निघंटु–२ : वैदिक पदांचा वा शब्दांचा सर्वप्राचीन उपलब्ध कोश. यास्काने त्यावर ⇨ निरुक्तनामक भाष्य रचिले असून त्याच्या आरंभीच ह्या कोशाला समाम्नाय (वैदिक शब्दकोश) असे संबोधिले आहे. ह्या समाम्नायाचेच ‘निघंटव:’ असे नाव प्रचलित असल्याचे यास्काने म्हटलेले आहे. त्यामुळे समाम्नायाला उद्देशून ‘निघंटु’ हा शब्द वापरला जात असावा, असा तर्क करता येतो. निघंटूवरील यास्काचे भाष्य निरुक्त ह्या नावाने सामान्यपणे ओळखले जात असेल, तरी सायणाचार्यांनी आपल्या ऋग्वेदभाष्यभूमिकेत निघंटूलाही निरुक्तच म्हटले आहे. हा कोश सध्या उपलब्ध असलेल्या स्थितीत एककर्तृक नसण्याची शक्यता आहे. अनेकांनी वेगवेगळ्या काळी भर घालीत ही कोशरचना पूर्ण केली असावी. निरुक्ताच्या सातव्या अध्यायात ‘य-तु संविज्ञानभूतम् स्यात् प्राधान्यस्तुति तत्समामने’ (७·१३) (जी अभिधाने देवतेचे नाव म्हणून रूढ झाली आहेत व ज्यांना उद्देशून प्राधान्याने स्तुती रचण्यात आल्या आहेत, अशांचा समावेश मी केलेला आहे.) असे यास्कानेच म्हटले आहे. त्यावरून संपूर्ण निघंटूची रचना यास्कानेच केली, अशी काहींची समजूत आहे तथापि ती बरोबर नाही. वरील उल्लेखावरून फार तर निघंटूच्या शेवटच्या दैवतकांडाची (पाचव्या अध्यायाची) रचना यास्काने केली, असे म्हणता येईल. मात्र ह्या बाबतीत अभ्यासकांत ऐकमत्य नाही.

निघंटूची एकूण तीन कांडे आणि पाच अध्याय आहेत. पहिल्या कांडात तीन अध्याय आणि दुसऱ्या व तिसऱ्या कांडांत प्रत्येकी एक-एक अध्याय अशी ही पाच अध्यायांची विभागणी आहे. ‘नैघंटुक’ हे पहिल्या कांडाचे नाव. त्यात समानार्थक शब्दांचा संग्रह असून कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ आणि त्या अर्थाचे वाचक असे किती शब्द आहेत, हे सांगितले आहे. ते करीत असताना नामांचा गट आणि क्रियापदांचा गट असा भेदही ठेविलेला आहे. नामांचा गट असल्यास ‘नामानि’ किंवा ‘नामधेयानि’ आणि क्रियापदांचा गट असल्यास ‘कर्माण:’ असे शब्दप्रयोग त्याने केले आहेत (हिरण्यनामानि, पृथिवीनामधेयानि ज्वलतिकर्माण:).

पहिल्या तीन अध्यायांत येणाऱ्या शब्दांची स्थूलमानाने विभागणी अशी : पहिल्या अध्यायात पृथिवी, अंतरिक्ष, मेघ, उषा इ. विश्वरचनाविषयक व नैसर्गिक घटनांशी संबंधित अशी नामे. दुसऱ्या अध्यायात मानव व त्याच्याशी संबंधित अशा वस्तू व क्रिया. तिसऱ्या अध्यायात अमूर्त कल्पना वा गुणविशेष. एक उल्लेखनीय विशेष म्हणजे तिसऱ्या अध्यायात एके ठिकाणी (३·१३) उपमा देण्याचे विविध प्रकार एकत्र करण्यात आलेले आहेत. ‘नैगमकांड’ किंवा ‘ऐकपदिक कांड’ हे निघंटूचे दुसरे कांड होय. ‘जहा’, ‘निधा’ इ. ‘अनवगतसंस्कार’ किंवा व्याकरणदृष्ट्या अवघड अशा अनेकार्थशब्दांचा संग्रह त्यात आहे.

निघंटूच्या ‘दैवतकांड’ नामक तिसऱ्या कांडात अग्नी, इंद्र, वरुण इ. देवतांच्या नावांच्या संग्रहाबरोबरच त्यांच्याशी संबंधित असलेल्या इषु, रथ, दुंदुभी ह्यांसारख्या वस्तु किंवा अश्व, मंडूक इ. प्राणी ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ह्या कांडातील एका अध्यायाचे एकूण सहा विभाग असून पहिल्या तीन विभागांत पृथ्वीवरील देवता वा वस्तू चौथ्या व पाचव्या विभागांत अंतरिक्षातील देवता व सहाव्या विभागात द्यूलोकातील देवता समाविष्ट आहेत.

निघंटूमधील पहिल्या तीन अध्यायांतील प्रत्येक पदावर यास्काचे भाष्य नाही मात्र चौथ्या व पाचव्या अध्यायांतील प्रत्येक पदावर त्याने भाष्य केलेले आहे. निघंटूत अनेकार्थशब्दांच्या यादीत समाविष्ट केलेले काही शब्द सकृत्‌दर्शनी चमत्कारिक वाटतात पण त्यांचा नीट अभ्यास व्हायला हवा. उदा., निघंटूत ‘उदनामानि’ (१·१२) मध्ये ‘ऋतस्य योनि:’ ह्या उदकवाचक शब्दाचा निघंटूत अंतर्भाव आहे. तो कसा समर्पक आहे हे प्रा. ल्यूडर्स ह्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या मते ऋत ह्या वैदिक शब्दाचा अर्थ सत्य असा आहे. ह्या सत्याचे स्थान अत्युच्च द्यूलोकात असणाऱ्या अक्षय्य झऱ्यातील पाण्यात आहे. त्यामुळे ‘ऋतस्य योनि:’ ह्यांचा निघंटूकारांनी केलेला पाणी हा अर्थ योग्य आहे.

मेहेंदळे, म. अ.