ऑक्टोकोरॅलिया : हा ॲक्टिनोझोआचा एक उपवर्ग असून यातील बहुतेक प्राणी निवहजीवी (समूह करून एके ठिकाणी राहणारे) आहेत. पॉलिपांचे (निवहातील अलग व्यक्तींचे) संस्पर्शक (अनेक सांध्यांनी तयार झालेली स्पर्शेंद्रिये) आणि आंत्रयोजनी (देहभित्तीपासून निघून आतड्यात गेलेला उभा स्‍नायुमय पडदा) यांची संख्या नेहमी आठच असतेसंस्पर्शक पिच्छाकृती (पिसांसारखे) असतात. ग्रसिकाखाचा (अन्ननलिकेतील खाचा) एकापेक्षा जास्त केव्हाही नसतात आणि असलेली खालच्या बाजूकडे (अधर) असते. आंत्रयोजनींची युग्मे नसतात. सगळ्या आंत्रयोजनी पूर्ण म्हणजे देहभित्तींपासून निघून मुखपथाला चिकटलेल्या असतात. सगळे अनुदैर्घ्य स्‍नायू (अधर स्‍नायू) आंत्रयोजनीच्या एकाच बाजूवर असतात.

या उपवर्गाचे ॲल्सिओनेरिया, गॉर्गोनेरिया आणि पेनॅट्युलॅरिया असे तीन गण पाडलेले आहेत.

आ.१ ॲल्सिओनियम (ॲल्सिओनियम पामटेम)

आ.२ ट्युबिपोरा (ट्युबिपोरा म्यूझिका) सबंध निवहाचा कंकाल : (म, म) मंच.

() ॲल्सिओनेरिया : या गणामध्ये कंकाल (सांगाडा), सामान्यतः मध्यश्लेष स्तरात (बाहेरच्या आणि आतल्या स्तरांच्यामध्ये असणारा जिलेटिनासारख्या द्रव्याच्या स्तरात) असणाऱ्या कॅल्शियममय कंटिका (कॅल्शियमाच्या बनलेल्या सुईसारख्या बारीक संरचना) किंवा लहान विषम (सारख्या नसलेल्या) कायांचा बनलेला असतो. ॲल्सिओनियम  हे या प्रकारचे उदाहरण आहे. काही प्रकारात कंटिका एकवट होऊन सलग कंकाल तयार होतो आणि त्याला शाखा फुटून सबंध निवहाचा तो अक्ष बनतो याचे उदाहरण रक्त प्रवाल (लाल पोवळे) होय.

कधीकधी प्रत्येक पॉलिपाकरिता एक स्वतंत्र नलिका तयार होते आणि या नलिका एकमेकींना जोडलेल्या असतात. ट्युबिपोरा हे याचे उदाहरण होय. निळ्या पोवळ्याचा कंकाल अवजड असतो.

आ. ३. गॉर्गोनिया

() गॉर्गोनेरिया : या गणामध्ये निवह झाडांसारखे असतात. कंकाल कॅल्शियममय अथवा शृंगी (केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेला) असून बाह्यत्वचेपासून उत्पन्न झालेला असतो आणि सबंध निवहाचा शाखित अक्ष त्याचाच बनलेला असतो. मध्यश्लेषस्तरात कंटिका असतात आणि ग्रसिक-खाच नसते. सगळ्या समुद्रव्यजनांचा (ज्यांच्या निवहांचा आकार पंख्यासारखा असतो अशा सागरी प्राण्यांचा) या गणात समावेश होतो.

आ. ४. पेनॅट्युला (पेनॅट्युला सल्केटा) सबंध निवह : (१) पार्श्व शाखा.

()पेनॅट्युलॅरिया : या गणात निवह सामान्यतः दीर्घित (लांब) असतो आणि त्याचे खालचे टोक समुद्राच्या तळाच्या चिखलात रुतलेले असते. दूरस्थ (वरच्या) टोकाकडे पॉलिप असतात आणि सामान्यतः ते पार्श्व शाखांवर असतात. खोडाला कॅल्शियममय अथवा शृंगमय कंकालाने आधार दिलेला असतो. पॉलिप द्विरूपी (दोन वेगवेगळी स्वरूपे असलेली) असतात. पेनॅयुला  हे या गणाचे उदाहरण आहे.

कर्वे, नी.

    “