दवे, ज्योतींद्र हरिहरशंकर :(२१ ऑक्टोबर १९०१–). गुजरातीतील प्रसिद्ध विनोदी निबंधकार. जन्म सुरत येथे. शिक्षण मुंबई विद्यापीठात एम्.ए. पर्यंत. संस्कृतचे ते गाढे पंडित असून रससिद्धांताचा त्यांचा व्यासंग विशेष उल्लेखनीय आहे. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीस ते सुरत येथे संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर अनेक वर्षे त्यांनी मुंबई सरकारची प्राच्यविद्या–भाषांतरकार म्हणून नोकरी केली. पुढे नोकरी सोडून ते मुंबई येथील एका महाविद्यालयात गुजरातीचे प्राध्यापक म्हणून गेले. नंतर भूज येथील महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. ह्या पदावरूनच ते वयाच्या पासष्टाव्या वर्षी निवृत्त झाले.

त्यांनी विपुल ग्रंथनिर्मिती केली असून ती मुख्यत्वे विनोदी आहे. त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ पुढीलप्रमाणे : मारी नोंधपोथी (१९३३), रंगतरंग  (सहा भाग, १९३२—५०), अमे बघां, पाननां बीडां  (१९४६), अल्पात्मानुं आत्मपुराण  (१९४७), हास्यतरंग (दुसरी आवृ. १९४७), रेतीनी रोटली  (१९५२), बिरबल अने बीजा  (तिसरी आवृ. १९५३) इ. त्यांचे विनोदी निबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. विषपान  (१९२८), वड अने तेटां (१९५४) ही त्यांची नाटके होत.

माणसाच्या जीवनातील व आजूबाजूच्या जगातील अनेक विनोदी प्रसंग त्यांनी स्वतःच्या मार्मिक अवलोकनाने यांत टिपले आहेत. त्यांचा विनोद व्यक्ती व प्रसंगापेक्षा वृत्तनिष्ठ अधिक असून तो स्फुट, अस्फुट व अर्धस्फुट स्वरूपात व्यक्त झाला आहे. त्यांचा विनाेद नर्ममर्मांनी परिपूर्ण, कोणालाही न बोचणारा, शुद्ध व सात्त्विक असून सर्वच स्तरांतील वाचकांना रुचेल असा आहे. गुजरातीतील सर्वश्रेष्ठ विनाेदी लेखक म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण मानले जाते. गुजरात साहित्य सभेतर्फे त्यांना ‘रणजितराम सुवर्णचंद्रक’देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. १९६५ मध्ये सुरत येथे भरलेल्या गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला. त्यांची जन्मषष्ट्यब्दी सर्व गुजरातमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होऊन त्यानिमित्त त्यांच्या उत्कृष्ट लेखनाचे संकलन असलेला वाङ्‌मयविहार  नावाचा ग्रंथ १९६४ मध्ये प्रकाशित करण्यात आला. ऑक्टोबर १९७६ मध्ये त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस मुंबईत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला व त्यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले गेले.

ब्रोकर, गुलाबदास पेंडसे, सु. न.