नरसिंहवर्मन्, पहिला: (? — ६६८). कांचीच्या पल्लव घराण्यातील एक पराक्रमी व कलाभिज्ञ राजा. तो महेंद्रवर्मन् या आपल्या पित्यानंतर ६३० मध्ये गादीवर आला. तो नरसिंहवर्मन् महामल्ल या नावानेही प्रसिद्ध होता. त्याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा सलग तीन लढायांत पराभव केला व त्यांत शेवटच्या म्हणजे वातापी (बादामी) येथील लढाईत पुलकेशी मारला गेला असावा (६४२). या विजयामुळे वातापिकोण्ड (वातापी घेणारा) ही उपाधी त्याने धारण केली. या वेळी त्याच्या ताब्यात चालुक्यांचे सबंध राज्य आले होते. बादामी येथील मल्लिकार्जुन-मंदिराच्या पाठीमागील दगडावर त्याने या विजयाची नोंद केली आहे. यामुळे जे त्याच्या पित्यास किंवा कनौजच्या हर्षवर्धनास जमले नाही, ते त्याने केले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने जलमार्गाने श्रीलंकेवर आपले सैन्य मानवर्म्यास गादीवर बसविण्याच्या कामी मदत करण्यासाठी धाडले. दक्षिण हिंदुस्थानात यावेळी पल्लवांचे राज्य विस्तृत प्रदेशावर पसरले होते. शिवाय त्याने मामल्लपुरम् (महाबलीपुर) येथे एकसंधी पाषाण मंदिरांची (रथांची) उभारणी केली. ह्याच्या कारकीर्दीत ह्युएनत्संगाने कांचीस भेट दिली होती (६४०). त्याचा तत्कालीन परिस्थितीचा वृत्तांत फार मनोरंजक असून त्यावरून कांचीची भरभराट, विद्वानांस असणारा आश्रय आणि त्या शहराची रचना यांविषयी महत्त्वाची माहिती मिळते. या वेळी कांची येथे बौद्ध, जैन व हिंदू या तिन्ही धर्मांचा प्रभाव असावा. नरसिंहवर्मन्‌नंतर दुसरा महेंद्रवर्मन् पल्लवांच्या गादीवर आला.

देशपांडे, सु. र.