मुडदूस : लहान मुलात वयाच्या पहिल्या तीन वर्षांत, अस्थींच्या वृद्धिकालात ‘ड’ जीवनसत्त्वाची न्यूनता [⟶ जीवनसत्त्व ड] उत्पन्न झाल्यामुळे उद्‌भवणाऱ्या विकृतीला मुडदूस म्हणतात. या विकृतीत कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या चयापचयात्मक (शरीरातून सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये उद्‌भवणाऱ्या) बिघाडामुळे शरीरातील हाडांवर विशेष दुष्परिणाम होतात. याशिवाय स्नायू तंत्र (संस्था), जठरांत्र मार्ग (जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे यांनी मिळून बनणारा अन्नमार्ग), शरीरवाढ व विकास यांवरही दुष्परिणाम होतात.

इतिहास : सतराव्या शतकाच्या सुरुवातीस या रोगाकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रथम लक्ष गेले. १६४५ मध्ये डॅनिएल व्हिसलर या इंग्रज शास्त्रज्ञांनी या विषयावर पहिला निबंध लिहिला. सर फ्रान्सिस ग्लिसन यांनी १६५० मध्ये आपला दुसरा निबंध प्रसिद्ध केला. १६६० मध्ये शास्त्रज्ञ जॉन मेयो यांनी मुडदुसामधील अस्थींच्या मऊ बनण्याकडे प्रथम लक्ष वेधले. १७५१ मध्ये टॉमस सिडमन यांनी रोगाचे पहिले उपरुग्ण वैद्यकीय वर्णन लिहिले. १९०९ मध्ये रशियन वैद्य जे. ए. शाबाद यांनी दोन महिने कॉड माशाच्या यकृत तेलाचा उपचार करून एक मूल बरे केले. राझिन्स्की या शास्त्रज्ञांनी १९१२ मध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव रोगास कारणीभूत असल्याचा दावा केला. अमेरिकेत १९१७ मध्ये मुडदुसाकरिता बाह्यरुग्ण विभागातून कॉड माशाच्या यकृताचे तेल आरोग्य खात्यामार्फत मूळ किंमतीतच पुरविण्यात येऊ लागले.

प्रादुर्भाव: एके काळी हा रोग इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो ‘इंग्लिश रोग’ या नावानेच ओळखला जात होता. बहुतेक सर्व प्रगत देशांतून प्रसूतिपूर्व देखभाल, अर्भकाची देखभाल, राहत्या घरांचे वायुवीजन (हवा खेळती ठेवण्याची योजना) व प्रकाश व्यवस्था इत्यादींकडे लक्ष पुरवल्यामुळे या रोगाचे उच्चाटन झाले आहे. नैसर्गिक रीत्या हा रोग प्राण्यांत व आद्य पर्यावरणात आढळत नाही. आफ्रिकेतील आदिवासीत तो अजिबात दिसत नाही, तसेच चीन व जपान या देशांतही क्वचित आढळतो. ग्रीनलंड, आइसलँड, नॉर्वे व डेन्मार्क या देशांतून दैनंदिन आहारात माशाचे तेल वापरात असल्यामुळे, तसेच दक्षिण इटली, ग्रीस व तुर्कस्तान या देशांतून भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळे तेथे हा रोग आढळत नाही. यूरोप, अमेरिका व कॅनडा या ठिकाणच्या मोठ्या शहरांतील गरिबांच्या वस्त्यांतून ३० ते ९०% मुले या रोगाने पछाडलेली आढळतात.

 भारतात अजूनही हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने केलेल्या एका पाहणीनुसार एकूण त्रुटिजन्य विकारांपैकी ५% रोगी मुडदुसाचे आढळतात. महाराष्ट्रात हे प्रमाण याहून थोडे अधिक असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. अकाल जन्म झालेल्या नवजात अर्भकात हा रोग अधिक संभवनीय असतो, कारण गर्भवासातील शेवटच्या तीन महिन्यांत शरीरातील कॅल्शियमाच्या एकूण संचयापैकी ८०% संचय होतो व तशी संधी या अर्भकांना मिळालेली नसते.

संप्राप्ती : १९५० सालानंतर झालेल्या संशोधनानुसार मुडदूस या रोगास ड जीवनसत्त्वाची न्यूनता कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे. रोगाचे कारण समजण्याकरिता ड जीवनसत्त्वविषयी काही माहिती असणे आवश्यक आहे. हे जीवनसत्त्व एक हॉर्मोन (उत्तेजक स्त्राव) आहे. अंतःस्त्रावविज्ञानातील (वाहिनीविहीन ग्रंथीतून स्ववणाऱ्या व रक्तामध्ये एकदम मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावांसंबंधीच्या विज्ञानांतील) अलीकडील संशोधनामुळे या जीवनसत्त्वाबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. ड जीवनसत्त्वाचा चयापयातील बिघाड अनेक विकृतींशी संबंधित असल्याचे आढळले आहे.


मानवी शरीराला हे जीवनसत्त्व दोन प्रकारांनी मिळू शकते.

(१) अंतर्जात : म्हणजे शरीरांतर्गत काही प्रक्रियांनंतर उपलब्ध होणारे सर्व स्टेरॉइड हॉर्मोनांचा आधारभूत पदार्थ कोलेस्टेरॉल असतो व त्यापासून यकृत व आंत्र श्लेष्मकलेमध्ये (बुळबुळीत पातळ अस्तरामध्ये) ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल बनते. हा पदार्थ रक्ताभिसरणातून त्वचेतील आधारस्तरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून वाहत असताना सूर्यप्रकाशातील जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरण त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलात (ड जीवनसत्त्वात) रूपांतर करतात. या रूपांतराचे प्रमाण त्वचेतील मेलॅनीन नावाच्या रंजकद्रव्यामुळे नियंत्रित होते. कोलेकॅल्सिफेरॉल जेव्हा यकृतात येते तेव्हा २५-हायड्रॉक्सिलेज नावाचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यात मदत करणारे प्रथिन) त्याचे २५-डायहायड्रॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉलामध्ये रूपांतर करते. त्यानंतर हा पदार्थ जेव्हा रक्तप्रवाहातून वृक्कात (मूत्रपिंडात) येतो तेव्हा त्यापासून १, २५-डायहायड्रोकोलेकॅल्सिफेरॉल बनते. कोलेकॅल्सिफेरॉल व त्याचे सर्व अनुजात (त्यापासून बनणारी इतर संयुगे) मुडदूसरोधी असले, तरी हा शेवटी तयार होणारा पदार्थ अत्यल्प मात्रेतही अतिशय गुणकारी आहे.

(२) बहिर्जात : कॉड, हॅलिबट यांसारखे खोल सागरी मासे त्यांच्या यकृतात संश्लेषित (घटकद्रव्ये एकत्र आणून बनवलेले) कोलेकॅल्सिफेरॉल मोठ्या प्रमाणावर तयार करतात. याचे कारण अजून अज्ञात आहे. या माशांच्या यकृत तेलाचा औषधी उपयोग अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. वनस्पतींतील अरगोस्टेरॉल या घटकापासून किरणीयनाने (जंबुपार किरणांच्या परिणामाने) अरगोकॅल्सिफेरॉल (ड जीवनसत्त्व) बनवता येते (ड जीवनसत्त्व हा प्रकार अस्तित्वात नाही). कोलेकॅल्सिफेरॉलप्रमाणेच शरीरांतर्गत चयापचयात्मक बदल अरगोकॅल्सिफेरॉलातही होतात व शेवटी तयार होणारा पदार्थ तेवढाच परिणामकारक असतो. लोणी, दूध व अंड्यातील पीतक (पिवळ्या रंगाचे पोषक द्रव्य) यांत ड जीवनसत्त्व अल्प प्रमाणात असते. मातेच्या दूधात पुरेसे ड जीवनसत्त्व असावे. अलीकडील संशोधनानुसार ते जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) सल्फेटाच्या स्वरूपात असावे.

इतर स्टेरॉइडांप्रमाणे यकृतात कॅल्सिफेरॉल आणि त्याचे अनुजात यांचेही अपघटन (रेणूचे लहान तुकडे होण्याची क्रिया) होत असते.

वरील गोष्टी लक्षात घेतल्यास ड जीवनसत्त्व न्यूनता उद्‌भवण्यास पुढील गोष्टी कारणीभूत होऊ शकतात, हे ध्यानात येते : (१) ७-हायड्रोकोलेस्टेरॉलाचे सदोष संश्लेषण, (२) अपुरे जंबुपार किरणीयन, (३) सदोष यकृत एंझाइम, (४) सदोष वृक्क एंझाइम, (५) यकृतातील प्रमाणाबाहेर अपघटन, (६) अपुरे सेवन, (७) आंत्रमार्गातून अपुरे अभिशोषण [⟶ अभिशोषण].

वसापुरीष (मलातून मोठ्या प्रमाणात वसा-स्निग्धद्रव्ये-विसर्जन होणारी विकृती), अप-अभिशोषण या आंत्रमार्गाच्या विकृतींशिवाय भारतीय मुलांमध्ये तृणधान्य सेवन त्यातील फायटिक अम्लामुळे ड जीवनसत्त्वाच्या अभिशोषणात व्यत्यय आणीत असावे. शहरी वस्त्यांतील धूळ व धूर, तसेच लहान मुलाला नेहमी कपड्यात गुंडाळून ठेवण्याची प्रवृत्ती सूर्यप्रकाशाचा त्वचेवर योग्य परिणाम होण्यात अडथळा आणतात. यांशिवाय गरिबीमुळे दैनंदिन आहारात दूध (त्यामधील कॅल्शियमाकरिता) साय, लोणी, अंडी यांसारखे ड जीवनसत्त्वयुक्त अन्नपदार्थ घेणे परवडत नाही.

ब्रिटनमध्ये मुडदूस सरळ रोगावस्थेत आढळत नसला, तरी पाच वर्षे वयाखालील पुष्कळ गरीब मुले लक्षणहीन अवस्थेत आढळतात.


विकृतिविज्ञान : ड जीवनसत्त्व आंत्रमार्गातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या अभिशोषाणाकरिता आवश्यक असते. वृक्कनलिकांना फॉस्फेटाचे अधिक अभिशोषण करण्यातही ते मदत करीत असावे. ड जीवनसत्त्व न्यूनता कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचयात बिघाड उत्पन्न करते परावटुस्त्रावाधिक्यास [⟶ परावटु ग्रंथि] कारणीभूत होते. परिणामी अस्थींच्या आघात्रीमध्ये (कोशिकांच्या-पेशींच्या-मधल्या भागातील पदार्थामध्ये) खनिजीभवन नीट होत नाही. अस्थींच्या उपास्थी (कूर्चा) भागात कॅल्शियम संचय होत नाही व अग्रप्रवर्धाच्या (वाढ होत असलेल्या लांब हाडांच्या टोकाशी असलेल्या व ज्यामुळे हाडाची वाढ होते अशा भागाच्या) उपास्थी भागात रुंदी वाढते. मध्यप्रवर्ध खंड (अस्थींचे शरीर किंवा दंड) मऊ राहिल्याने स्नायू ताणामुळे लांब हाडे वक्र बनतात. लांब हाडांशिवाय कवटी, श्रोणी (धडाच्या तळाशी असलेली हाडांनी बनलेली तसराळ्यासारखी खोलगट संरचना) व कशेरुक दंड (पाठीचा कणा) यांमध्येही खनिजीभवन नीट न झाल्यामुळे विद्रूपता उत्पन्न होते.

आ. १. मुडदुसामुळे येणारी पृष्ठवंश वक्रता : मूल बसविल्यामुळे वक्रता स्पष्ट दिसते.जीवरासायनिक बदल : विशिष्ट बंधक प्रथिने ओळखता येऊ लागल्यामुळे रक्तरसातील (रक्तातील घन पदार्थरहित भागातील) ड जीवनसत्त्वाच्या चयापचयोत्पादित पदार्थांचे मापन करणे शक्य झाले आहे. मुडदुसामध्ये रक्तरसातील २५-डायहायड्रॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉलाचे नेहमीचे प्रमाण अगदी कमी झाल्याचे आणि १, २५-डायहायड्रोकोलेकॅल्सिफेरॉल अजिबात नसल्याचे आढळते. प्राकृतिक (सर्वसाधारण) अवस्थेत रक्तरसात ३ ते ४·५ मिग्रॅ./१०० मिली. मध्ये एवढा फॉस्फरस असतो. मुडदुसात हे प्रमाण घटलेले असते, तर क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या) फॉस्फेटेजाचे प्रमाण खूपच वाढलेले असते. रक्तरसातील कॅल्शियमाचे प्रमाण अनिश्चित असते मात्र परावटू स्त्रावाचे प्रमाण वाढलेले आढळते. मूत्रातील कॅल्शियमाचे प्रमाण नेहमी कमी झाल्याचे आढळते.

आ. २. मुडदूसजन्य विद्रूपता : हातापायातील वक्रता, उदरी (पोट पुढे येणे) व हॅरिसन खात.लक्षणे : ड जीवनसत्त्व न्यूनतेचे अस्थीवरील दुष्परिणाम दिसू लागण्यास काही महिन्यांचा अवधी लागत असल्यामुळे सर्वसाधारणपणे पहिल्या वर्षाच्या शेवटास किंवा दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीस लक्षणे दिसू लागतात. मूल चिडखोर, थलथलित (शिथिल अल्प स्नायू ताण असलेले) व पोट पुढे आलेले असते. दात उशिरा येतात. कधीकधी यकृतवृद्धी आढळते व मुलाच्या कपाळावर नेहमी घाम येतो. डोकीवरील केस गळणे, छातीच्या आकारात बदल होणे ही लक्षणे दिसतात. कवटीच्या हाडांच्या मऊपणामुळे ती चौकोनी पेटीसारखी बनते. छातीच्या पिंजऱ्याच्या पर्शुक उपास्थी संधीवर (बरगड्यांची हाडे उरोस्थीला म्हणजे छातीवरच्या मध्यावरच्या चपट्या हाडाला जोडणाऱ्या उपास्थी संधीवर) विशेषकरून चौथ्या, पाचव्या व सहाव्या फासळ्यांवर दोन्ही बाजूंस जाड गाठी बनतात. त्या छातीवर माळा रुळल्यासारख्या दिसतात म्हणून या लक्षणाला ‘मुडदूस गुटिकामाला’ म्हणतात. ज्या ठिकाणी मध्यपटल स्नायू (छाती व उदर पोकळी यांमधील स्नायूचा पडदा) जाडलेला असतो त्या ठिकाणी छातीभोवता खळगा तयार होतो व या लक्षणाला एडविन हॅरिसन या ब्रिटिश वैद्यांच्या नावावरुन ‘हॅरिसन खात’ म्हणतात. गंभीर रोगात छातीच्या पृष्टवंश (पाठीच्या कणाच्या) भागात कुबड उत्पन्न होते व ते मूल बसले असताना स्पष्ट दिसते. पायातील लांब हाडांच्या वक्रतेमुळे बहिर्नत जानू किंवा अंतर्नत जानू (गुडघे एकमेकांपासून लांब जाऊन पाय घनुष्याकृती वाकणे किंवा पावले एकमेकांपासून लांब जाऊन गुडघे एकमेकांस घासणे) या विकृती उद्‌भवतात. मूल चालू लागले, तर डगमगत चालते.


निदान : रोग किंचित बळावल्यानंतर निदान सोपे असते. रोगाच्या सुरुवातीस व सौम्य प्रकारात ते कठीण असते. पर्शुक उपास्थी संधींची जाडी वाढणे बहुधा प्रथम लक्षण असते. क्ष-किरण तपासणी खात्रीपूर्वक निदानास उपयुक्त असते. मनगटी सांध्याचे क्ष- किरण चित्रण त्यातील प्रबाहूतील दोन्ही हाडांच्या खालच्या टोकावरील विशिष्ट फरकामुळे निदानास पुष्टी देते. वर उल्लेखिलेले जीवरासायनिक बदल निदानास मदत करतात.

आ. ३. पायांतील लांब हाडांच्या वक्रतेमुळे उद्‌भवणाऱ्या विकृती : अंतर्नत जानू (डावीकडील) व बहिर्नत जानू (उजवीकडील).

उपचार : न्यूनताजन्य विकृतीत आहाराकडे लक्ष पुरवणे जरूर असते. ड जीवनसत्त्व व कॅल्शियम यांचे योग्य पुरवठा होण्यावरच मुडदूस उपचाराचा प्रमुख भर असतो. रोगाची चिकित्सा मात्रा १,००० ते ५,००० आंतरराष्ट्रीय एकक (आं. ए.) एवढी असू शकते आणि ती रोग गांभीर्य व वय यांवर अवलंबून असते. एक चहाचा चमचा कॉड-यकृत तेलात (सु. ५ मिली. मध्ये) ४२५ आं. ए. असतात. ज्या मुलांना हे तेल मानवत नाही त्यांना हॅलिबट-यकृत तेल देता येते व ते २० ते ४० पटींनी अधिक समृद्ध असते. या तेलांचा विशेष म्हणजे त्यात ड शिवाय अ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते आणि मागासलेल्या देशांतून दोन्ही जीवनसत्त्वांची न्यूनता एकाच वेळी आढळते. अधिक गंभीर रोगात संश्लेषित कॅल्सिफेरॉलचे द्रावण देता येते. ॲडिक्सोलिन नावाचे द्रावण काही थेंब मात्रेतच गुणकारी आहे. ज्या वेळी मुलाकडे दैनंदिन लक्ष पुरवणे शक्य नसते त्या वेळी ड जीवनसत्त्वाच्या संपुजित मात्रा देता येतात. अशी तोंडाने दिलेली मात्रा अंतःक्षेपनाने (इंजेक्शनाने) दिलेल्या मात्रेएवढीच परिणामकारी असते संपुंजित मोठी मात्रा चालू असताना या जीवनसत्त्वाच्या विषारी परिणामाकडे बारीक लक्ष द्यावे लागते. मळमळणे, उलट्या, अतिसार, गुंगी व वृक्क निष्फलता (वृक्काचे कार्य बंद पडणे) ही लक्षणे विषारी परिणाम दर्शवतात, म्हणून ती उद्‌भवण्यापूर्वीच मोठी मात्रा चालू असताना रक्तरसातील कॅल्शियमाची पातळी दर तीन महिन्यांनी तपासणे इष्ट असते.

कॅल्शियमाच्या योग्य व भरपूर पुरवठ्याकरिता दूध पिणे सर्वोत्तम असते. मुडदूस झालेल्या मोठ्या मुलास दरदोज कमीतकमी अर्धा लिटर दूध द्यावयास हवे. गंभीर रोगात कॅल्शियमाच्या औषधी गोळ्या देता येतात. कॅल्शियम लॅक्टेट किंवा कॅल्शियम क्लोराइड यापेक्षा कॅल्शियम ग्लुकोनेट मुले आनंदाने घेतात.त्याच्या पाण्यात फसफसणाऱ्या गोळ्याही मिळतात.

वरील उपचारांशिवाय लोह, प्रथिने, इतर जीवनसत्त्वे यांचा पुरवठा, आहारासंबंधी मातेला समजावणे, मुलास सतत घरात डांबून न ठेवता उन्हात खेळू देणे इ. बाबींकडे लक्ष द्यावे लागते.

इलाज सुरू केल्यानंतर एक ते दोन दिवसांतच रक्तरसातील ड जीवनसत्त्वाची पातळी वाढू लागते. १० दिवसांत फॉस्फरसाची पातळी पूर्ववत होते आणि तिसऱ्या आठवड्यापासून क्ष-किरण चित्रणात कॅल्शियम व फॉस्फरस यांचा संचय अस्थींच्या आधात्रीत सुरू झाल्याचे आढळते. त्यानंतर मात्रा कमी करता येते.

फलानुमान: (रोगाच्या अंतिम परिणामासंबंधीचे अनुमान). मुडदूस हा प्रत्यक्षात मारक रोग नाही परंतु मुडदूस झालेले मूल क्षयासारख्या संसर्गजन्य रोगांनी लवकर पछाडले जाण्याची शक्यता असते व न्यूमोनियासारख्या आजाराने दगावते. पुष्कळ वेळा आंत्रशोथ (आतड्याची दाहयुक्त सूज) मृत्यूस कारणीभूत होतो. मुडदूसजन्य लांब हाडांच्या विकृती बंधफलक (विस्थापित किंवा हालचाल करता येणारे भाग स्थिर करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन) योग्य वेळी वापरून टाळता येतात. योग्य व दीर्घकालीन उपचारानंतर डोके, छाती या भागांच्या विद्रूपता पुष्कळ अंशी कमी होतात. कधी कधी पायांची धनुष्याकृती विद्रूपताही दिसेनाशी होते.

प्रतिबंधात्मक उपाय : वाढत्या वयात मुलांना योग्य तो दूध पुरवठा, औद्योगिक शहरातील गलिच्छ वस्ती निर्मूलन, आधुनिक घरबांधणी, धुराच्या प्रदूषणाविरुद्ध उपाय खर्चिक वाटले, तरी चालूच ठेवले पाहिजेत. मातांना शिशुसंगोपनातील ड जीवनसत्त्व आणि सूर्यप्रकाश यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. सूर्यप्रकाशाचा अभाव असलेल्या देशांतून ड जीवनसत्त्वाचा आहारातून पुरवठा करण्याची योजना असते. त्याची दैनंदिन गरज ४०० आं. ए. असते. कृत्रिम आहारावर वाढणाऱ्या मुलांच्या अन्नपदार्थात जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिसळता येते.


जन्मानंतर पहिले ४ ते ६ महिने मूल स्तनपानावर वाढवणे रोगप्रतिबंधक असते. मातेच्या दुधात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण अल्प असले, तरी पूर्ण दिवसानंतर जन्मलेले मूल मातेच्या रक्तातील या जीवनसत्त्वाचा पुरेसा भाग तिच्या वारेतील रक्तप्रवाहातून जन्मापूर्वीच साठवून घेत असावे. मातेच्या दूधात कॅल्शियम व फॉस्फरसही कमी प्रमाणात असल्यामुळे अकाल जन्मलेल्या मुलांना कॅल्शियम १०० मिग्रॅ. दर किग्रॅ. वजनाप्रमाणे व फॉस्फर ५० मिग्रॅ. दर किग्रॅ. वजनाप्रमाणे देणे मुडदूस-प्रतिरोधी असते. गर्भारपणी व प्रसूतिपश्च काळात मातेला ड जीवनसत्त्व देणे उपयुक्त असते. स्तनपान फार काळपर्यंत चालू ठेवणेही रोगात्पादक असते. अलीकडील संशोधनानुसार मातेच्या दुधात ड जीवनसत्त्व जलविद्राव्य सल्फेटच्या स्वरूपात असते. मूल आजारी पडल्यास किंवा अकाल जन्म झालेले असल्यास दैनंदिन मात्रा दुप्पट (८०० आं. ए.) असावी. प्रतिबंधात्मक मात्रा किती वयापर्यंत चालू ठेवावी याविषयी तज्ञांचे एकमत नाही. सर्वसाधारणपणे कुटूंबाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, हवामान इ. लक्षात घेऊन पाच वर्षे वयापर्यंत मात्रा चालू ठेवण्यास हरकत नाही. आठवड्यातून एका ३,००० आं. ए. मात्रा असलेली गुटिका (जिलेटीन-वेष्ट, कॅपसूल) प्रतिबंधात्मक असते. ब्रिटनमध्ये राहावयास गेलेल्या आशियातील निर्वासितांच्या आट्यामध्ये प्रत्येक किग्रॅ. मध्ये ५,००० आं. ए. ड. जीवनसत्त्व मिश्रित करणे मुडदूसरोधी व उपयुक्त ठरले आहे.

वरील माहितीत फक्त ड जीवनसत्त्व न्यूनताजन्य मुडदूस या विकृतीचाच विचार केला आहे. मुडदूस ही विकृती अंतर्जातही असू शकते व तिची निरनिराळी कारणे आहेत. उदा., वृक्कजन्य मुडदूस अथवा वृक्कजन्य शिशुता. या इतर प्रकारांचा येथे विचार केलेला नाही.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव. य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन: हा विकार बहुधा लहान मुलांना होतो. हा हाडांचा विकार आहे. हाडांची वाढ न होता ती क्षीण होत जात असतात. हाडांच्या अगोदरचा जो मेद धातू तोही यात बिघडलेला असतो. त्यामुळे त्याचा मळ (घाम) त्या मुलाला सारखा येत असतो. त्याकरिता प्रथम मेदोधातूचे पचन सुधारावे आणि अस्थी घटक चांगले बनावे ह्याकरिता काडेचिराईत, गुळवेल, चंदन व सुंठ ह्यांचे चूर्ण किंवा ह्यांनी सिद्ध केलेले दूध किंवा तूप मुलांना देत असावे. तिक्तक, महातिक्तक ही घृते मुलांना द्यावी. अस्थी धातूचे पचन चांगले होत नसेल किंवा अस्थीचे घटक त्याच्या आहारात कमी पडत असतील असे वाटत असेल, तर प्रवाळभस्म, मृगशृंगभस्म, उंटाच्या हाडाचे भस्म हे मोरावळ्यातून द्यावे. मृगशृंगभस्मापेक्षा सांबरशिंग किंवा शंख घासून त्यात मध व मोरावळा खलून देणे. प्रवाळभस्मापेक्षा प्रवाळपिष्टी उत्तम समजावी, चुन्याची निवळ दुधातून द्यावी. चुनखडीच्या चुन्यापेक्षा शंख-प्रवाळदिकांचा चुना चांगला असतो. अंगाला वरील घृते, नारायण तेल, चंदन, बलालाक्षादी तेल ह्याचा अभ्यंग करून हळूहळू चोळून अंगात जिरवावे. पाच तोळे नारायण तेलाची पिचकारी देत असावे. कानात व नाकातही ह्याचे थेंब घालावे. अंग गरम ठेवावे. लोकरीचे कपडे घालावे.

पटवर्धन, शुभदा अ.

पशूंतील मुडदूस : वाढत्या वयातील पशूंच्या पशूंच्या शरीरवाढीवर परिणाम करणाऱ्या रोगांपैकी मुडदूस हा एक प्रमुख रोग आहे. वासरे, कुत्रीची पिल्ल, करडे, कोंबडीची पिल्ले, घोडीची शिंगरे आणि डुकरीची पिल्ले व इतर काही अल्पवयीन प्राण्यांमध्ये ही एक नेहमी आढळणारी विकृती आहे. या रोगात हाडांची अप्रमाणित वाढ, मोठ्या हाडांच्या वाढत्या टोकांची जाडी वाढणे व स्वशरीर वजनामुळे हाडांत वक्रता उत्पन्न होणे ही प्रमुख लक्षणे आढळतात.


प्राण्यांतील मुडदूस पुढील कारणांमुळे उद्‌भवतो : (१) कॅल्शियम किंवा फॉस्फरस किंवा दोहोंची न्यूनता असलेला आहार. या दोन्ही खनिजांची हाडांच्या योग्य वाढीकरिता आवश्यकता असते. वाढणाऱ्या वासराला दररोज ६–१२ ग्रॅ. कॅल्शियम आणि फॉस्फरस लागतो. (२) कॅल्शियम व फॉस्फरस यांचे आहारातील एकमेकांशी असलेले अयोग्य प्रमाण. हाडांच्या योग्य वाढीकरिता हे प्रमाण २ : १ असणे उत्तम परंतु त्यात १ : २ पर्यंत बदल झाला, तरी तो फारसा दुष्परिणाम करीत नाही. यापेक्षा जादा बदल मात्र रोगोत्पादक असतो. कोणत्याही एकाच खनिजाची आहारातील विपुलता प्राण्यांच्या अस्थिवृद्धीस निरुपयोगी असते. (३) ड जीवनसत्त्वाची न्यूनता. हे जीवनसत्त्व कॅल्शियम व फॉस्फरस या दोन्ही खनिजांच्या आंत्रमार्गातील अभिशोषणाकरिता आवश्यक असते. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे या दोन्ही कार्यांत बिघाड उत्पन्न होऊन मुडदूस उद्‌भवतो.

रोगाची सुरुवात बहुधा अभक्ष भक्षणाने होते. प्राणी भिंती, लाकडी वस्तू, इतर प्राण्यांची शरीरे किंवा स्वशरीर चाटू लागतो. माती, विष्टा, घाण पाणी, मूत्र इत्यादींचे सेवन करू लागतो. दात पद्धतशीर न येता वेडेवाकडे दिसतात. हालचाल असंबद्ध बनते. रोगी लंगडतो आणि त्याला बसून उठते वेळी कष्ट पडतात. लांब हाडांची वाढती टोके जाड बनून सूज येते व ती वेदनामय बनतात. काही प्राण्यांत वक्रपाद आढळतात. यामध्ये पाय बाहेरच्या बाजूस वाकलेले असतात. कधी कधी स्वशरीर वजनामुळे अपूर्ण अस्थिभंग होतात. उरोस्थीच्या दोन्ही बाजूंस जाड गाठी तयार होतात व या लक्षणाला ‘मुडदूस गुटिकामाला’ म्हणतात. काही प्राण्यांत वक्ष (छाती), श्रोणिभाग, पाठीचा कणा या ठिकाणी विद्रूपता उत्पन्न होते.

ही विकृती दीर्घकालीन असून प्राणी दररोज खंगत जातो. उपचारामध्ये आहारातील भरडा व योग्य खनिज पूरवठा होण्यावर विशेष भर द्यावा लागतो. शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस ही दोन्ही भरपूर असतात. खनिजांचे एकमेकांशी असलेले प्रमाण योग्य असणे महत्त्वाचे असते. हाडांचे चूर्ण पशुखाद्यात वापरल्यास त्यामध्ये या खनिजांचे प्रमाण १ : १ असल्यामुळे त्यांचा योग्य पुरवठा होतो. दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात वावरणाऱ्या प्राण्यांत ड जीवनसत्त्व न्यूनता सहसा आढळत नाही. जरूर पडल्यास त्याचा पुरवठा कॉड माशाचे यकृत तेल वगैरेंमधून करता येतो.

भालेराव, य. त्र्यं.

पहा : जीवनसत्त्व-ड.

संदर्भ : 1. Behrman, R. E. Vaughan, V. C., Ed., Nelson Textbook of Pediatrics, Philadelphia, 1983.

             2. Blood, D.C. Henderson. J. A. Veterinary Medicine, London, 1973.

             3. Brander, G. C. Pugh, D. M. Veterinary Applied Pharmacology and Therapeutics, London, 1975.

             4. Devidson, S. Macleod, J., Ed., Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1971.

             5. Krupp. A. M. Chatton, M. J. Ed., Current Medical Diagnosis and Treatment-1983, Singapore, 1983.

             6. Prasad, Lata Surajandas. Ed., Robinson and Wallgren’s Manual of Pediatrics, Bombay, 1973.