंचे मुख्य घटक म्हणजे सेल्युलोज, हेमीसेल्युलोज व लिग्निन हे आहेत. याशिवाय तंतूमध्ये चरबीनायट्रोजनयुक्त पदार्थ आणि ज्यांमुळे तंतूंना रंग प्राप्त होतो असे पदार्थ मेणे आणि खनिज द्रव्ये असतात. सर्वसाधारणपणे तागाच्या तंतूंचे रासायनिक संघटन पुढीलप्रमाणे असते : सेल्युलोज ५६–६२%, हेमिसेल्युलोज वर्गातील पदार्थ २२–२६%, लिग्निन ११–१२% , नायट्रोजनयुक्त पदार्थ १–१·५%, चरबी आणि मेणे ०·८–१·२%, राख १–१·५% , इतर पदार्थ १·५–२·५%.

विक्री : भारतात उत्पादन होणारा तागाचा वाख बहुतांशी उत्पादनाच्या गावातच विकला जातो. याची अनेक कारणे आहेत. कापणीच्या हंगामात सुलभ आणि सुरक्षित वाहतुकीच्या व्यवस्थेचा अभाव, अडतेदलालांच्या मोठ्या साखळीमुळे प्रत्यक्ष गिरणी मालकांना किंवा मोठ्या बाजारात विकण्यात येणाऱ्या अडचणी, चांगली किंमत येईपर्यंत माल साठविण्याकरिता सोयीची जागा नसणे इ. कारणांमुळे सु. ७५% माल खेड्यातच विकला जातो २०% माल प्राथमिक बाजारात व आठवडे बाजारात आणि ५% दुय्यम बाजारात व कच्च्या गाठी बांधण्याच्या ठिकाणी विकतात. ताग (वाख) उत्पादकापासून अंतिम गिऱ्हाईकापर्यंत पुढील तीन निरनिराळ्या टप्प्यांनी पोहोचतो : (१) खेड्यांतून प्राथमिक बाजारात (ही माल गोळा करण्याची प्राथमिक केंद्र असतात) (२) प्राथमिक बाजारातून मोठ्या (दुय्यम) बाजारात (येथे तागाच्या कच्च्या गाठी बांधल्या जातात) (३) दुय्यम बाजारातून कलकत्त्याच्या तागबाजारात. ह्या व्यापारात निरनिराळे दलाल अगर मध्यस्थी असतात. पैकार, फरिया आणि व्यापारी लोक खेड्यांतील शेतकऱ्यांकडून अथवा आठवडे बाजारात माल खरेदी करून तो दुय्यम बाजारात कच्च्या गाठी बांधणाऱ्यांना विकतात. कच्च्या गाठी बांधणारे लोक व्यापारी प्रतींप्रमाणे माल वेगळा वेगळा काढून त्यांच्या कच्च्या गाठी बांधतात. या गाठीचे वजन ५५ ते १५० किग्रॅ. असते. कलकत्त्याच्या बाजारात ताग खरेदी करणारे (१) तागगिरण्यांचे मालक अथवा त्यांचे दलाल आणि (२) निर्यातीसाठी पक्क्या गाठी बांधणारे असे दोन वर्गांचे लोक असतात. तागगिरण्यांसाठी लागणारा माल कच्च्या गाठींच्या स्वरूपात खरेदी केला जातो.

तागाचा वर्ग व प्रत ठरविताना तो निरनिराळ्या उत्पादनांसाठी कितपत योग्य आहे आणि उत्पादनाच्या निरनिराळ्या क्रियांमध्ये त्याची क्षमता कशा प्रकारची असेल, या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. प्रथम तागाच्या जातीप्रमाणे वर्गवारी केली जाते. त्यानंतर माल कोणत्या जिल्ह्यात अगर भागात पिकविला गेला, हे विचारात घेतले जाते. या गोष्टींवर आधारित अशी मालाची वर्गवारी कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहे. उदा., ‘जात’ वर्गातील माल (वाख) सर्वांत उत्तम मानला जातो. कोष्टक क्र. ३ प्रमाणे मालाचा वर्ग (गुणवत्तेप्रमाणे) निश्चित झाल्यावर त्याची प्रत विचारात घेतली जाते. यासाठी वाखाची लांबी, मजबुती, रंगदोषांचे प्रमाण, आर्द्रता यावर आधारित अशा चार निरनिराळ्या प्रती सर्वसामान्य झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे : (१) शेंडे, (२) मध्यभाग, (३) डेखे अथवा बुडखे आणि (४) क्ष–डेखे. कोष्टकात दिलेल्या मालाच्या वर्गवारीच्या प्रकाराप्रमाणे मालाची किंमत कमीजास्त होते. तसेच प्रत्येक प्रकाराची प्रतही लक्षात घेतली जाते. ‘शेंडे’ या प्रतिपेक्षा ‘मध्यभाग’ प्रतीला भाव कमी मिळतो, तर ‘डेखे’ या प्रतीला त्याहूनही कमी भाव मिळतो. मालामध्ये आर्द्रता किती आहे हे प्रत्येक खरेदीदाराला अनुभवाने ठरवावे लागते. सर्वसाधारणपणे वाखातील आर्द्रतेचे प्रमाण निरार्द्र वाखाच्या वजनाच्या ९·६ ते १२% असते. जून ते सप्टेंबरमध्ये निर्यात होणाऱ्या गाठींमध्ये हे प्रमाण १२% पेक्षा जास्त नसावे व इतर महिन्यात ते १०% पेक्षा जास्त नसावे, असे भारतातील ताग गिरण्यांच्या संघटनेने ठरवून दिले आहे.


 कोष्टक क्र.३. तागाचे गुणवत्तेप्रमाणे वर्ग

 

जाती व वर्ग (गुणवत्ता)

उत्पादनाचे स्थान

तंतूचे गुणधर्म

कॉ. कॅप्सुलॅरिस

सफेद ज्यूट

   

जाट (नारायणगंज

किंवा डाक्का)

मैमनसिंग, टिपेरा, ब्रह्मपुत्रेच्या काठी.

उत्कृष्ट प्रत, बळकट, स्वच्छ, चकाकणारे, सारख्या जाडीचे, कठीण.

डिस्ट्रिक्ट (सरोजगंज)

डाक्क्याच्या पश्चिमेकडे व जात जातीच्या पश्चिमेकडील भाग.

वरीलप्रमाणे साधारण गुणधर्माचे, कठीण अथवा मऊ.

नॉर्दन (उत्तर)

उत्तर बंगाल, गंगेच्या उत्तरेकडील जिल्हे.

मऊ, तळ्यात कुजवलेले म्हणून पाणी जसजसे आटत जाईल तसतसे अस्वच्छ व कमी प्रतीचे.

वेस्टर्न

बिहारमधील पूर्णिया जिल्हा

मऊ व उत्तरोत्तर कमी बळकट व रंग विटणारे.

आसाम

आसाम व पूर्व बंगालमधील सिल्हेट.

कुजविण्याच्या भिन्न रीतींमुळे भिन्न प्रतींचे व आखूड तंतूमुळे कमी प्रतीचे, कठीण अथवा मऊ.

ओरिसा

ओरिसा.

दावरा

बाकरागंज व फरीदपूर.

साधारण बळकट पण विटलेल्या रंगाचे, कठीण.

जंगली

माल्डा व मुर्शिदाबा

कठीण व खूप मुळ्यायुक्त.

कॉ. ओलिटोरियस

टोस्सा ज्यूट

   

जाट

सफेद ज्यूटखालील जिल्हे

उत्तम प्रतीचे, बळकट, स्वच्छ तकतकीत, सोनेरी किंवा किंचित करड्या रंगाचे, कठीण.

डिस्ट्रिक्ट

फरीदपूर, खुलना, नडिया जिल्हे.

जातपेक्षा कमी प्रतीचे, करड्या ते पवळसर सोनेरी रंगाचे, कठीण अथवा मऊ.

नॉर्दन

राजशाही, मुर्शिदाबाद, पावना व वोग्रा.

मऊ व वरीलपेक्षा फिक्कट रंगाचे.

देशी ज्यूट

   

जाट

पश्चिम बंगाल, हावडा, हुगळी, बरद्वान.

तकतकीत, लांब, तंतू करडा व मऊ, जास्त पीळ सहन करणारा.

डिस्ट्रिक्ट

२४–परगणा, नडिया व खुलना.

नॉर्दन टोस्सासारखे परंतु अस्वच्छ पाण्यात कुजविल्यामुळे जास्त काळसर, मऊ.


निर्यात होणाऱ्या कच्च्या तागाच्या प्रत्येक गाठीचे वजन १८१ किग्रॅ. असते मालाची प्रत दर्शविणाऱ्या गाठीवरील सु. २,००० निशाण्यांची कलकत्ता वेल ज्यूट ॲसोसिएशनकडे नोंद करण्यात आली आहे. यांतील प्रत्येक निशाणी गाठीतील मालाच्या प्रतीबद्दल हमी निदर्शक असते. ह्या निशाण्यांमागे एल.जे. ए. ही अक्षरे असल्यास ती निशाणी लंडन ज्यूट ॲसोसिएशनला मान्य असलेल्या प्रतवारीप्रमाणे आहे, असे समजतात [स्थानिक वापराकरिता हब्बी–डाब्बी (निवडलेली) व गरसाट (न निवडलेली) अशाही निशाण्या गाठीवर वापरण्यात येतात]. भारतीय मानक संस्थेने पांढऱ्या तागाच्या ८, टोस्सा तागाच्या ९ व देशी तागाच्या ३ प्रतींना मान्यता दिली आहे.

उपयोग : तागाचा सर्व जगामध्ये निरनिराळ्या कारणांसाठी कृषी, व्यापार, उद्योग आणि घरगुती क्षेत्रांत उपयोग केला जातो. त्याचा मुख्य उपयोग किंतान आणि गोणीचे कापड तयार करण्यासाठी होतो. ह्या कापडाच्या पिशव्या (गोणी अथवा पोती) बनवितात आणि त्यांतून अनेक प्रकारचा माल पाठविला जातो. उदा., धान्य, कोळसा, खनिज पदार्थ, खते, रसायने, सिमेंट साखर, कॉफी वगैरे. सुती, रेशमी व लोकरीच्या कापडाचे गठ्ठे बांधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर तागाच्या कापडाचा उपयोग केला जातो. इतर विविध कारणांसाठी तागाचे कापड, सुतळी, दोर अथवा तुकडे यांचा वापर केला जातो. त्यांपैकी काहींचा उल्लेख पुढे केला आहे. (१) लिनोलियमासाठी (२) गालिचे बनविण्यासाठी (कापसाच्या अगर लोकरीच्या धाग्यांबरोबर), गालिच्याच्या खालच्या बाजूला ताग असल्याने त्याला मजबुती येते(३) चहाच्या मळ्यात नुकतीच तोडलेली पाने हवेवर वाळविण्यासाठी (४) घरगुती उपयोगातील आसने, बिछायत, गाद्यांच्या खोळी, ताग व लोकर यांपासून तयार केलेली कांबळी वगैरेंसाठी(५) शिंपीकामात अस्तर व पॅडिंगसाठी (६) तागाच्या कापडाचे एकावर एकथर देऊन स्तरफलक (प्लायबोर्ड) तयार करतात व त्यांचा उपयोग धातूचा पत्रा अगर स्तरकाष्ठ (प्लायवुड) यांच्याऐवजी करतात (७) जलाशय व कालवे यांतून झिरपणाऱ्या पाण्याचा प्रतिबंध करण्यासाठी ताग व बिट्युमेन यांच्यापासून तयार केलेला जलनिरोधक कपडा वापरून (८) घरांच्या छपरांसाठी (९) पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी (यासाठी वाळू भरलेल्या तागाच्या पिशव्यांचा उपयोग केला जातो)(१०) तंबूसाठी नवार पट्ट्या (११) लढाईत रणगाडे शत्रूला दिसू नयेत यासाठी ते तागापासून तयार केलेल्या जाळ्यांनी झाकतात(१२) घराच्या बांधकामातील सिमेंटला पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी (डांबराबरोबर उपयोग) (१३) ताडपत्र्या बनविण्यासाठी (१४) जमिनीखालून अगर पाण्याखालून जाणाऱ्या केबलींसाठी वेष्टन(१५) कागदाच्या आणि प्लॅस्टिकच्या धंद्यात तागाच्या टाकाऊ मालाचा उपयोग करतात(१६) दोर (३·७ सेंमी. जाडीपर्यंतचे), सुतळी व दोरापासून बनविलेल्या जाळ्यांसाठी (१७) विमानतळाची धावपट्टी तयार करण्यासाठी (डांबराबरोबर)(१८) विजेच्या तारांच्या वेष्टनात (१९) पादत्राणांच्या तळांसाठी(२०) ताग व लाख ह्यांच्या थरांपासून तयार केलेल्या फलकांच्या (ज्यूटलॅकच्या) पेट्यांचा दुसऱ्या महायुद्धात चहा पाठविण्यासाठी उपयोग केला गेला (२१) ताग (वाख) काढून घेतल्यावर उरणाऱ्या काड्यांचा उपयोग जळणासाठी होतो अथवा त्यांपासून बंदुकीच्या दारूचा कोळसा तयार करण्यात येतो.

कापडनिर्मिती : कच्च्या तागापासून कापड निर्माण करण्यामधील निरनिराळ्या प्रमुख क्रिया पुढीलप्रमाणे आहेत : (१) सूतकताई, (२) विणाई, (३) अंतिम संस्करण. यांपैकी सूतकताईची क्रिया तागाच्या बाबतीत महत्त्वाची आहे. सूत तयार झाल्यावर कापडविणाई व कापडावरील अंतिम संस्करण या क्रिया इतर धाग्यांच्या सुतापासून विणलेल्या कापडाप्रमाणे असतात. सारांशरूपाने (अ) धाग्यांचे तंतू मोकळे करणे (आ) तंतूंची समांतर मांडणी करणे (इ) सुताचा रंग, प्रत आणि मजबुती यांच्या एक समानतेसाठी तंतूंचे मिश्रण करणे (ई) तंतूंना पीळ देऊन सूत काढणे, या तागाच्या सूतकताईमधील प्रमुख क्रिया आहेत.

धाग्यांवरील पूर्वक्रिया : तागाच्या धाग्यांवरील कताई-विणाईपूर्वीच्या क्रिया तागाच्या जाति-प्रतीवर अवलंबून राहतात. निरनिराळ्या ठिकाणचा माल निरनिराळ्या प्रतींचा असणे स्वाभाविक आहे. धाग्याचा रंग, स्पर्श, त्याची बळकटी आणि त्यातील मुळाकडच्या भागाचे प्रमाण यांवरून सामान्यतः तागाची प्रत ठरविली जाते. व्यवहारात वरील गुणांवरून तागाच्या उत्तम, मध्यम, कनिष्ठ व निकृष्ट अशा चार प्रती निदर्शिल्या जातात.

मिश्रण : गिरणीत ताग गाठींच्या रूपात येतो. गाठी उघडून त्यांतील मालाची नीट पाहणी करतात व काढावयाच्या सूत प्रकारांच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने त्याची विभागणी करतात. नंतर प्रत्येक प्रकारच्या सुतासाठी निरनिराळे गट मिसळून मिश्रण तयार करतात. या मिश्रणाच्या गठ्ठ्यात काही कडक व काही मऊ धाग्यांचा भाग असतो. हा कडक भाग रोपांच्या मुळाकडचा असतो व पाण्यात कुजवून गाभ्यापासून धागा मोकळा करताना त्यावर सालीचा भाग शिल्लक राहिल्याने तो कडक झालेला असतो. चांगल्या प्रतीच्या सुतासाठी जे मिश्रण वापरावयाचे त्यातील असा सर्व किंवा काही भाग कापून काढतात. अशा तऱ्हेने मिश्रणांचे गट तयार झाल्यावर धागे मऊ करण्याची पुढील क्रिया त्यांवर करण्यात येते.

मऊ करणे : सर्व ताग व अर्थातच कापलेला कडक सालपट भागही नरम करावा लागतो. यासाठी त्याला तेल व पाणी निरनिराळी किंवा त्यांचे पायस (मिश्रण) करून लावतात. सामान्यतः ही तेल–पाणी देण्याची क्रिया ताग नरमित्र नावाच्या उपकरणातून नेत असतानाकरतात. नरमित्रात पन्हळ्या असलेल्या पोलादी रुळांची जोडी असते आणि तीतून जाताना धाग्यांवर दाब पडतो व तसेच ते वाकविलेही जातात. तसेच रुळांमुळे तेल–पाणी सगळीकडे सारखे पसरते. यांत्रिक कार्य व तेल–पाणी यांमुळे धागे बरेच मऊ होतात.


धाग्यात आणखी नरमपणा आणण्यासाठी मालाचा ढीग रचून चार-पाच दिवस तो तसाच राहू देतात. सालपट भाग जास्त असल्यास आठवडाभर ठेवावा लागतो. माल चांगल्या प्रतीचा, साल नसलेला असल्यास ढीग करूनराहू दिल्याशिवायही तो पुढील क्रियांसाठी घेता येतो. ढीग रचून माल तसाच ठेवलेला असताना ढिगात उष्णता उत्पन्न होते आणि मग तेल, पाणी  व जंतू यांच्या संयुक्त कार्याने धागे नरम होतात. तेल व पाणी किंवा पायस यांचे वजन साधारणतः तागाच्या वजनाच्या ३०% असते. खनिज तेलाची किंमत तेलबियांच्या तेलापेक्षा कमी असल्याने तेच वापरले जाते.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काही वर्षांपासून वरील नरमित्राऐवजी माल पसरविणारे यंत्र वापरात आले आहे. या यंत्राने सगळीकडे तेल-पाणी देण्याचे कार्य जास्त चांगले होते व त्यातून बाहेर पडणारा माल मुळकट्याच्या रूपात असतो. मुळकटीमुळे तागात तेल-पाणी जास्त सामावते आणि तो मऊ पडण्याची क्रिया जास्त चांगली होते.

मुळकटे मऊ करणे : काही ठिकाणी ताटे कुजविण्यासाठी पुरेसे पाणी नसते, तर काही वेळा अपुरे व सदोष कुजवणे होते. या कारणांनी मुळाकडील भाग सालपट राहतो. अशा तऱ्हेच्या कमी प्रतीचा ताग भारतात पुष्कळ निघतो व तो वरील पद्धतीने पुरेसा मऊ होत नाही. ही प्रत गोणपाटाच्या बाण्यासाठी (आडव्या धागासाठी) वापरता येते, तरीही अशा तऱ्हेने वापरूनही पुष्कळ ताग शिल्लक उरतो. तो वापरावयाचा तर आणखी मऊ करणे जरुरीचे असते. यासाठी दोन पद्धती शोधून काढण्यात आल्या आहेत. भारतीय केंद्रीय ताग समितीच्या तांत्रिक संशोधन प्रयोगशाळेच्या पद्धतीत तागाच्या वजनाच्या ४०% पाणी व डाय अमोनियम हायड्रोजन फॉस्फेटाचा १% विद्राव यात घालून ही मुळकटे ४-५ दिवस ठेवल्यास जंतू सालीतील अविद्रुत पेक्टिनाचे विघटन करतात आणि धागे मऊ होतात. भारतीय ताग गिरणी संघाच्या (इंडियन ज्यूट मिल्स ॲसोसिएशनच्या) संशोधन-संस्थेच्या पद्धतीत विरल अमोनियम सल्फेट (०·५% विद्राव) व मॅग्नेशियम क्लोराइड (०·०५%) यांच्या सान्निध्यात मालाला संमिश्र जंतु-संवर्धकाचा (ज्यात सूक्ष्मजंतूंची वाढ होते अशा माध्यमाचा) विद्राव घेतात आणि माल चार दिवस तसाच राहू देतात. नंतर नेहमीचे पायस देऊन नरमित्रातून माल काढला, तर हा खालच्या दर्जाचा ताग गोणपाटाच्या ताग्यासाठी (रुंदीतील धाग्यासाठी) आणि किंतानाच्या बाण्यासाठीही वापरता येतो.

पिंजण आणि ओढण : नरमित्रातून आलेला व तेल–पाणी दिलेला माल जरूर तेवढे दिवस साठवून ठेवल्यावर तो पिंजण खात्यात येतो. पिंजण यंत्रणेतील पहिली पायरी म्हणजे तोडपिंजक (ब्रेकर कार्ड) यंत्र हे होय. त्याच्या भरण टोकाला एक अखंड फिरता पट्टा असतो आणि कामगार आलेला माल त्यावर सारखा पसरत असतो. यंत्रात काही रूळ असतात व त्यांना पोलादी टोकदार चुका लावलेल्या असतात. रूळ फिरताना तागाचे धागे रूळ-चुकांमधून जातात. या वेळी धाग्यांची तूट-फूट होऊन त्यांची लांबी व रुंदी कमी होतात. तसेच चुकांमधून पिंजण होत असताना कचरा, सालपटे वगैरे काढून टाकली जातात.

मुळकटे, दोरांचे व जुन्या गोणपाटाचे तुकडे, गुंता झालेले धागे असा मिश्र व जाडाभरडा माल असल्यास प्रथम तो वरच्याच सारख्या पण दणकट यंत्रातून (टीझर कार्ड) काढतात. यंत्रातून बाहेर पडणारा माल वरील तोडपिंजकात घालण्यायोग्य होतो व तो इतर मालाबरोबरच यंत्रात भरतात. तोडपिंजकातून बाहेर पडणारा माल हा पेळूच्या स्वरूपात असतो. मात्र कापसाच्या पेळूप्रमाणे ही पेळू गोल छेदाची नसून रुंद फीत असते. ही एक डब्यात जमा होते किंवा एका तर्कूवर गुंडाळून हिचे रीळ बनविले जाते.

अंत्य पिंजक : पिंजण्याच्या क्रियेतील हे दुसरे व शेवटचे यंत्र असून यात बऱ्याच (बहुतेक १२) पेळू भरण टोकाला यंत्रात घालतात. यंत्रातील रुळांची रचना तोडपिंजकातल्याप्रमाणेच असते, पण येथे पिंजण जास्त चांगले होण्याची व्यवस्था असते. या यंत्रातही राहिलेला कचरा काढून टाकला जातो पण या यंत्रात होणारे मुख्य कार्य म्हणजे या १०–१२ पेळू जरी यंत्रात भरल्या गेल्या, तरी त्यातून बाहेर एकच व तीही पहिल्यापेक्षा हलकीच अशी पेळू मिळेल असे साधणे. हे साधण्यासाठी प्रदान रूळाचा (ज्यातून पेळू बाहेर पडते त्या रूळाचा) पृष्ठीय वेग भरण (आदान) रुळाच्यापेक्षा जास्त ठेवलेला असतो. यामुळे पिंजणाबरोबर धाग्यांची ओढणही होते. तसेच या यंत्रात मिश्रणही साधते व बाहेर पडणारी पेळू हवी तशी एकसारखी होते.

अलीकडे तोड व अंत्य पिंजक या दोन्ही यंत्रांत घडणारी कार्ये एकाच पिंजकात साधली गेली असून त्याला संयुक्त पिंजक म्हणतात.

अंत्य किंवा संयुक्त पिंजकातून निघालेल्या पेळू ओढक (ड्रॉ फ्रेम) यंत्रात भरतात. या यंत्रात दोन ते चार पेळूंची एक पेळू, पण पहिल्यातील एकीएवढीच किंवा लहानही केली जाते. येथेही प्रदान रुळांचा पृष्ठीय वेग भरण रुळांच्या वेगापेक्षा जास्त ठेवल्याने ही क्रिया घडून येते. बारीक सूत काढायचे असेल, तर दोन किंवा तीन वेळाही असे पेळूंचे एकीकरण करतात.


 रोव्हींग : ओढकातून आलेल्या पेळू रोव्हिंग यंत्रात भरतात. यंत्रात पेळू ओढून बारीक केली जाते, पण तिला थोडा पीळही घातला जातो. आता फितीचा आकार जाऊन तागाला पीळ नसलेल्या दोरीचे रूप येते. ही दोरी यंत्रावरच ठेवलेल्या एका लाकडी नळीवर (बॉबिनीवर) गुंडाळली जाते. यंत्रावर अशा बऱ्याच गुंडाळ्या तयार होतात.

कताई : वरील गुंडाळ्या (बॉबीन) आता कताई यंत्रावर ठेवल्या जातात. गुंडाळीतील दोरी भरण रुळांच्या जोडीतून ओढरुळांच्या जोडीत जाते. हे ओढरूळ पन्हळीचे असतात. या रुळांत पन्हळ्यांमध्ये सुतावर दाबही पडतो. या दोन रूळ जोड्यांमधील अंतर सु. २५–२८ सेंमी. असते. ओढरुळातून सूत बाहेर पडल्यावर ते एका फिरतीतून (फ्लायरमधून) जाते व तेथे त्याला (रोव्हिंग यंत्रातल्याप्रमाणे) जरूरतितका पीळ दिला जातो. नंतर सूत एका बॉबिनवर गुंडाळले जाते. एका कताई यंत्रात ४०–५० बॉबिनी लावलेल्या असतात.

अलीकडील पद्धतीनुसार रोव्हिंग हा टप्पा काढून टाकला असून तिसऱ्या ओढकातून बाहेर पडणारी पेळूच (फीतच) सरळ कताई यंत्रात भरतात. ही पेळू अगदी पातळ व नाजूक असते. ती हाताळताना व तीवर होणाऱ्या पुढील क्रियांत ती तुटू नये म्हणून ओढकातून बाहेर येताना तिला मुद्दाम वळ्या (सुरकुत्या) पडतात. ही पेळू नेहमीप्रमाणे डब्यात साठवलेली असते व या डब्यातूनच कताई यंत्रात भरली जाते. पेळूचे कताई यंत्र नेहमीच्यापेक्षा थोडे निराळे असते. त्यात पेळूपासून सुतापर्यंतच्या टप्प्यात एकापेक्षा जास्त ओढरूळांच्या जोड्या असतात. तसेच फिरती व बॉबिन यांचा फिरण्याचा वेग जास्त असतो. यातून मिळणारे सूत नेहमीच्या कताई यंत्रातल्यापेक्षा अधिक चांगले असते.

खळ देणे : किंतानाच्या जातीचे म्हणजे वरच्या दर्जाचे कापड विणण्यासाठी वापरावयाच्या ताण्यांच्या सुताला खळ देणे आवश्यक असते. किंतानाच्या बाण्याला आणि गोणपाटाच्या ताण्याला व बाण्याला बहुतेक खळ देण्याची जरूरी नसते. पूर्वी खळ पिष्टमय पदार्थांची करीत, पण दुसऱ्या महायुद्धापासून आता चिंचोक्यांची करतात. सॅलिसिलिक अम्ल, बीटा-नॅप्थॉल, फॉर्माल्डिहाइड यांसारखी रसायने तीत परिरक्षक (कापड जास्त दिवस खराब न होता टिकावे म्हणून घातलेले पदार्थ) म्हणून घालतात. जितके ताणे (शेकड्यांनी) हवे असतील तितकी सूत गुंडाळलेली रिळे एका चौकटीला लावतात. ही सुते खळ लावण्याच्या रूळजोडीतून जातात व त्यांना तेथे हवी तेवढीच खळ लागते. नंतर त्यांना वाळवण्यासाठी एका मोठ्या पोकळ गरम रुळावरून नेतात व मग ती बिमावर (मोठ्या रिळावर) गुंडाळली जातात. बिमावर शेकडो मीटर लांब ताणे गुंडाळतात.

विणाई : वरीलप्रमाणे तयार झालेले बीम मागांवर बसवितात आणि त्यांतील ताणे पहिल्याने वयांतून व मग फणीतून ओढून घेऊन एका लाकडाच्या रुळाला बांधून ठेवतात. वयांची संख्या आणि ओवण्यासाठी घ्यावयाच्या ताण्यांचा क्रम ज्या प्रकारचे कापड विणायचे असेल त्यावर अवलंबून असतो. एवढे झाल्यावर प्रत्यक्ष विणाईला सुरुवात होते.

माग दोन प्रकारचे असतात :सपाट व गोल. सपाट म्हणजे नेहमीच्या पद्धतीच्या मागावरील कापडाला दोन काठ असतात. गोल मागावरच्या कापडाला अर्थातच काठ नसतात. कापडाचा एक लांबच लांब नळच त्यावरूननिघतो. हे कापड पिशव्या करायला फार सोयीचे असते. कारण त्यात बाजूला शिवण येत नाही. हल्लीचे माग स्वयंचलित पद्धतीचे म्हणजे धोट्यातील सूत संपले की, त्यातील रिकामी कांडी काढून टाकून आपोआप नवी भरली जाणारे असतात. तसेच ताणा किंवा बाणा तुटल्यास आपोआप माग थांबण्याचीही त्यात व्यवस्था असते.

अंतिम संस्करण : यात पुढील क्रियांचा समावेश होतो : (१) तंतू कापणे (कॉप्रिंग), (२) इस्त्री करणे (कॅलेंडरिंग) (३) कापडाचा पृष्टभाग मऊ व गुळगुळीत करणे (मॅंगलिंग) (४) घड्या घालणे. तंतू कापण्याच्या क्रियेमध्ये नागमोडी पाती असलेल्या यंत्रातून कापड काढतात. त्यामुळे कापडाच्या पृष्ठभागावरील तंतू व गाठी कापल्या जातात. त्यानंतर फिरत्या ब्रशांच्या साहाय्याने कापलेले तंतू काढून कापड साफ केले जाते. कापडाचा पृष्ठभाग दाबून सपाट करण्याचे कार्य कॅलेंडरिंग क्रियेमध्ये होते. या क्रियेनंतर कापड गुळगुळीत करण्यासाठी ते मॅंगल नावाच्या यंत्रातील रूळांमधून ओढले जाते. कापडाला घड्या घालण्याचे काम यंत्रावरच केले जाते.

ओलसर हवेत अगर पाण्यात तागाचे कापड कुजू नये यासाठी त्यावर तांब्याच्या संयुगाची क्रिया करतात. अशा प्रकारच्या खास मागणी असलेल्या कापडावर ही क्रिया करतात [→ कापडावरील अंतिम संस्करण].


तागाची उत्पादने : एकूण ताग उत्पादनापैकी ज्या मालाला जागतिक बाजारपेठ असते, अशा मालाचे उत्पादन ९५% असते. तागगिरण्यांतील प्रमुख उत्पादने पुढीलप्रमाणे आहेत.

किंतान : (हेसियन). हे साध्या विणीचे, दर मीटरला १५० ते ३६० ग्रॅ. वजनाचे आणि सर्वसाधारणपणे १०० सेंमी. रुंदीचे, चांगल्या प्रकारच्या पांढऱ्या तागापासून तयार केलेले कापड होय. या कापडापासून निरनिराळ्या उपयोगांसाठी पिशव्या (गहू, साखर, कांदे, कापूस वा वाळू भरण्यासाठी) लिनोलियम आणि बिछायतीसाठी कपड्यासाठी अस्तर बांधकामातील सिमेंटच्या लाद्यांतील फटी बुजविण्यासाठी शिंपीकामासाठी अस्तरमांसासाठी वेष्टन व विजेच्या तारांच्या जुडग्यांना वेष्टन हे किंतानाचे प्रमुख उपयोग आहेत. या कापडावर डांबराचा थर देऊन त्याचा उपयोग खाणीमध्ये हवा खेळविण्यासाठी आडभिंती बांधण्यासाठी करतात.

गोणपाट : (गोणी बनविण्याचे कापड). हे जाड, सैल विणीचे, टि्‌वल अगर साध्या प्रकारचे कापड असून त्याचे दर मीटरला ३६० ते ६०५ ग्रॅ. वजन असते रुंदी गरजेप्रमाणे कमीजास्त ठेवतात. हे कापड सर्वसाधारणपणे कमी प्रतीच्या धाग्यापासून तयार करतात. या मालाची निर्यात मुख्यतः तयार पिशव्यांच्या (गोणींच्या) रूपात करण्यात येते. या गोणी धान्य, खनिजे, खते, सिमेंट वगैरे भरण्यासाठी वापरतात.उपयोगावरून जगातील वेगवेगळ्या देशांत गोणींना वेगवेगळी नावे आहेत. उदा., ईजिप्शियन ग्रेनसॅक, क्यूबन शुगरबॅग्स, सिडनी वुलपॅक्स, जावा टि्‌वल्स इत्यादी.

कॅन्व्हास : हे घट्ट विणीचे व चांगल्या पोताचे कापड असून दर मीटरला ४२५ ते ७२५ ग्रॅ. वजनाचे व ९० सेंमी. रुंदीचे असते. भारतात तयार होणाऱ्या तागाच्या उत्पादनात हा सर्वांत उत्तम प्रतीचा माल आहे. याचा उपयोग जहाजाच्या मजल्यावरील प्रवेशमार्गावर आच्छादनासाठी, सर्व प्रकारचा माल झाकण्यासाठी आणि डांबरासारख्या पदार्थाचा थर देऊन ताडपत्र्या बनविण्याच्या कामी होतो.

सूत आणि सुतळी : तागाचे सूत काही प्रमाणात निर्यात केले जाते. भारतात वापरल्या जाणाऱ्या सुतळीपेक्षा परदेशी निर्यात करण्याची सुतळी चांगल्या प्रकारची व तीन रंगांची (पांढरी, सोनेरी तपकिरी आणि निळी) असते.

गालीच्यासाठी अस्तराचे कापड : अलीकडील काही वर्षांत तागगिरण्यांनी हे कापड वाढत्या प्रमाणावर तयार करण्यास सुरुवात केली आहे.

यांखेरीज इतर नवीन उत्पादनांचा उल्लेख भारतीय उद्योग या सदराखाली केलेला आहे.

तागाला पर्यायी पदार्थ : दुसऱ्या महायुद्धकालामध्ये तागाची (कच्च्या मालाची) चणचण भासू लागल्यामुळे अथवा इतर कारणांमुळे ताग न पिकविणाऱ्या देशांत तागाला पर्यायी पदार्थ शोधून काढण्याची गरज भासू लागली. तागाला तीन प्रकारचे पर्यायी पदार्थ आहेत :(१) नैसर्गिक तंतू, (२) कृत्रिम तंतू व (३) कागद.

नैसर्गिक तंतूमध्ये अंबाडी, लाल अंबाडी, काँगो ज्यूट व घायपात हे महत्त्वाचे आहेत. यांपैकी पहिले तीन तागाच्या धाग्याशी पुष्कळ साधर्म्य असणारे आहेत. तागाशी तुलना करता त्या सर्वांमध्ये काही दोष आहेत परंतु तागाच्या गिरण्यांतील यंत्रावर त्यांचे सूत निघू शकते व तागामध्ये मोठ्या प्रमाणात मिसळूनही पुष्कळ उत्पादनांना योग्य असे सूत काढता येते. भारतात अंबाडीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व तागामध्ये मिसळून तिचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. लाल अंबाडीचा वाख तागाच्या वाखात मिसळून वापरता येतो. भारतात याची लागवड विशेषेकरून बंगालमध्ये आणि काही प्रमाणात बिहार, आसाम, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथे होते. काँगो ज्यूट हा तागाला उत्तम पर्याय आहे परंतु त्याची लागवड भारतात होत नाही. घायपाताच्या वाखापासून तागाच्या यंत्रसामग्रीवर सूत काढण्याचे प्रयोग यशस्वी झाले नाहीत.


 तागाला पर्यायी असे कृत्रिम तंतू जर्मनी आणि इटलीमध्ये तयार करण्यात आले आहेत. उदा., लाकडापासून तयार केलेल्या फायब्रो नावाच्या कृत्रिम तंतूपासून तागाच्या यंत्रसामग्रीवर सूत काढता येते व त्यापासून विणलेल्या कापडापासून चादरी, पिशव्या व मेजावरील अच्छादने बनवितात.

आवेष्टनासाठी तागाच्या पिशव्यांऐवजी कागद वापरून बनविलेल्या पिशव्यांचा उपयोग पुष्कळ देशांत सिमेंट व खत उद्योगांत व पिठाच्या गिरण्यांत यशस्वी रीत्या करण्यात आला आहे. कागदावर डांबराचा थर देऊन तयार करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर बोटीतून पीठ, साखर, वाटाणे वगैरे माल पाठविण्यासाठी अमेरिकेत वाढत्या प्रमाणात होत आहे. कागदाच्या दोन थरांमध्ये घायपाताचा वाख घालून बनविलेल्या ‘सिसालक्रॅफ्ट’ च्या पिशव्यांचा वापर ऑस्ट्रेलियातून सुकी फळे पाठविण्यासाठी करण्यात येतो. [→ तंतु, कृत्रिम तंतु, नैसर्गिक घायपात].

भारतातील तागगिरणी धंद्याचा इतिहास आणि सद्यस्थिती 

भारतीय उद्योग : ज्या काळी तागाची माहिती यूरोपातील राष्ट्रांना नव्हती त्या काळी (अठराव्या शतकात) बंगालमध्ये त्याचा सुतळी, दोरखंड, पट्टे (कापसासाठी वेष्टन), सतरंज्या, आसने, नवार, पिशव्या व कापड उत्पादनासाठी आणि कागद तयार करण्यासाठी वापर होत असे. हातमागावर विणल्या जाणाऱ्या कापडाचे तीन प्रकार असत :(१) गून (जाड घट्ट विणीचे कापड). (२) मेकली (बारीक विणीचे किंतानासारखे कापड, कधीकधी यात कापसाच्या धाग्याचे मिश्रण करण्यात येत असे). या प्रकारच्या कापडाचा उपयोग गरीब लोक वस्त्र आणि अंथरुण यांसाठी करीत असत. (३) गूनचाट (शेतमाल आणि मोठ्या आकारमानाच्या वस्तूंच्या आवेष्टनासाठी लागणारे भरड आणि सैल विणीचे कापड). हातमागावर विणलेल्या तागाच्या गोणी १७४६ आणि १७५६ मध्ये इंग्लंडला पाठविल्या गेल्याचा उल्लेख आढळतो. तसेच अठराव्या शतकात तागाच्या सुताची किरकोळ निर्यात इंग्लंड, पश्चिम यूरोप आणि अमेरिकेला होत असे. हातमागावर विणलेल्या तागाच्या कापडाला व इतर मालाला इंग्लंड, अमेरिका, जर्मनी वगैरे देशांत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बाजारपेठ निर्माण झाली व उत्तरोत्तर तेथे असा माल जास्त विकला जाऊ लागला. तथापि ही मागणी फार काळ टिकली नाही.

कच्चा माल म्हणून तागाकडे पश्चिमी राष्ट्रांचे विशेष लक्ष एकोणिसाव्या शतकात गेले, तरी पण या मालाचा वापर सुरूवातीच्या काळात फारसा झाला नाही. याचे कारण तागाचा धागा निकृष्ट प्रतीचा समजला जात असे आणि तो फ्लॅक्स (अळशी) व हेंप यांच्या धाग्यांत मिसळणे ही भेसळ समजली जात असे. परिणामी त्याच्या विशिष्ट अशा चांगल्या गुणधर्मांकडे दुर्लक्ष झाले. १८३२ मध्ये स्कॉटलंडमध्ये डंडी येथे तागापासून सूत काढून त्यापासून यांत्रिक मागावर कापड विणण्याचे प्रयोग यशस्वी झाले (पश्चिम यूरोपात प्रथमतः अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी झाला या दृष्टीने त्याला फार महत्त्व आहे). १८३९ मध्ये नेदर्लंड्‌स सरकारने कॉफीच्या पिशव्यांसाठी फ्लॅक्सऐवजी तागाचा वापर करण्याचे ठरविल्यामुळे ताग कापड धंद्याला चालना मिळाली आणि डंडीच्या आसपास तसेच यूरोप खंडात व अमेरिकेत ताग वस्तूंचे उत्पादन सुरू झाले. याचा परिणाम भारतातील ताग वस्तूंच्या निर्यातीवर झाला. यानंतर कच्च्या तागापासून यंत्रांच्या साहाय्याने कापड तयार करण्याचे प्रयत्न कच्चा माल तयार होणाऱ्या प्रदेशांतच होणे स्वाभाविक होते. बंगालमध्ये तागाचे भरपूर पीक निघत असल्यामुळे, तसेच कलकत्ता हे परदेशाला बोटीने माल पाठविण्यासाठी सोईचे बंदर असल्याकारणाने आणि कारखान्याला लागणारा कोळसा व स्वस्त मजूर कलकत्त्याच्या आसपास मिळत असल्याने हुगळी नदीच्या काठावर कलकत्त्यापासून २० किमी. अंतरावर रिश्रा येथे हिंदुस्थानातील पहिली तागाची सूत गिरणी १८५४ मध्ये सुरू झाली. १८५९ मध्ये यंत्रमाग बसविण्यात येऊन कापड उत्पादन सुरू झाले. १८६०–७३ या काळात ५ गिरण्या होत्या व मागांची संख्या १,२५० होती. १८८५ मध्ये ११ गिरण्या होत्या व त्यांत ६,७०० माग होते. त्यापुढील १० वर्षांत आणखी ३,००० मागांची भर पडली. १८९५ नंतर या धंद्याची खरी भरभराट झाली. भारताच्या निर्यात व्यापारात झालेली वाढ व ताग वस्तूंना वाढती मागणी ही या मागील कारणे आहेत. १९०९ मध्ये गिरण्यांची संख्या ३८ होती व मागांची संख्या सु. ३१,००० होती. पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या सुमारास (१९१४ च्या अखेरीस) मागांची संख्या ३८,५५४ होती. त्यांपैकी २२,६०३ मागांवर फक्त किंतानाचे कापड विणले जात असे व त्याच्या खालोखाल गोणपाटांचे उत्पादन होत असे. या वेळी कलकत्त्याच्या ताग कापड धंद्याची एवढी वाढ झाली होती की, जगातील इतर सर्व देशांतीलतागगिरण्या मिळून जेवढा कच्चा माल वापरीत त्यापेक्षा जास्त कच्चा माल कलकत्त्याच्या आसपासच्या गिरण्या वापरील असत. महायुद्धाच्या अखेरीनंतर गिरण्यांच्या व मागांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. १९१८-१९ मध्ये ७३ गिरण्या आणि ३९,७०० माग होते, तर १९२८-२९ मध्ये ९५ गिरण्या व ५२,९०६ माग होते. १९३०–३५ या मंदीच्या काळातही आणखी ७ गिरण्या सुरू झाल्या. प्रमाणाबाहेर उत्पादनामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी भारतीय तागगिरणी संघाला उपाय योजावे लागले.

दुसऱ्या महायुद्धात या धंद्याला आणखी चालना मिळाली. देशाच्या संरक्षणाच्या गरजांसाठी नव्या प्रकारची उत्पादने निघू लागली. उदा., न कुजणाऱ्या वाळूच्या पिशव्या, विमानातून माल टाकण्यासाठी हवाई छत्र्यांचे कापड, तागाचे कापड आणि लाख यांच्या थरांपासून बनविलेला स्तरफलक (पुठ्ठा). युद्धसहित्याच्या निर्मितीसाठी शासनाने काही गिरण्या ताब्यात घेतल्या होत्या. १९४७ पर्यंत गिरण्यांची संख्या १११ व मागांची संख्या सु. ६६ हजार झाली.


 इ. स. १९४७ मध्ये देशाच्या फाळणीमुळे भारतातील तागगिरणी धंद्याची परिस्थिती फार बिकट झाली. भारतातील तागाच्या एकूण क्षेत्रापैकी ७०% क्षेत्र पूर्व पाकिस्तानात गेले. त्यामुळे तागाची (कच्च्या मालाची) किंमत पुष्कळ वाढली आणि त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर झाला. किंतानाची विक्री घटली आणि त्यामुळे गोणपाटाचे उत्पादन वाढवावे लागले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ताग गिरणी संघाने पुष्कळ उपाय योजिले. मे १९४९ पासून १२½% माग बंद करण्यात आले आणि जूलै १९४९ पासून सर्व गिरण्या महिन्यातून एक आठवडा बंद ठेवण्यात आल्या. डिसेंबर १९४९ पासून गिरण्या बंद न ठेवता आठवड्याचे कामाचे तास ४८ वरून ४२½ तास करण्यात आले. ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीला कच्चा माल खरेदी करण्यास गिरण्यांना मनाई करण्यात आली. गिरण्यांची एकूण उत्पादनशक्ती बारा लक्ष टनांची असूनही कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे १९५०-५१ मध्ये फक्त ८·७ लक्ष टन उत्पादन झाले व निर्यात व्यापारातही घट झाली. तागाचे उत्पादन वाढविण्यासाठी योजिलेल्या उपायांमुळे १९५१-५२ मध्ये कच्च्या मालाचा तुटवडा थोडा कमी झाला व तयार मालाचे उत्पादन ९·८३ लक्ष टन झाले. १९५०-५१ मध्ये ११४ कोटी रुपयांचा माल निर्यात झाला होता. त्याऐवजी १९५१-५२ मध्ये २७० कोटी रु. किंमतीचा ८·१ लक्ष टन माल निर्यात झाला. गिरण्यांतील आठवड्याचे कामाचे तास पूर्ववत (४८) करण्यात आले. व निर्यात व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी निर्यात कर कमी करण्यात आला व निर्यातीवरील बंधने उठविण्यात आली. परंतु पुढील वर्षात पूर्व पाकिस्तानातील व यूरोपातील गिरण्यांनी सुरू केलेल्या स्पर्धेमुळे, कोरियन युद्धामुळे उत्पन्न झालेली तेजी बंद झाल्यामुळे आणि माल भरण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे परदेशांतील मागणी घटली. वाजवीपेक्षा जास्त मालाचा साठा टाळण्यासाठी भारतातील तागगिरण्यांनी आठवड्याचे कामाचे तास पुन्हा ४८ वरून ४२½ केले. १९५३-५४ मध्ये निर्यातीसाठी मागणी वाढली व उत्पादन वाढविण्यासाठी कामाचे तास पूर्ववत ४८ करण्यात आले आणि १९४९ मध्ये १२½% गिरण्या बंद करण्यात आल्या होत्या त्यांपैकी ७½% गिरण्या पुन्हा चालू करण्यात आल्या. यामुळे ७५,००० टन उत्पादन वाढले.

तागाच्या गिरण्यांतील उत्पादन नियमित करण्यामुळे कच्च्या मालाच्या तुटवड्याचा प्रश्न सुटला नाही. १९५३ मध्ये भारत सरकारने यासाठी एक चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने पुढील शिफारशी केल्या व त्या भारत सरकारने स्वीकारल्या : (१) कच्च्या मालाच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तागाखालील क्षेत्र न वाढविता विशिष्ट क्षेत्रात लागवडीच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करून तागाचे उत्पादन वाढवावे. (२) कच्च्या तागाची निर्यात पूर्णपणे बंद करावी. (३) उत्पादित ताग वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण नसावे (कारण यातील पुष्कळसा माल परदेशांत विकला जातो). (४) नवीन गिरण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. (५) तागाचा व्यापार आणि ताग गिरणी धंदा यांना घातक ठरणाऱ्या सर्व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कायदे करावे.

इ. स. १९५८–५९ मध्ये भारतातील तागाचे उत्पादन देशातील गिरण्यांच्या गरजेपेक्षा जास्त होऊन कच्चा ताग परदेशी पाठविणेही शक्य झाले. परंतु हवामान आणि इतर परिस्थितीमुळे १९६४–६५, ६५–६६ आणि ६६–६७ मध्ये उत्पादन कमी झाले. १९६८–६९ मध्ये तर ते फारच कमी झाले.

भारतातील तागाच्या गिरण्यांतील यंत्रसामग्री परदेशातून मागविण्यात येत असे व ती डंडी येथे १०० वर्षांपूर्वी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीप्रमाणे असे. या यंत्रसामग्रीची किंमत कमी असते परंतु त्यावर उत्पादन काढण्यासाठी मजुरीचा खर्च फार येतो (१०० वर्षांपूर्वी मजुरीचे दर फार कमी असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता). भारतातील पुष्कळ गिरण्यांतील यंत्रसामग्री जुनी व कालबाह्य असल्यामुळे उत्पादन खर्च परवडत नाही, असे आढळून आले. याउलट बांगला देशासह (त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानासह) इतर देशांतील तागगिरण्यांतून अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यात आली असून उत्पादनाच्या खर्चात काटकसर करण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यामुळे त्यांना भारतातील गिरण्यांशी स्पर्धा करणे शक्य झाले (बांगला देशात अद्ययावत यंत्रसामग्रीबरोबरच कच्चा मालही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे). १९५३ पासून जपानने तागाचा चांगल्या प्रतीचा माल तुलनेने कमी किंमतीत अमेरिकेला विकण्यास सुरुवात केली.

अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यासाठी भारतातील ताग गिरण्यांना सरकारने कर्जे देऊन आयात परवान्यात वाढ केली. तसेच काही कंपन्यांना अशा प्रकारची यंत्रसामग्री भारतातच बनविण्यासाठी परवाने देण्यात आले. १९५०–६० या काळात नवीन यंत्रसामग्री बसविण्यासाठी ५० कोटी रु. खर्च करण्यात आले आणि चतुर्थ पंचवार्षिक योजनेत आणखी ५० कोटी रु. खर्च करण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आला. गालिच्यांसाठी अस्तराचे कापड मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी रुंद माग मोठ्या प्रमाणावर १९६८ नंतर बसविण्यात आले.

सध्याच्या सर्व चालू गिरण्यांत सूतकताईपर्यंतच्या सर्व सामग्रीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. याशिवाय उत्पादनाच्या इतर शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यामुळे यंत्रमागांची संख्या न वाढविता उत्पादन वाढविणे शक्य झाले आहे. १९६७ पासून भारतातील ताग गिरण्या भारतीय मानक संस्थेच्या विनिर्देशाप्रमाणेच मालाचे उत्पादन करतात व निर्यातीपूर्वी मालाची तपासणी करण्यात येते.


भारतातील ताग गिरण्या बहुसंख्येने कलकत्त्याच्या उत्तरेस ५६ किमी. आणि दक्षिणेस ३५ किमी. परिसरात हुगळी नदीच्या तीरावर आहेत. कच्चा माल आणि कोळसा यांचा नजिकच्या भागातून पुरवठा, कुशल कामगारांची व मजुरांची उपलब्धता आणि निर्यातीसाठी कलकत्ता बंदर या सोयींमुळे मोठ्या संख्येने गिरण्या या भागात आहेत. १९५८ मध्ये भारतातील एकूण ११२ तागगिरण्यांपैकी १०१ गिरण्या या भागात होत्या. इतर ११ गिरण्या आंध्र प्रदेश (४), बिहार (३), उत्तर प्रदेश (३) आणि मध्य प्रदेश (१) या राज्यांत होत्या. १९७३ मध्ये भारतात फक्त ६६ गिरण्या उत्पादन करीत होत्या (प. बंगाल ५४, आंध्र प्रदेश ४, बिहार ३, उत्तर प्रदेश ३, मध्य प्रदेश १, आसाम १).

ताग वस्तूंच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक असून जगातील उत्पादनाच्या ३०% उत्पादन भारतात होते. जगातील एकूणताग यंत्रमागांची संख्या १,०९,२७५ आहे. त्यांपैकी भारतात ४३,०४५ (३९%) व बांगला देशात २५,१६० (२३%) आहेत. बाकीचे ४१,०७० माग (३८%) जगातील निरनिराळ्या ५२ देशांत आहेत.

 

तागापासून कापड उत्पादन करणाऱ्या जगातील ५४ देशांपैकी काही देशांच्या १९६९ च्या उत्पादनाची आकडेवारी उपलब्ध आहे ती अशी [आकडे कोटी चौ.मी.चे आहेत. भारताच्या खालोखाल बांगला देशात (त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानात) तागाच्या कापडाचे उत्पादन होते परंतु तेथील आकडेवारी उपलब्ध नाही] : भारत १९१·३, जपान १४·१, रशिया १३·५, इंग्लंड ११·३, फ्रान्स ९·७, पोलंड ६·१, प. जर्मनी ४·१, इटली ४·५, ईजिप्त ५·५, अमेरिका ७·५.  

किंतान व पिशव्यांसाठी लागणाऱ्या कापडासारख्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनांखेरीज भारतातील ताग गिरण्यांनी गेल्या काही वर्षांत नव्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले आहे. त्यांत गालिच्यासाठी अस्तराच्या कापडाचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. एकूण उत्पादनापैकी सु. २२% उत्पादन व निर्यातीपैकी सु. ३५% निर्यात या कापडाची होते. इतर काही नवीन उत्पादने पुढील प्रकारची आहेत : लोकर भरण्यासाठी हलक्या पिशव्या, सजावटीच्या वस्तूंसाठी रंगीत आणि विरंजित कापड, लिनोलियमासाठी किंतान, नवार, बिछायतीचे कापड आणि गालिचे, ताग व कापसाच्या मिश्रणापासून बनविलेले कॅन्व्हास, कापड थरांपासून बनविलेल्या वस्तू आणि कालव्यांत वापरण्यासाठी ताग व बिट्युमेन यांपासून बनविलेले जलरोधक कापड.

इ. स. १९७२-७३ साली भारतात ११·६८ लक्ष टन तागाच्या वस्तूंचे उत्पादन झाले व त्यांतील ५·७५ लक्ष टन वस्तूंची निर्यात झाली.

भारतात सु. २,७१,००० लोक ताग गिरण्यांत व सु. १,२९,००० लोक ताग व्यापारात काम करतात.

भारतातील ताग गिरणी धंद्याला भविष्यकालात काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आवेष्टनासाठी लागणाऱ्या कापडासाठी तागाखेरीज इतर वनस्पतींच्या धाग्यांचा संश्लेषित (कृत्रिम) धाग्यांचा वाढता वापर आणि आवेष्टनाच्या तंत्रामध्ये व वाहतुकीच्या पद्धतीमध्ये होणारे बदल यांमुळे भविष्यकालात तागाच्या कापडाला या कामासाठी मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तागाखालील क्षेत्र भातासारख्या पिकाकरिता वापरात येण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा कमी होण्याचा संभव असल्याने जास्त उत्पन्न देणाऱ्या तागाच्या प्रकारांची लागवड आणि इतर उपायांनी तागाचे हेक्टरी उत्पादन वाढविणे, गिरण्यांतील उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री बसविणे आणि मागणीप्रमाणे नव्या वस्तूंचे उत्पादन करणे या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

निर्यात : तागाच्या वस्तूंच्या निर्यातीमुळे भारताला सर्वांत जास्त परकी चलन मिळते. भारताच्या एकूण निर्यातीपैकी तागाच्या वस्तूंची निर्यात सु. २५% असते. निर्यातीपैकी पुष्कळसा भाग किंतान आणि गोणपाट यांचा असतो. अलीकडील काही वर्षांत गालिच्यासाठी लागणाऱ्या अस्तराच्या कापडाची निर्यात वाढली आहे. कोष्टक क्र. ४ मध्ये १९६५-६६ पासून १९७५-७६ पर्यंतच्या प्रत्येक वर्षातील तागाच्या वस्तूंचे एकूण उत्पादन, निर्यात व निर्यात मालाची किंमत दिली आहे.

इ. स. १९६५-६६ नंतर उत्पादनात वाढ झाली नाही, उलट १९६८-६९ पासून पुढील तीन वर्षांत उत्पादन बरेच घटले. त्याचप्रमाणे निर्यात मालातही १९६५-६६ नंतर कमीजास्त प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते परंतु निर्यात कमी असूनही निर्यात मालाच्या किंमतीत मात्र वाढ झाल्याचे दिसून येते.


कोष्टक क्र. ४. भारतातील ताग गिरण्यांतील उत्पादन व निर्यात (१९६५-६६ ते १९७५-७६)  

वर्ष

उत्पादन (हजार टन)

निर्यात (हजार टन)

निर्यातीचे उत्पादनाशी

प्रमाण (%)

निर्यात मालाची किंमत

(कोटी रुपये)

१९६५-६६

१९६६-६७

१९६७-६८

१९६८-६९

१९६९-७०

१९७०-७१

१९७१-७२

१९७२-७३

१९७३-७४

१९७४-७५

१९७५-७६

१,२०७

१,१३४

१,१२२

९१७

९५४

९७९

१,१३८

१,०४४

९३६

– 

८८२

७२४

७४०

६३९

५५६

५५८

६७४

५७५

५४९

– 

७३·१

६३·८

६५·९

६९·६

५८·३

५८·३

५९·९

५५·७

५८·८

१८२·६५

२४९·६०

२३४·१०

२१८·०१

२०९·२९

१९०·३४

२६५·३४

२४८·३७

२२५·६२

२९५·६०

२२५·०० 

ताग उद्योगविषयक संस्था व मंडळे : भारतीय ताग उद्योगाच्या वाढीसाठी व त्याच्या विविध अंगोपांगांचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळी सरकारी आणि खाजगी संस्था व मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे ताग उद्योगासंबंधी संशोधन करणाऱ्या व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही आहेत.

भारतीय ताग महामंडळ : कच्च्या तागाची आयात, निर्यात आणि त्याच्या देशांतर्गत व्यापाराचे व्यवस्थापन करण्यासाठी १९७१ मध्ये या महामंडळाची स्थापना झाली. १९७३-७४ मध्ये मंडळाने कच्च्या तागाच्या किंमती सर्व भारतात वर्षभर स्थिर राखल्या.

ताग कापड सल्लागार मंडळ : भारत सरकारने १९६९ मध्ये हे मंडळ स्थापन केले, ताग धंद्यासंबंधी सर्व महत्वाच्या बाबतींत (विशेषतः ताग धंद्याचा विकास, गिरण्यांतील उत्पादन व त्यांमध्ये विविधता आणणे, अद्ययावत यंत्रसामग्री बसविणे आणि तयार मालाची निर्यात) हे मंडळ सरकारला सल्ला देते. १९७० मध्ये गिरण्यांतून नव्या प्रकारच्या किंतानाचे उत्पादन सुरू झाले व उत्पादनामध्ये विविधता आणण्याच्या हेतूने. नवार, कापसासाठी पिशव्या, लिनोलियमासाठी विशिष्ट प्रकारचे किंतान, तागाचे गालिचे, इतर प्रकारच्या  गालिच्यांसाठी अस्तरांचे कापड आणि सजावटीसाठी तागाचे विविध प्रकारचे रंगीत कापड या वस्तूंचे क्रमाक्रमाने उत्पादन सुरू झाले.

ताग विकास निदेशालय : हे निदेशालय तागाच्या विकासासंबंधीच्या योजना कार्यान्वित करते. त्याचे कार्यालय कलकत्ता येथे आहे.


ताग तंत्रविद्या संस्था : भारतीय तागगिरणी संघाच्या वित्तव्यवस्थेखाली कलकत्ता विश्वविद्यालयाच्या कक्षेत ही संस्था तागाची सूतकताई, विणकाम, तागाच्या वस्तूंचे गुणवत्ता नियंत्रण आणि यंत्रसामग्रीची देखभाल यांसंबंधी सखोल आणि शास्त्रीय प्रशिक्षण देते.

भारतीय ताग उद्योग संशोधन संस्था : कलकत्ता येथील ही संस्था ताग उद्योगाच्या संशोधन आणि विकासविषयक प्रश्नांकडे लक्ष पुरविते. यात तागासंबंधीचे मूलभूत आणि अनुप्रयुक्त संशोधन, तंत्रविषयक सेवा, उत्पादन विकास आणि कच्च्या मालाच्या उत्पादनासंबंधी प्रश्न यांचा अंतर्भाव होतो.

ताग कृषी संशोधन संस्था : या संस्थेमध्ये ताग व तत्सम धाग्यांच्यापिकाच्या लागवडीसंबंधीच्या प्रश्नावर संशोधन होते. ही संस्था बरॅकपूर (प. बंगाल) येथे आहे.

ताग निदेशालयामार्फत ज्यूट बुलेटिन व भारतीय तागगिरणी संघातर्फे ज्यूट क्रॉनिकल ही भारतीय ताग उद्योगासंबंधी विविध माहिती देणारी मासिके प्रसिद्ध केली जातात.

संदर्भ : 1. C.S. I. R. The wealth of India, Industrial Products, Vol. V.New Delhi, 1960.

           2. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials,Vol. II, New Delhi, 1950.

           3. I.C.A.R. Handbook of Agriculture, New Delhi,1966.

           4. Indian Central Jute Committee, Jute In India, Culcutta,1959.

           5. Poehlmar, J.M. Borthakur, D. Breeding Asian Field Crops, New Delhi, 1969.

           6. Vaidya, V. G. Sahassrabuddhe, K. R. Khuspe,V.S. Crop Production and Field Experimentation. Poona, 1972.

देव, स. ग. परांडेकर, शं. आ. 

 गोखले, वा. पु. ओगले, कृ. ह. पाटील, ह. चिं. रुईकर, स. के.


तागाच्या पिकाची कापणी

ताग पाण्यात कुजविण्याची क्रिया

कच्च्या तागाच्या गाठी

अंत्य पिंजक

पेळू तयार करणारे यंत्र

तागाचे कापड विणण्याचे माग


तोड पिंजक

अंत्य पिंजक

पहिल्या क्रमांकाचा पेळू ओढक

दुसऱ्या क्रमांकाचा पेळू ओढक

तिसऱ्या क्रमांकाचा पेळू ओढक

किंतानाचे जवळून दिसणारे दृश्य

मालाने भरलेले पोतेतागाच्या सुतळ्यांचे विविध प्रकार