सुखलालजी पंडित : (१८८०–१९७८). श्रेष्ठ गुजराती पंडित व साहित्यिक. पूर्ण नाव सुखलाल संघवी. सौराष्ट्रातील लिमाली खेड्यात जन्म. वयाच्या सोळाव्या वर्षी देवीच्या रोगाने त्यांना अंधत्व आले. या दुर्दैवी घटनेमुळे ते जास्त अंतर्मुख झाले व त्यांनी आपले आयुष्य विद्याव्यासंगाला वाहून घेतले. जैन आचार्यांची प्रवचने त्यांनी ऐकली, तसेच साहाय्यक वाचकाच्या मदतीने जैन धर्मग्रंथ अभ्यासले. १९०४ मध्ये त्यांनी वाराणसीच्या ‘श्री यशोविजय जैन संस्कृत पाठशाळेमध्ये प्रवेश घेतला. तीन वर्षांत त्यांनी सिद्घ-हेम-व्याकरण मुखोद्‌गत केले. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती, त्यामुळे कमावलेले ज्ञान त्यांच्या कायम स्मरणात राहत असे. व्याकरणाखेरीज त्यांनी तर्कसंग्रह, मुक्तावली, व्याप्तिचक्र हे ग्रंथ व त्यांवरील टीका अभ्यासल्या. रघुवंश, किरातार्जुनीय, माघकाव्य, नैषधीयचरित यांसारखी महाकाव्ये तसेच अलंकारशास्त्र, कोश आदींचाही त्यांनी अभ्यास केला. पुढील अध्ययनासाठी ते १९११ मध्ये मिथिला येथे व नंतर वाराणसीला गेले. तेथे त्यांनी तत्त्वज्ञान व साहित्य यांच्या व्यासंगाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यानंतर ते आग्रा येथे गेले व तेथे त्यांनी महत्त्वाच्या जैन साहित्यकृतींचे संपादन केले. उदा., पंचप्रतिक्रमण (देवेंद्रसूरीकृत पहिले चार कर्मग्रंथ), योगदर्शन व हरिभद्रसूरीची योगविंशिका. १९२२ मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठाने सुरू केलेल्या ‘गुजरात पुरातत्त्व मंदिरा’त भारतीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्या ठिकाणी त्यांनी सिद्घसेन दिवाकराच्या सन्मतितर्क चे संपादन केले. १९३३ मध्ये पंडित सुखलालजी बनारस हिंदू विश्वविद्यालयात जैन तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गेले. तेथे त्यांनी जे ग्रंथ संपादित केले, त्यांत आचार्य ⇨उमास्वाती च्या तत्त्वार्थाधिगमसूत्राचा व सिद्घसेन दिवाकराच्या न्यायावताराचा (संहितेसह गुजराती भाषांतर) समावेश होतो. सुखलालजी पंडितांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ लेखनात आणि प्राचीन संस्कृत, हिंदी, गुजराती भाषांतील मौलिक, महत्त्वपूर्ण साहित्याचे संपादन करण्यात व्यतीत केला. आचार्य हेमचंद्राच्या प्रमाणमीमांसा या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आणि त्याला विस्तृत प्रस्तावना व टीपा जोडल्या. हा ग्रंथ संशोधन-संपादनाला नवी दिशा देणारा ठरला. चार्वाक दर्शनावरील जयराशीच्या तत्त्वोपप्लव या प्रमाण भाष्यग्रंथाची चिकित्सक संपादित आवृत्ती पं. सुखलालजींनी सिद्घ केली, त्यामुळे त्यांना विद्वज्जनांत ख्याती लाभली. ⇨धर्मकीर्तीच्या हेतुबिंदुवरील आर्चटाच्या भाष्यग्रंथाचे त्यांनी संपादन केले व त्यायोगे बौद्घ तत्त्वज्ञानाच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यावर (१९४४) ते भारतीय विद्याभवनात दाखल झाले व तेथे त्यांनी आचार्य ⇨ जिनविजयजी मुनी यांच्या समवेत कार्य केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातर्फे सुखलालजी यांना भारतीय तत्त्वज्ञानावर पाच व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ही व्याख्याने नंतर ग्रंथरूपाने गुजरातीमध्ये (१९५१), हिंदीमध्ये (१९७१) व इंग्रजीत (१९७७) प्रसिद्घ झाली. त्यांनी ‘गुजरात विद्यासभा’ येथे आत्मा-परमात्मा व साधना या विषयांवर दिलेली विद्वत्तापूर्ण व्याख्याने अध्यात्म विचारणा या शीर्षकाने हिंदी व गुजराती मध्ये प्रकाशित झाली. मुंबई विद्यापीठाने त्यांना आचार्य हरिभद्र यांच्यावर व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित केले, ही व्याख्यानेदेखील गुजरातीमध्ये (१९६१) व हिंदीत (१९६६) ग्रंथरूपाने प्रसिद्घ झाली. १९५७ मध्ये मुंबई येथे एका सार्वजनिक सभेत डॉ. राधाकृष्णन् यांच्या हस्ते पं. सुखलालजी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व त्याप्रसंगी त्यांना त्यांच्या संकलित वाङ्‌मयाचे तीन खंड व थैली अर्पण करण्यात आली. त्यातून त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांच्या अभिवृद्घीसाठी ‘ज्ञानोदय ट्रस्ट’ची स्थापना केली. पं. सुखलालजी यांना अनेक मानसन्मान लाभले. १९४७ मध्ये त्यांना यशोविजय ग्रंथमालेतर्फे जैन तत्त्वज्ञान व प्राकृत भाषा यांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी ‘विजयधर्मसूरी जैन साहित्य सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात आले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या. त्यांच्या दर्शन अने चिंतन (१९५६) ह्या तत्त्वज्ञानाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादेमी पुरस्कार देण्यात आला (१९५८). १९६१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी व जैन समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याती आहे.

इनामदार, श्री. दे.