क्लूस व्हिलेम योहान :(६ मे १८५९–३१ मार्च १९३८). डच कवी आणि समीक्षक. जन्म ॲम्स्टरडॅम येथे. काही काळ ॲम्स्टरडॅम येथेच अभिजात साहित्याचा अभ्यास. पुढे स्वच्छंद जीवन जगू लागला. डच कवितेला नवे वळण लावण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावलेल्या तरुण बंडखोर कवींत त्याला प्रमुख स्थान होते. ‘१८८० ची पिढी’ ह्या नावाने हे कविमंडळ डच साहित्येतिहासात ओळखले जाते. वर्ड्‍स्वर्थ, शेली आणि कीट्स हे त्यांचे आदर्श होते. De Nieuwe Gids (१८८५, इं. शी. द न्यू गाइड) ह्या त्यांच्या मुखपत्राच्या संस्थापकांपैकी तो एक होय. डच कवितेतील सांकेतिकतेवर क्लूसने त्यातून प्रखर हल्ले केले. Verzen (१८९४) ह्या काव्यसंग्रहात त्याच्या उत्तमोत्तम कविता संगृहीत करण्यात आल्या आहेत. ह्यातील सुनीते डचमधील सर्वोत्कृष्ट सुनीतांपैकी होत. कवितेतील शब्दकळा व रूपके ह्या सर्वच बाबतींत त्याने मौलिकतेचा आग्रह धरला होता. ‘अत्यंत व्यक्तिगत भावनेची अत्यंत व्यक्तिगत अभिव्यक्ती’ ह्या त्याने प्रतिपादिलेल्या सूत्रात त्याची काव्यविषयक भूमिका व्यक्त झालेली आहे. सततचे मानसिक ताण आणि अतिरिक्त मद्यपान ह्यांमुळे त्याला मानसोपचार केंद्रात काही काळ घालवावा लागला. हेग येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.