कालेलकर, काकासाहेब :  (१ डिसेंबर १८८५ —                                     ). सुप्रसिद्ध गांधीवादी गुजराती साहित्यिक व शिक्षणतज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर असले, तरी ते काका कालेलकर या नावानेच विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे मूळ गाव बेळगावजवळील बेळगुंदी. त्यांचा जन्म साताऱ्यास झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.ए. झाले (१९०७). त्यानंतर एल्‌एल्‌. बी. च्या दुसऱ्या वर्षाला असताना ते राष्ट्रकार्यात उतरले आणि मुंबईच्या राष्ट्रमत दैनिकात काम करू लागले (१९०९). १९१२ साली त्यांनी हिमालयाची यात्रा केली. १९१५ साली ‘शांतिनिकेतना’त महात्मा गांधींशी त्यांची भेट झाली आणि तेव्हापासून ते गांधींजींचे अनुयायी बनले. १९१७ साली ते साबरमती आश्रमात दाखल झाले आणि १९२० पासून गुजरातीत लिहू लागले. १९२८ साली गुजरात विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. गुजराती भाषेचा पहिला अधिकृत शब्दकोश जोडणीकोश (१९२९) तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी या काळातच केले. १९३७ साली ते वर्ध्यास (सेवाग्राम) गेले. १९४८ नंतर ते दिल्लीस गेले. तेव्हापासून तेथेच राहत आहेत. स्वातंत्र्य–आंदोलनात त्यांनी अनेक वेळा कारावास भोगला.

राष्ट्रभाषा हिंदी–हिंदुस्तानीचा प्रचार, राष्ट्रीय शिक्षणाच्या पुनर्रचनेला हातभार आणि आता सर्वधर्मसमन्वयाचा प्रसार ही तीन महत्त्वाची कामे काकासाहेबांनी केली. त्यांसाठी त्यांनी प्रथम सबंध भारतभर व नंतर सर्व जगभर प्रवास केला. या प्रवासाची त्यांनी लिहिलेली वर्णने अत्यंत रोचक व उद्‌बोधक आहेत. हिमालयनो प्रवास (१९२४), ब्रह्मदेशनो प्रवास (१९३१), पूर्व अफ्रीकामां (१९५१), उगमणो देश: जापान (१९५८) या प्रवासवर्णनपर ग्रंथांप्रमाणेच स्मरणयात्रा आणि लोकमाता (१९३४), जीवननो आनंद (१९३६), यांसारख्या त्यांच्या ललित ग्रंथांचाही खूप गाजावाजा झाला. काव्यमय प्रसन्न शैली, जीवनस्पर्शी विचारसरणी आणि सखोल चिंतन यांमुळे काकासाहेबांचे साहित्य चिरंतन स्वरूपाचे ठरले आहे. मराठीत त्यांनी हिंडलग्याचा प्रसाद (१९३४), वनशोभा (१९४४), खेळकर पाने (१९६४), यांसारखी फार थोडी पुस्तके लिहिली आहेत. परंतु त्यांच्या गुजराती साहित्यापैकी बरेच साहित्य अनुवादरूपाने मराठीत आले आहे. हिंदी व इंग्रजीतही त्यांचे काही ग्रंथ आहेत.

राष्ट्रपतींनी काकासाहेबांची १९५२ व १९५८ साली राज्यसभेवर नियुक्ती केली. १९५३ साली अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५९ साली गुजराती साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. केंद्रीय सरकारच्या हिंदी विश्वकोश समितीचे सदस्य म्हणून १९६०साली त्यांची निवड झाली. १९६४ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब बहाल करण्यात आला. १९६६ साली जीवनव्यवस्था या त्यांच्या निबंधसंग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. १३ जुलै १९७१ रोजी त्यांना साहित्य अकादेमीची फेलोशिप देऊन गौरविण्यात आले. बहुभाषा कोविद, रसिक आणि सखोल चिंतक म्हणून काकासाहेबांना सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे.

जोशी, श्रीपाद