प्रेमानंद : (सु. १६३६ – सु. १७३४). मध्ययुगातील एक श्रेष्ठ गुजराती आख्यानकवी. त्याच्या जीवनकालाबद्दल मतभेद असले, तरी स्थूलमानाने १६३६ ते १७३४ हा त्याचा जीवनकाल मानला जातो. त्याच्या जीवनविषयक माहितीतदेखील दंतकथांचे प्रमाण अधिक आहे. जातीने तो ब्राह्मण होता व त्याचे वास्तव्य बडोद्यास होते, त्याच्या वडिलांचे नाव कृष्णराम. ते कथेकरी होते. आईवडिलांच्या निधनाने तो लहानपणीच पोरका झाला. नंतर मावशीने त्याचा सांभाळ केला. रामचरण नावाच्या एका संन्याशासोबत तो उत्तर भारतात गेला आणि तेथे त्याने हिंदी व संस्कृत भाषा आत्मसात करून घेतल्या. सुरुवातीस त्याने हिंदी काव्यरचना केली पण गुरूच्या सांगण्यावरून तो नंतर गुजरातीत काव्यरचना करू लागला, असे सांगतात. सुरुवातीस गागरिआ भाट म्हणून तो प्रसिद्धीस आला. नंतर बडोदा, नंदुरबार इ. ठिकाणी चांगला पैसा मिळवून त्याने सुखी जीवन व्यतीत केले. नंदुरबार येथे त्याचे दीर्घ काल वास्तव्य होते. गुजराती भाषेचा त्याला विशेष अभिमान होता. गुजराती भाषेचा साहित्यभाषा म्हणून हिंदीसारखा उत्कर्ष झाल्याशिवाय स्वतः पगडी न घालण्याची त्याने प्रतिज्ञा केली होती, असे सांगतात. मृत्युसमयी त्याचे ५२ शिष्य होते आणि त्यांत प्रेमानंद

१२ स्त्रियाही होत्या, असे म्हटले जाते. त्याचा पुत्र व शिष्य वल्लभ हाही कवी होता, असे एक मत आहे. त्याच्या नावावर सु. पन्नास काव्यरचना मोडतात परंतु त्यांतील अर्ध्याहून अधिक रचनांबाबत त्याचे कर्तृत्व संशयास्पद आहे. आजवर त्याच्या नावावर मोडणारी नाटके मात्र अलीकडील संशोधनानुसार त्याची नसल्याचे दिसून आले आहे. लहानमोठे वीस पंचवीस ग्रंथ मात्र त्याचेच आहेत, हे सर्वमान्य झाले आहे. त्याने दाणलीला, भ्रमरपचिशी आदी स्फुटकाव्ये व ओखाहरण, सुदामाचरित्र, नळाख्यान, सुधन्वाख्यान, हरिश्चन्द्राख्यान, मदालसाख्यान, रुक्मिणीहरण आदी पौराणिक आख्याने लिहिली. ही आख्यानकाव्ये तसेच ‘हुंडी’, ‘श्राद्ध’, ‘मामेरुं’ आदी ⇨नरसी मेहताच्या जीवनावर आधारित आख्याने व भागवताचा दशमस्कंध हे प्रेमानंदाचे उत्कृष्ट काव्यग्रंथ आहेत. अर्थात पौराणिक विषयांवर व नरसी मेहताच्या जीवनप्रसंगांवर प्रेमानंदाप्रमाणेच नाकर, विष्णुदास, विश्वनाथ जानी आदी त्याच्या अगोदरच्या अनेक कवींनी आख्याने रचली आहेत परंतु त्या सर्वांत प्रेमानंदाची आख्याने सर्वश्रेष्ठ ठरली आहेत. आख्यानकाव्याला आवश्यक असे उत्कृष्ट कथनकौशल्य प्रेमानंदाजवळ आहे. स्वतःच्या काव्याला पोषक असे अनेक बदल त्याने मूळ कथांत केले आहेत. काव्यकथेचा सुघटित प्रमाणबद्ध विकास साधताना त्याने एकही प्रसंग अनाठायी ठरू नये याची दक्षता घेतलेली आहे. नानाविध भावप्रसंगांचे, भावनांचे आविष्कार करताना त्याने अनुरूप रसनिर्मिती साधलेली आहे. म्हणूनच एक रससिद्ध कवी म्हणून त्याचा गौरव करण्यात येतो. पौराणिक आख्यानांतील स्त्रीपुरुष पात्रांची रूपवर्णने करण्यात आणि त्यांच्या अंतरंगांचे दर्शन घडवून जिवंत व्यक्तिचित्रे उभी करण्यात प्रेमानंद सिद्धहस्त आहे. म्हणूनच त्याच्या काव्यास लोकमानसात चिरंतन स्थान प्राप्त झाले आहे. तत्कालीन समाजाचे मनोहर प्रतिबिंबही त्याच्या काव्यात आढळते. विशेषतः पौराणिक पात्रांना स्वकालीन व्यक्तींचा साज चढविण्याकडे प्रेमानंदाचा कल आहे, हे त्याच्या काव्याचे यश आहे व मर्यादाही आहे.

प्रेमानंदाच्या आख्यानांतून गुजराती भाषेच्या सामर्थ्याचा अपूर्व असा प्रत्यय येतो. गुजरातीतील तो एक सर्वश्रेष्ठ महाकवी असल्याचा निर्वाळा सर्वच समीक्षक देतात.

पेंडसे, सु. न.