नानालाल : (१६ मार्च १८७७ – ९ जानेवारी १९४६). श्रेष्ठ गुजराती कवी व नाटककार. नानालाल (न्हानालाल) हे गुजराती कविश्रेष्ठ ⇨ दलपतराम (१८२०–९८) यांचे पुत्र होत. जन्म वढवाण येथे एका श्रीमाली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मोरबी (काठेवाड), मुंबई व अहमदाबाद येथे झाले. १९०१ मध्ये अहमदाबाद येथून एम्.ए. झाल्यावर ते शिक्षण खात्यात नोकरी करू लागले. राजकोट संस्थानात ते काही काळ उच्च न्यायाधीश म्हणूनही होते. १९२१ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन असहकारितेच्या चळवळीत भाग घेतला तथापि नंतर चळवळीपासून वेगळे होऊन त्यांनी उर्वरित आयुष्य गुजराती साहित्याच्या सेवेत वेचले. एखाद्या भाषेच्या साहित्येतिहासात पितापुत्रांनी सातत्याने सु. १०० वर्षांचा कालखंड स्वतःच्या सकस साहित्यनिर्मितीने गाजविण्याचा अपवादभूत सुयोग दलपतराम-न्हानालाल यांच्यामुळे गुजरातीस लाभला.
नानालाल यांनी विविध साहित्यप्रकारांत विपुल साहित्यनिर्मिती केली असली, तरी मुख्यत्वे कवी व नाटककार म्हणूनच त्यांना गुजरातीत महत्त्वाचे व मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. केटलांककाव्यो (३ भाग, १९०३, १९०८ व १९३५ ), वसंतोत्सव (१८९८ व १९०५ ), न्हानान्हानारास (३ भाग,१९१०,२८व३७), प्रेमभक्तिभजनावली (१९२४), कुरुक्षेत्र (महाकाव्य,१३ खंड,१९२६–४०), चित्रदर्शनो (१९२८), गीतमंजरी (१९२८), हरिसंहिता (महाकाव्य, ३खंड, १९६०)इ.त्यांचे अकरा काव्यसंग्रह व काव्यग्रंथ असून त्यांत भावकाव्य, चित्रकाव्य, भक्तिकाव्य, शिशुकाव्य, खंडकाव्य, महाकाव्य, रास, पद इ.काव्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत. ‘प्रेमभक्ति’ हे त्यांचे टोपणनावही आहे. प्रेम व भक्ती हे त्यांच्या जीवनाचे तसेच काव्याचेही स्थायीभाव आहेत.जीवनातील गूढगहन, सूक्ष्मतरल, नाजूककोमल भावनांचा तेजस्वी आविष्कार त्यांच्या काव्यात झाला असून ईश्वरभक्ती व राजभक्तीपासून तो राजकीय,सामाजिक, कौटुंबिक जीवनातील विविध भावविचारांचा सुंदर आविष्कार त्यांनी आपल्या काव्यात केला आहे. अर्वाचीनकाळातील नानालाल हे सर्वश्रेष्ठ भावकवी मानले जातात.त्यांची भावकवितातरल कल्पनेने नटलेली असून त्यांच्या रासांनी तर गुजरातचे सामाजिक जीवनच समृद्ध केले आहे. त्यांच्या प्रेमपर कवितेत दांपत्यभावनेचे समृद्ध चित्रण असूनही कविता श्रेष्ठ दर्जाची समजली जाते. त्यांची चिंतनपर कविता ही कलात्मक दृष्टीने श्रेष्ठप्रतीची आहे. गुजराती भाषेतील दैनंदिन बोलभाषेपासून तो शिष्यमान्य परिष्कृत भाषेपर्यंत भाषाव्यवहारातील सर्वछटा आणि त्यांतील सौंदर्य डोळसपणे टिपून त्यांचा त्यांनी कलात्मक आविष्कार केला. स्वतःच्या तरल भावछटाही त्यात गुंफून एका आगळ्या भावसौंदर्याचे दर्शन त्यांनी आपल्या काव्यात घडविले. त्यांची ही ऊर्मिकाव्ये (भावकाव्ये) गुजराती साहित्याचा अमोल ठेवा आहेत. छंदोबद्धतेपेक्षा आशयाच्या आंतरिक लयीस त्यांनी आपल्या भावकाव्यात प्राधान्य दिले. त्यांच्या सर्वच भावकविता लयसंवादी व अछांदस (छंदमुक्त) आहेत. त्यांची ही विशिष्ट शैली ‘डोलनशैली’ वा ‘अपद्यागद्य’ म्हणून गुजरातीत प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक कविता तसेच त्यांची नाटके ही ह्या डोलनशैलीत लिहिलेली आहेत. छंदांवरही त्यांचे चांगले प्रभुत्व होते. त्यांच्या काही कविता छंदोबद्धही आहेत.
गुजरातीतील एक महत्त्वाचे नाटककार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. इंदुकुमार (३ भाग, १९०९, २७ व ३२), जयाजयंत (१९१४) यांसारखी कल्पित कथांवर आधारित जहांगीर नूरजहां (१९२८), शहान्शाह अकबरशाह (१९३०), संघमित्रा (१९३१) सारखी ऐतिहासिक राजर्षि भरत (१९२२) सारखी पौराणिक विश्वगीता (१९२७) सारखी तात्त्विक प्रेमकुंज (१९२२) सारखी ग्रामीण जीवनावर आधारित अशी विविध प्रकारची एकूण पंधरा नाटके त्यांनी लिहिली. प्रत्येक नाटकात एखादी भावना वा एखादे तत्त्व मध्यवर्ती घेऊन त्याच्या अवतीभवती कथापात्रांची ते कौशल्याने गुंफण करतात. त्यामुळे कथानकाचा किंवा पात्रांचा विकास व्हावयाच्या ऐवजी त्या विशिष्ट भावनेचा वा तत्त्वाचाच विकास त्यांच्या नाटकांतून झालेला दिसतो आणि ते कथानक व ती पात्रे त्या भावनेची वा तत्त्वाची प्रतीके म्हणूनच नाटकांत वावरताना दिसतात. नानालाल यांचा पिंडच मुळी आत्मनिष्ठ भावकवीचा असल्यामुळे घटना, कृती, संघर्ष आदी वस्तुनिष्ठ नाट्यांगांपेक्षा उच्च कल्पनाविलास व मृदुतरल भावनांमध्येच त्यांची नाटके घुटमळताना दिसतात. भावनाट्याचे (लिरिकल ड्रामा) प्रवर्तक म्हणून त्यांचे गुजराती साहित्यातील स्थान अनन्यसाधारण आहे. प्रायोगिक दृष्ट्या त्यांची ही नाटके यशस्वी ठरली नसली, तरी त्यांतील अपद्यागद्य डोलनशैलीचे भावमाधुर्य, कल्पकता व लालित्य या दृष्टीने उत्कृष्ट भावनाट्ये म्हणून ती निश्चितच आस्वाद्य आहेत. त्यांची काही उत्कृष्ट भावपूर्ण पदे त्यांच्या नाटकांतच आली आहेत.
काव्य व नाटक यांव्यतिरिक्त नानालाल यांनी पांखडिओ (१९३०) हा लघुकथासंग्रह उषा (१९१८) व सारथी (१९३८) ह्या कादंबऱ्या संसार मंथन (१९२७), अर्धशताब्दीना अनुभवबोल (१९२७) हे विविध विषयांवरील चिंतनपर लेखांचे संग्रह कवीश्वर दलपतराम (३ खंड, १९३३–४१) हे त्यांच्या वडिलांचे चरित्र आपणां साक्षररत्नो (२ खंड, १९३४–३५) व जगत्कादंबरी-ओमां सरस्वतीचंद्रनुं स्थान (१९३३) हे समीक्षात्मक ग्रंथ इ. विविध साहित्यप्रकारांतील निर्मिती केली आहे. कवीश्वर दलपतराम हा चरित्रग्रंथ गुजराती साहित्यात विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यातील ‘पितृतर्पणा’ ही कविता त्यांची एक उत्कृष्ट कविता मानली जाते. त्यांच्या ह्या सर्वच लेखनात त्यांची ऋजुता, निर्णायक बुद्धी, उच्च रसिकता व प्रेरक भावलक्षिता व्यक्त होते. त्यांनी भगवद्गीता (१९१०), मेघदूत (१९१७), शाकुंतल (१९२६) इत्यादींचे तसेच पाच उपनिषदांचे गुजरातीत अनुवादही केले आहेत. त्यांच्या जीवनावर व साहित्यावर मनसुखलाल झवेरी यांनी न्हानालाल (१९५७) हा ग्रंथ लिहिला आहे. अहमदाबाद येथे ते निधन पावले.
पेंडसे,सु.न.
“