सातू : (हिं. जौ क. जवे गोढी इं. बार्ली लॅ. होर्डेअम व्हल्गेर एल्., कुल-ग्रॅमिनी उपकुल-फिस्टुकोइडी). तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे.सुमारे पाच हजार वर्षांपेक्षा ही जुने सातूचे अवशेष मेसोपोटेमियामध्ये सापडले आहेत. तेच बहुधा सातूचे मूलस्थान असावे. तेथून त्याचा प्रसार ॲबिसिनिया, यूरोप, चीन आणि इतर देशांत झाला असावा.

 आ.१.सातू वनस्पती : (१) खोड, (२) पानाचे आवरण, (३) पान, (४) कांडे, (५) ध्वजपर्ण, (६) कणिश.आ.१.सातू वनस्पती : (१) खोड, (२) पानाचे आवरण, (३) पान, (४) कांडे, (५) ध्वजपर्ण, (६) कणिश.लागवडीखाली असलेल्या सातूमध्ये गुणसूत्रांच्या सात जोड्या असतात. याशिवाय लागवडीखाली नसलेल्या चार प्रकारात गुणसूत्रांच्या १४ जोड्या, तर एका प्रकारामध्ये २१ जोड्या असल्याचे आढळले आहे. विभिन्न गुणसूत्रे असलेल्या सातूच्या जातींमधील संकर काही अंशी यशस्वी झालेले आहे. गहू व ओट्यां मध्ये मात्र तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे. सातू हे स्वपरागीभूत पीक आहे. तथापि, लागवडीखालील जातींमध्ये काही प्रमाणात संकर करता येतो. परागीभवन होण्यापूर्वी फुलातील पुं-केसर काढून त्यावर रानटी जातीच्या सातू वाणांचे पराग टाकून संकर करता येतो. त्यासाठी हो. स्पाँटॅनिअम (दोन रांगांच्या ओंब्या) असलेले आणि हो. ॲग्रि ओक्रिथॉन (सहा रांगांच्या ओंब्या असलेले) या रानटी सातू वाणांचा वापर करतात. संकर करून सातूचे सुधारित वाण तयार करतात.

सातू वनस्पती सरळ वाढणारी आणि काटक खोडाची असते.उंची साधारणपणे ०·६ – १·२ मी., गव्हासारखी दिसणारी, पानांची संख्या कमी, पाने एकाच्यावर एक सरळ रेषेत असणारी आणि ध्वजपर्ण ओंबीच्या जवळ असते. ओंबी ५ ते ६·२५ सेंमी. लांब आणि घट्ट असते. ओंबीमध्ये दाण्यांच्या सहा रांगा किंवा दोन रांगा असतात. (आ.२) तसेच ओंब्या प्रशुकयुक्त किंवा प्रशुकविरहित असतात.

 आ.२. सातूची ओंबी : (१) सहा रांगांची ओंबी, (२) दोन रांगांची ओंबी.आ.२. सातूची ओंबी : (१) सहा रांगांची ओंबी, (२) दोन रांगांची ओंबी.पूर्वी सातू पिकाची लागवड दाण्यासाठी करीत असत व त्याच्या पिठापासून खाद्यपदार्थ बनवीत असत. आजही उत्तर भारतातील राजस्थान व उत्तरप्रदेश या राज्यांत बहुसंख्य गरीब लोक सातूचा आहारात उपयोग करतात. कधी कधी गव्हामध्ये सातूचे धान्य मिसळून एकत्र दळून पिठात भेसळ करतात. सातू भाजून तयार केलेले सातूखाद्य शेतीची जनावरे आणि घोडे यांना खाऊ घालतात. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य देशांत ‘बिअर’, ‘ ब्रँडी ’आणि ‘व्हिस्की’ या प्रकारची मद्ये सातूपासून तयार करतात. विशिष्ट प्रकारे तयार केलेले सातूचे दाणे ‘पर्ल बार्ली’ नावाने सीलबंद डब्यांतून रुग्णांच्या उपयोगासाठी विकण्यात येतात. 

   

भारतात सातूखाली सु. ३३ लक्ष हे.जमीन आहे. उत्तर प्रदेश व राजस्थानमध्येच यांपैकी ७३ टक्के जमीन आहे. शिवाय पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली, प.बंगाल, बिहार वगैरे राज्यांतूनही याची लागवड करतात.

लोखंडी नांगराने जमीन आडवी –उभी नांगरुन दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन चांगली मशागत केलेल्या जमिनीत पीक चांगले येते. गव्हाच्या पिकाला घट्ट, तर सातूला भुसभुशीत जमीन लागते. कोरडवाहू जमिनीत घ्यावयाच्या सातूच्या पिकासाठी शेत तयार करताना भरखत बहुधा घालीत नाहीत. तथापि अशा जमिनीतील पिकालाही खत दिल्यास ते चांगले उत्पन्न देऊ शकते. बागायती पिकास दर हेक्टरी ४ ते ५ टन या प्रमाणात शेणखत अगर कंपोस्ट खत देतात. सामान्य प्रतीच्या जमिनीवर घेतलेल्या पिकाला दर हेक्टरला २५ ते ३० किग्रॅ.नायट्रोजन, अमोनियम सल्फेटाच्या किंवा पेंडीच्या रुपाने खत दिल्यास पीक चांगले येते. यापेक्षा जास्त नायट्रोजन दिल्यास मात्र त्या पिकाच्या दाण्यापासून चांगले मद्य तयार करता येत नाही.


 सातूचे बी मुठीने फोकून पेरतात अगर मोगण्याने ओळीत पेरतात. पेरताना दोन ओळींत सु.२२ सेंमी. अंतर ठेवतात. दर हेक्टरमध्ये ७५ ते १०५ किग्रॅ. बी पेरतात. पेरणीचा योग्य हंगाम ऑक्टोबरपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत असतो. पेरणीला उशीर केल्यास पिकातील दाणे चांगले भरत नाहीत व त्यामुळे नुकसान होते. सातूचे पीक घ्यावयाच्या जमिनीत आधीच्या खरीप हंगामांत कोणतेही पीक न घेता जमीन मोकळी ठेवून तिच्यामध्ये सातू केल्यास पीक उत्तम येते. सातू स्वतंत्र पीक म्हणून बहुतेक एकटेच लावतात. कधीकधी ते गहू, हरभरा, वाटाणा किंवा मसूर या पिकांबरोबर मिश्रपीक म्हणूनही लावतात.

जमिनीची पूर्वशागत चांगली केलेली असल्यास पिकांत बहुतेक तण निघत नाही आणि त्यामुळे आंतर मशागतीची फारशी आवश्यकता उद्‌भवत नाही. तरीही काही कारणामुळे पिकात तण उगवलेले आढळले, तर पिकाला एक खुरपणी आणि कोळपणी देतात.

कोरडवाहू सातूच्या पिकाबाबत यापुढे कापणीपर्यंत काही शेतकाम नसते. बागायती पिकाला मात्र वेळचेवेळी पाणी द्यावे लागते. सातूला गहू व ओटच्या पिकांपेक्षा पाणी कमी लागते.

पेरणीपासून सु. पाच महिन्यांनी सातूचे पीक कापणीस तयार होते. पंजाब, राजस्थान व उत्तर प्रदेश या भागांत या पिकाची काढणी मार्च-अखेर ते एप्रिलच्या मध्यापर्यंत चालते. बिहार व प.बंगालमध्ये एक आठवडा लवकर सुरु होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांत फेब्रुवारीच्या मध्याला काढणी सुरु होते. पूर्ण तयार झालेले पीक विळ्याने जमिनीलगत कापतात. कापताना ओंब्यांतले दाणे झडू नयेत म्हणून पीक सकाळच्या प्रहरी कापून वाळल्यावर मळणी करतात. त्यानंतर दाणे उफणून साफ करून पोत्यांत भरुन पोती कोरड्या जागेत रचून ठेवतात. एक हेक्टर जिरायत पिकापासून ७–९ क्विंटल इतके उत्पन्न मिळते. बागायती पिकाचे उत्पन्न जवळजवळ १२–१८ क्विंटल इतके येते.

केरकचरा नसलेला, स्वच्छ व पोसलेल्या ठळक दाण्याचा माल माणसांच्या आहारासाठी पसंत करतात. त्याला चांगला भाव मिळतो. पूर्णपणे पक्व, मध्यम आकाराचे दाणे असलेला, सोनेरी पिवळ्या रंगाचा व निकोप माल मद्य तयार करण्यासाठी वापरतात. अशाच प्रकारच्या सारख्या आकाराच्या दाण्यांपासून ‘पर्ल बार्ली ’ नावाचा रुग्णोपयोगी माल तयार करतात.

सातू पिकात बरेच प्रकार आहेत. सातूचा निरनिराळ्या कामासाठी उपयोग होतो. ज्या उद्देशाने हे पीक लावावयाचे असेल त्याला अनुरुप वाण निवडून त्याचे खात्रीशीर बी पेरुन पीक घेणे श्रेयस्कर असते.निवडलेला वाण जास्त उत्पन्न देणारा तर असावाच, शिवाय ह्याचे उत्पादन वांछित गुणधर्माला पुरेपूर जमणारे असावे. या पिकाचे शोधून काढलेले काही नवीन वाण म्हणजे पंजाब राज्यासाठी सी.१३८·२, १४४, १५५, एन. पी. १०४ उत्तर प्रदेशासाठी के. १२,५०,८४,२५१, के. एन. २९२,२९४, एन. पी. २१ राजस्थान, दिल्ली व बिहार राज्यांसाठी एन. पी. १३,१०३,२१, बी. आर. २२ आणि निलगिरी टेकड्यांच्या प्रदेशासाठी एन. पी. १०६ हे होत. पंजाब आणि निलगिरी टेकड्यांचा प्रदेश यासाठी शिफारस केलेल्या वाणांचे वैशिष्ट्य असे की, ते कवकीय रोगांना प्रतिकार करणारे आहेत. दिल्ली, बिहार व राजस्थान या राज्यांसाठी शिफारस केलेले वाण जास्त उत्पन्न देणारे आहेत. स्थानिक वाणापेक्षा अधिक इतर काही गुणधर्मही या नवीन वाणात आहेत.

सर्वसाधारणपणे सातूच्या दाण्यांत प्रतिशत ६२–७२ कार्बोहायड्रेटे, ७·०६ आर्द्रता, २७·१७ प्रथिनयुक्त पदार्थ, ११-१२ अल्ब्युमिनॉइड, २·४० स्निग्ध पदार्थ, ४ तंतुमय पदार्थ व १-२ राख असते.

सातूच्या पिकावर काणी, तांबेरा, मूळकूज वगैरे रोग आढळतात. यांच्या प्रतिबंधासाठी जरी रोगनाशक औषधे उपलब्ध असली, तरी रोगप्रतिबंधक जाती निवडणे हाच उत्तम उपाय असतो. पिकाला खोडकिडा आणि मावा या कीटकांपासूनही नुकसान पोहोचते. त्यावर योग्य कीटकनाशकाचे द्रावण प्रतिहेक्टर ६७५ लि. प्रमाणात फवारतात.

संदर्भ : I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.

पाटील, ह. चिं.