दलपतराम: (२१ जानेवारी १८२०–२५ मार्च १८९८). आधुनिक गुजराती कवी. त्यांचे संपूर्ण नाव दलपतराम डाह्याभाई त्रवाडी असले, तरी ते ‘कवी दलपतराम’ नावानेच प्रसिद्ध आहेत. जन्म वढवाण येथे श्रीमाली ब्राह्मण कुटुंबात. स्वामीनारायण पंथाचे संत व कवी देवानंद यांचे शिष्यत्व दलपतरामांनी स्वीकारून त्यांच्याजवळ काव्यशास्त्राचे अध्ययन केले. पुढे त्यांना फार्बस ह्या इंग्रज गृहस्थाला गुजराती काव्य शिकविण्याचा योग आला. फार्बसच्या सहवासामुळेच त्यांना इतिहास, भाषा, साहित्य यांची गोडी निर्माण झाली. काही काळ त्यांनी सरकारी नोकरीही केली तथापि १८५५ मध्ये ही नोकरी सोडून दिली व ते फार्बसने सुरू केलेल्या ‘गुजरात व्हर्‌नॅक्युलर सोसायटी’चे (सध्याची गुजरात विद्यासभा) सहायक सचिव म्हणून काम करू लागले. तेथे त्यांनी स्वतःच्या संपादकत्वाखाली बुद्धिप्रकाश  नावाचे मासिक काढले, गुजराती पाठ्यपुस्तके प्रकाशित केली, प्राचीनग्रंथांच्या व ग्रंथकारांच्या परिचयात्मक पुस्तिका प्रसिद्ध केल्या व गुजराती काव्य दोहन  नावाने प्राचीन गुजराती कवींच्या निवडक वेच्यांचा संग्रह प्रसिद्ध केला.

इंग्रजी साहित्याशी परिचय नसूनही फार्बसचे साहाय्य व स्वतःची प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी मोलाची साहित्यसेवा व समाजसेवा केली. देशाची दुर्दशा, अंधविश्वास, औद्योगिक ऱ्‍हास, स्त्रीशिक्षण इ. तत्कालीन विषयांबाबतचे त्यांचे आकलन कौतुकास्पद होते. गुजराती, व्रज व संस्कृत भाषांवर तसेच छंदशास्त्र, अलंकारशास्त्र व रससिद्धांत यांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते.

पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने भारतीय जीवनाचे जे नवीन पर्व सुरू झाले होते, त्याचे गुजराती साहित्यात पहिलेवहिले पडसाद दलपतराम यांच्या काव्यात उमटले. त्यांच्या बापानी पिंपर  (१८४५) ह्या काव्यापासून गुजराती साहित्याच्या अर्वाचीन युगाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. त्यांचे काव्य शब्दचमत्कृतियुक्त, अनुप्रासबद्ध, उपदेशप्रधान आणि रंजक आहे. त्यांनी एकदा आपल्या पद्यमय व्याख्यानात, हुन्नरखाननी चढाई (१८५१), नवीन यंत्रयुगातील उद्यमाचे महत्त्व सांगितले व पुढे वेळोवेळी स्वतःच्या काव्याद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले. फार्बसच्या प्रोत्साहनाने त्यांनी विपुल काव्य लिहिले व ‘कवीश्वर’ ही पदवी प्राप्त करून घेतली. त्यांचे स्फुटकाव्य दलपतकाव्य (२ भाग, १८७९, १८९६) नावाने संगृहीत असून त्यात त्यांची गीते, पदे, गरबी, छप्पे इ. विविध प्रकारांतील रचना आहेत. फार्बस विरह (१९६५), फार्बस विलास  (१८६७), वेनचरित्र (१८६८), हरिलीलामृत  आदी त्यांची अन्य काव्ये होत. फार्बस विरह  हे त्यांचे काव्य उत्कृष्ट मानले जाते. मित्रवर्य फार्बसच्या मृत्यूवर लिहिलेले हे भावोत्कट शोककाव्य आहे. भूतनिबंध  व ज्ञातिनिबंध  हे त्यांचे निबंधग्रंथ तसेच लक्ष्मी  (१८५२) व मिथ्याभिमान  (१८६७) ही त्यांची नाटके आहेत. त्यांच्या काव्यात विपुल व्यक्तिचित्रे असून, त्यांतून मानवी स्वभावाची त्यांची सूक्ष्म जाण दिसून येते. व्यावहारिक शहाणपण व तत्त्वनिष्ठा शिकविणाऱ्या त्यांच्या काव्यांत पंचतंत्राप्रमाणेच पशुपक्ष्यांच्या कथांचा मुक्त वापर केलेला आढळतो. विनोदी शैलीने त्यांनी समाजाला उपदेश केला. अर्थात लोकशिक्षणार्थ लिहिलेल्या त्यांच्या उपदेशपर काव्यात अनिर्बंध ऊर्मीचा स्वाभाविक आविष्कार साधणारे अंतस्तत्त्व नसल्यामुळे, टीकाकारांनी त्यांना ‘समर्थ उपकवी’च म्हटले. स्वतःच्या अत्यंत सरळ व स्वाभाविक काव्यरचनेने दलपतरामांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य दलपतपिंगल  ह्या छंदशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथाने तसेच गुजरात व्हर्‌नॅक्युलर सोसायटी व बुद्धिप्रकाश मासिकाद्वारे त्यांनी गुजराती भाषा आणि साहित्याची सुरुवातीच्या अवस्थेत केलेली सेवा यांना आधुनिक गुजराती साहित्याच्या व समाजाच्या इतिहासात फार महत्त्व आहे.

पेंडसे, सु. न.