रमणभाई महीपतराम नीळकंठनीलकंठ, रमणभाई महीपतराम: (१३ मार्च १८६८ – ६ मार्च १९२८). प्रसिद्ध गुजराती साहित्यसमीक्षक, नाटककार, विनोदकार आणि समाजसुधारक. त्यांचा जन्म अहमदाबाद येथे वडनगरा नागर जातीत झाला. गर्भश्रीमंती, पाश्चात्त्य-पद्धतीची उच्च राहणी, प्रार्थनासमाजी धर्मभावना आणि सुधारकतेचे संस्कार रमणभाईंना वडीलांपासून प्राप्त झाले होते. ते एक बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांचे शिक्षण बी.ए. एल्एल्.बी. पर्यंत झाले आणि अहमदाबाद येथेच त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. ज्ञानसुधा ह्या प्रार्थनासमाजाच्या पाक्षिकाचे संपादकत्व त्यांनी ३१ वर्षे (१८८७ – १९१८) गाजविले. उपन्यायाधीश, अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष, गुजरात साहित्य सभेचे प्रमुख संचालक आदी मानाची पदे त्यांनी भूषविली व सरकारकडून बहुमानाचा ‘नाइटहूड’ किताबही संपादन केला. अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

भद्रंभद्र (१९००), राईनो पर्वत (१९१४), हास्यमंदिर (१९१५), कविता अने साहित्य (४ भाग, १९२६ – २९), धर्म अने समाज (२ भाग, १९३२, ३५) इ. ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर मोडते. ‘मकरंद’ ह्या टोपणनावाने त्यांनी काही सुंदर कविताही लिहिलेल्या आहेत.

कविता अने साहित्यमध्ये ग्रंथांची परीक्षणे, काव्यतत्त्वचर्चा, भाषाशास्त्रीय संशोधन आणि त्यांची भाषणे संगृहीत असून सरलता, विशदता, रसात्मकता, निर्भीडपणा इ. गुणविशेष या लिखाणातून प्रतीत होतात. त्यांच्या काव्यदृष्टीवर वर्ड्‌स्वर्थचा प्रभाव विशेष दिसतो. संस्कृत रसविचार व पाश्चात्त्य काव्यमीमांसा यांचा तुलनात्मक विचार करून त्यांनी तत्कालीन नवकवितेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. चोखंदळ साहित्यसमीक्षक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. धर्म अने समाजमध्ये सनातन हिंदू धर्म, स्वधर्म, परधर्म, अधिकार, प्रार्थनासमाज, ख्रिस्ती धर्म आदी विषयांवर त्यांनी केलेली चर्चा मुख्यत्वे त्यांच्या मणिलाल नभुभाई यांच्याशी झालेल्या अटीतटीच्या वादविवादांमधून निर्माण झाली आहे. ⇨ मणिलाल नभुभाई द्विवेदी (१८५८ – ९८) व रमणभाई यांच्या मूळ भूमिकांतच फरक आहे. दोघे स्वसिद्धांतांचे कडवे पुरस्कर्ते असून स्वतःचीच मते सिद्ध करण्याची दोघांनीही पराकाष्ठा केली. खंडन-मंडनात्मक पांडित्यपूर्ण शैली मणिलाल यांच्या प्रतिपादनात दिसून येते तर रमणभाईंची शैली वकिली युक्तिवादाची असून तीत वाक्‌चातुर्य अधिक आहे. राईनो पर्वत ह्या एकाच नाटकामुळे रमणभाईंना नाटककार म्हणून गुजराती साहित्यात मोठी मान्यता लाभली. ह्या नाटकात त्यांनी संस्कृत व इंग्रजी नाट्यतंत्रांचा समन्वय साधला असून नाट्यवस्तूची रचना, संवाद, स्वभावचित्रण इ. नाट्यांगांचा चांगला परिपोष केला आहे. मणिलाल यांच्या कांता (१८८२) ह्या त्या वेळी गाजलेल्या नाटकापेक्षाही ह्यात नाट्यतंत्रावरील प्रभुत्व विशेष जाणवते. भद्रंभद्र ही रमणभाईंची संपूर्ण विनोद कादंबरी गुजराती साहित्यात अनन्यसाधारण ठरली आहे. सर्‌व्हँटीझची (१५४७ – १६१६) डॉन क्विक्झोट (डॉन किहोटे) ही कादंबरी तिच्या प्रेरणास्थानी आहे. ह्या कादंबरीत सनातनी लोकांच्या अंधश्रद्धा व रूढी आणि बोजड संस्कृतप्रचुर लेखनशैली यांवर उपहासात्मक प्रखर टीका केलेली आढळते. स्त्रीपात्राचा अभाव हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य होय. मनःसुखराम सूर्यराम त्रिपाठी (१८४० – १९०७) ह्यांच्यावर त्यांच्या ह्या उपहासाचा गर्भित रोख आहे. ह्या कादंबरीने त्या वेळी बरीच कटुता निर्माण केली. असे असले, तरी व्यक्ती, प्रसंग व परिस्थिती यांवर आधारलेला या कादंबरीतील विनोद सर्वांना आस्वाद्य वाटतो. हास्यमंदिर हा रमणभाईंच्या विनोदी लेखांचा संग्रह आहे.

पेंडसे, सु. न.