आलेक्सांद्र द्यूमा ( पेअर)

द्यूमा, आलेक्सांद्र (पेअर: (२४ जुलै १८०२–५ डिसेंबर १८७०). जगद्विख्यात फ्रेंच कादंबरीकार आणि नाटककार. ब्हीलेअर–कॉतरे येथे जन्मला. नशीब काढण्याच्या उद्देशाने द्यूमा विसाव्या वर्षी पॅरिसला आला व द्यूक दोर्ले याच्या परिवारात त्याला नोकरी मिळाली. तेथील वास्तव्यात त्याने शेक्सपियर, वॉल्टर स्कॉट आणि शिलर यांचे वाचन केले व स्वच्छंदतावादी लेखकांच्या गटात प्रवेश मिळवून नाट्य लेखनास आरंभ केला. १८२९ साली त्याचे आंरी त्र्वा ए सा कूर (इं. शी. हेन्री द थर्ड अँड हिज कोर्ट) हे नाटक रंगभूमीवर आले. नाट्यगुणांनी समृद्ध असलेले हे नाटक गद्यात लिहिलेले असून त्यात द्यूमाने अभिजात नाट्यकृतींत पाळला जाणारा ऐक्यत्रयाचा (थ्री यूनिटीज) पारंपरिक संकेत झुगारून दिलेला आहे. ह्या नाटकाला लाभलेले यश ही फ्रेंच स्वच्छंदतावादी संप्रदायाला लाभलेल्या यशाची ग्वाही मानली गेली. यानंतर त्याने क्रीस्तीन (१८३०), नेपोलियन बोनापार्ट (१८३१) आणि आंतॉनी (१८३१) अशी आणखी काही नाटके लिहिली.

साधारण १८३९ च्या सुमारास द्यूमा कादंबरीकडे वळला व या क्षेत्रात त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले. कादंबरीलेखनात तो अनेक कथालेखकांचे साह्य घेत असे. म्हणून लोक त्यांचा औपरोधिकपणे ‘द्यूमा व कंपनीचा लिमिटेड कारखाना’ असा उल्लेख करीत. तथापि साहाय्यकांचे काम द्यूमाला मुख्यतः संविधानके पुरविणे, हेच असे. संविधानकांना जिवंत कलाकृतीचे रूप देण्याचे कर्तृत्व द्यूमाचेच. मनोवेधक निवेदनशैली, चुरचुरीत संवाद, अत्यंत प्रभावी कल्पनाशक्ती ही त्याच्या कादंबरीची वैशिष्ट्ये होत. प्रेम व पराक्रम या द्यूमाच्या लेखनामागील दोन प्रेरणा. मानसशास्त्रीय विश्लेषणाकडे व ऐतिहासिक सत्य पारखण्याकडे त्याने बुद्धिपुरस्सर दुर्लक्ष केले. प्रेमप्रकरणे, रोमांचकारी साहसे, तुरुंगवास, आश्चर्यकारक सुटका, असंख्य द्वंद्वयुद्धे इत्यादींनी ओतप्रोत भरलेल्या या कादंबऱ्यांनी वाचकांची मने काबीज केली. प्रथम वर्तमानपत्रांतून व नियतकालिकांतून प्रसिद्ध होणाऱ्या या कादंबऱ्या शेवटी पुस्तकरूपाने बाहेर पडत.

द्यूमाच्या लोकप्रियतेचा उच्चांक मोडणारी त्यांची लू काँत द् मॉंते क्रिस्तो (इं. शी. काउंट ऑफ मोंते क्रिस्तो) ही कादंबरी १८४४ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी प्रसिद्ध झालेली Les Trois Mousquetaires ( इं, शी. थ्री मस्किटीअर्स) ही तेरावा लुई व कार्डिनल रिशूल्यच्या काळातील वातावरण असलेली कादंबरीसुद्धा अतिशय गाजली.

मे मेम्वार (२२ खंड, इं. शी. माय मेम्वार्स) ह्या नावाने त्याने आपल्या आठवणी लिहिल्या. त्यांतून उलगडत जाणारी त्याची आत्मकथा एका साहसमय कादंबरीच्याच पातळीवर गेलेली आहे. जिवंत प्रवासवर्णने तसेच लहान मुलांकरिता कथाही त्याने लिहिल्या.

पाकशास्त्रविषयक शब्दांचा एक कोशही द्यूमाने तयार केला होता. ‘कालमान लेव्ही’ ह्या प्रकाशन संस्थेने त्याचे समग्र साहित्य १०३ खंडांत प्रसिद्ध केले आहे.

इटलीच्या स्वातंत्र्याबद्दल त्याला आस्था होती. यूरोपमध्ये इटालियन स्वातंत्र्यलढ्याची बाजू मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य द्यूमाने तळमळीने केले. ते स्मरून इटालियन स्वातंत्र्यनेता गॅरिबाल्डी ह्याने द्यूमाची नेपल्स येथे ललित कला संचालक (डिरेक्टर ऑफ फाइन आर्ट्स) ह्या पदावर नेमणूक केली होती. १८६४ मध्ये तो फ्रान्समध्ये परतला. द्येप शहराजवळील प्वी येथे तो आपल्या मुलाकडे राहू लागला. तेथेच त्याचे निधन झाले.

संदर्भ: Davidson, Arthur F. Alexandre Dumas Pere His Life and Works, 1902.

टोणगावकर, विजया