बारशिंगा"बारशिंगा : स्तनी प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या सर्व्हिडी कुलात या हरिणांचा समावेश होतो. बारशिंगा हा सर्व्हस वंशातील सर्व्हस ड्यूव्हाउसेली या जातीचा असून भारतात याच्या दोन प्रजाती आढळतात. यांपैकी एक सर्व्हस ड्यूव्हाउसेली ड्यूव्हाउसेली व दुसरी सर्व्हस ड्यूव्हाउसेली ब्रँडेरी ही होय. तराई, उत्तर प्रदेश, आसाम व सुंदरबन या भागांतल्या दलदलीच्या प्रदेशातआढळणाऱ्या ड्यूव्हाउसेली या प्रजातीच्या बारशिंग्याचे खूर पसरट असतात व डोके मोठे असते, तर मध्य प्रदेशात आढळणाऱ्या ब्रँडेरी प्रजातीच्या बारशिंग्यांचे खूर लहान व आखूड असतात आणि ते खडकाळ व गवताळ प्रदेशांत राहतात. हे पाण्यावर विशेष अवलंबून असत नाहीत.तराईमधील बारशिंगा दलदलीच्या प्रदेशातून सहसा बाहेर येत नाही. आसामधील बारशिंगा उंच जागी पाण्याच्या सन्निध राहतो. दलदलीच्या प्रदेशात किंवा पाण्यासन्निध राहण्याच्या यांच्या सवयीमुळे इंग्रजीत यांना ‘स्वॅम्पडीयर’ असे म्हणतात. हे प्राणी कळप करून राहतात. कळपात हजारो बारशिंगे असतात. हे निशाचर नाहीत. ते सकाळी व सायंकाळपूर्वी चरण्यास बाहेर पडतात व दुपारी विश्रांती घेतात. झाडांचा कोवळा पाला व गवत यांवर यांची उपजीविका चालते.

बारशिंग्याचा रंग फिकट तपकिरी ते पिवळसर असतो. पोटाचा व शेपटीखालचा भाग पांढरा असतो. नरास आयाळीसारखे लांब केस असतात व त्याचा रंग मादीपेक्षा गडद असतो. उन्हाळ्यात नर आणि मादी या दोहोंचेही रंग फिके होतात. पिलांच्या अंगावर अस्पष्ट ठिपके असतात. नराच्या डोक्यावर मृगशृंगे असतात [⟶ मृगशृंगे व शिंगे]. या शृंगाच्या रचनेत व आकारात पुष्कळदा बरेच वैचित्र्य आढळते. सर्वसाधारणपणे शृंगाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात शृंग प्रथम पाठीकडे झुकते व नंतर त्याची वाढ झाल्यावर डोक्यावर येते. शृंगाला बाजूस शाखा फुटतात. दुसऱ्या प्रकारात मूळ शृंगास प्रथम काटकोन करणारी शाखा फुटते. यामुळे पुढे या शाखेस व मूळ शृंगास फुटणाऱ्या शाखांना अडथळा होत नाही. या दुसऱ्या प्रकारच्या शृंगामुळे जनावर जास्त आकर्षक दिसते. प्रत्येक शृंगास सु. १० ते १४ शाखा फुटतात. काही वेळा ही संख्या २० पर्यंतही जाते. ही मृगशृंगे फक्त नरांनाच असतात. मृगशृंगांचा उगम संयोगी ऊतकापासून (दोन पेशींमध्ये बरेच तंतुमय आधारद्रव्य असलेल्या पेशी समूहापासून) झालेला असतो. यांची वाढ होण्यापूर्वी यांवर एक मखमलीसारख्या कातड्याचे आवरण असते. मृगशृंगांची वाढ झाली व त्याचे अस्थीभवन (हाडाप्रमाणे कठीण होण्याची क्रिया) झाले की, वरचे कातडे वाळून जाते. मृगशृंगांची वाढ शरीरात निर्माण होणाऱ्या लैंगिक ⇨हॉर्मोनामुळे (उत्तेजक स्त्रावांमुळे) होते म्हणून ही लैंगिक उपलक्षणे समजली जातात. खच्ची केलेल्या नरात अगर म्हताऱ्या नरात या हॉर्मोनाची कमतरता असल्यामुळे मृगशृंगांची वाढ होत नाही. दरवर्षी किंवा ठराविक कालानंतर ही मृगशृंगे गळून पडतात व त्यांच्या जागी नवी निर्माण होतात.

पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्यापर्यंतची उंची १३५ सेंमी. व वजन १७० ते १८० किग्रॅ. असते. शिंगांची उंची ७५ सेंमी. व घेर १३ सेंमी. असतो. यापेक्षाही मोठी शिंगे आढळली आहेत. मादी नरापेक्षा थोडी लहान असते.

बारशिंग्याची दृष्टी व श्रवणशक्ती सर्वसाधारण प्रतीची असते त्याची घ्राणेंद्रिये मात्र तीक्ष्ण असतात. कान मोठे असतात. काही जातींत डोळ्यांच्या खाली गंध ग्रंथी असतात. नरांच्या या ग्रंथींमधून एक वासाचा द्रव वाहत असतो. या ग्रंथी अश्रू ग्रंथींपेक्षा वेगळ्या आहेत. धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर सर्व कळप मोठ्याने आवाज करतो. हे प्राणी माजावर येण्याचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळा असतो. हा काळ मध्य प्रदेशात डिसेंबर-जानेवारी, उत्तर प्रदेशात नोव्हेंबर-डिसेंबर तर आसामात एप्रिल-मे असा आहे. माजावर येईपर्यंत सर्व प्राणी कळपात गुण्यागोविंदाने रहात असतात. माजाच्या काळात नरांची एकमेकांशी झुंज होते. विजयी नर आपला जनानखाना निर्माण करतात. एका जनानखान्यात अंदाजे ३० माद्या असल्याचे आढळले आहे. हा काळ संपला की, पुन्हा नवीन मोठे कळप तयार होतात. गर्भावधी सरासरी सहा महिन्यांचा असतो. मादी एका वेळेस एका पिलाला जन्म देते. दोन वर्षांनी पिलू वयात येते.

पहा : हरिण.

दातार, म. चिं.