झवेरी, मनसुखलाल मगनलाल : (३ ऑक्टोबर १९०७–  ). प्रसिद्ध गुजराती कवी व समीक्षक. जन्म सौराष्ट्रात जामनगर येथे. १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठातून गुजराती घेऊन ते एम्.ए. झाले. १९३७–७२ ह्या कालखंडात त्यांनी मुंबई, राजकोट, कलकत्ता, पोरबंदर इ. ठिकाणी महाविद्यालयांतून गुजरातीचे अध्यापन केले. १९४३–४५ व १९५९–६३ ह्या कालावधीत ते अनुक्रमे राजकोट येथे उपप्राचार्य व पोरबंदर येथे प्राचार्य होते. १९६६ मध्ये ते कलकत्त्याच्या बी. ई. एस्. कॉलेजचेही प्राचार्य होते. मुंबई, गुजरात, बडोदे, नागपूर, शिवाजी, दिल्ली इ. विद्यापीठांत त्यांनी अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच इतर जबाबदारीच्या जागांवर काम केले. साहित्य अकादेमी, ‘पेन’, गुजराती साहित्य परिषद, चित्रपट अभ्यवेक्षण मंडळ, आकाशवाणी इ. महत्त्वाच्या संस्थांतही त्यांनी सदस्य म्हणून वा इतर पदांवर काम केले.

मनसुखलाल झवेरी

लहान वयातच त्यांनी लेखनास सुरुवात केली. तारुण्याच्या प्रारंभीच त्यांनी शाकुंतलाचे गुजरातीत सुंदर भाषांतर करून मेघदूताच्या धर्तीवर आपले चंद्रदूत  हे मौलिक काव्य लिहिले. सुरुवातीच्या काळात ‘कुरुक्षेत्र’ विषयक दीर्घ कवितालेखनामुळे त्यांना फार प्रसिद्धी लाभली. प्रौढ शैली, संस्कृतप्रचुर प्रासादिक रचना, संस्कृत छंदोरचनेवर असाधारण प्रभुत्व या सर्व गुणांनी त्यांना गांधी युगातील कवींत उच्च स्थान प्राप्त झाले.

त्यांच्या समीक्षेतील निर्भयता लक्षणीय आहे. आपली मते ते कशाचीही पर्वा न करता निर्भिडपणे व्यक्त करतात. त्यांनी सुंदर व्यक्तिचित्रे रेखाटली असून त्यांचे अमेरिकेचे प्रवासवर्णनही त्यांच्या सूक्ष्म दृष्टीचे द्योतक आहे. हॅम्लेटचा त्यांनी केलेला गुजराती अनुवाद उच्च प्रतीचा आहे. उत्कृष्ट वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.

चंद्रदूत (१९२९), फूलदोल (१९३३), आराधना (१९३९), अभिसार (१९४६), अनुभूति (१९५२), काव्यसुषमा (१९५९), दूमो ओगल्यो (१९७५) इ. त्यांचे उल्लेखनीय काव्यग्रंथ होत. त्यांच्या समीक्षापर लेखसंग्रहांत थोडा विवेचन लेखो (१९४९), पर्येषणा (१९४९), काव्यविमर्श (१९६२) , अभिगम (१९६५ ), गोवर्धनराम (१९६७), नानालाल (१९६७), कनैयालाल मुन्शी (१९६९), उमाशंकर जोशी (१९७१), आपणो कविता-वैभव (२ भाग, १९७४, ७५), आपणां उर्मिकाव्यो (१९७५) यांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. अमेरिका-मारी दृष्टिये (१९७४) हे त्यांचे अमेरिकेचे प्रवासवर्णन असून चरित्रांकन (१९७५) मध्ये त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे संगृहीत आहेत. यांशिवाय त्यांनी संस्कृत व इंग्रजीतील कृतींचे शाकुंतल (१९२८),  भगवद्‌गीता (१९७४ ), हॅम्लेट (१९६७), ऑथेल्लो (१९७०) इ. गुजराती अनुवादही केले आहेत.

ब्रोकर, गुलाबदास (गु.) कालेलकर, ना. गो. (म.)