सॉल्झबरी, सर एडवर्ड ( जेम्स ) : (१६ एप्रिल १८८६–१० नोव्हेंबर १९७८). ब्रिटिश वनस्पतिवैज्ञानिक. ब्रिटिश वनश्रीच्या ⇨ परिस्थितिविज्ञाना संबंधी केलेल्या संशोधनाबद्दल विशेष प्रसिद्घ. यामध्ये त्यांनी मृदेच्या प्रभावावर विशेष भर दिला. तसेच निरनिराळ्या वनस्पतींच्या परिस्थितिसापेक्ष जीववैज्ञानिक अनुयोजनासंबंधीही त्यांनी संशोधन केले.

सॉल्झबरी यांचा जन्म हर्पेंडेन ( हार्टफर्डशर, इंग्लंड ) येथे झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथून वनस्पतिविज्ञानाची पदवी (१९०५) आणि बियांच्या जीवाश्मांवर ( शिळाभूत झालेल्या अवशेषांवर ) प्रबंध लिहून डीस्‌सी. ए. पदवी (१९१३) मिळविली. ते युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (१९१३–२४) व युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे वरिष्ठ व्याख्याते, वनस्पतींच्या परिस्थितिविज्ञानाचे प्रपाठक (१९२४–२९) आणि वनस्पतिविज्ञानाचे क्वेन प्राध्यापक (१९२९–४३) होते. उद्यानविद्या व पादपजात फ्लोरा यांसंबंधी त्यांनी दिलेल्या सुरस व्याख्यानांमुळे ते लोकप्रिय झाले होते. त्यांनी प्रसिद्घ केलेल्या दि लिव्हिंग गार्डन (१९३५) या ग्रं थामुळे उद्यानविद्येची वैज्ञानिक पार्श्वभूमी समजण्यास जिज्ञासूंना बहुमोल मदत झाली याबद्दल दि रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीने त्यांना ‘द वेच मेमोरियल मेडल’ हे सुवर्णपदक बहाल केले (१९३६). दुसऱ्या महायुद्घाच्या वेळी त्यांनी शेतकीसंबंधीच्या संशोधनकार्यात बहुमोल कामगिरी केली. ते क्यू येथील शाही वनस्पतिवैज्ञानिक उद्यानाचे संचालक (१९४३–५६) आणि रॉयल सोसायटीचे जीववैज्ञानिक सचिव (१९४५–५५) होते. १९४५ मध्ये रॉयल सोसायटीने त्यांना ब्रिटिश वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्षमतेसंबंधी आद्य संशोधन केल्याबद्दल रॉयल पदक अर्पण केले.

निवृत्तीनंतर त्यांनी तणांच्या प्रजोत्पादनासंबंधी संशोधन चालू ठेवले. तणांना खंडितपणेच विशिष्ट वसतिस्थानाचा लाभ होत असल्याने त्यांच्या भिन्न पृथक आकारमानापेक्षा विपुल बीजनिर्मितीमध्ये व जवळजवळ एकाच वेळी होणाऱ्या बीजांकुरणामध्ये असणारे वसतिस्थानाचे महत्त्व सॉल्झबरी यांनी निदर्शनास आणून दिले. यावरुन त्यांना असा निष्कर्ष काढता आला की, मनुष्याने वनस्पतींची लागवड सुरु केल्यापासून आजपर्यंत ज्या वर्षायू ( एक वर्ष जगणाऱ्या ) जातींच्या वाणांची निवड नकळत सुरु केली, त्यांमध्ये विशेषतः खंडितपणे अंकुरण होणाऱ्या व मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या बीजांच्या वनस्पतींचा अधिक भरणा असावा. वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्षमतेच्या तपशीलवार अभ्यासाने त्यांना असे दिसून आले की, जातींच्या अस्तित्वाच्या द्दष्टीने आवश्यक त्या नैसर्गिक पूर्व दक्षतेचा परिणाम दाखविणारे, परिस्थितिसापेक्ष असे बीजांचे आकारमान, वैपुल्य व ⇨ अंकुरणा बाबत वर्तन यांना महत्त्वाचे स्थान आहे. वालुकाराशीचे परिस्थितिविज्ञान आणि वनस्पतींचे अनुक्रमण यासंबंधीही त्यांनी संशोधन केले. त्यांचे इतर ग्रंथ असे : (१) दि ईस्ट अँग्लिकन फ्लोरा (१९३३), (२) दि रिप्रॉडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ प्लँट्स (१९४२), (३) डाऊन्स अँड ड्यून्स : देअर प्लँट लाइफ अँड इट्स एन्व्हायरन्मेंट (१९५२) आणि (४) वीड्स अँड ॲलीन्स (१९६१).

सॉल्झबरी यांचे बोगनॉर रेगिस ( इंग्लंड ) येथे निधन झाले.

पहा : परिस्थितिविज्ञान.

कुलकर्णी, स. वि. परांडेकर, शं. आ.