ब्रोकर, गुलाबदास हरजीवनदास : (२० सप्टेंबर १९०९-). आधुनिक गुजराती लेखक व समीक्षक. जन्म सौराष्ट्रात (गुजरात) पोरबंदर येथे.शिक्षण मुंबई विद्यापीठात बी. ए. (१९३०) पर्यंत. स्वातंत्र्य आंदोलनात १९३२-३३ च्या कायदेभंग चळवळीत भाग घेऊन त्यांनी सोळा महिने कारावासही भोगला. १९३३ पासून वायदेबाजाराचे दलाल म्हणून त्यांनी व्यवसाय केला व १९६४ मध्ये ते ह्या व्यवसायातून निवृत्त झाले.

गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर

साहित्य अकादेमीच्या गुजराती सल्लागार मंडळाचे सदस्य, गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष (१९७४), मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, पी. ई. एन्. च्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य इ. मानाची व जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली. पी. ई. एन्.चे भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी यूरोपचा दौराही केला (१९५९). १९६२ व १९६३ मध्ये त्यांनी अनुक्रमे अमेरिकेचा व प. जर्मनीचा दौरा ह्या देशांच्या निमंत्रणांवरून केला. १९४३ मध्ये गुजराती साहित्य परिषदेतर्फे त्यांच्या ‘धूम्रसेर’ ह्या कथेस ‘महीडा सुवर्णचंद्रक’, मुंबई सरकारतर्फे धूम्रसेर ह्या नाटकास १९४७ ते ५४ ह्या कालखंडात प्रसिद्ध झालेले उत्कृष्ट नाटक म्हणून पहिले बक्षीस, माणसनां मन ह्या कथासंग्रहास १९६८ चे गुजरात सरकारचे पहिले बक्षीस तसेच सूर्या, नवा गगननी नीचे इ. ग्रंथांना बक्षिसे मिळाली. १९७४ मध्ये इचलकरंजीस भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचा गुजराती लेखक म्हणून गौरव करण्यात आला.

गुजराती साहित्यात कथाकार म्हणून त्यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गुजरातीत मनोविश्लेषणपर कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. साधी-सरळ लेखनशैली व दैनंदिन घटनांचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा मानवी मनाच्या अगाध तळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. महानगरांतील उच्च-मध्यम वर्गीय तरुण स्त्री-पुरुषांच्या समस्या -विशेषतः लैंगिक -त्यांनी आपल्या कथांतून मुख्यत्वे हाताळल्या. त्यांच्या एकांकिकांतूनही हाच विशेष दिसून येतो. मानवी मनाचे जटिल रूप गोचर करण्याचे सामर्थ्य त्यात दिसून येते. स्त्री- पुरुषसंबंधांवरील कथांप्रमाणेच माता व मुले या विषयांवरही त्यांच्या काही दर्जेदार कथा आहेत. त्यांचे नवा गगननी नीचे (१९७०) हे यूरोपचे प्रवासवर्णन त्यातील ह्रद्य सांस्कृतिक जीवनचित्रणाने वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे. समीक्षालेखनातही त्यांनी सैद्धांतिक विश्लेषण-विवरण उत्तम प्रकारे केले आहे.

त्यांच्या कथा जवळजवळ सर्वच आधुनिक भारतीय भाषांतून तसेच इंग्रजी, जर्मन, इटालियन इ. यूरोपीय भाषांतून भाषांतरित झाल्या आहेत. इंग्रजी व हिंदीतील काही प्रसिद्ध साहित्यकृतींचेही त्यांनी गुजरातीत अनुवाद केले आहेत.

त्यांच्या विशेष उल्लेखनीय साहित्यकृती पुढीलप्रमाणे : कथा : लता अने बीजी वातो (१९३८),वसुंधरा अने बीजी वातो (१९४१), उभी वाटे (१९४४), सूर्या (१९५०), पुण्य परषार्दु नभी (१९५४), प्रकाशनूं स्मित (१९५६),जीवननां अमृत (१९५७), माणसनां मन (१९६२), भीतरनां जीवन (१९६७),प्रेम पदारथ (१९७४) आठवणीः अमृत दीक्षा (१९७६) नाटक : धूम्रसेर (१९४८ – स्वतःच्याच याच शीर्षकाच्या कथेचे धनसुखलाल महेतांसमवेत नाट्यरूपांतर), मननां भूत (१९६७) एकांकिका संग्रह : ज्वलंत अग्नि (१९५६) काव्य : वसंते (१९६४) समीक्षा : रूप सृष्टिमां (१९६२), अभिव्यक्ति (१९६५) प्रवासवर्णन : नवा गगननी नीचे (१९७०) संपादन : गुजरातीनां एकांकी (१९५८) अनुवाद : भूतावळ (१९६० – इब्सेनच्या षोस्ट्सचा अनुवाद), विच्छेद (१९६७ – हेन्री जेम्सच्या द अमेरिकन ह्या कादंबरीचा अनुवाद) इत्यादी.

ब्रोकर, गुलाबदास (गु.) कालेलकर, ना. गो. (म.)