हॅराल्ड झुर हाउसेनहाउसेन, हॅराल्ड झुर : (११ मार्च १९३६). जर्मन विषाणुशास्त्रज्ञ. ग्रैव (गर्भाशयाचा सुरुवातीचा अरुंद भाग) कर्करोगाला का र णी भू त होणाऱ्या मानवीअं कु रा र्बु द विषाणूंचा (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस HPV) शोध लावल्याबद्दल हाउसेन यांना ल्यूक माँताग्नेर आणि फ्रांस्वा सिनौसीबार यांच्यासमवेत २००८ सालचे शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

 

हाउसेन यांचा जन्म गेलसेनकर्चिन (जर्मनी) येथे झाला. त्यांनाजीवशास्त्र व वैद्यक या विषयांच्या अभ्यासात विशेष रस होता. त्यांनी वैद्यकीय शिक्षण बॉन, हँबर्ग आणि ड्यूसेलडॉर्फ या विद्यापीठांत पूर्ण केले. १९६० मध्ये त्यांनी एम्.डी. ही पदवी मिळविली. त्यानंतर १९६२ मध्ये त्याच विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञान विभागात ते प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून रुजू झाले. फिलाडेल्फियायेथील बालरुग्णालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत व्हेर्नर आणि गट्रड हेन्ले या पती-पत्नीसमवेत काम करीत असताना प्रथमतः त्यांनी कर्कविषाणूवर (एप्स्टाइन-बार व्हायरस EBV) संशोधन केले. हे विषाणू निरोगी लसीका कोशिकांचे कर्ककोशिकांमध्ये रूपांतर करतात. त्यामुळे हेच विषाणू कर्ककोशिका तयार होण्यास कारणीभूत असतात, असे त्यांचे प्रमुख संशोधन आहे. तसेच त्यांनी अंकुरार्बुद विषाणू (पॅपिलोमा व्हायरस) शोधून काढला. ह्या विषाणूमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो. स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. ते १९७७ मध्ये फ्रायबर्ग (ब्रेस्लॉ) येथे विषाणुविज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्यांनी लुट्झ गिसमान यांच्यासमवेत काम करीत असताना सोप्या केंद्रोत्सारण पद्धतीने मानवी अंकुरार्बुद विषाणू-६ (HPV-6) जनन-चामखिळीपासून वेगळाकेला. तसेच त्यांनी मानवी अर्बुदातील विषाणू ओळखण्याच्या नवीन पद्धती वा शक्यता सुचविल्या. त्यांना जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर (हायड्लबर्ग) या राष्ट्रीय संस्थेचे वैज्ञानिक संचालक म्हणून १९८३ मध्ये नेमण्यात आले. वीस वर्षांच्या सेवेनंतर २००३ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर तेथे ते सन्माननीय प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

 

हाउसेन यांनी बऱ्याच वर्षांच्या संशोधनान्ती ग्रैव कर्करोगाच्या गाठीतील कझत-१६ डीएनए सदर्न ब्लॉट संकरण पद्धतीने शोधून काढण्यात यश मिळविले. त्यानंतर एका वर्षांनी कझत-१८ चा शोध लागला. हा विषाणू मानवामध्ये होणाऱ्या ग्रैव कर्करोगास ७५% कारणीभूत आहे, असे त्यांनी प्रमाणित केले. हे अनुमान त्यांनी १९७६ मध्येच प्रसिद्ध केले होते. ड्यूसेलडॉर्फ विद्यापीठात काम करीत असताना त्यांनी वैद्यकीय सूक्ष्म-जीवशास्त्र व प्रतिरक्षाविज्ञानात महत्त्वाचे संशोधन केले. तसेच त्यांनी व्हायरसप्रेरित जनुकांमधील बदलासंबंधीचेही संशोधनकार्य केले. २००६ मध्ये त्यांनी कर्करोगासंबंधीची लस विकसित केली.

 

हाउसेन यांना रॉबर्ट कॉख पुरस्कार (१९७५) चार्ल्स एस्. मॉट पुरस्कार (१९८६) वुर्ट्सबर्ग युनिव्हर्सिटीचे फिरखो पदक (२०००) जर्मन कॅन्सर एड ॲवॉर्ड (२००६) गेर्डनर फौंडेशन इंटरनॅशनलॲवॉर्ड (२००८) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यातआले. तसेच त्यांना शिकागो, प्राग, सॉल्फर्ड, हेल्सिंकी यांसारख्या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. ते २००० पासून इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर या नियतकालिकाचे प्रमुख संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

एरंडे, कांचन