नेत्रश्लेष्मशोथ: (कंजक्टिव्हायटिस). डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील बाजूवरील व नेत्रगोलाच्या पुढच्या भागावर स्वच्छमंडलापर्यंत (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागापर्यंत) पसरलेल्या पातळ पारदर्शक आवरणास नेत्रश्लेष्म म्हणतात. या आवरणास येणाऱ्या दाहयुक्त सुजेला ‘नेत्रश्लेष्मशोथ’ म्हणतात.

नेत्रवैद्यकात नेहमी आढळणारा तसेच सर्व नेत्ररोगांत अधिक प्रमाणात आढळणारा हा रोग असून त्याची अनेक कारणे आहेत. सर्वसाधारणपणे ‘डोळे येणे’ असा शब्दप्रयोग या रोगाच्या सर्वच प्रकारांचा उल्लेख करताना व्यवहारात वापरला जातो. सामान्यपणे या रोगात फारसा त्रास होत नसला, तरी काही प्रकारांत दृष्टीवर गंभीर परिणाम होऊन अंधत्व येण्याचा धोका असतो. सर्व प्रकारच्या नेत्रश्लेष्मशोथांत प्रकाशाची भीती किंवा असह्यता, स्रावाधिक्य आणि रक्तवाहिन्या विस्फारण (डोळे लाल होणे) ही लक्षणे कमीजास्त प्रमाणात आढळतात.

नेत्रश्लेष्म्याचा पुष्कळसा भाग बाह्य वातावरणाशी संलग्न असल्यामुळे त्यावर सूक्ष्मजंतू, अधिहर्षता (ॲलर्जी) उत्पादक आणि इतर क्षोभकारक पदार्थ सहज परिणाम करू शकतात. यांशिवाय एखाद्या शस्त्रामुळे किंवा इतर कारणामुळे झालेली इजा, रासायनिक वायूंचा परिणाम, जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणे, वितळजोडकाम (वेल्डिंग) करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणाचा अतितीव्र प्रकाश, बर्फमय प्रदेशात बर्फावरून परावर्तित होणारे सूर्यकिरण यांमुळेही हा शोथ होतो.

लक्षणे: वर दिलेल्या तीन प्रमुख लक्षणांशिवाय पापण्या व बुबुळावर सूज येणे, डोळे दुखु–खुपू लागणे ही लक्षणे आढळतात. डोळ्यातून सुरुवातीस पाणी आणि नंतर श्लेष्मल (चिकट) स्राव वाहू लागतो. कधीकधी पू येतो. सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या पापण्या चिकटल्यामुळे डोळे उघडण्यास त्रास होतो. काही वेळा कानाच्या पुढील किंवा जबड्याच्या खालील लसीका ग्रंथी (रक्तद्रवाशी साम्य असणारा व पदार्थ–लसीका–वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील पेशींचे पुंज) सुजतात.

प्रकार: या विकाराचे सर्वसाधारणपणे पुढील प्रकार आढळतात : (१) संसर्गजन्य, (२)  अधिहर्षताजन्य, (३) आघातजन्य, (४) त्वचारोगसंबंधित.

संसर्गजन्य: या प्रकारात लक्षणानुसार वर्गीकरण करतात.

(अ) श्लेष्मपूयिक : या प्रकारात पूमिश्रित स्राव येतो. फुप्फुसगोलाणू (न्यूमोकॉकस सुक्ष्मजंतू), मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस सूक्ष्मजंतू) व कॉख–वीक्स (रॉबर्ट कॉख व जे. ई. वीक्स यांच्या नावाने ओळखण्यात येणारे) सूक्ष्मजंतू बहुधा कारणीभूत असतात. बहुधा दोन्ही डोळे बिघडतात. विशेषेकरून शाळा, वसतिगृहे यांमधून हा रोग फैलावतो कारण हात, कपडे वगैरेंमधून रोग्याच्या स्रावातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा फैलाव होतो. यामुळे या प्रकाराला व्यवहारात डोळ्याची साथ आली असे म्हणतात.

(आ) पूयिक : या प्रकारात जवळजवळ पूच डोळ्यातून स्रवतो. नवजात अर्भकामध्ये प्रसूतीच्या वेळी डोळ्यामध्ये सूक्ष्मजंतू, विशेषेकरून ⇨ परमा रोगाच्या प्रमेह गोलाणूंमुळे (गोनोकॉकससूक्ष्मजंतूंमुळे) या प्रकाराचा शोथ उत्पन्न होतो. जन्मल्याबरोबर सुईणीने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे उद्‌भवणारा हा रोग अतितीव्र प्रकारचा असून त्यामुळे अंधत्व येण्याचा धोका असतो. प्रौढांनाही हा रोग होण्याचा संभव असतो.

(इ) पटलात्मक : या प्रकारात स्रावापासून चिकट, घट्ट व पांढुरका पडदा (पटल) तयार होतो. हा प्रकार ⇨ घटसर्पास कारणीभूत असणाऱ्या क्लेप्स–लफ्लर (ई. क्लेप्स व एफ्‌. ए. जे. लफ्लर या जर्मन सूक्ष्मजंतूवैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) सूक्ष्मजंतूंमुळे उद्‌भवतो. हा रोग संसर्गजन्य असून स्रावामध्ये हे सूक्ष्मजंतू सापडतात. या प्रकारात स्वच्छमंडलास धोका असल्यामुळे त्वरित इलाज करणे जरूर असते. कधीकधी मालागोलाणू किंवा प्रमेह गोलाणूंच्या संसर्गाने झालेल्या नेत्रश्लेष्मशोथातही असाच पांढुरका पडदा तयार होतो. स्रावाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी निदानास उपयुक्त असते.

(ई) पुटकीय : या प्रकारात नेत्रश्लेष्म्यावर शिजलेल्या साबुदाण्यासारखे लहान लहान उंचवटे (पुटक) दिसतात. याचे मुख्य दोन प्रकार ओळखले जातात : (१) सौम्य किंवा साधा व (२) कणियुक्त, या दुसऱ्या प्रकारास ⇨ खुपरी म्हणतात.

(उ) चिरकारी : या प्रकारात शोथ चिरकारी प्रकारचा म्हणजे दीर्घकाल टिकणारा असतो. पुंजगोलाणू, मालागोलाणू किंवा मोरॅक्स-आक्सेनफेल्ट (व्ही. मोरॅक्स व टी. आक्सेनफेल्ट या नेत्रवैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे) सूक्ष्मजंतू बहुधा कारणीभूत असतात. वयस्कर व्यक्तींमध्ये कधीकधी नेत्रश्लेष्म्याच्या खाली टणक ऊतकाचे(पेशींच्या समूहाचे) खड्यासारखे गोळे जमतात. या खड्यांना ‘नेत्रश्लेष्म संधित पदार्थ’ म्हणतात. त्यांच्या घर्षणामुळे चिरकारी प्रकारचा नेत्रश्लेष्मशोथ उत्पन्न होतो. स्थानीय बधिरता आणणारी औषधे टाकून हे गोळे काढून टाकतात.

वरील प्रकारांशिवाय व्हायरस, उपदंशाचे सूक्ष्मजंतू, क्षयरोगांचे सूक्ष्मजंतू यांमुळेही नेत्रश्लेष्मशोथ होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी गोदी कामगारांमध्ये व्हायरसामुळे होणाऱ्या नेत्रश्लेष्मशोथाची साथ मोठ्या प्रमाणावर उद्‌भवली होती.

अधिहर्षताजन्य: मानवी शरीराला अनेक पदार्थांची अधिहर्षता असते. निरनिराळे पराग, निरनिराळ्या प्रकारचे धूलिकण यांमुळे नेत्रश्लेष्म्यास दाहयुक्त सूज येते. डोळ्यास खाज सुटून हाताने डोळे चोळण्याकडे सारखी प्रवृत्ती होते. डोळ्यात घालावयाच्या काही औषधांचीही अधिहर्षता असण्याचा संभव असतो. ॲट्रोपीन, पेनिसिलीन, हायोसीन व इसेरीन ही ओषधे अधिहर्षताजनक असतात. कोणत्या पदार्थाची अधिहर्षता आहे, याची परीक्षा करून घेऊन त्या पदार्थाचा संपर्क टाळावा [→ ॲलर्जी].

गलिच्छ वस्तीतून राहणाऱ्या ५ ते १२ वर्षे वयाच्या मुलांमध्ये अशक्तपणा, अपपोषण इ. कारणांमुळे जो नेत्रश्लेष्मशोथ आढळतो त्यास ‘अहिटा’ किंवा ‘पीतकणयुक्त नेत्रश्लेष्मशोथ’ म्हणतात. या प्रकारात नेत्रश्लेष्मा आणि स्वच्छमंडलावर लहान लहान पिवळसर कण दिसतात. या रोगाचे एक कारण अधिहर्षता असावे असा समज आहे. दुर्लक्ष झाल्यास स्वच्छमंडलावरील परिणामामुळे दृष्टिमांद्य येते.

आघातजन्य : शस्त्रे किंवा इतर कारणांमुळे झालेली इजा, डोळ्यात शिरणाऱ्या बाह्य वस्तू, रासायनिक वायू, तीव्र क्षार (अल्कली) किंवा तीव्र अम्ले, अतितीव्र प्रकाश, जंबुपार किरणे यांमुळे नेत्रश्लेष्म्यास इजा होऊन शोथ होतो.

जंबुपार किरणांचा उद्‌गम हा त्याकरिता खास बनविलेला दिवा किंवा बर्फावरील परावर्तित सूर्यकिरणे किंवा वितळजोडकामाचे विद्युत्‌ उपकरण यांपैकी कोणताही असला, तरी नेत्रश्लेष्मशोथास कारणीभूत होतो. उंच पर्वतांची शिखरे चढताना या किरणांमुळे कधीकधी अंधत्वही येते, त्याला ‘हिमांधत्व’ म्हणतात. डोळे लाल होणे, दुखू लागणे, पाणी येणे, प्रकाश असह्यता ही लक्षणे आढळतात. ही अवस्था बहुधा अल्पकाळ टिकणारी असते. डोळ्यात कोकेनचे थेंब व एरंडेलमिश्रित होमॅट्रोपीन औषधी थेंब घालून डोळ्यावर पट्टी बांधून विश्रांती घेतल्यास हा रोग बरा होतो. डोळ्यात शिरलेल्या बाह्य वस्तू तज्ञाकडून काढून घ्याव्यात. तीव्र क्षार किंवा तीव्र अम्ले डोळ्यात गेल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे व तज्ञांचा सल्ला घ्यावा.

त्वचारोगसंबंधित: काही त्वचारोगांमध्ये उदा., ॲक्मी रोझेसिया (गाल, नाक यांवर पुरळ येऊन रक्तवाहिन्या फुगीर बनून हे भाग लालबुंद दिसणे) नेत्रश्लेष्मशोथ होतो. पेम्फीगस नावाच्या त्वचारोगात त्वचा आणि श्लेष्मकला या दोन्ही ठिकाणी द्रवयुक्त फोड येतात. या रोगात नेत्रश्लेष्म्यावर परिणाम होऊन दोन्ही पापण्या नेत्रगोलावर चिकटून बसतात. परिणामी डोळा कोरडा पडून स्वच्छमंडलावरही परिणाम होतो.

वर वर्णन केलेल्या प्रकारांशिवाय देवी, गोवर यांसारख्या रोगांतही नेत्रश्लेष्मशोथ होतो. देवीमुळे अंधत्वही संभवते. संसर्गजन्य प्रकारांतरोग न फैलावण्यावर विशेष भर द्यावा लागतो.

नेत्रश्लेष्मशोथाचे निदान व चिकित्सा ताबडतोब योग्य त्या तज्ञाकडून करवून घेणे इष्ट असते. त्यामुळे दृष्टिमांद्य, अंधत्व यांसारखे गंभीर दुष्परिणाम टाळणे शक्य असते. (चित्रपत्र ५१).

संदर्भ : Lye, T. K. Cross, A. G., Eds. May and Worth’s, Manuae of Diseases of the Eye, London,             1959.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.

आंतरकोशिकीय स्वच्छमंडलशोथ अग्र-वर्णपटलशोथ
नेत्रश्लेष्मशोथातील अतिरक्तता-रक्तवाहिन्यांचे विस्फारण होऊन डोळा लाल दिसतो. अधोनेत्रश्लेष्म रक्तस्राव-सहज होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे रक्ताळलेल्या भागातील रक्त रंग न बदलता तांबडेच दिसते.
तीव्र नेत्रश्लेमशोथ अधिहृषताजन्य नेत्रशोथ
खुपरी-तीव्र प्रकार खुपरी-चिरकारी प्रकार
अहिरा