‘निराला’-सूर्यकांत त्रिपाठी : (२१ फेब्रुवारी १८९९–१५ ऑक्टोबर १९६१). प्रख्यात हिंदी कवी. त्यांचा जन्म बंगालमधील मेदिनिपूर (महिषादल संस्थान) येथे एका कान्यकुब्ज ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे उत्तर प्रदेशातील उन्नाओ जिल्ह्यातील. बालपण बंगालमध्ये गेल्यामुळे मातृभाषा बंगाली. पुढे मेदिनिपूर सोडून ते आपल्या मूळ गावी आले. गरिबीमुळे त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. ते लहान असतानाच त्यांचे आईवडील वारले पुढे पत्नीही वारली आणि कुटुंबाचा सर्व भार त्यांच्यावरच पडला. मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने ते हिंदी भाषा शिकले आणि तीत साहित्यनिर्मितीही करू लागले. वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी होते. आर्थिक संघर्षाबरोबरच साहित्यिक मान्यतेसाठीही त्यांना संघर्षच करावा लागला. जीवनभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे. उत्तरायुष्यात मानसिक तोल ढासळल्यामुळे त्यांच्या वृत्तीत विक्षिप्तपणा आला. काव्याशिवाय त्यांनी कथा, कादंबऱ्या आणि निबंधही लिहिले. समन्वय, मतवाला, सुधा इ. नियतकालिकांचे संपादनही त्यांनी काही काळ केले. एकूण ४४ ग्रंथ त्यांच्या नावावर आढळतात. अलाहाबाद येथे त्यांचे निधन झाले.

‘निराला’-सूर्यकांत त्रिपाठी

मुख्यतः कवी म्हणूनच हिंदीत त्यांचे नाव चिरंतन झाले आहे. १९२३ साली मतवाला या मासिकात त्यांची ‘जुही की कली’ ही विमुक्त प्रणयाचे मादक शब्दचित्र रेखाटणारी कविता प्रसिद्ध झाली. ही कविता सरस्वतीचे संपादक महावीरप्रसाद द्विवेदी यांनी साभार परत केली होती. ते नवे नवे प्रयोग करणारे साहसी कवी होते. हिंदीमध्ये मुक्तछंदात कविता लिहिण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. छंदांच्या बंधनांना झुगारून भावानुकूल शब्द व लय यांचा पुरस्कार करण्याचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्यांमध्ये निरालांचाच वाटा महत्त्वाचा आहे. मुक्तछंदातील त्यांच्या कांव्यात आशयानुकूल अंतर्गत लय विशेषत्वाने जाणवते. त्यांच्या अभिव्यक्तीवर बंगाली आणि इंग्रजी भाषांतील काव्याचा प्रभाव दिसतो. निरालांचे एकूण काव्य वैविध्यपूर्ण आहे. शृंगार, कारूण्य, वात्सल्य, हास्य, उपरोध यांनी ते संपन्न आहे. राम की शक्तिपूजासारख्या त्यांच्या दीर्घकाव्यात पौरुष व ओज यांचा प्रत्यय येतो. तुलसीदास ही चिंतनपर, अंतर्मुख वृत्तीची दीर्घकविता त्यांच्या निसर्गप्रेमाची, सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या तळमळीची आणि रचनाकौशल्याची साक्ष देते. तुलसीदासांना महाकाव्य लिहिण्याची प्रेरणा का व कशी मिळाली, याचा शोध घेण्याचा या कवितेत त्यांनी प्रयत्न केला आहे. याच संदर्भात तत्कालीन सामाजिक परिस्थितिचेही काव्यात्म वर्णन आले आहे. त्यांनी आपल्या कन्येच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या ‘सरोजस्मृति’ या शोकगीताची हिंदीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांत गणना केली जाते.

निसर्गप्रेम, सौंदर्याची आसक्ती, उत्तुंग कल्पनाशक्ती, चोखंदळ शब्दयोजना, सूक्ष्मता, वैयक्तिकता ही सर्व छायावादी वैशिष्ट्ये तर निरालांच्या काव्यात आढळतातच पण त्यांचे खास वैशिष्ट्य हे, की, ते काळाबरोबर गतिशील राहिले छायावादाच्या हळव्या व भावविवश विश्वातून कठोर वास्तवाच्या खडबडीत भूमीवर ठामपणे उभे राहिले. ‘भिक्षुक’, ‘वह तोडती पत्थर’, ‘बनबेला’, ‘कुकुरमुत्ता’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यांनी लिहिल्या. वास्तवाशी इमान राखण्याच्या वृत्तीमुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांच्या कविता आजही ताज्या व परिणामकारक वाटतात. म्हणूनच छायावादाचा प्रभाव ओसरल्यावरही निरालांची लोकप्रियता टिकून राहिली. भारतीयसांस्कृतिक परंपरेचा रास्त अभिमान, सद्यःकालीन सांस्कृतिक ऱ्हासाबद्दलचा विषाद आणि आदर्शाची अनिवार ओढ त्यांच्या काव्यात व्यक्त झाली. निरालांच्या कथा आणि मनोवेदनांनी थरथरणाऱ्या कितीतरी कविता रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेतात.

निरालांची काव्याची समज अतिशय प्रगल्भ होती आणि समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी सुमित्रानंदन पंतांच्या पल्लव (१९२८) ह्या काव्यसंग्रहावर केलेल्या विस्तृत समीक्षणावरून आणि स्वतःच्या काही कवितांच्या त्यांनी केलेल्या समीक्षेवरून याची साक्ष पटते.

त्यांनी अप्सरा (१९३१), अलका (१९३३), निरुपमा (१९३६), प्रभावती (१९३६), कुल्लीभाट (१९३९), बिल्लेसुर बकरिहा (१९४५), चोटी की पकड (१९४६) या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथा लिली (१९३३), सखी (१९३५), सुकुल की बीबी (१९४१) व चतुरी चमार (१९४५) यांत संगृहीत आहेत. त्यांचे निबंध प्रबंध पद्म (१९३४), प्रबंध प्रतिमा (१९४०), चयण (१९५७), चाबूक (१९६२) व संग्रह (१९६४) मध्ये संकलित आहेत.

अनामिका (१९२३), परिमल (१९३०), गीतिका (१९३६), तुलसीदास (१९३८), कुकरमुत्ता (१९४२), अणिमा (१९४३), बेला (१९४३), नए पत्ते (१९४६), अर्चना (१९५०), आराधना (१९५३), गीतगुंज (१९५४) इ. त्याचे काव्यसंग्रह होत. अनामिका हा संग्रह १९३७ साली त्यात नव्या कवितांची भर घालून पुन्हा छापला गेला. हिंदीतील छायावादी कवींत निरालांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.

संदर्भ : १. पांडेय, गंगाप्रसाद, महाप्राण निराला, अलाहाबाद, १९४९.

२. वर्मा, धनंजय, निराला काव्यः पुनर्मूल्यांकन, दिल्ली, १९७३.

३. शर्मा, रामविलास, निराला की साहित्य साधना, दिल्ली, १९६९.

४. सिंह, दूधनाथ, निराला : आत्महन्ता आस्था, अलाहाबाद, १९७२.

५. सिंह, बच्चन, क्रांतीकारी कवि निराला, वाराणसी, १९६१.

बांदिवडेकर, चंद्रकांत