कोथिंबीर : (हिं. धनिया गु. कोनफिर क. कोथंब्री, कोतुंबरी सं. धान्यक, कुस्तुंबरी, अल्लका इं. कोरिअँडर, लॅ. कोरिअँड्रम सॅटायव्हम कुल-अंबेलिफेरी). ही परिचित ओषधीय [→ ओषधि] वनस्पती भारतात सर्वत्र पिकविली जाते. ती मूलतः दक्षिण यूरोप व आशिया मायनरमधील असून यूरोपात फार प्राचीन काळापासून लागवडीत आहे. तेथे व अमेरिकेत काही भागांत लागवडीतून निसटून तणाप्रमाणे इतरत्र उगवलेली आढळते. मध्य पूर्वेत व ग्रीस येथेही ती पूर्वीपासून परिचित आहे. पूर्वी भारतातून निर्यात होत असे. हल्ली अनेक देशांत (विशेषतः रशिया, हंगेरी, यूगोस्लाव्हीया व मोरोक्को) ती लागवडीत असल्यामुळे आता निर्यात होत नाही. या वनस्पतीच्या पाल्याला कोथिंबीर व फळांना धणे म्हणतात. या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) वनस्पतीची उंची ४०–५० सेंमी. असून पाने दोन प्रकारची व खोड पोकळ असते. वरची पाने आखूड देठाची, अपूर्ण पिच्छाकृती (पिसासारखी), खंडितखालची पाने लांब देठाची, विषमदली अपूर्ण पिच्छाकृती, बहुदलित असून त्यांचे तळ संवेष्टी (देठाला वेढणारे) असतात. फुले नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येतात आणि ती लहान, पांढरी किंवा किंचित निळसर, संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात असतात[→पुष्पबंध]. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे अंबेलिफेरी कुलाप्रमाणे [→ अंबेलेलीझ]. फळे (धणे) आंदोलीपाली, साधारण गोलसर, फलांश दोन व अर्ध गोलाकृती असून त्यावर उभे कंगोरे असतात [→ फळ]. खोड, पाने व फळे यांना उग्र वास असतो. या वनस्पतीचा स्वयंपाकातील व मसाल्यातील उपयोग सर्वांना परिचित आहे. औषधात वायुनाशी व सुगंधी म्हणून पूर्वी घालीत असत. कोरिअँड्रॉल हे बाष्पनशील (उडून जाणारे) तेल त्यात असल्याने तिला स्वयंपाकात महत्त्व आले आहे. मिठाई व मद्ये यांतही त्याचकरिता धणे वापरतात. फळे उत्तेजक मूत्रल (लघवी साफ करणारी), वायूनाशी, पौष्टीक, दीपक (भूक वाढविणारी), पित्तप्रकोपरोधक, वाजीकर (कामोत्तेजक), शीतक असून शूल (पोटातील वेदना) व रक्ती मूळव्याध यांवर धण्यांचा काढा देतात.

जमदाडे, ज.वि.

हवामान व जमीन : हे मुख्यतः उष्ण प्रदेशात वाढणारे पीक आहे. भारतात, पाण्याखाली कोथिंबिरीसाठी ते वर्षातून केव्हाही लावतात. भारी काळ्या जमिनीत ते जिरायत पीक म्हणून घेतात. मध्यम काळ्या चांगल्या निचऱ्याच्या आणि लाल पोयट्याच्या जमिनीत बागायती पीक म्हणून लावतात. त्याचे मिश्रपीकही घेतात.

मशागत : एखादी नांगरट आणि एक-दोन वखर पाळ्या देऊन जमीन तयार करतात. साधारणतः पिकाला खत देत नाहीत. पण प्रतिहेक्टर सहा-सात टन शेणखत दिल्यास पिकाची वाढ जोमदार होऊन फायदा होतो.

पेरणी : धण्यासाठी मे-जूनमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये अशा दोन हंगामांत पिकाची लागवड केली जाते. पेरणी ओळीत २२–३० सेंमी. अंतर ठेवून प्रतिहेक्टर १५–२० किग्रॅ. बी पाभरीने पेरतात. बी म्हणजे या पिकाची गोलाकार फळे (धणे) पायाने किंवा पादत्राणाने रगडून त्यांच्या दोनदोन डाळींब्या करून पेरतात. अशा प्रकारे फळांचे विभाजन करून लावल्यास बी कमी लागून उगवण चांगली होते. बी पेरल्यापासून ९-१० दिवसांनी उगवते.

आंतर मशागत : बियांची उगवण पूर्ण होऊन रोपे वर आली की कोळपणी करतात. आवश्यकतेनुसार निंदणी आणि पाणी देतात. धण्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रतिहेक्टर २५ किग्रॅ. नायट्रोजन (अमोनियम सल्फेटाच्या रूपात) या प्रमाणात रासायनिक खताचा पुरवठा केल्यास उत्पन्न चांगले येते.

काढणी व मळणी : धण्यासाठी लावलेले पीक साडेतीन ते चार महिन्यांत तयार होते. त्यावेळी त्याची पाने वाळून गळू लागतात. तेव्हा झाडे उपटून त्यांचे भारे बांधून खळ्यावर नेऊन दोन-तीन दिवस वाळू देतात. नंतर खळ्यात पसरून त्यावर बैलांची पात धरून किंवा झाडे मोगऱ्यांनी बडवून मळणी करतात. उफणून स्वच्छ धणे वाळवून पोत्यात भरून ठेवतात.

उत्पन्न : (१) कोरडवाहू पिकापासून हेक्टरी ७५०–१,००० किग्रॅ. आणि (२) बागायती पिकापासून हेक्टरी १,७५०–२,४०० किग्रॅ. धण्याचे उत्पन्न मिळते.

धण्यांचे पृथ्थकरण : धण्यांमधील घटक द्रव्यांचे सरासरी शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे आढळते.

पाणी

प्रथिने

तेले

स्टार्च

तंतुमय पदार्थ

राख 

११·२

१४·१

१६·६

२१

३२·६

४·४ 

कोथिंबीर (पाला) : मध्यम काळ्या निचऱ्याच्या जमिनीत धण्यांच्या पिकाप्रमाणे मशागत करून वाफ्यात पाण्याखाली हे पीक करतात. बी धण्यांच्या पिकातल्याप्रमाणे फोडून वाफ्यात मुठीने फोकून पेरतात आणि दाताळ्याने मातीत मिसळून लगेच पाणी देतात. बी हेक्टरी ५० किग्रॅ. पर्यंत लागते. या पिकाला हेक्टरी ५० किग्रॅ. नायट्रोजन वरखत म्हणून दिल्यास उत्पन्न जास्त येते. हे पीक सहा-सात आठवड्यांत काढायला येते. फुले येण्यापूर्वी ते उपटून जुड्या बांधून विक्रीकरिता बाजारात पाठवितात. हेक्टरी उत्पन्न ३,७०० ते ५,००० किग्रॅ. मिळते. हिरव्या कोथिंबिरीत अ जीवनसत्त्व भरपूर असते.

नानकर, ज. त्र्यं.

रोग : कोथिंबिरीवर भुरी, खोडातील गाठी, करपा व मर हे रोग पडतात.

भुरी रोग : हा रोगएरिसायफे पॉलिगोनाय  कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) होतो. रोगामुळे पानावर कवकबीजाणूंची (कवकाच्या लाक्षणिक प्रजोत्पादक भागांची) करड्या रंगाची वाढ दिसते. ढगाळ हवेत रोग वाढतो. रोगनाशासाठी दर हेक्टरी १५ किग्रॅ. या प्रमाणात पीक फुलोऱ्यात असताना गंधकाची भुकटी पिस्कारतात. 

खोडावरील गाठी : हा रोगप्रोटोमायसीस मॅक्रोस्पोरस  कवकामुळे होतो. रोगामुळे पानांच्या शिरा व देठ, पुष्पबंध (फुलोरा), खोड व फळे यांवर गाठी येतात. गाठींची लांबी सु. १·२५ सेंमी. व रुंदी ३ मिमी. असते. सावलीच्या जागी रोग वाढतो आणि झाडे मरतात. कवकाचे विश्रामी बीजाणू जमिनीत जिवंत राहतात. रोगाचा प्रसार रोगट जमिनीतून आणि रोगट बियांद्वारा होतो. रोगप्रतिबंधक उपाय म्हणून पिकांची फेरपालट करतात, तसेच निरोगी बी पेरतात.

करपा : हा रोगआल्टर्नेरिया  जातीच्या कवकामुळे मुख्यत्वेकरून पावसाळी हंगामात होतो. रोगनाशासाठी ३: ३: ५० बोर्डो मिश्रणासारखी कवकनाशके वापरतात. 

मर : हा रोग फ्युजेरियमऑक्सिस्पोरम  प्रभेद कोरिअँड्राय  कवकामुळे होतो. हा रोग मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात विशेष आढळून येतो. रोगामुळे झाडे मरतात. रोगकारक कवक जमिनीत जिवंत राहत असल्यामुळे पिकाची फेरपालट करतात व रोगप्रतिबंधक जातीचे बी वापरतात. 

कुलकर्णी, य.स.