बेली, लिबर्टी हाइड : (१५ मार्च १८५८-२५ डिसेंबर १९५४). अमेरिकन उद्यानविद्यावेत्ते, वनस्पतिशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ, त्यांनी अमेरिकेतील उद्यानविद्येला व्यवहारी स्वरूप दिले व विज्ञानाची शाखा म्हणून तिला प्रतिष्ठाही मिळवून दिली. शिवाय अमेरिकेतील कृषि-शिक्षणाच्या प्रसाराला त्यांनी सर्वाधिक मदत केली. त्यांचा जन्म अमेरिकेतील साउथ हेवन (मिशिगन) येथे झाला व त्यांचे थोडे शिक्षण घरीच झाले. वनस्पती, पक्षी, कीटक व काही वैचित्र्यपूर्ण खडक यांच्या अभ्यासाची, तसेच सफरचंदाच्या झाडांची कलमे करण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. १८८२ साली त्यांनी मिशिगन स्टेट (ॲग्रिकल्चर) कॉलेजमधून बी.एस्‌. पदवी मिळाल्यावर ॲसा ग्रे यांनी त्यांची हार्व्हर्ड विद्यापीठाच्या वनस्पतीसंग्रहाचे अभिरक्षक म्हणून नेमणूक केली. १८८५ साली मिशिगन स्टेट (ॲग्रिकल्चर) कॉलेजमध्ये वेली उद्यानविद्येचे व उद्यान-वास्तुकलेचे (उद्यानातील वृक्ष, झाडेझुडपे, वाटा, कारंजी वगैरेंची मांडणी करण्याच्या कलेचे) प्राध्यापक झाले. १८८६ साली त्यांनी एम.एस. पदवी संपादन केली व जोसेफ चार्ल्स आर्थर यांच्याबरोबर मिनेसोटा राज्याच्या वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षणात भाग घेतला. १८८८ मध्ये बेली कॉर्नेल विद्यापीठात व्यावहारिक व प्रायोगिक उद्यानविद्या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर १९१३ पर्यंत ते न्यूयॉर्क स्टेट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचे अधिष्ठाते व ॲग्रिकल्चरल एक्सपेरिमेंटल स्टेशनचे संचालक होते. १९१३ साली निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या वनस्पतिसंग्रहाविषयीचे काम व लेखन केले.

बेली यांनी वनस्पतींच्या कॅरेक्स, कुकर्बिटा, रूबस व ब्रॅसिका या वंशांचे   आणि पाम (ताड) वृक्षांचे संशोधन करून लेख लिहिले. ते या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती मानले जाते. वनस्पतीविषयक आनुवंशिकी, वनस्पतिरोगविज्ञान, वनस्पति-प्रजनन आणि कृषिविज्ञान या विषयांच्या विकासावर त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला आहे. त्यांनी फळे व भाज्या यांचे वर्गीकरण, नामकरण, संकरण या बाबतींत नवनवीन युक्त्यांचा वापर केला. अमेरिकेतील सेज वनस्पती, ताडवृक्ष, ब्लॅक बेरी, रासबेरी इ. वनस्पतींच्या संशोधनासाठी ते प्रसिद्ध होते. एक्याण्णवाव्या वर्षी त्यांनी कॅरिबियन प्रदेशातील पाम गोळा करण्याच्या मोहिमेत भाग घेतला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष थीओडोर रूझव्हेल्ट यांनी बेली यांची कंट्री लाइफ कमिशनचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली (१९०८). तेव्हा व इतर वेळीही लेख लिहून त्यांनी ग्रामीण भागाच्या सुधारणेचे प्रयत्न केले. त्यांनी आपल्या ग्रंथांचा व वनस्पतींचा संग्रह जमीन व इमारतीसह न्यूयॉर्क स्टेट कॉलजे ऑफ ॲग्रिकल्चरला भेट दिला. त्यातूनच तेथे ‘लिबर्टी हाइड बेली हार्टोरियम’ ही संस्था स्थापन झाली बेली तिचे संचालक होते (१९१५-५१). त्यांचे लेखन विपुल असून त्यांनी ६० पुस्तके व ७०० संशोधनपर लेख लिहिले, तसेच जेन्टेस इर्बोरियम या नियतकालिकाची स्थापना केली होती. द सर्व्हायव्हल ऑफ द अन्लाइक (१८९६), प्लॅंट त्रीडिंग (१८९७), बॉटनी (१९०१), लेसन्स षिथ प्लॅंट्‌स (१९०४), स्टेट अँड द फार्मर (१९०८), मॅन्युअल ऑफ गार्डनिंग (१९१०), द ॲपल ट्री (१९२२), मॅन्युअल ऑफ कल्टिव्हेटेड प्लॅंट्‌स (१९२४) ही त्यांची काही पुस्तके असून त्यांनी पुढील महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथाच्या संपादनाल मोलाचे साहाय्य केले होते : सायक्लोपीडिया ऑफ अमेरिकन हॉर्टिकल्चर (१९००-०२) स्टॅडर्ड सायक्लोपीडिया ऑफ हॉर्टिकल्चर (१९१४), सायक्लोपीडिया ऑफ अमेरिकन ॲग्रिकल्चर (१९०७-०९), हॉर्ट्‌स (१९३०) आणि हॉर्ट्‌स सेकंड (१९४१), यांशिवाय त्यांचे दोन कवितासंग्रह असून ग्रामीण समाजशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान इ. विविध विषयांवरही त्यांनी लेखन केले आहे.

वाइल्डर पदक (१८८५), इंगम काउंटी हॉर्टिकल्चरल सोसायटीचे अध्यक्ष (१८८६), वोटॅनिकल सर्व्हे ऑफ अमेरिका व अमेरिकन सोसायटी फॉर हॉर्टिकल्चरल सायन्स यांचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (१९३०), अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष (१९२६), अमेरिकन ॲकॅडेमी, ऑफ आर्ट्‌स अँड यन्सेस व बोटॅनिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थांचे सदस्य व अध्यक्ष (१९२६) इ. बहुमान व अनेक सन्माननीय पदव्या आणि पदे त्यांना मिळाली होती. त्यांच्या सन्मानार्थ १९४८ साली त्यांच्या नावाने एक पदक देण्यात येऊ लागले. इयाका (न्यूयॉर्क) येथे ते मृत्यू पावले.    

जमदाडे, ज.वि.