गुजराती साहित्य : जिला प्राचीनतम गुजराती, जुनी गुजराती, प्राचीन पश्चिमी राजस्थानी किंवा ‘मारू गुर्जर’ असे म्हणतात, तिच्या आरंभकाळापासून (सु. १२५०) आजपर्यंत गुजरातीभाषी लोक गुजरातच्या भौगोलिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून भारतात दूरवर पसरले आहेत आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही जाऊन राहिले आहेत. यांत आफ्रिका खंडात गुजराती वस्ती बऱ्याच प्रमाणात असून तेथेही गुजराती भाषेतून साहित्यनिर्मिती होत असते.

अशा रितीने इतर प्रांतांत व देशांत पसरलेल्या गुजराती भाषेच्या आरंभकालीन रूपाला ‘जुनी गुजराती’ हे नाव असून निरनिराळ्या स्वरूपांत आजतागायत ती टिकून आहे. तिला ‘गुजराती’ हे नाव सतराव्या शतकात मिळाले. सर्वांत प्रथम सर्वश्रेष्ठ कवी प्रेमानंदाने हे नाव वापरले, पण ते एकदाच. यापूर्वी विद्वानांकडून ती ‘गौर्जर’ किंवा ‘शौरसेनी अपभ्रंश’ म्हणून ओळखली जाई आणि सामान्य माणसे तर तिला प्राकृतच म्हणत. गुजरातीच्या आधी गुजरातमध्ये साहित्याची भाषा अपभ्रंश होती. अपभ्रशांच्या शौरसेनी प्रकाराला भोजाने (सु. १०००) सरस्वतीकंठाभरण या ग्रंथात ‘गुर्जरांची प्रिय भाषा’ म्हणून संबोधले आहे आणि वैयाकरण मार्कंडेय (सु. १४५०) याने तिला ‘गौर्जरी अपभ्रंश’ असे नाव दिले. जैन आपल्या लेखनात महाराष्ट्री अपभ्रंशाचाही उपयोग करतात. साधारणपणे ९०० ते १२५० हा या अपभ्रंश भाषेचा काल समजला जातो. त्यानंतर १२५१ पासून १६५० पर्यंत जुनी गुजराती प्रचलित होती आणि त्यानंतर नवी गुजराती अस्तित्वात आली.

गुजराती साहित्याचे पुढीलप्रमाणे कालखंड पाडले जातात :

मध्य  कालखंड : (१२५० ते १८५२). यात प्राचीन व मध्य असे दोन कालखंड एकत्र घेतले आहेत पण जुन्या गुजरातीपासून दयारामपर्यंत पसरलेला हा दीर्घ कालखंड ‘मध्य कालखंड’ म्हणूनच ओळखला जातो. या कालखंडात निर्माण झालेल्या साहित्याची गुणवैशिष्ट्ये एकाच प्रकारची आहेत. त्यामुळे हा संपूर्ण काळ एकत्र बांधला गेला आहे.

अर्वाचीन  कालखंड : नर्मद व दलपत यांच्यापासून (सु. १८५३ पासून) अर्वाचीन कालखंड सुरू होतो. ब्रिटिश राजवट येथे स्थिर झाली, हीच मूळी एक मोठी क्रांतिकारी घटना होती. स्वतःबरोबर स्वतःचे साहित्य आणि संस्कृती घेऊन इंग्रज येथे आले. येथील साहित्यनिर्मितीत त्याचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आहे. १८५२ साली अस्त पावलेल्या मध्ययुगीन निर्मितीशी या अर्वाचीन निर्मितीची तुलना करून पाहिली, म्हणजे विषय, पद्धती व अभिव्यक्ती यांबाबतींत दोहोंतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. नर्मद (१८३२—८६) पासून आजपर्यंत ‘अर्वाचीन कालखंड’ मानला जातो. यातही पोटविभाग आहेत, ते पुढीलप्रमाणे : सुधारणा काल (१८५३—८६), पंडित काल (१८८७—१९१४), गांधी काल (१९१५—४७) आणि स्वातंत्र्योत्तर काल (१९४७ नंतर). कालाचे हे विभाग सोयीसाठी केले आहेत. एका कालातील वैशिष्ट्ये दुसऱ्या कालातही मिसळून जातात, तर कधी कधी कालाचा व्युत्क्रमही निर्मितीच्या संदर्भात पाहायला मिळतो. तरीसुद्धा या कालांना स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत.

मध्य  कालखंड : जैनांची निर्मिती : प्राचीन किंवा मध्ययुगीन कालाच्या आरंभी जैन मुनींनी विपुल साहित्यनिर्मिती केली. जुन्या गुजराती साहित्यात जैनांचे कार्य मोठे आहे. जुनी गुजराती प्रचारात येण्याआधीचे गुजरात प्रदेशातील साहित्य अपभ्रंश भाषेत आहे. यात स्वयंभू (सु. आठवे शतक) व पुष्पदंत (दहावे शतक) यांच्यासारखे महाकवी आणि हेमचंद्रासारखे (१०८९—११७४) पंडित आहेत.

जुन्या गुजराती साहित्यनिर्मितीचे प्रमुख प्रणेते जैन मुनी होत. सुरुवातीच्या काळात त्यांनी मुख्यतः पद्यात आणि थोडेफार गद्यातही लेखन करून गुजराती साहित्यनिर्मिती चालू ठेवली. हे साहित्य धर्मकथांच्या रूपाचे आहे. ‘रास’ आणि ‘रासो’ या नावाने ओळखली जाणारी ती पद्यरचना आहे. क्वचित गद्यही त्यांनी लिहिले. यामध्ये ११८५ मधील भरतेश्वर बाहुबली रास या शालिभद्र सूरीच्या कृतीचे स्थान सर्वांत आधीचे राहील. भरत आणि बाहुबली या दोन जैन धुरंधरांच्या जीवनातील कथाप्रसंगांचे या कृतीत ओजस्वी शैलीत सुंदर वर्णन केले आहे. यानंतर महेंद्र सूरीचा शिष्य धर्म याची जंबूसामी चरिय (१२१०) ही उल्लेखनीय कृती होय. सोमसुंदर (१३७४— ४४६) हा उत्तम गद्यपद्य लिहिणारा म्हणून प्रसिद्ध आहे. माणिक्यसुंदरकृत सुप्रसिद्ध पृथ्वीचंदचरित (१४४२) हे उत्तम व रसपूर्ण असे गद्यकाव्य होय.

या रास किंवा रासोशिवाय ‘फाग’ किंवा ‘फागू’ ही जैनांची आणखी वैशिष्ट्यपूर्ण अशी साहित्यनिर्मिती आहे. ही मुख्यतः ऋतुवर्णनांची काव्ये आहेत. जंबुस्वामी किंवा नेमिनाथ यांच्यासारख्या पुराणप्रसिद्ध व्यक्तींना काव्यविषय मानून त्यांच्या परिसरातील ऋतुविषयक शृंगारवर्णन या काव्यप्रकारात केलेले असते. के. ह. ध्रुव यांच्या मते, फाल्गुन मासातील क्रीडांचे यात वर्णन असते, म्हणून जुन्या गुजरातीत त्यांना ‘फागू’ हे नाव प्राप्त झाले. जैन मुनींनी वसंत ऋतूमधील शृंगार ‘फागू’ मध्ये आणून अखेर त्यांचा बोधवादी उपयोग करून घेतला आहे. सर्वांत जुने फाग सिरिस्थूलिभद्रफागु  हे जिनपद्म सूरीने १३२४ च्या सुमारास लिहिले. तेराव्या शतकातील नेमिनाथ चतुष्पादिका हे विनयचंद्र सूरिलिखित (१२६९) पहिले ऋतुकाव्य किंवा बारमासी काव्य होय.

जैनेतर  लेखन : गुजरातीमधील उत्कृष्ट फागुकाव्य वसंतविलास हे जैनेतर कवीने लिहिलेले आहे. या कवीची निश्चित माहिती मिळत नाही. तो पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला असे मानतात. या काळात बाराही महिन्यांची वर्णने करणारी ‘बारमासी’ काव्ये बरीच निर्माण झाली. धार्मिक विषयांवरील या काव्यरचनेनंतर ऐहिक प्रेमविषयक किंवा युद्धविषयक काव्य लिहिणाऱ्यांमध्ये श्रीधर व्यास (१३९८) हा प्रमुख समजला जातो. त्याने लिहिलेल्या रणमल्ल छंदमध्ये ईडरचे ठाकूर रणमल्ल यांच्या पराक्रमाची गाथा उत्तम रीतीने गायिली आहे. याशिवाय असाईत (१३६१) याचे हंसाउली  आणि अब्दुर रहमान (१४२०) याचे संदेशक रास  ही या काळातील सुप्रसिद्ध काव्ये होत. ह्या सर्व काव्यांत दोहा, चौपाई इ. छंदांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला आहे. आजही लोकसाहित्यातील हे रचनेचे थाट जसेच्या तसे राहिले आहेत.

ऐतिहासिक प्रभाव : या सर्व साहित्याचे विहंगावलोकन केल्यानंतर या सर्व साहित्याचा मूळ प्रेरणास्त्रोत जो नरसी मेहता, त्याच्या निर्मितीकडे वळले पाहिजे पण त्यापूर्वी त्या काळातील निर्मितीवर जो  ऐतिहासिक प्रभाव होता, तिकडेही दृष्टिक्षेप टाकायला हवा. या ऐतिहासिक प्रभावामागे सबंध भारतातील बदलती राजकीय परिस्थिती आहे. या काळात सर्वत्र धार्मिक साहित्य निर्माण होत होते. धर्मावर लटकणारी भयाची तलवार हे याचे एक कारण होते. मुसलमानी टोळ्या भारतावर चालून आल्या होत्या आणि धर्मच नव्हे, तर अवघे जीवन भीतीने पछाडलेले होते. पुरातन काळापासून चालत आलेली संस्कृतिमूल्ये भयग्रस्ततेने ढासळू लागली होती. या परिस्थितीतून भारताला व भारतीय संस्कृतीला संतांनी आणि संतकवींनी वाचवले. साऱ्या भारतात या काळी संतकवी निर्माण झाले. त्यांनी आपल्या धर्मभक्तिद्वारा भारताचे व भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. ही भक्ती मुख्यतः प्रेमलक्षणा (मधुरा) भक्ती होती. तीत लोकांना तन्मय करण्याची अपार शक्ती होती.

नरसी मेहता (नरसिंह मेहता) : गुजरातमधील कवींमध्ये प्रमुख कवी नरसी मेहता (१४१६—८०) होय. काव्यगुण दृष्टीनेसुद्धा उत्तम कवींमध्ये त्यांची गणना करता येईल. त्यांच्या जन्म-मृत्यू तारखांबद्दल वाद आहे. कन्हैयालाल मुनशींनी तर त्यांची जन्मतारीख रूढ तारखेपेक्षा १०० वर्षांनी नंतरची मानली आहे. ⇨नरसी मेहतांचे नाव साऱ्या भारतास माहीत आहे. ‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराइ जाणे रे’ हे त्यांचे काव्य महात्मा गांधीनी विश्वविख्यात केले पण ते काही त्यांचे उत्तम काव्य नव्हे. त्यांचे उत्तम काव्य म्हणजे ज्ञानपर व भक्तिपर पदे. वेदान्तातील उत्तमोत्तम ज्ञान व उत्तमोत्तम काव्य यांच्या रसायनातून त्यांची रचना झाली आहे.

संसारात त्यांचे मन उरले नाही. त्यामुळे अवघे आयुष्य त्यांनी कृष्णगुणगानामध्ये व्यतीत केले. लहानमोठा भेद केला नाही. स्पृश्यास्पृश्यता मानली नाही. अस्पृश्यांना ‘हरिजन’ हा शब्द प्रथम त्यांनी वापरला. भक्तिगीतांप्रमाणे शृगांरिक पदेही त्यांनी रचली. त्यांतील शृंगार बऱ्याच वेळा उत्तान बनतो पण ही सारी कृष्णलीला आहे व ती कृष्णार्पण केलेली आहे. मुलगी प्रथम गर्भवती असताना माहेरचे दान द्यायचे आहे, मुलाचेही लग्न करायचे आहे पण साऱ्या गोष्टी कृष्णभगवान निभावून नेतो. नरसी मेहतांचा मुलगा शामळशा याच्या विवाहाची कथा तर नरसी मेहतांनी शामळशानो विवाहमध्ये सुंदर रीतीने सांगितली आहे. ‘हारमाळा’ हा नाजूक प्रसंग तर आयुष्यात प्रत्यक्ष घडला, तसा नरसी मेहतांनी वर्णिलेला आहे. या दोन्ही प्रसंगांत त्यांची परमेश्वरावरील नितांत श्रद्धा आणि परमेश्वराचे त्यांच्यावरील प्रेम यांचे दर्शन होते. हे सारे नरसी मेहतांच्या मनाचे विलास होते हे खरे, पण त्यांतून त्यांची अंतरीची अनुभूती जाणवल्याशिवाय राहत नाही. असा श्रद्धाशील कवी दाणलीला, रासलीला सुरतसंग्राम  यांसारखी काव्येही लिहू शकतो.

नरसी मेहता केवळ पदकार नव्हते, हे त्यांच्या शामळशानो विवाह या दीर्घ काव्याद्वारा सिद्ध आहे. ते केवळ आत्मचरित्रात्मक कवीही नव्हते, हे त्यांच्या सुदामचरित्र ग्रंथाद्वारे दिसून आले आहे. पुढे गुजराती भाषेत ‘आख्यान कविता’ हा जो वाङ्‌मयप्रकार चांगल्या रीतीने फळाफुलाला आला, त्याची बीजे नरसी मेहतांच्या कथात्मक काव्यात प्रथम दिसतात.

खऱ्या अर्थाने नरसी मेहता हे गुजराती भाषेचे आद्य कवी होत. इतकी सुंदर कविता इतक्या विपुल प्रमाणात त्यांच्या आधी गुजरातीत कुणी लिहिली नव्हती. शिवाय नरसी मेहता भक्त होते. नरसी मेहतांमुळे गुजरातीत अस्सल कवितेचा पाया घातला गेला आणि तिच्या शाखोपशाखा विस्तार पावल्या.

ऐतिहासिक व इतर  लेखन : पद्मनाभ   (सु. १४५६) हा नरसी मेहतांचा समकालीन कवी. त्याच्या कान्हडदे प्रबंध  या प्रख्यात वीररसात्मक काव्यातून गुजराती काव्याचा हा विस्तार अनुभवास येतो. पद्मनाभ हा जातीने वीसनगरा नागर होता व मारवाडमधील झालोरचा राजा अखेराज याच्या दरबारी राजकवी होता. अखेराजाच्या पराक्रमी पूर्वजाचे नाव कान्हडदे असे होते.


दिल्लीचा बादशाह अलाउद्दीन खल्‌जी याने गुजरातचा राजा करण वाघेला याच्यावर चढाई केली. त्यासाठी त्याने अलूखान याच्या आधिपत्याखाली सैन्य रवाना केले. या सैन्याच्या वाटेवर झालोर होते. तेव्हा सेनापतीने बादशाहाचा आदेश कान्हडदे चौहानास कळवला व त्याच्या राज्याच्या हद्दीतून सैन्य जाऊ देण्याची मागणी केली. कान्हडदेने ही मागणी धुडकावून लावली. या कालावधीत बादशाहाचे सैन्य दुसऱ्या    मार्गाने निघून पुढे गेले होते पण गुजरात पादाक्रांत करून व सोमनाथाचे मंदिर फोडून ते कान्हडदेसमोर युद्धासाठी सज्ज झाले. या युद्धात कान्हडदेने विलक्षण पराक्रम करून बादशाहाच्या सैन्याचा पराभव केला.

या आणि यानंतरच्या राजपुतांच्या शौर्याची कथा या काव्यात वर्णिलेली आहे. तत्कालीन गुजराती समाजाच्या अनेक विशेषांचे वर्णनही या काव्यात केलेले आहे. प्रेम, शौर्य, त्याग, इमानदारी, पराक्रम इ. अनेक भाव अतिशय कुशलतेने यात व्यक्त झाले आहेत. त्यामुळे जुन्या गुजरातीमधील ती एक अजोड कृती ठरली आहे पण या कवीची बरोबरी करणारा आणि आपल्या निर्मितीने गुजराती साहित्यसृष्टी संपन्न करणारा एक मोठा कवी या कालखंडात गुजरातमध्ये होता. या कवीचे नाव भालण (सु. १४५९—सु. १५१४). त्याचेच दुसरे नाव पुरुषोत्तम महाराज. उत्तर गुजरातमधील पाटणचा हा कवी संस्कृतमध्येही पारंगत होता. संस्कृतचे त्याचे हे ज्ञान बाणभट्टाच्या कादंबरीच्या त्याने केलेल्या पद्यमय अनुवादाने सिद्ध होते. मूळ काव्याच्या काही भागाचा त्याने संक्षेप केला आहे, तर काही भागाचा विस्तारही केला आहे. त्याची ही संपूर्ण कृती अर्वाचीन काव्यदृष्टीनेही समाधानकारक आहे. त्याने नलाख्यान, दशमस्कंध रामबालचरित ही आख्यानकाव्येही लिहिली आहेत. पुढे प्रेमानंदाने अमर केलेल्या आख्यानकाव्याचा प्रणेता भालण म्हणता येईल. या दीर्घ काव्यांबरोबर लहान सुंदर ‘गरबी’  काव्येही त्याने लिहिली आहेत. नंतर गरबी काव्यरचनेत विशेष नावलौकिक मिळविलेल्या दयारामच्या काव्यावर भालणच्या रचनेचा परिणाम स्पष्ट दिसतो.

यानंतर या काळात अनेक लहानमोठे कवी होऊन गेले. त्यांपैकी उषाहरणचा कर्ता वीरसिंह (१४६४), नाकर (१५१६—६८), भीम (सु. १४८५), मांडण (सु. १४८०), कर्मण (सु. १४७०) हे उल्लेखनीय कवी होत.

मीराबाई : जिचा उल्लेख विशेष गौरवाने केला पाहिजे व जिची गीते आणि पदे अवघ्या भारतात आवडीने गायली जातात, ती कवयित्री म्हणजे ⇨मीराबाई (१४९९ — १५४७ ते ६४ च्या दरम्यान) होय. मेवाडच्या ह्या महाराणीला गुजरातची कवयित्री का म्हणावयाचे हा प्रश्न पडेल पण ‘जुनी गुजराती ’ म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या भाषेचे दुसरे नाव ‘जुनी पश्चिमी राजस्थानी’ किंवा ‘मारू गुर्जर’ असे होते. त्यामुळे ही भाषा राजस्थान व गुजरातमध्ये जवळजवळ समान होती. शिवाय मीराबाईच्या जीवनातील उत्तरकाळ गुजरातमधील द्वारकेत गेला. तिथे तिचे देहावसान झाले. त्यामुळे तिच्या भाषेवर गुजरातमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचा ठसा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तिचे माहेर मेडतामध्ये होते व मातृकुलात वैष्णवभक्ती हा कुलधर्म होता. मीराबाईवरही हे संस्कार झाले होते. मेवाडचा राणा याच्या घरी म्हणजे मीराबाईच्या सासरी शिवभक्तीचा कुलधर्म होता. मीराबाईला तो काही फारसा मानवला नाही. त्यामुळे पतिपत्नींमध्ये संघर्ष निर्माण झाला पण मीराबाईने तर स्वतः गिरिधरगोपालालाच वरले होते. त्याच्यासोबत ती नाचत होती, गात होती, त्याची पूजा करीत होती, भक्ती करीत होती. अनेक पदे आणि गीते तिने रचली-गायली आणि साऱ्या गुजरात-राजस्थानमध्ये ती गायिली गेली. तिला पतीने विषाचा प्याला दिला, तर तो गिरिधरगोपालाचे स्मरण करीत ती आवडीने प्याली. तिच्या परमेश्वरप्रीतीला अन्य कोणत्याही वासनेचा स्पर्श झाला नाही. तिने म्हटले आहे, की वज्रमध्ये कृष्ण हा एकच पुरुष आहे. असे हे तिचे जीवन आणि कवन गुजरातच्या जीवनावर व काव्यावर कधीच पुसला न जाणारा ठसा ठेवून गेले आहे.

मीरेच्या नंतर होऊन गेलेला मोठा कवी अखो हा होय. अखो जातीने सोनार. त्याचा जन्म १५९१ मधला पण त्याआधी तुलनेने लहान असे तीन कवी होऊन गेले. त्यांनी पुढे येणाऱ्या तीन मोठ्या कवींच्या आगमानाची पूर्वतयारी करून ठेवली. हे तीन मोठे कवी म्हणजे अखो, प्रेमानंद व शामळ. अखिल भारतीय भाषा-साहित्यात स्थान मिळावे असे हे कवी होते. या प्रत्येकाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य होते. या वैशिष्ट्याची पूर्वतयारी करणारे तीन कवी म्हणजे नरहरी (सु. सोळावे शतक), गणपती (सु.१५१८) आणि विश्वनाथ जानी (सु. १६२५—७५). अखोप्रमाणे नरहरीने तत्त्वज्ञानपर कविता लिहिली. गणपतीने माधवानलकामकुंडलादोग्धक या काव्याद्वारा शामळ कवीच्या पद्मकथांची चुणूक दाखविली आणि विश्वनाथ जानीने ‘मोसाळुं’ वगैरे रचून प्रेमानंदाच्या अपूर्व आख्यानांची भूमिका सिद्ध करून ठेवली.

अखो आणि त्याचा काळ : अखोच्या जन्मकालापर्यंत (सु. १५९१—१६५६) गुजरातच्या इतिहासात बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या. १५७३ मध्ये अकबराने गुजरात हा आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून घेतला होता. सुलतानशाही संपली होती व मोगल सत्ता स्थिर झाली होती. त्यामुळे लोकांच्या जीवनालाही एक प्रकारची स्थिरता आली होती. त्यांना सर्वतोपरी धर्मरक्षण व जातिरक्षण यांचे अगत्य वाटत होते. त्यामुळे लहानलहान समूह करून ते आपले रक्षण करीत होते. सतत परकीयांच्या दास्यत्वात जीवन व्यतीत करीत असल्यामुळे प्रेमलक्षणाभक्तीच्या माधुरीची जागा निराशा, निर्वेद यांनी घेतली. लोक संभ्रमी बनले होते आणि वैराग्यभाव त्यांच्यात अधिक दिसू लागला होता.

या सर्व भावभावनांची व जीवनदृष्टीची अभिव्यक्ती करणारा कवी अखो असून त्याने काव्यलेखनाला वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर सुरुवात केली असावी. त्याने सु. पंधरा वर्षे काव्यलेखन केले असावे. या दृष्टीने त्याचा लेखनकाल १६४१ ते १६५६ असा मानण्यात येतो.

उशिरा आरंभ करून उत्तम लेखन करणारांची उदाहरणे साहित्याच्या इतिहासात विरळा पण अखोच्या बाबतीत ही गोष्ट सहज घडल्याचे दिसते. वैदिक तत्त्वज्ञान त्याने काव्यात आणले. त्याशिवाय ऐहिक जीवनही त्याने आपल्या काव्यात ‘छप्पा’ या काव्यप्रकारातून गुंफले. हे छप्पे आजही आवडीने म्हटले जातात. अनेक छप्प्यांतून तत्कालीन गुजरातच्या जीवनाचे प्रतिबिंब दिसते. अखेगीता, अनुभवबिंदु  इ. त्याची ग्रंथसंपत्ती होय [→ अखो भगत].

प्रेमानंद : प्रेमानंद (सु. १६३६—सु. १७३४) हा अखोनंतरचा कवी पण त्याची कविता अखोहून अगदीच भिन्न प्रकारची आहे. भक्ती, वैराग्य किंवा वेदान्तपर अशी कविता त्याने लिहिली नाही. स्वतःच्या प्रदेशाला त्याने कथा आणि आख्यानांच्या द्वारे जिवंत ठेवले. भालणने सुरू केलेली आख्यानलेखनाची कला त्याने अंतिम अवस्थेला पोहोचविली. ही आख्याने बहुतेक पुराणकथांवरून व नरसी मेहतांच्या जीवनावरून घेतलेली आहेत पण या आख्यानांत इतकी ऐहिकता भरलेली आहे व जीवनातील इतक्या मार्मिक व सत्य अवलोकनांनी ती युक्त आहेत, की त्यामुळे मध्यकालीन गुजराती साहित्यातच नव्हे, तर आजवरच्या समग्र गुजराती साहित्यातही तो उत्तम कवी म्हणून ओळखला जातो. गुजराती साहित्याच्या इतिहासात त्याला महाकवीची पदवी बहाल करण्यात आली आहे.

त्याच्या जीवनाची साधार माहिती फार थोडी मिळते. मूळचा तो बडोद्याचा पण तेथील दुष्काळाच्या वेळी तो खानदेशात नंदुरबारला निघून गेला. तरुण वयातच त्याला रामचरण हा प्रभावी गुरू लाभला. त्याच्याकडून मिळालेल्या ज्ञानाच्या छटा वारंवार त्याच्या साहित्यात दृष्टीस पडतात. दुष्काळ भयानक रूप धारण करीत असतानाही तो काव्य करीत राहिला. ऋष्यशृंगाख्यान  नावाचे त्याचे काव्य आहे. तो प्रतिभासंपन्न कवी असल्यामुळे त्याच्या अंगी उत्तुंग कल्पनाशक्ती व अपूर्व अवलोकनशक्ती होती. त्याच्या कवितेचे माध्यम कथा होते. त्याने समकालीन गुजराती स्त्रीपुरुषांची विविधरंगी आणि विविधवेशी रूपे नीटसपणे आपल्या काव्यात रेखाटली आहेत. त्याच्या व्यक्तिरेखा पुराणातील आहेत. उदा., श्रीकृष्ण, नल, दमयंती, सुदामा, उषा, अनिरुद्ध इत्यादी. पण या  साऱ्या व्यक्तिरेखा प्रेमानंदाच्या प्रतिभास्पर्शाने खास गुजराती बनल्या आहेत, हे त्याचे यश आहे आणि कित्येकदा हीच त्याची मर्यादाही आहे. त्याची वर्णने व विशेषतः त्याची स्त्रीचित्रणे ही त्याच्या अपूर्व यशाची निदर्शक आहेत. शिवाय इतर कवींच्या ठायी दुर्मिळ असणारा हास्यरस त्याच्या कवितेत भरपूर आहे. त्याच्या आधीच्या विश्वनाथ जानीने नरसी मेहतांविषयक सुंदर ‘मोसाळुं’ लिहिली आहेत पण नरसी मेहतांच्या जीवनावरील मामेंरू वगैरे प्रेमानंदाची काव्ये अपूर्व आहेत. त्याचे नलाख्यान तर श्रेष्ठ आख्यानकाव्य होय. त्याचे सुदामचरित्रओखाहरण ही काव्ये आजही खेड्याखेड्यांतून गायिली जातात.

प्रेमानंद हा व्यवसायाने गागरिया भट्ट किंवा भाणभट्ट होता. त्याची वृत्ती कथेकऱ्याची होती. या व्यवसायाद्वारा त्याने समकालीन स्त्रीपुरुषांच्या हृदयात स्थान मिळविले होते आणि आजही ते अढळ आहे यात संशय नाही [ → प्रेमानंद].


शामळ : प्रेमानंदानंतर वल्लभ, रत्नेश्वर, धीरजी, सुंदर असे अनेक लहानमोठे कवी होऊन गेले. त्यांमध्ये प्रेमानंदाचा पुत्र म्हणवणारा वल्लभ (सु. १७२४) आणि त्याचे शिष्य म्हणवणारे रत्नेश्वर (सु. १७००), धीरजी आणि सुंदर हे होत. साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेणारा ⇨शामळ (१७०० — ६५) हा कवी प्रेमानंदाप्रमाणेच व्यवसायाने कथेकरी होता पण आख्यानकवी नव्हता. त्याची कथाकाव्येही प्रेमानंदाहून वेगळ्या प्रकारची होती. पुराणातील धार्मिक कथांबरोबर संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि जुनी गुजराती यांच्या द्वारा समस्त गुजराती समाजात पसरलेल्या परंपरागत सांसारिक कथा त्याने घेतल्या, त्यांना अद्‌भूत रसाची जोड दिली व या कथाकविता आपल्या वाणीद्वारा प्रसृत केल्या. परंपरागत अशी अंगदविष्टि, रावण मंदोदरी संवाद  यांसारखी काव्ये त्याने लिहिली आहेत तथापि छप्पा काव्ये आणि सांसारिक जीवनाचे चित्रण करणारी कथाकाव्ये ही त्याची खास निर्मिती होय. प्रेमानंदासारख्या श्रेष्ठ कवीनंतर आलेल्या कवीने काही वेगळा प्रकार हाताळला नसता, तर त्याच्याकडे लक्ष जाणे शक्य नव्हते, हेही एक कारण शामळभट्टाने वेगळे क्षेत्र पसंत करण्यामागे असेल आणि त्याच्याइतका त्यानंतरचा श्रेष्ठ कवी तर आपण आहोतच अशी ईर्षाही त्याला कारणीभूत असेल म्हणूनच आपली काव्यवस्तू स्वतंत्र आहे आणि प्रेमानंदाची उसनवारीने घेतलेली आहे, असे सुचवणारी पंक्ती शामळने लिहिली आहे. पण शामळच्या कथा पूर्वीच्या जैन व इतर साहित्यांतील कथांची उसनवारी करणाऱ्या आहेत, हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.

सिंहुज गावच्या रविदास या श्रीमंत गृहस्थाने शामळच्या कथा व काव्ये ऐकली असावी आणि त्याच्या अंगच्या काव्यशक्तीने प्रभावित होऊन आपल्या गावी त्याला बोलावले. तेथेच शामळ चाळीस वर्षे राहिला, असे सांगतात. एखादा अद्‌भूत विषय कथारूपाने सादर करण्याचा अपूर्व नमुना शामळच्या सिंहासनबत्रीशी किंवा बत्रीस पुतळीनी  वार्ता या रचनेचा उल्लेख करता येईल. तसेच मदनमोहना  व विनेचटनी वार्ता  वगैरे कृतींमधून शृंगारनिर्मितीच्या त्याच्या शक्तीचा परिचय होतो. त्याच्या छप्प्यांमध्ये सांसारिक अनुभवाचे बोल विपुल आहेत तसेच त्या काळाला साजेसा स्त्रियांविषयीचा पूर्वग्रहही त्यांत बऱ्याच प्रमाणात आढळून येतो.

शामळ हा फार मोठा श्रेष्ठ कवी नसला, तरी कथाकथनाची त्याची शैली प्रभावी आहे. आजही गावोगावी सांगितल्या जाणाऱ्या कथांमध्ये शामळभट्टाने रचलेल्या कथांचे प्रमाण लहानसहान नाही. त्याची समस्यानिर्मितीची पद्धती, त्याची स्त्रीपात्रे, त्याचा उपरोध इत्यादींमुळे जनमानसाची जाण असलेला आणि त्याचे निरूपण करू शकणारा कथाकार म्हणून त्याला मध्ययुगीन कालखंडात मानाचे स्थान दिले जाते. त्याची शैली अगदी साधी, सरळ, रंजक व कथाकारांना साजेशी रसपूर्ण आहे.

शामळनंतरचा काळ : प्रेमानंद आणि शामळ यांनी आख्याने व कथाकाव्ये यांची जी सृष्टी निर्माण केली, तिची परंपरा चालवणारा कवी नंतरच्या काळात झाला नाही. पुन्हा एकदा भक्तिगीते निर्माण होऊ लागली पण येथेही दयारामसारखा महान कवी येईतो हा प्रवाह लहानलहान गीतांद्वाराच वाहत राहिला. या कवींमधील प्रमुख कवी पुढीलप्रमाणे : प्रीतमदास (सु. १७७४), नरभे राम (१७६८—१८५२), रत्नो (सु. १७३९), धीरो (१७५३—१८२५), निरांत भगत (१७७०—१८४६), भोजो भगत (१७८५ ? —१८५०) व रामायणाचा कर्ता गिरधर (१७८७—१८५२).

या सुमारास पुन्हा एकदा देशात अशांती वाढली. मराठ्यांनी आणि मुसलमानांनी गावेच्या गावे भरडून काढली. स्वाभाविकच लोकांचे लक्ष भक्ती व धर्म यांच्याकडे पुन्हा वळले. त्यांच्या मनात निराशा पसरली. या पार्श्वभूमीवर कविताही या प्रकारची निर्माण होणे स्वाभाविक होते. यात प्रीतमदासाचे कित्येक अमर चरण आहेत. धीरो कवीच्या ‘काफी’ (एक विशिष्ट काव्यप्रकार) आहेत, तसेच भोजो भगताच्या ‘चाबखा’ सुद्धा आहेत.

हे सर्व कवी ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. याबरोबर या काळात दुसरी एक ऐतिहासिक परंपरा सांगणारी कविता लिहिली जात होती. ती ⇨स्वामीनारायण पंथाच्या कवींची. त्यांचा मुख्य पुरुष सहजानंद स्वामी (१७८१ — १८३०) हा फार मोठा समाजसुधारक होता. त्याने समाजाच्या खालच्या थरात, काठी लोकात व कारागीर लोकात, आपल्या पंथाचा प्रसार केला. त्यातून गुजरातच्या समाजजीवनात एक नवाच प्रवाह वाहू लागला. त्याने त्याग व वैराग्य यांचा उपदेश करून चारित्र्यादी उत्तम गुणांवर विशेष भर दिला.

या परंपरेत मुक्तानंद (१७६१—१८२४), ब्रह्मानंद (१७७२—१८३२), प्रेमानंदस्वामी (१७७९—१८४५) व निष्कुलानंद (१७६६—१८४८) हे उल्लेखनीय कवी होऊन गेले. त्यांनी आपल्या काव्यांतून आणि आख्यानांतून आत्यंतिक भक्तीचा उपदेश केला. यांतील निष्कुलानंदाचे ‘त्याग नाटके रे वैराग्य विना’, हे पद प्रसिद्ध आहे.

या काळात जैन कवितेचा प्रवाहही आटला नव्हता. या परंपरेत लावण्यसमयने (ज. १४६५) विमल प्रबंध  नावाचे काव्य रचले आणि कुशललाभाने (ज. १५६०) माधवकामकुंडला रास  लिहिला. कवी समयसुंदरने (१५८०—१६४२) नलदवदंती रास (सु. १६१७) नावाचे सुंदर काव्य लिहिले आहे. तसेच नेमिविजय याने १६९४ मध्ये शीलवती रास  हे काव्य लिहिले. तथापि या संपूर्ण कालखंडात गुजरात खरोखर समर्थ अशा कवीची वाट पहात होता आणि असा कवी अखेर उदयास आला. त्याचे नाव ⇨दयाराम (१७७७—१८५२). त्याचे संपूर्ण नाव दयाशंकर पंड्या असे होते. कवी व भक्त या नात्यांनी दयाराम प्रसिद्धीस आला.

या सुमारास गुजरातमधील जीवनात असाधारण परिवर्तन झाले होते. यानंतरच्या लेखकांच्या निर्मितीवर याचा परिणामही झाला आहे पण दयारामची रचना या प्रभावापासून पूर्णपणे अलिप्त राहिलेली दिसते. म्हणूनच आता मध्ययुगीन कालखंडातील अखेरचा कवी म्हणून त्याला संबोधतात. मध्ययुगीन कालखंडातील अखेरचा कवी म्हणून त्याला संबोधतात. मध्ययुगीन कालखंडातील प्रेमभक्तिरूप कवितेचे विशेष तिच्या सर्व अंगोपांगांसह दयारामच्या निर्मितीत पुरेपूर प्रगट झालेले दिसतात. श्रीकृष्णाच्या या महान भक्ताने प्रेमाची अपूर्व गीते गायिली आहेत आणि गरबी व पदे यांच्या द्वारा शृंगार व भक्ती यांनी परिपूर्ण असा भावनाविष्कार केला आहे.

त्याचे जीवनही त्याच्या पदांप्रमाणेच शृंगारपूर्ण व रोमांचकारी आहे. त्याचे मूळ गाव चांदोद. कर्नाली येथे केशवदास नावाच्या एका गुरूचा त्याला सहवास घडला. तेथून तो डभोईला गेला. तेथे इच्छारामभटजी या थोर गुरूची भेट झाली आणि अस्थिर दयारामचे अवघे जीवनच बदलून गेले. त्याने धर्मशास्त्रांचा अभ्यास केला हिंदी, व्रज व संस्कृत भाषांचे अध्ययन केले शुद्धाद्वैताचे ज्ञान मिळविले हिंदुस्थानातील तीर्थक्षेत्रांची तीन तीन वेळा यात्रा केली. स्त्रियांबाबतची त्याची रसिकता जागीच राहिली असणार पण तो आजन्म अविवाहित राहिला.

आपल्या पंचाहत्तर वर्षांच्या आयुष्यात दयारामने विपुल लेखन केले. सत्यभामाख्यान, ओखाहरण आणि अजामिलाख्यान ही आख्याने लिहिली. काव्यद्वारा शुद्धाद्वैतवेदान्त मत प्रतिपादन करणारा रसिकवल्लभ हा ग्रंथ लिहिला.गीतामाहात्मही  रचले पण कवी म्हणून त्याची प्रतिभा चमकली ती त्याच्या गरबी काव्यात व पदांमध्ये. मध्ययुगीन कालखंडातील सर्वांत अधिक संवेदनाशील कवी कदाचित हाच असेल. त्याच्या रचनेतील माधुर्य प्रत्येक चरणांतील अंगोपांगांत दिसून येते. त्याच्या कवितेच्या चरणांत आणि पदांत इतके माधुर्य व गेयता आढळते, की आजही गुजराती स्त्रिया ती गरबी काव्ये मोठ्या आवडीने गात असतात. पण दयाराम अखेरपर्यंत भक्तच राहिला. चाळीस पंचेचाळीस वर्षांचे वय झाले असता रतनबाई नावाची एक शिष्या त्याला लाभली. उरलेले आयुष्य त्याने तिच्या संगतीत काढले. तिच्या सेवेस तो पात्र झाला. लोकलज्जेला घाबरेल, तर तो दयाराम नव्हे. त्याचा भक्त परिवार मोठा आणि कंठही सुरेल. याच सुरेल कंठाने मध्ययुगाचा वारसा सांगणारी असंख्य गीते गाण्यात तो रमला. नव्या युगाचा स्पर्श त्याच्या जीवनाला झाला असला, तरी कवितेमध्ये त्याने तो प्रकट केला नाही. अशीच भगवद्‌भक्ती करीत करीत व गीते गात गात त्याने डभोई येथे देह ठेवला. याबरोबर गुजरातमधील मध्ययुगीन कालखंडही संपला.

अर्वाचीन कालखंड : सुधारणा काल : दयारामाचा अंत आणि नव्या सुधारणा कालाचा उदय या घटना जवळजवळ समकालीन मानता येतील पण ह्या नव्या कालाच्या संभवशक्ती दयारामच्या जीवनकालातच निर्माण झाल्या होत्या. १८१८ मध्ये खडकीच्या युद्धानंतर ब्रिटिश सत्ता भारतात दृढ झाली होती मुंबईला स्वतःचे असे महत्त्व प्राप्त झाले होते आणि पश्चिम किनाऱ्यावरील भारतीय जनतेला पश्चिमी समाज आणि जीवन यांचा परिचय झाला होता. इंग्रजी शिक्षणानेसुद्धा या काळात मूळ धरले होते व नवे ज्ञान मिळविण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


बार्नेस साहेबाने १८२० मध्ये ‘बॉम्बे एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. तिच्या आश्रयाखाली मुंबई, सुरत व भडोच येथे शाळा स्थापिल्या. नंतर १८२७ मध्ये मुंबईला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली. त्यांचा उद्देश इंग्रजी भाषा आणि यूरोपीय कला, विज्ञान व साहित्य यांचे शिक्षण देणे हा होता. १८५८ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली.

या काळात मुंबईदेखील गुजराती व्यापार, शिक्षण व साहित्य यांचे महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे गुजराती जीवनात महत्त्वाचे बदल घडले. यूरोप आणि विशेषतः इंग्लंडमधील जीवन, विचार, इंग्रजी समाज व त्याची स्वातंत्र्याची आवड यांकडे येथील तरूण आकर्षित झाले. इंग्रजी कवी, साहित्यिक, विचारवंत यांच्या परिचयामुळे साहित्य आणि त्याची निर्मिती यांकडे बघण्याची दृष्टीच सर्वस्वी बदलून गेली. यानंतरचे साहित्य जुन्या पद्धतीने लिहिले जाणे शक्य नव्हते. जुने विचार आणि वृत्ती यांचा आविष्कार घडत राहणे असंभवनीयच होते.

नव्या युगाने नवे विचार निर्माण केले. नवा समाज व नवी संस्कृती यांच्या संपर्काने येथील जीवनात नवे संशोधन व नवी सुधारणा होण्यासाठी आवश्यक भूमिका तयार झाली. या नव्या सुधारणेची सुरुवात दुर्गाराम मेहताजींसारख्या सुरतच्या सुधारणावीरांकडून झाली. दुर्गाराम मेहताजी, महीपतीराम रूपराम व ⇨ करसनदास मूळजी (१८३२—७१) यांच्यासारख्या सुधारणावाद्यांनी ‘बुद्धिवर्धक सभा’ या संस्थेची स्थापना केली. १८२२ मध्ये मुंबई समाचार हे प्रसिद्ध दैनिकही सुरू झाले होते. सर्व भूमिका तयार होती. कोणीतरी समर्थ साहित्यिक आपल्या निर्मितीमध्ये व लेखनामध्ये हे सर्व परिणाम जिवंत करील, याची काळ वाट बघत होता.

नर्मद : कवी नर्मदच्या रूपाने गुजराती भाषेला असे साहित्यिक लाभले. त्यांचे संपूर्ण नाव नर्मदाशंकर लालशंकर दवे (१८३३—८६). सुरतमध्ये त्यांचा नागर ब्राह्मण कुळात जन्म झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशनमध्ये इंग्रजी शिक्षकाच्या हाताखाली शिकताना त्यांना कवितेची गोडी लागली. त्यांचे जीवन उत्साह आणि साहस यांनी भरलेले होते. वयाच्या सतराव्या वर्षी ⇨नर्मद यांनी मुंबईतच ‘जुवान माणसोनी अन्योअन्य बुद्धिवर्धक सभा’ स्थापन केली. स्वतःच तिचे प्रमुख बनले. ‘मंडळी मळवाथी यता लाभ’ या विषयावरील त्यांचे भाषण (१८५१) अर्वाचीन गुजराती भाषेतील पहिले गद्य लेखन म्हणून मानले जाते. याप्रमाणे त्यांनी अनेक चळवळी केल्या. त्यांनी एकट्याने गुजराती भाषेचा नर्मकोशनामक कोश तयार केला. बारा वर्षांच्या श्रमाने तो प्रसिद्ध केला. त्यांची नवी शैली, नवी धाटणी, नवे विषय आणि काव्यात संस्कृत शब्दांचा उपयोग यांमुळे त्यांचे नवे काव्य लोकांना समजत नव्हते. ते कळावे म्हणून त्यांनी हा कोश केला. पिंगल प्रवेशिका, अलंकार प्रवेशिका  आणि रस प्रवेशिका  अशी पुस्तकेही त्यांनी लिहिली. इतिहासलेखन केले. धर्मशास्त्राचे मंथन व त्याविषयी लेखनही केले. सुधारणेचे नेतृत्व करताना उद्‌भवलेल्या संघर्षात कधी जय कधी पराजय झाले पण ते लढत राहिले. यांनी नोकरी न करण्याची प्रतिज्ञा केली व स्वतःस लेखनाला वाहून घेतले पण पुढील आयुष्यात त्यांच्यावर प्रतिज्ञा मोडून नोकरी करण्याचा प्रसंग आला. त्यानंतर मात्र ते कधी हसले नाहीत.

त्यांनी केवळ अकरा वर्षे (१८५५ — ६६) बरीच कविता लिहिली तथापि त्यांनी कवितेची संपूर्ण धाटणीच बदलून टाकली आणि गुजराती साहित्यात अर्वाचीन युग सुरू झाले. त्यांनी इंग्रजी कवितेचा आस्वाद घेतला आणि त्यातील बरीच वळणे आपल्या कवितेत आणली. भावकाव्याचा पहिला आविष्कार त्यांच्या या कवितेत दिसतो. त्यांचे प्रेमकाव्य स्वतःचीच प्रेमकथा सांगणारे होते. पारंपरिक काव्याप्रमाणे राधाकृष्णाच्या प्रेमामागे ते लपलेले नव्हते. गुजरातीत सर्वप्रथम निसर्गकविता लिहिणारे कवीही तेच होत. वनवर्णन, ऋतुवर्णन वगैरे काव्ये यांपैकीच. शिवाय नर्मदमधील सुधारक यांच्या काव्यातही प्रकट झाला आहे. हिंदूओनी पडती हे काव्य याचा पुरावा होय. समाजाच्या वाईट चालीरीती, रूढींची गुलामी वगैरेंवर त्यांनी कठोर प्रहार केले. स्वदेशाभिमानाची गीते गायिली. ‘जय जय गरवी गुजरात’ हे त्यांचे गुजरात स्तोत्रासारखे काव्य आज अवघ्या गुजराती समाजात प्रादेशिक गीत म्हणून आवडीने म्हटले जाते.

नर्मद हे अर्वाचीन गुजराती भाव-भावनांचे उद्‌गाते असले, तरी त्यांची काव्ये काव्यगुणात कमी होती. कदाचित त्यात उत्साह अतिरेकाला पोहोचलेलाही आढळेल. त्यांच्या कवितांमधील भावनाही अप्रगल्भ होती. मनात खळबळणाऱ्या भावनांचा आविष्कार ही त्यांच्या काव्याची प्रेरक शक्ती होती. एका नव्या वळणाची कविता त्यांनी प्रकट केली. नर्मकाव्य  या ग्रंथात त्यांची संपूर्ण कविता आणिनर्मगद्यमध्ये त्यांचे गद्यलेखन प्रसिद्ध झाले.

नर्मद जितके उत्साही कवी होते तितकेच उत्साही जीवनवीरही होते. इंग्रजांच्या संपर्काने भारताची जी दुर्दशा झाली त्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी सुधारणेचे रणशिंग फुंकले. डांडिओ हे पत्रही त्यांनी त्यासाठी काढले. धर्मगुरूंशी व त्याच्या कर्मठ अनुयायांशी त्यांनी वादविवाद केला. अनेक सुधारणाकार्ये केली. विधवाविवाह झाले पाहिजेत असे जाहीर करून एक पत्नी हयात असताना एका विधवेशी त्यांनी स्वतःच विवाह केला. बरेच कष्ट सहन करून खडतर परिस्थितीतही ते अविचल राहिले. उत्तर आयुष्यात मात्र सुधारणेवर त्यांची तितकीशी श्रद्धा राहिली नाही. मुंबईच्या जीवनात ते सर्वत्र संचार करीत. मुंबईच्या सार्वजनिक जीवनातील त्यांचे स्थान जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी इत्यादींशी असलेल्या त्यांच्या संबंधांवरून स्पष्ट होते.

दलपतराम : नर्मदच्या जन्मापूर्वीच १८२० मध्ये दुसऱ्या एका प्रसिद्ध कवीचा जन्म झाला होता. अर्वाचीन काळाचा जन्मदाता नर्मद होता पण त्याचे पालनपोषण करून संवर्धन करणारा आणि निश्चित गतीने ध्येयाप्रत पुढे सरकणारा कवी ⇨दलपतराम डाह्याभाई (१८२०—९८) हा होय. सौराष्ट्रामधील वढवाण या शहरात त्यांचा जन्म झाला. स्वामीनारायण पंथातील देवानंद नावाच्या साधूच्या सहवासातून ईश्वरभक्तीचे तसेच सात्त्विकतेचे संस्कार त्यांच्यावर झाले. संस्कृत व व्रज भाषेचे ज्ञान व छंद, अलंकार आदींचे शिक्षणही त्यांना मिळाले. दलपतराम इंग्रजी शिकले नव्हते पण अलेक्झांडर किनलॉक फॉर्ब्स यांच्या मैत्रीमुळे त्यांच्यावर पाश्चात्त्य संस्कार चांगले झाले.

कविता लिहिणे तर दलपतरामांना सहज साधे. अगदी लहान वयापासून शामळभट्टाच्या शैलीची कविता लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली होती. लहान वयात दलपतरामांना प्रवासाची जी संधी मिळाली, त्यामुळे खूपच दूरवर व खोलवर पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली होती. त्यामुळेच उद्योग आणि कलाकुसर यांविषयी हुन्नरखाननी चढाई (१८५०) हे स्वदेशप्रेमाने ओतप्रोत भरलेले रूपकात्मक दीर्घकाव्य त्यांनी लिहिले आणि नर्मदकालातील उत्तम कथाकाव्य म्हणून मानले जाणारे वेन चरित्र (१८६८) हे वैधव्यविषयक सुधारणांवरील काव्यही प्रसिद्ध केले. १८४८ मध्ये फॉर्ब्स साहेबाने अहमदाबाद येथे स्थापन केलेल्या ‘गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी’ च्या कार्याशी ते संबंधित होते. फॉर्ब्स यांच्या मृत्युनंतर त्यांनी फॉर्ब्स विरह (१८६७) हे दीर्घ शोककाव्य लिहिले.

दलपतरामांचे सामर्थ्य या दीर्घ रचनांमध्ये नाही. ते आहे त्यांच्या लहान, उपदेशात्मक, नर्मविनोदी व मार्मिक अशा छोट्या छोट्या कवितांमध्ये. लहानलहान चुटकेवजा प्रसंग कवितेच्या माध्यमातून हास्यरसपूर्णतेने व कौशल्याने प्रकट करीत जाणे, ही त्यांची आगळी सिद्धी होती. त्यामुळेच ते लोकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविणारे कवी ठरले आणि त्यांच्या वंशजांना ‘कवी’ हे स्पृहणीय आडनाव लाभले. त्यांचे कित्येक हास्यरसपूर्ण चरण लोकांच्या हृदयांत आजही ठाण मांडून आहेत.  त्यांची ही स्फुट रचना दलपत काव्यात संगृहीत आहे.

ही कविता कदाचित उत्कृष्ट कविता नसेल पण ती एका नव्या युगाची द्योतक मात्र निश्चित आहे आणि त्यातून नव्या युगाच्या सर्व भावना प्रकट झालेल्या आहेत. नर्मदप्रमाणे दलपतराम अतिउत्साही व अतिरेकी नाहीत. देशभक्ती, समाजाबद्दलची तळमळ, स्त्रीदुःखाने द्रवणारे हृदय, यांची अभिव्यक्ती दलपतरामांच्या कवितेत आढळते. दलपतराम यांनी नर्मदप्रमाणे नाटकेही लिहिली आहेत. त्यांचे लक्ष्मी  नाटक (१८५२) हे ॲरिस्टोफेनीसच्या प्लूटूस  या ग्रीक नाटकाचे इंग्रजीवरून केलेले भाषांतर होय. मिथ्याभिमान हे त्यांचे नाटक उल्लेखनीय आहे. जीवराम भट्ट ही या नाटकातील व्यक्तिरेखा गुजराती भाषेत अमर होऊन राहिली आहे. दलपतपिंगल हा छंदशास्त्रावरील ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. नवलराम : दलपतरामांचा समकाली व नव्या युगाची अनेक अंगे आत्मसात करणारा समर्थ साहित्यिक म्हणजे ⇨नवलराम लक्ष्मीराम पंड्या (१८३६—८८). नवलरामांचा जन्मही सुरतेस झाला. प्रकृतीने व अभिरुचीने नर्मदहून वेगळे असूनही ते दोघे मित्र होते.

नवलरामांनी कविता लिहिल्या आहेत. त्यातील बऱ्याच कवितांत भेदक उपरोध ओतप्रोत भरलेला आहे. या काळातील बालविवाहाच्या चालीची विडंबनात्मक टिंगल त्यांच्याइतकी तीव्रतेने दुसऱ्या कुणा कवीने क्वचितच केली असेल.

बालगरबावली बाललग्न बत्रीशी  हे त्यांचे काव्यग्रंथ होत. या कविता आज मौल्यवान वाटणार नाहीत. नवलरामांनी नाटकेही लिहिली आहेत. वीरमती नाटक (१८६९) हे त्यांचे मौलिक नाटक होय. मोल्येरच्या ए मॉक डॉक्टर या नाटकाचे भट्‌टनु भोपाळूं  हे त्यांनी केलेले रूपांतर अत्यंत यशस्वी उतरले आहे.


हे सारे प्रयत्न चांगले आहेत पण सर्वांत महत्त्वाचे आहे ते त्यांचे समीक्षालेखन. नवलराम हे गुजरातीमधील पहिले व अतिशय समर्थ असे समीक्षक होत. त्यांनी उपस्थित केलेले अनेक मूलभूत प्रश्न आजही चर्चिले जातात. ही गोष्ट नवलरामांच्या दृष्टीतील मर्मग्राहिता व खोली यांची निदर्शक आहे. अठरा वर्षे नवलराम गुजरात शाळापत्र नावाच्या पत्राचे संपादक होते. त्यामुळे विपुल लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. १८७० मध्ये ते अहमदाबादच्या ‘मेल ट्रेनिंग कॉलेज’चे उपप्राचार्य आणि १८७६ मध्ये राजकोटच्या ‘मेल ट्रेनिंग कॉलेज’चे प्राचार्य झाले. या दोन्ही ठिकाणी त्यांनी विपुल वाचन, चिंतन व लेखन केले. १८९१ मध्ये गोवर्धनराम त्रिपाठींनी संपादित केलेल्या नवल ग्रंथावलीमध्ये हे सारे लेखन संगृहीत आहे. कविजीवन (१८८८) हे त्यांनी लिहिलेले नर्मदचे चरित्र हा उत्तम चरित्रलेखनाचा नमुना आहे. यांशिवाय व्युत्पत्तिपाठ (१८७२), निबंधरीति (१८८०) हे शास्त्रीय ग्रंथ व इंग्रज लोकनो संक्षिप्त इतिहास (१८८०—८७) हा महत्त्वपूर्ण ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. त्यांनी अर्वाचीन गुजराती गद्याची निर्मिती, जडणघडण व विकास केला आहे. हे गद्य प्रवाही आहे. ते साधे, सरळ आणि सुघटित आहे. विविध प्रकारे गद्य लिहिण्याचा मार्ग त्यांनी गुजराती भाषेला दाखविला.

कादंबरीलेखन : नवलरामांच्या गद्यलेखनाचा परिणाम म्हणजे सुरतेचे नंदशंकर तुलजाशंकर मेहता (१८३५—१९०५ ) यांनी १८६८ मध्ये लिहिलेली करण घेलो ही पहिली गुजराती कादंबरी. गुजरातीत कादंबरी लिहिण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले होते. महिपतराम रूपराम नीलकंठ (१८२६—९१) यांची सासु बहुनी लडाई ही कादंबरी १८६६ मध्ये प्रसिद्ध झाली होती पण हे अर्धेकच्चे प्रयत्न होते आणि त्यांत कलात्मकता मुळीच नव्हती. गुजरातचा अखेरचा हिंदू राजा करण वाघेला याची करण घेलो ही जीवनकथा आहे. या कथेत नंदशंकरांनी रोमांचकारी, प्रणयप्रधान जीवनदर्शन घडविले आहे. त्यासाठी या काळातील समाज आणि त्याची अनेक अंगे यांचा उपयोग केला आहे. या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असले, तरी नंदशंकर हे उत्तम प्रतीचे लेखक नसल्यामुळे त्यात उणिवा आहेत. हिची भाषा सुसंस्कृत व प्रतिष्ठित आहे. तिच्यात दीर्घ वर्णने आहेत व बऱ्याच ठिकाणी भाषा ओजस्वी आहे.

कदाचित करण घेलोच्या यशाने प्रेरित होऊन महिपतराम रूपराम नीलकंठ यांनी वनराज चावडो (१८८१) व सधराजे संग (१८९६) या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या पण त्या सामान्य आहेत. यापेक्षा त्यांचा उत्तम कपोळ करसनदास मूळजी हा गुजराती साहित्यातील पहिला चरित्रग्रंथ (१८७८) अधिक सरस आहे.

पारशी लेखक : या कालखंडातील कादंबरीलेखनात स्वतःचा स्पष्ट व सुंदर ठसा कुणी उमटवून ठेवला असेल, तर तो जहांगीर अरदेशर तल्यारखान (१८४६—१९२८) या पारशी लेखकाने. रत्नलक्ष्मी (१८८१) व कुलीन अने मुद्रा (१८८४) या त्याच्या दोन कादंबऱ्या प्रमाण गुजराती भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत व त्या कलाकृती म्हणूनही चांगल्या आहेत. केखुशरो नवरोजजी काबराजी (१८४२—१९०४) यांनीही अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्या साऱ्या पारशी — गुजरातीमध्ये लिहिलेल्या आहेत पण त्यांचाही खास असा वाचकवर्ग होता.

कादंबरीशिवाय इतर क्षेत्रांतही पारशी लेखकांनी आपले कर्तृत्व दाखविले. उदा., दादाभाई नौरोजींनी वृत्तपत्रसृष्टीत, सोराबजी शापुरजी बंगाली (१८३१—९३) यांनी स्फुट लेखनामध्ये, बेहरामजी मलबारी (१८६३—१९१८) यांनी कवितालेखनात, नानाभाई रुस्तमजी राणीना (१८३२— १९००) यांनी इंग्रजी-गुजराती शब्दकोशासारख्या उपयुक्त क्षेत्रात. १८४८ मध्ये पारशी गृहस्थांनी ‘ज्ञानप्रसारक मंडळी’ स्थापन केली होती. हरदूनजी मर्झबान आणि माणकेजी के. शापुरजी ‘मनसुख’ वगैरे उल्लेखनीय पारशी लेखकही होऊन गेले.

कांटावाला : हरगोविंददास द्वारकादास कांटावाला (१८४४—१९३१). यांच्या अंधेरी नगरीनो गंधर्व सेन (१८८१) या कादंबरीचाही उल्लेख येथे करायला हवा. या कादंबरीत देशी राजांसंबंधी औपरोधिक कथा आहेत. त्या काळाचे प्रत्यंतर या कादंबरीतून येते. संस्कृत शब्दांच्या ऐवजी देश्य शब्दांचा सप्रयोजक उपयोग हाही या कादंबरीचा एक विशेष होय पण यापेक्षा अधिक सामर्थ्य या कादंबरीत नाही. कांटावाला यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी संपादित केलेली प्राचीन काव्यमाला हे होय.

नाटके : याच काळात गुजरातीमध्ये नाटके लिहिण्यास सुरुवात झाली. ललितादुःखदर्शक नाटक (१८६६) हे अगदी मौलिक व अतिशय लोकप्रिय नाटक रणछोडदास उदयराम दवे (१८३१—१९२३) यांनी लिहिले. यापूर्वीच्या भवाईसारख्या नाटकांमधील बीभत्सतेला प्रतिष्ठित समाज कंटाळला होता. यावर पहिला घाव रणछोडभाईंच्या या व यापूर्वी लिहिलेल्या जयकुमारी, विजय (१८६१) या नाटकांनी घातला. लँबच्या टेल्स फ्रॉम शेक्सपिअरचा शेक्सपिअर कथासमाज (१८७८) हा अनुवाद करून त्यांनी गुजरातला शेक्सपिअरचा परिचय करून दिला. या कार्यात मणिभाई जशभाई (१८४४—१९००) व छोटालाल सेवकराम (१८४२—१९००) हे त्यांचे सहकारी होत.

छंदशास्त्र : रणछोडभाईंनी रणपिंगल हा छंदशास्त्रावरील मोठा ग्रंथ १९०२—०७ या कालावधीत पुरा केला. संस्कृत, प्राकृत, व्रजभाषा, फार्सी व गुजराती भाषांमधील छंदांचे व विशेषकरून चारण व भाट यांच्या लोकसाहित्यात प्रचलित असलेल्या छंदांचे उत्तम विश्लेषण या ग्रंथात केलेले आहे. यानंतर फॉर्ब्स साहेबांनी लिहिलेल्या रासमालेचाही अनुवाद त्यांनी केला आहे. यामध्ये राजस्थान व मेवाडमधील बऱ्याच ऐतिहासिक वीरकथा आहेत. रणछोडभाईंचे अनुवाद सरळ व सोपे आहेत.

इतर लेखक : यांशिवाय या कालखंडात प्रार्थनासमाजाचे एक संस्थापक व भक्तकवी भोळानाथ साराभाई (१८२२—८६), भाषाशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ व्रजलाल कालिदास शास्त्री (१८२५ — ९३), प्रखर समाजसुधारक आणि इंग्लंडमां प्रवास या पहिल्या प्रवासवर्णनपर ग्रंथाचे लेखक करसनदास मूळजी, अस्तोदयचे विद्वान लेखक मनसुखराम सूर्यराम त्रिपाठी (१८४०—१९०७) तसेच हीराचंद कानजी, शिवलाल धनेश्वर, गणपतराम राजाराम इ. कवीही होऊन गेले. यांच्या बरोबरीने भगवानलाल इंद्रजी (१८३८—८८) हे संशोधक व अंबालाल साकरलाल देसाई हे सामाजिक विचारवंतही या कालखंडातच होऊन गेले.

सुधारणा कालाचे कार्य : अशा रीतीने सुधारणायुगात अर्वाचीन गुजराती साहित्याचे पहिले दर्शन झाले, पहिली कादंबरी लिहिली गेली तसेच नाटक, आत्मचरित्र, चरित्र वगैरे अनेक क्षेत्रांतील पहिल्या कृती निर्माण झाल्या आणि पुढे स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या साहित्याचा पाया घातला गेला. या कालखंडात धर्माविषयी मनन व चिंतन झाले, सुधारणेकडे यथार्थ स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न झाला, इंग्रजी व संस्कृत साहित्य चांगल्या रीतीने समजून घेण्याचा व त्याचे विवरण-विवेचन करण्याचा फार मोठा प्रयत्न झाला. परदेशप्रवासाची चाल सुरू झाली व त्यासंबंधी ग्रंथरचनाही झाली. गुजराती रंगभूमीला स्थैर्य आले, नाटकमंडळ्यांची स्थापना झाली, वर्तमानपत्रे निघाली, मुंबई समाचार तर १८८२ मध्ये सुरू झाले, ‘ज्ञानप्रसारक मंडळी’ची स्थापना झाली, ‘बुद्धिवर्धक मंडळी’ निघाली, बुद्धिप्रकाशसारखे मासिकही या कालखंडातच प्रसिद्ध होऊन गेले.

पंडित काल : पंडित कालातील यशाचा पाया सुधारणा कालातच घातला गेला होता पण सुधारणा कालात ज्या विभागांचा आरंभ झाला ते सारे पंडित कालाच्या आरंभापर्यंत दृढमूल आणि स्थिर पायावर उभे राहिले होते. मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५८ मध्ये झाली पण त्याद्वारा मिळणाऱ्या शिक्षणाचे व ज्ञानाचे संस्कार आपल्या बुद्धीवर, सामर्थ्यावर व सर्जनशीलतेवर होऊन त्याचा सुंदर परिणाम या कालखंडाच्या शेवटी म्हणजे पंडित कालाच्या सुरुवातीला दिसणे शक्य झाले. शिवाय सुधारणा कालात सुरुवातीला जे प्रश्न प्रखरतेने पुढे ठाकले त्यांची प्रखरता पंडित कालाच्या आगमनापर्यंत नाहीशी झाली होती व त्यासंबंधी शांतपणे विचार करणे शक्य झाले होते. याचा फायदा पंडित कालासच मिळाला. सुधारणा कालाच्या सुरुवातीचे कार्य इंग्रजी भाषेच्या अर्ध्यामुर्ध्या ज्ञानाने दिपलेले होते पण पंडित कालाच्या आरंभालाच इंग्रजी आणि संस्कृतमधील खोल व विस्तृत ज्ञानाचा फायदा मिळाला. शिवाय १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊन इंग्रजी राज्याचे दुष्परिणामही जाणवू लागले होते. अशा रीतीने या कालातच स्वदेशभक्तीची भावना अंकुरावी हे स्वाभाविक होते.

युगप्रवर्तक अशी दोन पुस्तके १८८७ मध्ये प्रसिद्ध झाली. पहिले कुसुममाळा हे लहानसेच काव्याचे पुस्तक आणि दुसरे सरस्वतीचंद्र (भाग पहिला). पहिले पुस्तक ⇨नरसिंहराव भोळानाथ दिवेटिया (१८५९—१९३७) यांनी व दुसरे ⇨गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी (१८५५—१९०७) यांनी लिहिले. या दोन्ही पुस्तकांनी आपापल्या परीने गुजराती साहित्याचा कायापालट केला. कुसुममाळा थोड्याशाच कवितांचा संग्रह होता पण त्याचे स्वरूप, शैली, भाषा व पद्धती यापूर्वीच्या गुजराती कवितेहून सर्वस्वी भिन्न होती. इंग्रजीतील ‘लिरिक’ सारखे यांचे स्वरूप होते, कुसुममाळाच्या आधीची कविता बहुतेक त्यावेळी प्रचलित असलेल्या देशी रचनाप्रकारांत आणि वृत्तांमध्ये लिहिली जात होती. कुसुममाळापासून संस्कृत वृत्तांमध्ये कविता लिहिण्यास सुरुवात झाली. कुसुममाळाबरोबर गुजराती कविता वेगळ्याच दिशेने जाऊ लागली. या काळातील मान्यवर टीकाकारांनी ही गोष्ट मान्य केली आहे.

कुसुममाळामुळे पद्यलेखनाच्या क्षेत्रात जे परिवर्तन घडले तसेचसरस्वतीचंद्रच्या पहिल्या भागामुळे गद्यलेखनामध्ये घडले. लेखनातील प्रौढता, अनेक प्रकारे प्रासादिकतेद्वारा प्रकट होणारी गद्याची शक्ती, व्यक्तिरेखांची विविधता, समस्यांचे विश्लेषण, समाजस्थितीचे केवळ निरूपणच नव्हे, तर समाजाविषयीचे सखोल चिंतन, तात्त्विकता, लेखकाचा इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास आणि स्वतंत्र चिंतन यांमुळे सरस्वतीचंद्र ही कादंबरी एक युगप्रवर्तक साहित्यकृती ठरली. नरसिंहराव यांनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाची कामे केली तसेच या पंडित कालाला ‘गोवर्धनयुग’ म्हणावे इतके मोठे कार्य गोवर्धनराम यांनी केले.

सरस्वतीचंद्रचा पहिला भाग १८८७ मध्ये प्रसिद्ध झाला व अखेरचा चौथा भाग १९०१ मध्ये प्रसिद्ध झाला. पुढे १९०७ मध्ये गोवर्धनराम मृत्यू पावले. गोवर्धनराम त्रिपाठी हे नडीयादचे नागर ब्राह्मण. ते एम्.ए., एल्एल्.बी. होते. त्यांचा व्यवसाय वकिलीचा होता. राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, साहित्यसाधना अशा विविध क्षेत्रांत त्यांचे सामर्थ्य प्रकट होत होते. ते वत्सल पिता होते. आपली मुलगी लीलावती हिच्या मृत्यूनंतर त्यांनी लीलावती जीवनकळा (१९०५) हे तिचे चरित्र लिहिले.

त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. काहीसे क्लिष्ट व दुर्बोध असे स्नेहमुद्रा (१८८९) हे त्यांचे दीर्घ कथाकाव्य आहे. त्यातील निसर्गवर्णन चांगले आहे. नवल जीवन (नवलराम लक्ष्मीरामची जीवनकथा, १८९१), दयारामनो अक्षर देह (१९०८) हे गोवर्धनराम यांचे ग्रंथ म्हणजे साहित्यिकांचे जीवन आणि त्यांची साहित्यनिर्मिती यांचा त्या त्या लेखकाचे जीवनचित्र रेखाटनात किती सार्थ उपयोग करून घेता येतो, याची उदाहरणे होत. १९१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या साक्षर जीवन या ग्रंथातून त्यांचे याविषयीचे चिंतन किती सखोल होते आणि त्यांनी स्वतःसमोर किती उच्च आदर्श ठेवले होते, याचे प्रत्यंतर येते.


गोवर्धनराम यांच्या साहित्यनिर्मितीत सरस्वतीचंद्र हीच कृती सर्वश्रेष्ठ होय. प्रेमकथेद्वारा सांगितलेली ही संस्कृतिकथाच होय. तीत गोवर्धनराम यांनी आपले एक संपूर्ण भावविश्व उभे केले असून सरस्वतीचंद्र, कुमुद, कुसुम, गुणसुंदरी वगैरे तिच्यातील व्यक्तिरेखा गुजराती भाषेत अमर झाल्या आहेत. जीवनाच्या सर्व बाजूंचे चित्रण तीत आले आहे.

भाषणशास्त्राचा उदय : नरसिंहराव यांच्या कुसुममाळा (१८८७), हृदय वीणा (१८९६) आणि नुपूर झंकार (१९१४) या काव्यसंग्रहांद्वारा साहित्यात एका नव्याच वळणाच्या कवितेची भर पडली आहे. तसेच आपल्या मुलाच्या मृत्यूवर लिहिलेली स्मरणसंहिता (१९१५) ही ‘विलापिका’ या प्रकारातील काव्याचा गुजरातीतील एक उत्कृष्ट नमुना होय.

ते केवळ कवीच नव्हते. त्यांनी व्रजलाल शास्त्री यांचे व्युत्पत्तिशास्त्राविषयीचे उत्सर्गमाळा हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर, मुंबई विद्यापीठाच्या ‘विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स’ ह्या मालेत १९२१ मध्ये जी व्याख्याने दिली, ती पुढे दोन भागांत (१९२१—१९३२) प्रसिद्ध झाली. या व्याख्यानांनी भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाचा पाया गुजरातीमध्ये घातला गेला.

त्यांनी विवेचनात्मक व समीक्षणात्मक बरेच लेखन केले. मनोमुकुर या नावाने चार भागांत (१९२४ ते ३८) त्यांचे हे लेखन प्रसिद्ध झाले आहे. जीवनातील समृद्ध स्मृतींची नोंद त्यांच्या स्मरणमुकुर (१९२६) या ग्रंथात पहायला मिळते. तसेच विवर्तलीला (१९३२) या ग्रंथातील लेखांमधून त्यांचे जीवनविषयक चिंतन आढळते.

गोवर्धनराम यांच्याप्रमाणे नरसिंहराव यांनीही दैनंदिनी लिहिली आहे. तिचे संपादन करून रामप्रसाद बक्षी व धनसुखलाल मेहतांनी नरसिंहराव नी रोजनिशी (१९५३) या नावाने ती प्रसिद्ध केली. तिच्यातून एका सज्जन, सत्यवक्ता, निर्भय, धर्मप्रिय व भावनाप्रधान माणसाचे सुंदर व्यक्तिमत्त्व आविष्कृत होते.

समीक्षक या नात्याने त्यांनी खूप वाद केले. या वादांतून निर्भयता, खोली, मर्मग्राहीपणा वगैरे अनेक वैशिष्ट्यांचे स्पष्ट दर्शन होते. अभिनय कला हा एक लहानसाच ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. यावरून किती निरनिराळ्या विषयांत त्यांची गती व अभिरुची होती, हे दिसून येते.

इतर लेखक : कुसुममाळा कृतीच्याही पूर्वी बालाशंकर उल्लासराम कंथारिया (१८५८—९८) यांनी आपले क्लांतकवि (१८८५) हे काव्य लिहिले पण या युगाच्या ‘नव्या’ कवितेचे बरेच विविध नमुने सर्वप्रथम सादर केले ते नरसिंहराव यांनीच. बालाशंकर यांची दुसरी महत्त्वाची निर्मिती म्हणजे ‘गझल’ रचना. हरिप्रेम पंचदशी (१९०७) या नावाने अशा पंधरा गझलांचा गुच्छ प्रसिद्ध झालेला आहे. गुजरातची जनता बालाशंकर यांना ‘मस्त’ कवी म्हणून ओळखते याचे कारण या कवितांमधील धुंदीच्या छटा होत. इराणी प्रकारच्या या कवितांमध्ये सूफी रंग भरलेले आहेत. बालाशंकर यांची कविता आणि तिची आस्वादात्मकता यांनी प्रेरित होऊन उमाशंकर जोशी यांनी क्लांतकवि या नावाचा अभ्यासग्रंथ १९४२ मध्ये प्रसिद्ध केला आहे.

हरि हर्षद ध्रुव (१८५९—१९३८) हेही अर्वाचीन पंडितयुगातील एक आरंभीचे लेखक होते. कुसुममाळाच्या आधी यांच्याही काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी प्रेमकाव्ये तसेच वीररसात्मक काव्ये लिहिली आहेत. कुंजविहार हा त्यांचा कवितासंग्रह. नरसिंहराव यांचे बंधू भीमराव हे सुद्धा या काळात कविता लिहीत.

मणिलाल : या काळाच्या थोर व्यक्तींमध्ये तत्त्वज्ञ, कवी, नाटककार, विचारवंत, समाजहितचिंतक अशा

मणिलाल नभुभाई द्विवेदी (१८५८ — ९८) यांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. चाळीस वर्षांच्या अल्पायुष्यातच त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. तत्त्वचिंतनपर असे त्यांचे लेखन इतके पायाभूत आहे, की आनंदशंकर यांच्यासारख्या प्रकांड पंडिताने त्यांना ‘अद्वैत मार्गाचा प्रवासी’ म्हटले आहे. त्यांचे या प्रकारचे लेखन सुदर्शन गद्यावलि (१९०९) या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. धर्म, गृह, राज्य, साहित्य यांचे स्वरूप आणि संबंध यांविषयीचे विचार मणिलाल आपल्या सुंदर गद्यशैलीत मांडतात. मणिलाल यांचे गद्य म्हणजे गुजरातीमधील उत्तम गद्यशैलीचा नमुना होय. सिद्धांतसार (१८९५) हा त्यांचा तत्त्वचिंतनपर उत्तम ग्रंथ होय. त्यांनी समाजचिंतनही खूप केले होते. स्त्रियांच्या स्थितीविषयी त्यांनी बराच विचार केला होता. नारीप्रतिष्ठा (१८८४), चारित्र (१८९४) हे या प्रकारच्या लेखनाचे उत्तम नमुने होत. शिवाय त्यांचे मौलिक लेखन म्हणजे कान्ता (१८८२) हे नाटक. या आधीच्या रणछोडभाई उदयराम यांच्या नाटकात मणिलाल यांच्या नाटकातील कलात्मकता व काव्यात्मकता आढळत नाही. आजही कान्ता पहिल्या दर्जाचे नाटक समजले जाते. मालतीमाधव  व उत्तररामचरित यांची भाषांतरे त्यांनी केली. उत्तररामचरितची इतर चांगली भाषांतरेही नंतर झाली आहेत पण मणिलाल यांच्या भाषांतराची श्रेष्ठता आजही कायम आहे.

मणिलालनी कविता थोड्याच लिहिल्या पण त्यांतही त्यांची उत्तम दर्जाची सर्जनशक्ती दिसून येते. त्यात प्रेमजीवन (१८९७) हे काव्य आणि आत्मनिमज्जन (१८९५) हा काव्यसंग्रह यांचा समावेश होतो. आत्मनिमज्जनमध्ये कित्येक उत्तम कविता आहेत. त्यातील ‘प्रेमनी झलक आज छाई रे’ ह्या कवितेची गणना गुजरातीतील उत्तम कवितेत केली जाते. मणिलालनी कादंबरी लिहिली नाही पण त्या काळी प्रख्यात असलेल्या बुल्वर लिटन यांच्या झेनोनी कादंबरीचे गुलाबसिंह (१८९७) या नावाने केलेले रूपांतर त्यांच्या अनुवादकौशल्याची साक्ष देते. त्यांचे स्वतःचे खाजगी जीवन भ्रष्ट होते व याची त्यांना जाणीवही होती. या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिल्या आहेत पण ही दैनंदिनी अजून प्रसिद्ध झालेली नाही.

मणिलाल हे थोर संपादकही होते. १८८५ मध्ये त्यांनी प्रियंवदा हे मासिक सुरू केले. यात बहुतेक स्त्रीविषयक लेखन प्रसिद्ध होत असे. यानंतर १८९० मध्ये त्यांनी सुदर्शन काढले. मणिलाल यांच्या मृत्यूनंतर आनंदशंकर ध्रुव तसेच मणिलाल यांचे बंधू माधवलाल यांनी हे मासिक कित्येक वर्षे चालविले.

अनुवाद व संशोधन : मणिलाल यांनी ज्याप्रमाणे संस्कृतमधून अनुवाद केले तसेच ⇨केशवलाल हर्षदराय ध्रुव (१८५९ —१९३८) यांनी संस्कृतमधून भास, कालिदास, हर्ष, विशाखदत्त आणि अमरू यांच्यासारखे कवी आणि जयदेवासारखा भक्त कवी यांच्या कृतींचे चांगले अनुवाद केले. या चांगल्या अनुवादांशिवाय के. ह. ध्रुव यांनी आणखी एक पायाभूत काम केले, ते म्हणजे पद्यरचनानी ऐतिहासिक आलोचना (१९३२) हा त्यांचा ग्रंथ. या ग्रंथाचे मोल चिरस्थायी आहे. यांशिवाय भालणनी कादंबरीनो पूर्वभाग (१९१६) ही सटीक आवृत्ती आणि पंदरमा शतकनां प्राचीन गुर्जर काव्यो हा अभ्यासग्रंथ. यांमुळे पंडित कालातील साहित्यिकांमध्ये के. ह. ध्रुव यांचे स्थान मानाचे आहे.

इतर अनुवादक : या काळातील इतर अनुवादकांमध्ये कादंबरीचा भाषांतरकर्ता छगनलाल हरिलाल पंड्या व शांकुतलचा अनुवादक झवेरीलाल उमियाशंकर याज्ञिक यांची नावे घेता येतील. किलाभाई घनश्याम यांचे मेघदूताचे भाषांतर या काळातील उल्लेखनीय कृती होय. याशिवाय नानालाल, बळवंतराय क. ठाकोर आणि इतर लेखक यांनीही संस्कृतमधून भाषांतरे केली. यानंतर अलीकडच्या काळातही भाषांतराची परंपरा चालू आहे. उमाशंकर जोशी यांनी शांकुतलउत्तररामचरित आणि सुंदरम् यांनी मृच्छकटिक ही भाषांतरे केली आहेत.

इंग्रजीतूनही गुजरातीमध्ये अनुवाद झालेले आहेत. शेक्सपिअर, सर वॉल्टर स्कॉट, कर्नल मेडोज टेलर, मिसेस हेन्‍री वुड, प्रा. बेन, लीओ टॉलस्टॉय, हेन्री जेम्स, नॉथॅन्येल हॉथॉर्न, चेकॉव्ह, अर्नेस्ट हेमिंग्वे, इब्सेन इ. अनेक प्रख्यात लेखकांच्या कृतींचे अनुवाद आजपर्यंत गुजरातीत झालेले आहेत. हे अनुवाद भोगींद्रराव दिवेटिया, विश्वनाथ भट्ट, मनसुखलाल झवेरी, गुलाबदास ब्रोकर, चंद्रवदन मेहता, रमेश जानी इ. गांधीयुगातील लेखकांनी आणि मधुराय, सुरेश जोशी, हरिंद्र दवे यांच्यासारख्या आजच्या युगातील लेखकांनी केले आहेत.

पंडित कालातील महारथी : गोवर्धनराम, नरसिंहराव व मणिलाल यांच्यानंतर कान्त, कलापी, बळवंतराय, नानालाल वगैरे साहित्यिक या काळात होऊन गेले. यांपैकी ⇨कान्त (१८६७—१९२३) यांचे पूर्ण नाव मणिशंकर रत्नजी (रतनजी) भट्ट. त्यांचा पूर्वालाप (१९२४) हा एकमेव काव्यसंग्रह असून तो अद्वितीय आहे. गुजराती कवितेचे उत्तम स्वरूप या संग्रहात सापडते. गुजराती भाषेचे लालित्य व ओज यांची त्यांच्या काव्यातील अभिव्यक्ती आणि संस्कृत छंदांवरील त्यांचे प्रभुत्व, एक नानालालचा अपवाद वगळता, इतर कोणातही आढळत नाही. त्यांनी आपल्या मधुर, कोमल, ‘कान्त’ पदावलीने काव्यरसिकांची हृदये जिंकून घेतली. त्यांनी मधुर व प्रतिष्ठित भाषेत खंडकाव्ये निर्माण केली. ही खंडकाव्ये एखाद्या कथेभोवती गुंफलेली आहेत आणि त्यांतील भावनांनुरूप भिन्नभिन्न छंदांचा उपयोग केलेला आहे. त्यांच्या काव्याचा एकूण गोफच अतिशय रमणीय आहे. कथेच्या प्रवाहाबरोबर जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या प्रवाहाचे मर्म अत्यंत कलात्मकतेने त्यांनी व्यक्त केले आहे. या खंडकाव्यांत वसंत विजय, चक्रवाकमिथुन, अतिज्ञान आणि देवयानी ही प्रमुख होत. जीवनातील कारुण्य आणि दैवी क्रौर्य यांचे आणि त्यांवर अवलंबून असलेल्या विषादयुक्त मानवी जीवनाचे अत्यंत रमणीय चित्र त्यांत त्यांनी चितारले आहे.

खंडकाव्यातील हे कारुण्य कान्तांच्या जीवनातही होते. काही काळ ते ख्रिस्ती धर्मविचारात खूपच रमले होते. त्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षाही घेतली होती पण कुटुंबीय व मित्र यांची मने ते दुखवू शकले नाहीत. परिणामी ते परत हिंदू धर्मात आले. ख्रिस्ती विचार, पद्धती आणि उपदेश यांचा परिणाम त्यांच्या जीवनावर अखेरपर्यंत राहिला. त्यांच्या खंडकाव्यांशिवाय इतर काव्यांवर हा परिणाम दिसतो. काव्याव्यतिरिक्त कान्तांनी बरेच लेखन केले. शिक्षणनो इतिहास (१८९५) हा ग्रंथ, रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे गुजराती भाषांतर (१९१९), रोमन स्वराज्य (१९२४) आणि गुरुगोविंदसिंह (१९२४) ही दोन नाटके आणि कान्तांच्या अंतरंगाचे पडसाद ज्यात आहेत ते पत्रधारा (१९२४) हे गद्यलेखन यांचा त्यात समावेश होतो.


रमणभाई  नीलकंठ : कान्त तर गेले, पण कॉलेजमधला त्यांचा मित्र, सुधारणेचा ज्वलंत कैवारी, टीकेमधील ज्ञानी, नाटककार, कवी आणि भद्रंभद्र (१९००) हा गुजरातीतील आद्य विनोदी ग्रंथ लिहिणारे ⇨रमणभाई महिपतराम नीलकंठ (१८६८—१९२८) हे कविता अने साहित्य हा टीकाग्रंथ चार भागांत प्रसिद्ध करीत होते (१९२६—२९). त्यांचे सारेच लेखन महत्त्वपूर्ण आहे. रमणभाईंनी कविता फारशा लिहिल्या नाहीत पण ज्या थोड्या लिहिल्या त्या सुंदर आहेत. त्यांचे मुख्य लेखन टीकाक्षेत्रातील आहे. यांशिवाय ते ज्वलंत समाजसुधारणावादी होते. ते प्रार्थनासमाजी होते. स्त्रीसुधारणेसाठी ते झटत होते. या काळात अहमदाबादेमध्ये चालू असलेल्या भोंदूगिरीचे त्यांनी केलेल्या सूक्ष्म अवलोकनातून निर्माण झालेले विनोदी लेखन त्यांच्या भद्रंभद्र या कृतीमध्ये आहे. समाजाच्या दंभावर त्यात औपरोधिक टीका आहे.

एका बाजूस ते विनोदाद्वारे सुधारणेचा प्रसार करीत होते, तर दुसऱ्या बाजूने गुजराती साहित्यात चिरस्थायी ठरलेल्या राईनो पर्वत (१९१४) या आपल्या नाटकाद्वारे सुधारणेचा वेगही वाढवीत होते. या नाटकातून त्यांची उच्च नीतिमत्ता, स्त्रियांच्या स्थितीविषयीची त्यांची कळकळ यांचे स्पष्ट आणि सुंदर दर्शन होते.

ते कृतिशील समाजसुधारक होते. त्यांची पत्नी विद्यागौरी व त्यांची बहीण शारदा या गुजरातमधील पहिल्या पदवीधर महिला होत्या. त्या रमणभाईंना त्यांच्या समाजकार्यात सक्रिय साहाय्य करीत. रमणभाईंच्या हास्यमंदिर (१९१५) या लेखसंग्रहामध्ये ह्या साहाय्याचे स्पष्ट दर्शन होते. विद्यागौरी स्वतः चांगल्या लेखिका होत्या.

याशिवाय ज्ञानसुधा या पत्राचे त्यांनी केलेले संपादन ही एक संस्मरणीय गोष्ट होय. या पत्रातून त्यांनी साहित्यातील कूटप्रश्नांची आणि अनेक वादांची चर्चा केली. विचारांना स्पष्टता येण्यासाठी या चर्चांची खूपच मदत झाली.

बळवंतराय आणि अर्थघन कविता : याच काळातील तिसरे श्रेष्ठ साहित्यिक ⇨बळवंतराय कल्याणराय ठाकोर (१८६९—१९५०) हे होत. साहित्यक्षेत्रात मैत्री हा एक अगदी दुर्मिळ विशेष होय. अशी दुर्मिळ मैत्री कान्त व बळवंतराय ठाकोर यांच्यामध्ये होती. गुजराती कवितेला त्यांच्या या मैत्रीने खूप चांगले रूप दिले. ते भडोचचे राहणारे. कॉलेजमध्ये असतानाच कान्तांची व त्यांची मैत्री झाली व ती पुढे दीर्घकाळ टिकली.

इंग्रजीमधील ‘सॉनेट’ हा काव्यप्रकार बळवंतराय यांनी गुजरातीत रूढ केला. त्यांनी सुंदर कविताही लिहिल्या व त्यासंबंधी खूपच चिंतन व मनन केले. नरसिंहराव वगैरेंनी कवितेविषयी जे विचार मांडले होते, त्यांपेक्षा बळवंतराय यांच्या कवितेचे स्वरूप अगदीच निराळे होते. कविता अर्थघन असायला हवी, हा विचार त्यांनी काव्यविवेचनात सुरू केला व त्यानंतरच्या गांधी कालातील उमाशंकर, सुंदरम् वगैरे थोर कवींवर या विचाराचा परिणाम दीर्घकाळ टिकून होता. त्यांनी कवितेच्या छंदांमध्ये प्रवाहीपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि गुजराती कवितेत एक नवी दृष्टी आणली. त्यांच्या काळातील तसेच नंतरच्या कवींनीही निरनिराळ्या प्रकारच्या प्रवाही छंदांचे प्रयोग केले होते पण यासंबंधी प्राथमिक कार्य बळवंतराय ठाकोर यांनीच केले यात वाद नाही. याआधी के. ह. ध्रुव यानी ‘वनवेली’ या छंदाचा प्रयोग केला होता पण बळवंतराय यांच्या ‘पृथ्वी’ वृत्ताची लोकप्रियता गुजराती काव्यात गेली अनेक वर्षे टिकून आहे.

त्या काळातील कवितेच्या मानाने ही कविता शैली, रीती व अभिव्यक्ती यांबाबत इतकी वेगळी होती, की तिला कडवा विरोध झाला. त्याकाळात ती दुर्बोधही वाटली. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह भणकार १९१७ मध्ये प्रसिद्ध झाला. १९४२ मध्ये त्यांनी स्वतःच भणकारधारा १ अने २ आणि म्हारां सॉनेट या व इतर कृती असलेली नवी आवृत्ती प्रसिद्ध केली. कवितेबाबत ते सतत प्रयोग करीत होते. ‘द्विजोत्तम ज्ञातिनी कविता’ प्रकट करणारा कवी म्हणून त्यांचा नेहमी गौरव होत राहिला. त्यांच्या शैलीची तुलना समीक्षकांनी ‘नारिकेल पाका’शी केली आहे. या कवितांमध्ये प्रेमनो दिवस ही सुनीतमाला अपूर्व आहे. शब्दाशब्दाचा इतका विचारपूर्वक उपयोग आणि इतकी विशिष्ट भावघनता यांचा मेळ उत्कृष्ट कवितेतच होऊ शकतो.

त्या काळातील व नंतरच्या काळातील कवितेचे एक चांगले संपादन आणि आपणी कवितासमृद्धि (१९३१ व १९३९) या पुस्तकांत केले आहे. यांत कवितांविषयी विवरणही त्यांनी केले आहे. आपले मित्र कान्त यांच्या स्मरणार्थ कान्तमाला (१९२४) नावाचे पुस्तक त्यांनी संपादित केले. टीकाग्रंथांमध्ये कविताशिक्षण (१९२४), लिरिक (१९२८) आणि पंचोतेरमे (१९४६) यांतील लेखन विशेष महत्त्वाचे आहे. यांशिवाय दर्शनियुं (१९२४) हा लघुकथांचा संग्रहही प्रसिद्ध केला आहे.उगती जुवानी (१९२३) व लग्नमां ब्रह्मचर्य (१९२८) ही त्यांची नाटके. स्क्वेअरिंग द सर्कल या रशियन नाटकाचे सोविएट नव जुवानी हे भाषांतरही त्यांनी केले आहे. काही संस्कृत नाटकांचे अनुवादही केले आहेत.

बळवंतराय ठाकोर हे इतिहासाचे प्राध्यापक होते. इतिहास दिग्दर्शन (१९२८) या नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे पण त्यांचे मुख्य कार्य म्हणजे कवितालेखन व अध्यापन.

कलापी : बळवंतराय यांच्या कवितेत पाषाणाची घनता आहे, तर ⇨कलापी (१८७४—१९००) यांच्या कवितेत नदीची प्रवाहिता आहे त्यांचे नाव सूरसिंह तख्तसिंह गोहील. सौराष्ट्रातील लाठी या लहानशा राज्याचे ते ठाकूर होते. त्यांच्या काव्यात सफाई अल्पच आहे पण त्यातील भावनेचा आवेग इतका जबरदस्त आहे, की आजही कवितावाचनास लोक त्यांच्याच कवितेपासून सुरुवात करतात. कलापीनो केकारव (१९०३) या नावाने त्यांची समग्र कविता तसेच त्यांच्या काही पत्रांचा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला पण त्यांचा जीवनाविष्कार करणारी हृदयत्रिपुटी व इतर कविता यांच्या द्वारा गुजराती वाचकाने मन त्यांनी पूर्वीच आकर्षून घेतले होते.

कवितेशिवाय कलापींनी सुंदर गद्यही लिहिले आहे. काश्मीरनो प्रवास (१९१२) हा ग्रंथ उत्तम गद्याचा एक नमुना आहे तसेच कलापीना १४४ पत्रो (१९२५) हा पत्रसाहित्याचा उत्तम नमुना आहे. त्यांची बिल्वमंगल, भरत वगैरे दीर्घकाव्ये व उडित्रतां पंखीडाने वगैरे लघुकाव्ये खूप प्रसिद्ध आहेत, मणिलाल, कान्त, गोवर्धनराम वगैरे लेखकांशी असलेली त्यांची मैत्री व पत्रे यांतून त्यांची सुसंस्कृत अभिरुची दिसून येते.

नानालाल (न्हानालाल) : गुजराती जनतेने ज्यांचा हयातीतच खूप सन्मान केला आणि स्वतःच्या हृदयात स्थान दिले ते कवी ⇨नानालाल (१८७७—१९४६) होत. कवी दलपतराम यांचे हे पुत्र. दलपतराम शांत, सुस्थिर वृत्तीचे, तर नानालाल जणू काय भावनेचा सागर. त्यांच्याइतकी ऊर्मिशाली व भावपूर्ण कविता थोड्याच कवींनी लिहिली असेल. त्यांच्याइतका ‘वसंततिलका’ आणि ‘अनुष्टुभ’ यांचा प्रभावी वापरही फारच थोड्या कवींनी केला असेल. दयारामनंतर ऊर्मिशाली व मानवी हृदयातील आंदोलनाचे कढ व्यक्त करणारी गीते नानालाल यांनीच प्रथम लिहिली. केटलांक काव्यो या नावाने (तीन भागांत, १९०३, १९०८ व १९३५) हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला पण वसंतोत्सव हे त्यांचे पहिले काव्य १८९८ मध्ये लिहिले होते. रास व गीते या त्यांच्या रचनांचा संग्रह न्हाना न्हाना रास (१९१०) मध्ये आहे.

कवितेसाठी सुगम छंद असावेत म्हणून या काळातील कवींची धडपड होती. नानालास यांनी यासाठी ‘अपद्यागद्य’ निर्माण केले. आजच्या छंदमुक्त रचनेहून तात्त्विक दृष्ट्या ही रचना वेगळी आहे. हिला ‘डोलन शैली’ असे म्हटले आहे व या शैलीत त्यांनी अनेक कविता लिहिल्या. आपली नाटकेही त्यांनी या शैलीत लिहिली आहेत. त्यांनी अनेक पद्यनाटके लिहिली. इंदुकुमार (अंक पहिला, १९०९) व जयाजयंत (१९१४) ही त्यांतील सुप्रसिद्ध नाटके होत. ऐतिहासिक नाटकांमध्ये शहेनशाह अकबर (१९३०) व संघमित्रा (१९३१) ही प्रख्यात आहेत. त्यांची अनेक प्रख्यात गीते या सर्व नाटकांत विखुरली आहेत. केटलांक काव्योचा दुसरा भाग १९०८ मध्ये प्रसिद्ध झाला. नानालाल यांनी कुरुक्षेत्र हे महाकाव्य लिहिण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर १९६० मध्ये हरिसंहिता या महाकाव्याचे तीन भाग प्रसिद्ध झाले.

नानालालनी गद्यही काही थोडेथोडके लिहिलेले नाही. उषा (१९१८) व सारथी (१९३८) यांसारख्या कादंबऱ्या साहित्यमंथन (१९२४), उद्‌‌बोधनो  (१९२९), आपणां साक्षर रत्नो (२ खंड, १९३४ — ३५) हे त्यांच्या वैचारिक लेखांचे, व्याख्यानांचे व समीक्षालेखांचे संग्रह होत. इतर प्रकारचे विपुल गद्यही त्यांनी लिहिले आहे. पण नानालाल हे मुख्यतः कवी होते कादंबरीकार, समीक्षक वगैरे नव्हे. गद्यलेखनातील त्यांचे उत्तम पुस्तक म्हणजे कवीश्वर दलपतराम (३ खंड, १९३३—४१). त्यांनी लिहिलेले आपल्या वडिलांचे हे चरित्र. पितृतर्पण हे त्यांचे काव्यही चिरंतन महत्वाचे आहे. त्यातील प्रगल्भता, भक्तिभाव व उत्स्फूर्तता क्वचित इतर काव्यात आढळते.

नानालालनी अनेक ग्रंथ लिहिले. मेघदूत, शाकुंतलगीता  यांची त्यांनी गुजरातीत भाषांतरे केली. गुजरातने त्यांचा जितका गौरव केला, तितका क्वचितच कुणा अन्य कवीचा केला असेल. नानालाल हे स्वभावाने तापट होते त्यामुळे महात्मा गांधीशी झालेला आपला मतभेद त्यांनी जाहीर केला. त्यात त्यांचा संताप व्यक्त झाला आहे. असे असूनही गुजरातने त्यांच्या काव्यगुणांवर लुब्ध होऊन त्यांना महाकवी म्हणून गौरविण्याची धिटाई केली.

या श्रेष्ठ कवीच्या मर्यादाही तितक्याच स्पष्ट होत्या. शब्दलीला तर त्यांना खूपच अवगत होत्या पण बऱ्याच वेळा शब्दच त्यांचे स्वामी बनत. तरीसुद्धा भावोर्मी व भावना यांनी समर्थ बनलेले त्यांचे काव्य दीर्घकाळ वाचकांच्या स्मरणात राहील.

विचारवंत पंडित : आनंदशंकर बापूभाई ध्रुव (१८६९—१९४२) हे पंडित कालातील श्रेष्ठ विद्वान व विचारवंत होते. आपणो धर्म (१९१५) हा त्यांच्या तत्त्वचिंतनातील विचार मांडणारा महाग्रंथ होय. हिंदू धर्मनी बाळपोथी (१९१८) या पुस्तिकेमध्ये त्यांनी हिंदुधर्माचे रहस्य वाचकांसाठी थोडक्यात स्पष्ट केले आहे. असेच स्पष्ट विचार त्यांच्या साहित्य-समीक्षणांमध्येही आहेत. तत्त्वाशी त्यांचा चाललेला विवाद त्यांत स्पष्टपणे व्यक्त झाला आहे. काव्यतत्त्वविचार (१९३९) व साहित्यविचार (१९४१) या त्यांच्या सुंदर लेखांच्या संग्रहांमध्ये काव्याविषयी मूलगामी विचार प्रकट झालेले आहेत. दिग्दर्शन (१९४२) हा त्यांच्या अनेकांगी व्यक्तिमत्त्वाच्या छटा दाखविणारा लेखसंग्रह होय.

याशिवाय आपल्या वसंत या मासिकाद्वारे त्यांनी गुजराती साहित्य व समाज यांची अपूर्व सेवा केली. अध्यापन क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे गुजरातला नामवंत विद्याव्यासंगी लाभले. यांच्या इतकेच प्रसिद्ध असे एक पारशी कवी ⇨अरदेशर फरामजी खबरदार ‘अदल’ (१८८१ — १९५३) हे होत. हे पारशी गृहस्थ मद्रासमध्ये व्यापारी होते. विद्यापीठीय उच्च शिक्षण त्यांना लाभले नव्हते. त्यांचे गुजरात प्रेम त्यांच्या एका काव्यपंक्तीमधूनच व्यक्त झाले आहे. ही काव्यपंक्ती गुजरातच्या घराघरांत जाऊन पोहोचलेली आहे. ती पंक्ती पुढील अर्थाची होय : ‘जेथे जेथे एक गुजराती, तेथे तेथे सदासर्वकाळ गुजरात’. दर्शनिका (१९३१) हा खबरदार यांचा महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह. यात कवीचे तत्त्वचिंतन चांगल्या तऱ्हेने प्रकट झाले आहे. भजनिका (१९२८) आणि कल्याणिका (१९४०) यांमध्ये भक्तहृदय आणि कलिका (१९२६) मध्ये त्यांची प्रणयभावना स्पष्ट स्वरूपात व्यक्त झाली आहे. यांशिवाय त्यांनी नानालाल, बळवंतराय वगैरेंच्या काव्यांची सुंदर विडंबनेसुद्धा केली आहेत. प्रभातनो तपस्वी अने कुक्कुटदीक्षा (१९३७) ह्यात या प्रकारच्या समर्थ कविता आहेत. गुजराती कवितानी रचनाकळा (१९४१) हा अभ्यासपूर्ण गद्यग्रंथही खबरदारांनी लिहिला आहे. यामध्ये कविता व छंद यांविषयीचे विचार त्यांनी मांडले आहेत.


इतर साहित्यिक : इथे पंडित काल पूर्ण झाला. यानंतर इतक्या श्रेष्ठ नव्हे, पण बऱ्याच लहान लहान लेखकांनी या काळात लेखनकार्य केले आहे. त्यांमध्ये इच्छाराम सूर्यराम देसाई (१८५४—१९१२) यांचे गुजराती या साप्ताहिकाचे आणि काव्यदोहनचे संपादन दोलनराम पंड्या आणि डाह्याभाई देरासरी (१८५७—१९३७) यांचे काव्यलेखन कृष्णलाल मोहनलाल झवेरी (१८६८—१९५६) यांचे माइलस्टोन्स इन गुजराती लिटरेचर (१९१४) हे इंग्रजी प्रकाशन श्रीमद्‌राजचंद्र (१८६८—१९०१) यांचे सघन शैलीतील तत्त्वचिंतन दामोदर खुशालदास बोटादकर (१८७०—१९२४) यांचे रासतरंगिणी (१९४५), शैवलिनी (दुसरी आवृ. १९३०) वगैरे काव्यसंग्रह तसेच जन्मशंकर बूच ‘ललित’ (१८७७—१९४७) यांची गीते भोगींद्रराव रतनलाल दिवेटिया (१८७५ —१९१७) यांच्या स्वतंत्र व अनुवादित कादंबऱ्या या साहित्याने या काळातील साहित्य समृद्धीला हातभार लावला आहे. शिवाय सुंदरी सुबोध, विद्यावारिधि यांसारख्य़ा नियतकालिकांचे कार्यही उल्लेखनीय आहे. वा. मो. शाह यांची पत्रेही महत्त्वाची आहेत.

आज गुजराती साहित्यात विशेष समृद्ध असलेल्या लघुकथेची सुरुवात या काळातील प्रयत्नांमध्ये दिसते. राममोहनराय जशवंतराय आणि इतर लेखक यांनी १८९०- १९१० पर्यंतच्या काळात या प्रकारच्या लेखनाचा आरंभ करून दिला आणि रणजितराम वावाभाई मेहता (१८८२—१९१७) यांनी १९०४ मध्ये ‘हीरा’ नावाची या काळातील पहिली लघुकथा म्हणता येईल या योग्यतेची कथा लिहिली. या काळातील बऱ्याच लघुकथा अनुवादित, अनुकरणात्मक आणि उपदेशपर होत्या.

या कालखंडात सरस्वतीचंद्रसारखी श्रेष्ठ कादंबरी निर्माण झाली, काव्यात नवे प्रवाह आले, काही श्रेष्ठ कवी झाले, टीका, तत्त्वज्ञान, इतिहासविचार इ. क्षेत्रांत लेखन सुरू झाले, तसेच साहित्यिक नियतकालिकेही निघाली. लघुकथेचा जन्म झाला आणि गुजराती साहित्याला स्पृहणीय व समृद्ध रूप प्राप्त झाले.

गांधी काल : विसाव्या शतकाची वाटचाल सुरू होताना पूर्वीची समाज स्थिती बदलत होती. पश्चिमेकडील साहित्याचा परिणाम आता व्यापक बनला होता. कादंबरी आणि लघुकथा या क्षेत्रांत तेथे प्रगती झाली होती. याचे भान साहित्यिकांना आले होते आणि या समाजाच्या अधिक निकट संपर्कातून स्त्रीपुरुषविषयक व भारतातील एकत्र कुटुंबविषयक भावना यांसंबंधी विचार करायला लोक प्रवृत्त झाले होते. स्त्रिया महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागल्या होत्या आणि स्वतःचे हक्क व प्रतिष्ठा यांबाबत जागरूक झाल्या होत्या.

अशा वेळी १९१५ मध्ये गांधीजी आफ्रिकेतून गुजरातमध्ये आले व १९१७ ते १९ च्या दरम्यान त्यांनी आपली स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्यांनी अखिल भारताचा तसेच गुजरातमधील जीवनाचा आणि साहित्याचा संपूर्ण कायापालट करून टाकला. ⇨महात्मा गांधी (१८६९—१९४८) भाषणे, सभा व लेखन यांच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचू इच्छित होते. लोकांच्या भाषेत बोलून व लिहून यशस्वी होऊ पाहत होते. तेव्हा त्यांनी आपले लेखन अगदी साधे, सरळ, सुबोध होईल असा कटाक्ष ठेवला. गुजराती गद्याचा पंडित कालात बराच विकास झाला होता पण या कालखंडात ते संस्कृतप्रचुर व थोडे क्लिष्टही बनले होते. गांधीजींच्या प्रभावाने ते सरलमधुर व प्रासादिक बनले. गांधीजींनी लेखन खूप केले पण त्या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे दक्षिण आफ्रिकाना सत्याग्रहनो इतिहास (१९२४) तसेच सत्यना प्रयोगो अथवा आत्मकथा (१९२७) हे ग्रंथ. यांशिवाय त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. अनासक्तियोग (१९३०) म्हणून गीतेचा अनुवाद केला. हिंद स्वराज नावाचे पुस्तक लिहिले (१९०८). यानंतर त्यांची शैली आणि विचारसरण यांचा प्रभाव ज्यांच्यावर आहे, असे काही प्रतिभाशाली लेखकही गुजरातला लाभले. यांपैकी मुख्य पुढीलप्रमाणे : ⇨महादेवभाई देसाई (१८९२—१९४७), ⇨किशोरलाल घनश्यामदास मशरूवाला (१८९०—१९५२), ⇨काकासाहेब कालेलकर (१८८५—  ), नरहरी पारीख आणि स्वामी आनंद. नवजीवनयंग इंडिया यांच्या संपादनाद्वारा गांधीजींनी पत्रव्यवसायालाही एक नवी शक्ती प्राप्त करून दिली.

महादेवभाई देसाई यांनी गांधीजींचे वैयक्तिक कार्यवाह म्हणून जी अपूर्व कामगिरी केली आहे, त्यात साहित्यदृष्ट्या सर्वांत महत्वाची कामगिरी म्हणजे महादेवभाईनी डायरी (५ खंडांत, १९४८—५१) हा ग्रंथ होय. यांशिवाय त्यांनी रवींद्रनाथ व शरत्‌चंद्र यांच्या काही लेखनाचे सुंदर अनुवाद केले आहेत. चित्रांगदाविराजबहू यांचे अनुवाद चिरस्मरणीय बनले आहेत. ‘एखला चलोरे’ या टागोरांच्या प्रख्यात गीताचा गुजराती अनुवादही त्यांनी केला आहे.

किशोरलाल मशरूवाला हे तत्त्वज्ञ होते. त्यांची मुख्य कामगिरी म्हणजे समूळी क्रांति (दुसरी आवृ. १९५०) ही चिंतनपर पुस्तिका होय. जीवनाच्या सर्वच स्तरांत बदल केल्याशिवाय, समूळ क्रांती घडवून आणल्याशिवाय कोणतीही क्रांती परिणामकारक होत नाही, हे समजावून देण्यात त्यांनी अपूर्व यश मिळविले आहे. गांधीविचारदोहन (तिसरी आवृ. १९४०) हे संपादन, राम अने कृष्ण (चौथी आवृ. १९४६) आणि बुद्ध अने महावीर (चौथी आवृ. १९४६) या पुस्तिका, विदाय वेळाए हा खलील जिब्रान यांच्या काव्याचा गद्य अनुवाद आणि जीवनशोधन (पाचवी आवृ. १९५२) यात संगृहीत झालेले त्यांचे लेखन या पुस्तकांमधून त्यांची भारदस्त व समर्थ शैली प्रकट झाली आहे. त्यामुळे गांधी कालातील लेखकांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे.

पण गांधी कालातील सर्वांत प्रसिद्ध लेखक काकासाहेब कालेलकर होत. आश्चर्याची गोष्ट अशी, की हे मूळचे महाराष्ट्रीय असूनही गुजराती साहित्यातील एक गद्यशैलीकार होऊन बसले. ते गांधीजींचे निकटवर्ती शिष्य बनले. नवजीवनसाठी लेख लिहिण्याची जबाबदारी गांधीजींनी त्यांच्यावर सोपविली. ते गुजराती लिहू लागले. संवेदनशील मन, कविहृदय, आगळी जीवनदृष्टी आणि त्यांतून निर्माण झालेली सुंदर अभिव्यक्ती हे त्यांचे विशेष. गुजरातीमधील उत्तम प्रवासवर्णन म्हणजे त्यांचे हिमालयनो प्रवास (१९२४) हे होय. जीवननो आनंद (१९३६) हा त्यांच्या काव्यात्म संकीर्ण लेखांचा संग्रह होय. साहित्य व संस्कृतिविषयक लेखांचे संग्रह जीवनविकास (१९३६), जीवनभारती (१९३७), जीवनसंस्कृति (१९३९) वगैरे होत. लोकमाता (१९३४) हे भारतातील नद्यांविषयीचे त्यांचे काव्य. स्मरणयात्रा (दुसरी आवृ. १९४०) मध्ये त्यांनी आपल्या बालजीवनाचे चित्रण केले आहे. विचारवंत, गद्यकवी, जीवनद्रष्टा, जीवननिवेदक, आदर्श शिक्षक असे अनेक विशेष त्यांच्या ठायी आहेत. चिंतनपरता हा तर त्यांचा विशेष आहेच. त्यांची गद्यशैली साधीसीधी, पण काव्यात्म व लीलया प्रकट होणारी आहे. कोणत्याही विषयात ते सारख्याच सहजतेने विहार करतात. संस्कृत साहित्याच्या आणि काव्याच्या अभ्यासाने त्यांची शैली मधुररम्य व सहजसुंदर बनली आहे.

कालेलकरांचेच मित्र आणि हिमालय प्रवासातील त्यांचे साथीदार स्वामी आनंद होत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व लेखनाचे पोत निराळेच आहेत. घरगुती वळणाच्या त्यांच्या अनोख्या शैलीने गुजराती साहित्यावर छाप पाडली आहे. तेसुद्धा गांधीजींच्या शिष्यपरिवारातले. सुरुवातीच्या काळातच त्यांनी इसुनुं बलिदान (१९२२) हे सुंदर पुस्तक लिहिले. त्यानंतरचे त्यांचे श्रेष्ठ पुस्तक कुलकथाओ (१९६९) हे आहे. या पुस्तकाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.अजूनही त्यांच्या लेखणीतून महादेव थीये मोटेरा यासारखे लेखन गुजरातला मिळत आहे. गांधीवादी लेखकांमध्ये नरहरी पारीख यांचाही समावेश होतो.

क. मा. मुनशी : कोणत्याही अर्थाने गांधीवादी नसलेला व तरीसुद्धा या कालाला समर्थ बनविणारा असा लेखक म्हणजे ⇨कन्हैयालाल माणेकलाल मुनशी (१८८७—१९७१). लेखक म्हणून त्यांचा उदय १९१४–१५ मध्ये, म्हणजे गांधीजी भारतात येऊन स्थायिक झाले तेव्हापासून झाला. त्यांची पहिली कादंबरी वेरनी वसुलात  ही १९१३–१४ मध्ये ‘घनश्याम’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाली. मुंबईत त्यांचे शिक्षण झाले. एल्एल्.बी. झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. वकिलाने साहित्यात लुडबूड का करावी, असे कुणी म्हणेल या भीतीने त्यांनी ‘घनश्याम’ हे टोपणनाव घेतले होते.

नंतर तर अपूर्व कलात्मक अशा कादंबऱ्यांची मालिकाच त्यांनी सुरू केली. पाटणनी प्रभुता (१९१६), गुजरातनो नाथ (१९१९) व राजाधिराज (१९२२) या त्यांच्या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे त्यांची फार कीर्ती झाली. सरस्वतीचंद्र आणि त्यानंतर निर्माण झालेल्या कादंबऱ्यांच्या वाचनाने गुजराती वाचकांमध्ये जी अभिरुची निर्माण झाली होती, त्या अभिरुचीला नवीनच आस्वादक्षेत्र या कादंबऱ्यांनी मिळवून दिले. यांत लांबलचक संस्कृतप्रचुर वाक्ये नाहीत, कंटाळवाणा पाल्हाळ नाही पण वेग आणि आवेग यांचे एक अपूर्व काव्य आहे. त्यांचे गद्यही साधेसुधे पण धारदार आहे. त्यांची पात्रेसुद्धा हृदयाला जाऊन भिडणारी आणि तेथे कायमचे घर करणारी आहेत. मीनल, मुंजाल, मंजरी, काक अशी अनेक पात्रे नेहमी गुजरातमधील घराघरांतील माणसांच्या रूपाने वावरताना दिसतात.

मुनशींनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. अवसानकाल जवळ आला असताही ते कृष्णावताराची कथा लिहीत होते. त्याआधी तपस्विनी नावाची त्यांची दीर्घ कादंबरी प्रसिद्ध झाली होती.

कादंबरीक्षेत्रात मुनशींचे कार्य जितके अपूर्व आहे, तितके ते इतर क्षेत्रांत नाही. तरीसुद्धा इतर अनेक क्षेत्रांत ते यशस्वी ठरले आहेत. नाटके तर त्यांनी बरीच लिहिली. उदा., काकानी शशी (१९२८), ध्रुवस्वामिनीदेवी (१९२८), लोपामुद्रा (१९३३) वगैरे. गुजराती रंगभूमीला नवे रूप प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. मारी कमला अने बीजी वातो (१९२०) या संग्रहातील लघुकथा महत्त्वपूर्ण आहेत. याशिवाय आत्मचरित्रपर ग्रंथांमध्ये शिशू अने सखी (१९३२), अडधे रस्ते (दुसरी आवृ. १९४६) आणि चरित्रांमध्येनरसैंयो : भक्त हरिनो (१९३३), नर्मद, अर्वाचीनोमां आद्य (१९३९) इ. अनेक श्रेष्ठ कृती सादर केल्या आहेत. गुजरात अँड इट्स लिटरेचर (१९३५) हा गुजराती साहित्याचा इंग्रजीतील प्रसिद्ध इतिहासग्रंथ व द ग्लोरी दॅट वॉज गुर्जरदेश (१९४३) ही संपादित ग्रंथमाला यांमुळे मुनशींच्या लेखनाची व्याप्ती किती मोठी होती, हे दिसून येते.

मुनशी ही जणू एक संस्थाच होती. ‘भारतीय विद्याभवन’ची स्थापना करून त्यांनी भारताच्या ज्ञानक्षेत्रात एक अपूर्व व विशेष कार्य केले आहे. गुरजाती ‘अस्मिते’चे (हा शब्द त्यांनीच निर्माण केला) ते ‘गेयकार’ बनले. अर्वाचीन युगाचे मुख्य सुत्रधार तीन — गोवर्धनराम, गांधीजी व मुनशी, असे मनहरराम मेहतांनी एका काव्यपंक्तीत म्हटले आहे, ते खरेच आहे.

मुनशींच्या पत्नी लीलावती मुनशी (१८९८ —   ) यांचा स्वतःचा जीवनमांथी जडेली (१९३३) या नावाचा लघुकथासंग्रह आणि रेखाचित्रो (१९३५) या नावाची जीवनचित्रे आहेत. कुमारदेवी (१९३०) नावाचे नाटकही त्यांनी लिहिले आहे.

यांशिवाय मुनशींच्या उदयकाळात लेखन करणारे बटुभाई उमरवाडिया (१८९९ — १९५०) यांच्या मत्स्यगंधा अने गांगेय तथा बीजां चार नाटको (१९२५) आणि मालादेवी अने बीजां नाटको (१९२७) या गुजरातीतील पहिल्या एकांकिका प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बरोबरीने यशवंत पंड्या आणि प्राणजीवन पाठक यांनीही एकांकिका लिहिल्या आहेत.

लघुकथा आणि विनोद : याच काळातले धनसुखलाल कृष्णलाल मेहता (१८९०—  ) हे विनोदकार तर होतेच पण त्याचबरोबर लघुकथेच्या पहिल्या पुरस्कर्त्यांपैकी एक होते. १९०८ पासून ते कथालेखन करत असून त्यांनी बऱ्याच नमुनेदार कथा लिहिल्या. कंचनलाल वासुदेव मेहता (१८९२—१९१९) यांनी वीसमी सदी या मासिकात ‘मलयानिल’ या टोपणनावाने लिहिलेली ‘गोवालणी’ (१९१८) ही कथा गुजराती भाषेतील पहिली लघुकथा होय, असे सर्वमान्य मत आहे. पण त्या आधीच्या पहिल्या प्रवर्तकांत धनसुखलाल मेहतांचे स्थान महत्त्वाचे आहे. हुं सरला अने मित्रमंडळ (१९२०) हा त्यांचा विनोदी लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे आणि ज्योतींद्र दवे यांच्या सहकार्याने लिहिलेले अमे बधां (दुसरी आवृ. १९४९) हे पुस्तक विशेष लोकप्रिय आहे. नाटक आणि रंगभूमी या क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय लेखन व कार्य केले आहे. गरीबनी झुंपडी हे त्यांचे प्रख्यात नाटक होय. ते नटही होते.

नाटक आणि रंगभूमी : नाटकांच्या क्षेत्रात नट, दिग्दर्शक, लेखक, रंगभूमीसाठी सर्वार्पण करणारा आणि हौशी गुजराती रंगभूमीवर स्त्रियांचा प्रथम प्रवेश घडवून आणणारा, तसेच रंगभूमीची पायाभरणी करणारा म्हणून ⇨चंद्रवदन चीमनलाल मेहता (१९०१—  ) यांचेच नाव घ्यावे लागले. महाविद्यालयातील संमेलनांतून काम करता करता त्यांनी पारंपरिक रंगभूमीचा त्याग करून नव्या हौशी रंगभूमीचा आरंभ केला. त्यांनी अनेक नाटके लिहिली. त्यांमध्ये आगगाडी (पाचवी आवृ. १९५२), नागाबावा (१९३०), प्रेमनु मोती अने बीजां नाटको (१९३७) ही विशेष प्रसिद्ध आहेत. आजही नाट्यक्षेत्रात प्रचाराचे उत्तम कार्य ते करीत आहेत.


नाटकांमध्ये धारासभासारखी त्यांची प्रहसनेही प्रसिद्ध आहेत. ईलाकाव्यो (तिसरी आवृ. १९५२) हा बहीणभावांच्या प्रेमाच्या काव्यांचा त्यांचा संग्रह आहे पण अलीकडच्या काळातील त्यांची प्रवासवर्णनांची पुस्तके अतिशय लोकप्रिय आहेत. बांध गठरियां, छोड गठरियां, रंग गठरियां इ. पुस्तकांमधून त्यांची गद्यलेखनाची सुंदर लकब दिसून येते. त्यांना विनोदाची नैसर्गिक देणगी आहे व ती त्यांच्या धारासभा, होलिका वगैरे कृतींद्वारा प्रकट झाली आहे.

उत्कृष्ट विनोदाचे दर्शन होते ते ⇨ज्योतींद्र दवे (१९०१—  ) यांच्या लेखनातून. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी मानवी मनाच्या खोल अनाकलनीय अंगाचे दर्शन घडवले आहे. रंगतरंग ( १९५०) नावाचे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे. गुजरातमधील विनोदी लेखकांत ते अजोड आहेत.

समीक्षा : समीक्षेचा विषय निघाला, की ‘वि’त्रयी म्हणून ओळखले जाणारे विजयराज कल्याणराव वैद्य (१८९७—१९७४), ⇨विश्वनाथ मगनलाल भट्ट (१८९८—१९७०) आणि ⇨विष्णुप्रसाद त्रिवेदी (१८९९— ) यांची आठवण येते. गांधी कालातील समर्थ समीक्षकांमध्ये या तिघांचा समावेश होतो. विष्णुप्रसाद त्रिवेदी यांची महत्त्वाची पुस्तके विवेचना (१९३९) व परिशीलन (१९४९) ही होत. सरस्वतीचंद्राच्या गद्यावर त्यांनी विशेष जाणिवेने लेखन केले आहे अनंतराय मणिशंकर रावळ (१९१२—  ) यांनी आपल्या साहित्यविहार (१९४६) वगैरे ग्रंथांद्वारा उत्तम समीक्षालेखन केले आहे. तथापि समीक्षेच्या क्षेत्रात खोलवर दृष्टीने आणि संस्कृत व इंग्रजी साहित्याच्या विशेष अभ्यासामधून दोन्ही समीक्षाविचारांचा समन्वय साधणारे महत्त्वाचे कार्य ⇨रामनारायण विश्वनाथ पाठक (१८८७ — १९५५) यांनी केले आहे. अर्वाचीन काव्यसाहित्यनां वहेणो (१९३८), काव्यनी शक्ति (१९३९) व वाङ्‌‌मय विमर्श (१९३९) ही त्यांची समीक्षाविषयक उत्कृष्ट पुस्तके होत, तसेच वृहत्‌‌पिंगल हा त्यांचा ग्रंथ विद्वत्तापूर्ण आहे. त्यांची विद्वत्ता सखोल असून शैली परिणामकारक आहे. अंतरंगात शिरून एखाद्या वस्तूचा शोध घेणे आणि कोणालाही समजेल अशा रीतीने तिचे निरूपण करणे, हे त्यांचे विशेष आहेत.

लघुकथाकार म्हणूनही पाठकांचे नाव अग्रभागी आहे. १९२८ मध्ये द्विरेफनी वातो हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या कथा वास्तववादी आहेत, पण त्या आदर्श घाटाच्याही आहेत. गांधीवादी दृष्टीने त्या मानवतावादीही आहेत. लघुकथेला भक्कम पायावर उभे करण्याचे त्यांचे या क्षेत्रातील कार्य विशेष महत्त्वपूर्ण आहे.

यांशिवाय विनोदी लेखक म्हणूनही स्वैरविहार (२ खंड, दुसरी आवृ. १९३८-३९) या ग्रंथामुळे त्यांना प्रतिष्ठा लाभली. उमाशंकर, सुंदरम् वगैरे श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यगुणांचे संवर्धन करण्याचे त्यांचे कार्य लहान नाही. शेषनां काव्यो (१९३७) आणि मरणोत्तर प्रसिद्ध झालेला विशेषकाव्यो (१९५९) हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत.

लघुकथेच्या क्षेत्रात ज्याचे नाव घेतल्यावाचून पुढे जाताच येणार नाही, असा लेखक म्हणजे ⇨धूमकेतू. संपूर्ण नाव गौरीशंकर गोवर्धनराम जोशी (१८९२—१९६५). त्यांच्या प्रमुख कथा तणखा नावाच्या चार संग्रहांमध्ये संकलित आहेत (१९५१). यांतील पहिला १९२६ मध्ये प्रसिद्ध झाला. या संग्रहाच्या प्रकाशनानंतर गुजराती कथेला स्थैर्य लाभले आणि ती समर्थ बनली. या कथांमध्ये जी श्रेष्ठ गुणवत्ता होती त्या नमुन्याच्या अनेक कथा नंतर लिहिल्या गेल्या. यामुळेच पुढे अनेक वर्षे धूमकेतू आणि लघुकथा हे शब्द पर्यायवाचक झाले. धूमकेतूंच्या गद्यातील काव्यात्मकता, निरीक्षणातील सूक्ष्मता, कथांमधील विषयांची विविधता आणि अपार सहानुभूती यांमुळे त्यांना हे स्थान मिळाले. या साऱ्या गोष्टी लघुकथेच्या आकाराशी संबंधित होत्या. त्यांच्या लेखनातील भावविवशता या गुणांनी झाकली जाते. ‘लघुकथेचे जनक’ या नात्याने धूमकेतूंचे कार्य बरेच मोठे आहे. यांशिवाय धूमकेतूंनी आपल्या दीर्घ जीवनकाळात निरनिराळ्या क्षेत्रांतील कार्याचे यशस्वीपणे बीजारोपण केले. मुनशींनंतरचे यशस्वी ऐतिहासिक कादंबरीकार धूमकेतूच होत. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. चौलादेवी (चौथी आवृ. १९४६) व आम्रपाली ह्या त्यांतील विशेष प्रसिद्ध कादंबऱ्या होत. राजमुगट (तिसरी आवृ. १९४५) आणि पृथ्वीश या आरंभीच्या त्यांच्या कादंबऱ्या यशस्वी ठरल्या आहेत. जीवनपंथजीवनरंग (१९५३) ही त्यांची आत्मवृत्तेही प्रसिद्ध आहेत. त्यांनी बालकांसाठीही लेखन केले आहे. नाटिका लिहिल्या आहेत. भाषांतरेही केली आहेत. भारतातील अनेक भाषांत त्यांच्या लघुकथांचे अनुवाद झाले आहेत.

लोकसाहित्य : झवेरचंद कालिदास मेघाणी (१८९७—१९४७) हे आणखी एक प्रसिद्ध कादंबरीकार होत. त्यांच्या वेविशाळ (चौथी आवृ. १९४८), तुलसी क्यारो (चौथी आवृ. १९५०), सोरठ तारां वहेतां पाणी (चौथी आवृ. १९५२) वगैरे कादंबऱ्या बऱ्याच यशस्वी ठरल्या आहेत. गुजरातमधील सर्वच प्रदेशांचे व तेथील जीवनाचे त्यांनी सामर्थ्यशाली चित्रण केले आहे. याच जीवनाचे प्रतीक म्हणून ‘चिताना अंगारा’ ही त्यांची कथा उत्तम दर्जाची लघुकथा ठरली आहे. त्यांनी राष्ट्रभक्तिपर कविताही लिहिली आहे.

त्यांचा जन्म सौराष्ट्रात झाला. त्यांचे विख्यात कार्य म्हणजे सौराष्ट्रनी रसधार नावाची त्यांची लोकसाहित्य कथामाला. १९२३ ते १०२७ या कालावधीत ही माला प्रसिद्ध झाली. खरा भारत खेड्यात आहे, हे गांधीजींचे वचन या मालेने त्यांनी साहित्यविश्वात खरे करून दाखविले. कंकावटी (२ खंड, तिसरी आवृ. १९४७), चुंदडी (२ खंड, पाचवी आवृ. १९४६—४८) या संग्रहांच्या द्वारा लोकगीते, लग्नाची गाणी इ. क्षेत्रांतही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.

मेघाणींनी चांगले अनुवादही केले आहेत. युगवंदना (चौथी आवृ. १९५०) हा त्यांच्या स्वतंत्र कवितांचा संग्रह होय पण रवींद्रवीणेतून त्यांच्या अनुवाद कौशल्याचीही चांगली कल्पना येते. इंग्रजी व बंगालीमधून त्यांनी कादंबरी, कविता इत्यादींचे केलेले अनुवाद व रूपांतरे कित्येक वेळा मूळ कृतींपेक्षाही सरस वाटतात. पत्रकार म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले आहे. जन्मभूमि दैनिकातील वाङ्‌मयीन वृत्तपत्रलेखनाचे ‘कलम अने किताब ’ या सदरातील त्यांचे लेखन उत्कृष्ट उदाहरण आहे.

कादंबरी : कादंबरीलेखनामुळे लोकप्रिय ठरलेला दुसरा लेखक ⇨रमणलाल वसंतलाल देसाई (१८९२—१९५४) हा होय. देसाई तरुण असताना त्यांच्यावर गांधीजींचा असा विलक्षण प्रभाव पडला, की एका टीकाकाराने त्यांना ‘युगमूर्ती वार्ताकार’ म्हटले आहे. दिव्यचक्षु (चौथी आवृ. १९४७) ही त्यांची प्रख्यात कादंबरी. भारेलो अग्नि (दुसरी आवृ. १९३७), बाला जोगण (१९५२), प्रलय (दुसरी आवृ. १९५३) या त्यांच्या इतर प्रसिद्ध कादंबऱ्या. बाला जोगण मध्ये त्यांनी मीरेची कथा सांगितली आहे. प्रलयमध्ये प्रलयाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या आपल्या जीवनाचे अत्यंत प्रभावी चित्रण केले आहे. ग्रामलक्ष्मी (४ भाग, १९३४—४४) या कादंबरीत ग्रामीण जीवनाचे प्रश्न आणि आदर्श यांचे उत्तम चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अशा रीतीने त्यांनी आपल्या काळाचे सर्जनशील शब्दरूप तसेच तरुणतरुणींचा मुग्ध, पवित्र व निरागस प्रणय सुंदर रीतीने रंगविला आहे. त्यांच्या लेखनात पाल्हाळ, विषयांतर व विचारप्राधान्य असूनही ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले.

देसाईंनी लघुकथा, नाटके इ. क्षेत्रांतही विपुल लेखन केले आहे. झाकळ (दुसरी आवृ. १९३६) हा त्यांचा कथासंग्रह आणि शंकित हृदय (१९२५) हे त्यांचे नाटक विशेष प्रसिद्ध आहे. यांशिवाय अप्सरा हे वेश्याजीवनावरील लेखन आणि जीवन अने साहित्य (१९३६—३८) हा चार भागांतील साहित्यविषयक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. पूर्णिमा (दुसरी आवृ. १९३३) ही वेश्याजीवनावरील त्यांची उल्लेखनीय कादंबरी होय.

याच काळातील कादंबरीकारांत दरियालालचा (दुसरी आवृ. १९४४) कर्ता गुणवंतराय आचार्य आणि जिगर अने अमीचा कर्ता चुनीलाल वर्धमान शाह हे उल्लेखनीय होत.

काव्य : गांधी कालातील आरंभापासूनचे प्रसिद्ध कवी दोन : ⇨उमाशंकर जेठालाल जोशी (१९११—  ) आणि ⇨सुंदरम् (त्रिभुनवदास लुहार, १९०८—  ). दोघांनीही १९३०—४० च्या दरम्यान आपली उत्कृष्ट काव्यरचना केली. यापूर्वी भारतात गांधीजींच्या मानवतावादाचा व्यापक प्रभाव पडला होता पण १९२८—३० च्या सुमारास रशियातील साम्यवाद व क्रांतिवाद यांचाही प्रभाव होता. मेघाणींच्या काही कथांमध्ये व कवितांमध्ये तो दिसतो. या दोन्हीं प्रभावांचा उत्कृष्ट आविष्कार उमाशंकर आणि सुंदरम् या दोन कवींच्या निर्मितीमध्ये प्रत्ययास येतो. नानालालनंतर या दोघांनी उत्कृष्ट गीतरचना केली.

यांपैकी उमाशंकर जोशी तर सबंध भारतात प्रसिद्ध आहेत. ईडर संस्थानातील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला. वयाच्या अठराव्या वर्षी विश्वशांति (१९३१) हे काव्य त्यांनी लिहिले. १९३४ मध्ये गंगोत्री हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला व या काळातील उत्कृष्ट कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली. या काळाच्या आशा व आकांक्षा त्यांच्या काव्यात प्रतिबिंबित झाल्या आहेत. निशीथ हा त्यांचा संग्रह १९३९ मध्ये प्रसिद्ध झाला. प्राचीना या ग्रंथाद्वारे १९४४ मध्ये पद्यनाट्यांचा (व्हर्स प्ले) त्यांनी प्रयोग केला. अभिज्ञा हा त्यांचा काव्यसंग्रह १९६७ मध्ये प्रसिद्ध झाला.

कवितेशिवाय एकांकिकालेखनही त्यांनी केले. सापना भारा (१९३६) या संग्रहातील त्यांच्या एकांकिकाही उत्कृष्ट आहेत. खेड्यातील लोकांची सुखदुःखे त्यांनी ईडर लोकबोलीमध्ये चित्रित केली आहेत.


त्यांचे कथालेखन श्रावणी मेळो (१९३७) या संग्रहात संकलित आहे. यातील कथांनी चांगला कथाकार म्हणून त्यांचे स्थान सिद्ध केले आहे. शाकुंतल आणि उत्तररामचरित यांचे त्यांनी केलेले अनुवाद उत्कृष्ट मानले जातात.

कवी व टीकाकार म्हणून त्यांनी श्रेष्ठ स्थान मिळविले आहे.श्री अने सौरभ (१९६३) या ग्रंथात संस्कृत कलाकृतींच्या त्यांनी केलेल्या समीक्षा आहेत, तर अभिरुचि (१९५९) आणि कविनी साधना (१९६१) हे त्यांच्या उत्कृष्ट टीकालेखांचे संग्रह होत. अखो : एक अध्ययन (१९४१) आणि पुराणोमां गुजरात ही दोन पुस्तके त्यांच्या संपादनकौशल्याची चांगली निदर्शक आहेत.

उमाशंकर जोशी यांच्याच योग्यतेचे कवी सुंदरम् हे आहेत. त्यांचा काव्यमंगला (१९३३) हा संग्रह या काळातील नव्या कवितेचा प्रातिनिधिक संग्रह आहे. त्यानंतर यात्रा (१९५१) पर्यंतची त्यांची कविता तितकीच कीर्तिप्रद आहे. वसुधा (१९३९) या काव्यसंग्रहाला तर निशीथइतकीच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती.

उमाशंकर यांची कविता गंभीर व अभिजात स्वरूपाची आहे, तर सुंदरम् यांची कविता स्वच्छंदतावादी विशेषांनी युक्त आहे. योगी अरविंदाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर मात्र सुंदरम् यांची कविता बदलली.

त्यांच्या कथांचा पियासी (१९४०) हा संग्रह प्रसिद्ध आहे. १९३५ च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या त्यांची ‘खोलकी’ ही कथा पहिली वास्तववादी कथा होय. अर्वाचीन कविता (दुसरी आवृ. १९५३) हा महाग्रंथ त्यांच्या कविता, समीक्षा व संपादन क्षेत्रांतील सामर्थ्याचा प्रत्यय आणून देतो.

यांशिवाय ⇨स्नेहरश्मी (झीणाभाई रतनजी देसाई, १९०३—  ), करसनदास माणेक (१९०२—  ), ⇨मनसुखलाल मगनलाल झवेरी (१९०७ —   ), ⇨सुंदरजी गोकळदास बेटाई (१९०५— ), पूजालाल (१९०१ —   ) हे गांधी कालातील प्रमुख कवी होत. गांधी कालात लेखन करीत असूनही या कालाचा ठसा ज्यांच्यावर उमटला नाही, असे कवी म्हणजे कृष्णलाल श्रीधराणी, हरिश्चंद्र भट्ट, प्रल्हाद पारेख, ‘स्वप्नस्थ’ (भानुभाई रणछोडलाल व्यास) आणि मुरली ठाकूर हे होत. आज हयात असलेले प्रेमशंकर भट्ट, नाथालाल दवे, रतिलाल छाया, देवजी भाई मोठा, सुधांशू, जशभाई पटेल वगैरे याच काळातील लेखक होत.

यांपैकी स्नेहरश्मी यांचा पनघट हा काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे पण त्यांच्या कवितेचे खास आवाहन ‘हायकू’ ह्या जपानी काव्यप्रकारात आढळते. या प्रकारची काव्यरचना गुजरातीमध्ये प्रथम त्यांनीच केली. सोनेरी चांद रुपेरी सूरज (१९६७) हा त्यांच्या ‘हायकू’ प्रकारातील रचनेचा समृद्ध संग्रह होय.

कवितेशिवाय त्यांची अंतरपट ही कादंबरी आणि काही कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. करसनदास माणेक यांचा आलबेल (१९३६) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. सिंधुनी प्रेमकथाओ हे त्यांचे गद्यलेखन. त्यांच्या महाभारत कथामधून या विषयावरील त्यांची पकड दिसून येते.

उमाशंकर जोशी व सुंदरम् यांच्यानंतरचे गांधी कालातील विशेष प्रख्यात कवी मनसुखलाल झवेरी व सुंदरजी बेटाई हे होत. संस्कृतमधील प्रतिष्ठित शैलीसाठी मनसुखलाल, तर भावरम्य अभिव्यक्तीसाठी बेटाई प्रसिद्ध आहेत. फूलदोल (१९३३), आराधना (१९४०) वगैरे मनसुखलाल यांचे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी विपुल समीक्षालेखनही केले आहे. थोडा विवेचन लेखो (१९४४) व अभिगम (१९६६) हे त्यांचे समीक्षापर लेखांचे संग्रह होत. यांशिवाय गोवर्धनराम, मुनशी, उमाशंकर यांच्याविषयी विवेचनपर ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. अमेरिकेमधील प्रवासासंबंधीही त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले (१९७३). बेटाई यांनी सुवर्णमेघ (१९६४) हा समीक्षाविषयक ग्रंथ लिहिला असून तो विशेष महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिरेखा (१९३४), इंद्रधनु (१९३५), विशेषांजलि (१९५२) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. मृतपत्नीला उद्देशून लिहिलेले सद्‌गत चंद्रशीलाने (१९५९) हे त्यांचे काव्य या प्रकारच्या काव्यामध्ये एक अनोखे आविष्करण आहे. मनसुखलाल व बेटाई या दोघांनाही गीतेचे गुजराती भाषांतर केले आहे. मनसुखलाल यांनी शाकुंतलहॅम्लेट यांची गुजराती भाषांतरे केली असून ती उत्कृष्ट आहेत.

कृष्णलाल श्रीधराणी (१९११—६१) आणि प्रल्हाद पारेख (१९११—५८) हे दोघेही अल्पायुषी होते तथापि शुद्ध कवितांचे अनेक नमुने त्यांच्या कवितांत आढळतात. या दृष्टीने श्रीधराणी यांच्या कोडियां काव्यास (१९३४) ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रल्हाद पारेख यांचे बारीबहार (१९४०) हेही तितकेच प्रख्यात आहे. काव्याव्यतिरिक्त श्रीधराणींनी वडलोसारखी अपूर्व एकांकिका लिहिली आहे (१९३१). तसेच मोरनां इंडां (१९३४), पद्मिनी (१९३४) ही नाटकेही त्यांनी लिहिली. हरिश्चंद्र भट्ट (१९०६—५०) यांचा स्वप्नप्रयाण हा सुंदर काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.

‘पतील’ (मगनलाल भूधरभाई पटेल, १९०५—७०) हे या काळातले सामर्थ्यशाली कवी होत. त्यांचे गझल तसेच सूफी विचारांची कविता प्रसिद्ध आहे. नाथालाल दवे, भानुशंकर व्यास ‘बादरायण’, मगनलाल देसाई ‘कोलक’ आणि रतुभाई देसाई यांनीसुद्धा या काळात कविता लिहिल्या.

कथा-कादंबरी : या काळातील इतर महत्त्वाचे लेखन लघुकथा व कादंबरी या क्षेत्रांतील होय. नव्या पिढीत मनुभाई पंचोली ‘दर्शक’ (१९१४—  ), ईश्वर पेटलीकर (१९१६—  ), पीतांबर पटेल (१९१६— ), ⇨पन्नालाल पटेल (१९१२—   ), ⇨चुनीलाल मडिया (१९२२—६८), विठ्ठल पंड्या, मोहनलाल मेहता ‘सोपान’ (१९११—   ), धीरुबेन पटेल, सारंग बारोट, कुंदनिका कापडिया इत्यादींचा समावेश होतो. झेर तो पीघां छे जाणी जाणी (१९५२) ही ‘दर्शक’ यांची प्रसिद्ध कादंबरी होय आणि पेटलीकर यांच्या जनमटीप (तिसरी आवृ. १९५१), हैंयासगडी ह्या प्रख्यात कादंबऱ्या आहेत. धीरुबेन पटेल यांची वडवानल आणि कुंदनिका कापडिया यांची परोढथतां पहेलां हे कादंबरीसाहित्याचे सुंदर नमुने आहेत. ‘सोपान’ यांच्या संजीवनी (चौथी आवृ. १९४६) व प्रायश्चित्त ह्या कादंबऱ्या एके काळी फार गाजल्या होत्या. पन्नालाल पटेल यांच्या मळेला जीव (चौथी आवृ. १९५०) व मानवीनी भवाई (१९४७) ह्या कादंबऱ्यांचे भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.

पन्नालाल यांचे शिक्षण फार थोडे झाले पण त्यांच्या कादंबऱ्या चिरस्थायी स्वरूपाच्या आहेत. तितक्याच महत्त्वाच्या त्यांच्या कित्येक लघुकथाही आहेत कारण त्यांच्या साहित्यात उत्तर गुजरातमधील ग्रामीण समाजाचे सुदंर चित्रण आढळते. वळामणां ही त्यांची पहिली कादंबरिका मेघाणींनी १९४० मधील सर्वश्रेष्ठ कृती म्हणून उल्लेखिली आहे. वात्रकने कांठे (१९५१) हा त्यांचा प्रसिद्ध कथासंग्रह असून वैतरणीने तीरे, चांदो शें शामळो यांसारखी स्वतंत्र व रूपांतरित नाटकेही त्यांनी लिहिली आहेत.

सौराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे सुरेख चित्रण चुनीलाल मडिया यांनी केले आहे. वेळवेळानी छांवडी (१९५६), लीलुडी धरती वगैरे त्यांच्या कादंबऱ्या प्रख्यात आहेत. घूघवतां पूर (दुसरी आवृ. १९५३), पद्मजा (१९४७), चंपो अने केळ (१९५०) इ. त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. रंगदा (१९५१) वगैरे एकांकिका त्यांच्या प्रतिभेची चुणूक दाखविणाऱ्या आहेत. त्यांनी समीक्षापर लेखनही बरेच केले आहे. त्यांच्या आयुष्याची दोरी अचानक तुटली नसती, तर त्यांनी गुजराती साहित्यात आणखी बरीच मोलाची भर घातली असती.

गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर (१९०९—   ) हे कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मानवी जीवनातील लहानसहान प्रसंगांवर कथानिर्मिती करणे, हे होय. त्यांच्या कथा मुख्यतः शहरी जीवनातील मध्यमवर्गीय जीवनाला स्पर्श करणाऱ्या त्याचप्रमाणे तरुणतरुणी व सामान्य माणसे यांविषयीच्या आहेत. लता अने बीजी वातो (१९३८), माणसनां मन (१९६२) वगैरे त्यांचे लघुकथासंग्रह उल्लेखनीय होत. मानवी मनाची खोली प्रकट करण्याचे त्यांचे सामर्थ्य उल्लेखनीय आहे.

यानंतर किशनसिंह चावडा (१९०४—   ) यांचे कुंकुम (१९४२) वगैरे कथासंग्रह व अमासना तारा (१९५३) हा आठवणींचा संग्रह ही महत्त्वाची पुस्तके होत. दुर्गेश शुक्ल यांनीही या काळात लघुकथा, एकांकिका आणि नाटके यांच्याद्वारा महत्त्वाची कामगिरी बजावली.

जयंती घेलाभाई दलाल (१९०९ — ७०) व जयंत खत्री (१९०९ —  ६९) यांनी महत्त्वपूर्ण कथा-कादंबरीलेखन केले. जयंती दलाल यांना एका अर्थी यानंतर येणाऱ्या काळाचा अग्रदूत म्हणता येईल. त्यांची शैली आणि कथा सादर करण्याची नवी पद्धती, कथेला नवे रूप देण्यास साहाय्यभूत झाल्या. त्यांचे प्रमुख कथासंग्रह आ घेर पेले घेर (१९५५), अडखे पडखे हे होत. त्यांनी एकांकिकाही चांगल्या लिहिल्या आहेत. त्यांत त्यांची वेगळी लकब आणि धारदार भाषा दिसून येते. एकांकिकांचे त्यांचे प्रमुख संग्रह जवनिका (१९४१) व चोथो प्रवेश (१९५७) हे होत. कादंबऱ्या व एकांकिकांच्या बरोबर जयंती दलालांची अनुवादित पुस्तकेही बरीच आहेत. यांत टॉलस्टॉयची युद्ध अने शांति (४ भाग, १९५६) ही कादंबरीही आहे.

नव्या लघुकथेचे स्वरूप प्रकट करणारे असेच प्राथमिक कार्य जयंत खत्री यांच्या लघुकथांद्वारा झालेले दिसून येते. फोरां (१९४४) आणि खरा बपोर (१९६८) हे त्यांचे कथासंग्रह होत. स्वच्छंदतावादी व वास्तववादी आविष्कारपद्धतींचा त्यांनी आपल्या कथांमध्ये अतिशय चांगला मेळ घातला आहे.


या आधी बकुलेश व जितुभाई मेहता यांनी या शैलींमध्ये कथा लिहिल्या होत्या. हीरालाल फोफलिया, विठ्ठल पंड्या, सारंग बारोट वगैरेंनीही या काळात कथा लिहिल्या.

वैचारिक साहित्य : या काळात संशोधनपर, वैचारिक तसेच संस्कृतमधील ज्ञानभांडार गुजरातीत आणणारे दर्जेदार लेखन झाले. त्यात भोगीलाल सांडेसरा, डोलरराय मांकड, के. बी. व्यास, हरिवल्लभ भायाणी, प्रबोध पंडित आणि रामप्रसाद बक्षी यांचे लेखन उल्लेखनीय आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ⇨ सुखलालाजी पंडित (१८८०—   ) यांचा दर्शन अने चिंतन (१९५६) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. बेचरदास दोशी (१८९०—   ), ⇨जिनविजयजी मुनी (१८८८—   ) यांनी संशोधन क्षेत्रात मौलिक कार्य केले आहे. हरिप्रसाद शास्त्री, के. का. शास्त्री वगैरे या काळातील इतिहास आणि जुनी गुजराती भाषा या विषयांतील पहिल्या दर्जाचे विद्वान होत. यापूर्वी दुर्गाशंकर शास्त्री (१८९२— १९५२) यांनी केलेले इतिहासविषयक लेखन महत्त्वाचे आहे.

डोलराय मांकड (१९०२—७१) व रामप्रसाद बक्षी (१८९६—  ) हे संस्कृतचे विद्वान म्हणून प्रसिद्ध आहेत. रसिकलाल छोटालाल परीख (१८९७—  ) यांचाही समावेश याच वर्गात करता येईल. त्यांच्या शर्विलक (१९५७) या नाटकात मौलिक गुण आढळतात. भोगीलाल सांडेसरा (१९१७—   ) हे श्रेष्ठ दर्जाचे संशोधक आहेत, तर वाग्व्यापार (१९५४) वगैरे पुस्तकांचे लेखक हरिवल्लभ भायाणी (१९१७—  ) प्राकृतचे थोर विद्वान होत. ते चांगले टीकाकार व अर्वाचीन साहित्याचे पुरस्कर्तेही आहेत. के. बी. व्यास हे संपादन क्षेत्रातील निष्णात विद्वान होत. वाडीलाल मोतीलाल शाह यांचे जैन तत्त्वज्ञानासंबंधीचे विवेचन व पोपटलाल गोविंदजी शाह यांचे मानवशास्त्रविषयक लेखन प्रशंसनीय आहे. प्रबोध पंडित भाषाशास्त्रज्ञ आहेत.

बालसाहित्य : गिजूभाई बधेका, ताराबाई मोडक, रमणलाल सोनी, हरभाई त्रिवेदी यांचे बालसाहित्य विभागातील लेखन उल्लेखनीय आहे. हंसाबेन मेहता (१८९७—  ) यांचेही या क्षेत्रातील कार्य लक्षात घेण्यासारखे आहे.

रवींद्रनाथ व शरदबाबू यांच्या बंगाली साहित्याचे चांगले अनुवाद रमणलाल सोनी (१९०७—   ), नगीनदास पारेख (१९०३—   ), भोगीलाल गांधी (१९११—  ) वगैरेंनी केले आहेत. नगीनदास पारेख चांगले टीकाकारही आहेत. अभिनवनो रसविचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भोगीलाल गांधी हे उत्कृष्ट अनुवादक आणि कवी आहेत. ज्ञानगंगोत्री या विश्वकोशाच्या संपादनाचे कार्य त्यांनी अंगीकारले आहे. जगगंगानां बहेतां नीर हे अमृतलाल याज्ञिक यांचे पुस्तक शिक्षण, संस्कार व सामाजिकतेच्या दृष्टीने मौल्यवान आहे.

लेखिकांमध्ये हिराबहेन पाठक (१९२०—   ) आणि विनोदनी नीलकंठ (१९१३—   ) यांचे लघुकथा, कविता, विवरण आणि इतर प्रकारांतील लेखन उल्लेखनीय आहे. हिराबहेन पाठक यांचा परलोके पत्र हा कवितासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे.

मुस्लिम आणि पारशी लेखक : हिंदू लेखकांशिवाय ‘शयदा’ (हरजी लवजी दामाणी), ‘बेफाम’ (बरकत विराणी), सैफ पालनपुरी, शून्य पालनपुरी, आसीम शंदेरी, मरीझ या कवींची गझलरचना लक्षणीय आहे. पारशी लेखकांमध्ये अदी मर्झबान यांनी पहिल्या दर्जाचे नाट्यलेखन केले आहे. फिरोझ आंटिया हे यशस्वी नाटककार होत. मिनू देसाई हे कवी व टीकाकार आहेत.

गांधी काल १९४७ च्या आसपास संपला असे मानण्यात येते. गांधीजींच्या मानवतावादी व ध्येयवादी प्रणालीपासून साहित्यप्रवाह वेगळा झाला आहे पण १९१५ ते १९४७ च्या दरम्यानच्या या कालाने अपूर्व अशा साहित्यनिर्मितीद्वारा गुजराती साहित्याला सर्व दिशांनी समृद्ध केले आहे. पंडित कालाने व गांधी कालाने गुजराती साहित्याला भारतीय साहित्यात मानाचे स्थान प्राप्त करून दिले.

स्वातंत्र्योत्तर काल : भारतास १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले पण त्यापूर्वीच साहित्यक्षेत्रातील वातावरण बदलत चालले होते. यानंतरचे काव्य तर संपूर्णपणे बदलून गेले. हा बदल आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही प्रकारांबाबत होता. या दोन्हीही प्रकारांतील वळणांचे स्वरूप निश्चित झाले होते. साहित्यामध्ये आशा, आदर्श, आकांक्षा यांचे चित्रण झाले पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुभवाला आलेली असुरक्षितता, संत्रस्तता, कुंचबणा, बीभत्सता, मूल्यांवरील श्रद्धेचा अभाव या गोष्टींचा लेखक व विचारवंत यांच्यावर प्रभाव पडला. लोकांनी ज्यांना देव मानले होते ते सामान्य माणासापेक्षाही हीन ठरले. सारी स्वप्ने विरली. साहित्यात याचे प्रतिबिंब पडले. उमाशंकर जोशी यांच्यासारखा गांधीवादी मूल्यांचा आदर्श मानणारा कवीही गाऊ लागला, ‘मी छिन्नविच्छिन्न आहे’.

सौंदर्यशास्त्राच्या जुन्या संकल्पना बदलून गेल्या. ‘काय सांगितले आहे’ याऐवजी ‘कसे सांगितले आहे’ याचे महत्त्व वाढले. अर्थघनतेऐवजी शब्दाला महत्त्व आले. लेखकांच्या दृष्टीने कोणत्याही भावनांच्या बाह्याविष्कारापेक्षा स्वतःच्या अंतःसृष्टीचे आविष्करण अधिक उपयुक्त बनले.

हा काळ आपल्या इतका जवळचा आहे, की त्याबद्दल निर्णायक विधाने करणे किंवा दीर्घ चर्चा करणेही शक्य नाही पण त्याचे मुख्य प्रवाह व त्याच्या प्रेरक शक्ती स्थूलमानाने दाखविता येतील.

नवी कविता : या काळातही दोन टप्पे दिसतात. पहिल्या टप्प्यात आकृतिविषयक बदलांकडे विशेष लक्ष वेधले. या परिवर्तनात नव्या कवितेचे नवे स्वरूप पूर्णपणे प्रकट करणारे दोन समर्थ कवी आहेत : एक ⇨राजेंद्र केशवलाल शाह (१९१३—   ) आणि दुसरा ⇨निरंजन भगत (१९२६—  ). राजेंद्रच्या ध्वनि (१९५१) आणि निरंजनच्या छंदोलय (१९४९) या संग्रहांतील कविता गांधी कालातील कवितेला एक नवे व मनोहर वळण देतात. राजेंद्रमधील स्वप्नरम्यता विशेष मोहक आहे आणि निरंजनमधील वास्तवता विदारक आहे. काव्यक्षेत्रात या दोघांनी केलेले कार्य मोठे आहे. ध्वनिनंतर राजेंद्रांचे शांत कोलाहल वगैरे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. शांत कोलाहलला १९६३ चे साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.

छंदोलयनंतर निरंजन भगत यांचे किन्नरी (१९५०) वगैरे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ही सर्व कविता छंदोलय या शीर्षकानेच पुन्हा १९५७ मध्ये प्रसिद्ध झाली. मुंबई शहराविषयीचा प्रवालद्वीप हा त्यांचा काव्यगुच्छ विशेष प्रसिद्ध आहे. राजेंद्रांची गीते विशेष आल्हाददायक आहेत. निरंजनांनी दर्जेदार टीकालेखनही केले आहे. त्यामध्ये कोणत्याही टीकाप्रणालींना प्राधान्य नाही. जीवनातील ऊर्मी आणि त्यांचे कलात्मक घाट यांविषयी हे टीकालेखन आहे.

इतर कवीही संत्रस्ततेचे हे वातावरण गाजून उठण्यापूर्वीपासून लिहितच होते. या प्रकारची काव्यनिर्मिती करणारांमध्ये हरिंद्र दवे (१९३०—   ), सुरेश दलाल (१९३२—   ), प्रियकांत मणियार (१९२७—  ), बालमुकुंद दवे, मकरंद दवे, वेणीभाई पुरोहित, जयंत पाठक, ‘उशनस्‌‌’ (नटवरलाल के. पंड्या, १९२०—   ), प्रजाराम रावळ, रमेश जानी, पिनाकिन ठाकोर, हसमुख पाठक (१९३०—  ) इ. कवींचा समावेश होतो. यांपैकी हरिंद्र दवे व सुरेश दलाल हे माधुर्य आणि राधाकृष्णांच्या प्रतीकांचा नवीन तऱ्हेने केलेला उपयोग यांमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. सुरेश दलालांनी दर्जेदार बालगीतेही लिहिली आहेत. अंतःस्फुरणांच्या समृद्धीमुळे हरिंद्र दवे यांची कविता रमणीय बनते. जयंत पाठक हे सुमधुर काव्यपद्धतीसाठी व वेगळ्या अशा लयमाधुर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. ‘उशनस्’ हे कित्येकदा बळवंतराय ठाकोर यांची आठवण करून देतात. जयंत पाठक यांचा वनांचल हा लहानसा आत्मचरित्रात्मक ग्रंथ मौलिक स्वरूपाचा आहे. अशब्द रात्रि ह्या संग्रहातील तसेच इतर कवितांनी प्रियकांत मणियार यांचे या प्रकारच्या काव्यलेखनातील स्थान निश्चित झाले आहे. बालमुकुंद दवे आणि वेणीभाई पुरोहित यांची रचना परत परत वाचत रहावी अशी आहे. मकरंद दवे यांची कविता तिच्यातील हृदयंगमतेमुळे वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.

कथा-कादंबरी-नाटक : कथा, कादंबरी व नाटक यांचा विचार करताना शिवकुमार जोशी यांचा उल्लेख अवश्य करावयास हवा. ते व्यवसायाने व्यापारी आहेत आणि कलकत्त्यास राहतात. त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. उदा., कंचुकीबंध, दिदो अभयनां दान (१९६२), सुवर्णरेखा वगैरे. त्यांची अनेक नाटके उच्च दर्जाची मानली जातात. त्यांनी विपुल नाट्यलेखन केले आहे. त्यांचे लघुकथासंग्रहही अनेक आहेत. त्यांची भाषा प्रासादिक आहे. रंजक शैलीमुळे ते विशेष लोकप्रिय बनले आहेत.

विपुल लेखन करणारे दुसरे लेखक मोहमद वलीभाई मांकड (१९२८—   ) हे होत. धुम्मस आणि कायर या दोन कादंबऱ्यांनी त्यांना विशेष लौकिक मिळाला. त्यांनी कथाही खूप लिहिल्या आहेत. शिवकुमार जोशी (१९१६—   ) यांच्या लेखनामधून कलकत्ता व बंगाल यांचे दर्शन विशेष घडते. जीवनातील मांगल्याचे व पावित्र्याचे चित्रण करणारे, संत्रस्तता वगैरेंपासून सामान्यतः दूर राहणारे व नवी शैली, आकार, घाट, तंत्र यांचा उपयोग न करणारे कथाकार म्हणजे हिमांशू बोरा, चंदूलाल सेलारका, दिनकर जोशी, अबिद सुरती, जशवंत मेहता इ. होत. रसिक मेहता, ‘कोलक’, चंद्रवदन शुक्ल, नटवर शाह आणि हरकिसन मेहता हे कथाकार विशेष लोकप्रिय आहेत. तथापि १९५५ नंतरच्या काळातील स्थिती आणखी बदलली आहे. स्वतःची कुंचबणा, संत्रस्तता वगैरेंचे चित्रण विपुल प्रमाणात होऊ लागले आणि त्या प्रमाणात साहित्याच्या घाटांतही बदल होत गेले. साहित्याचा अवघा रचनाबंधच बदलून गेला.

जगात सर्वत्रच बदललेल्या साहित्यविचारांचे सारे वारे आता गुजरातीपर्यंत येऊन पोहोचले होते. आकृतिवादी विचारसरणीने स्वतःचा प्रभाव गाजवला होता आणि याबरोबरच प्रतीकवाद, प्रतिमावाद, अस्तित्ववाद, अतिवास्तवतावाद यांचा प्रादुर्भाव या काळात झाला. छंदमुक्त कविताही याच काळात गुजरातीत आली.

या नव्या प्रभावाचे प्रमुख पुरस्कर्ते ⇨सुरेश हरिप्रसाद जोशी (१९२१—   ) हे होत. ते संस्कृतचे व इंग्रजीचे व्यासंगी आहेत आणि व्यापक वाचन व विचार करणारे आहेत. गृहप्रवेश (१९५७) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. या नव्या कथनशैलीने गुजराती कथेचे रूपच बदलून टाकले. या कथासंग्रहातील ‘किंचित्’ या प्रास्ताविकाने नव्या टीकेची तुतारी फुंकली. याप्रमाणे नवी कथा आणि नवी टीका यांचे ते अध्वर्यू बनले. किंचित् (१९६०) या आपल्या लेखसंग्रहात त्यांनी नव्या कवितेच्या संकल्पनेचीही चर्चा केली आहे. अशा प्रकारे कथा, समीक्षा, कविता, नवकथा वगैरे क्षेत्रांत सुरेश जोशी यांच्या आगमनाने नवे प्रवाह सुरू झाले. याशिवाय अपिच हा त्यांचा आगळा सर्जनशील लेखांचा संग्रह आणि कथोपकथन हा समीक्षापर लेखांचा संग्रह होय. प्रत्यंचा हा त्यांच्या कवितांचा संग्रह होय.

याच काळात गुलाम मोहंमद शेख यांनी काही उत्तम दर्जाची नवी कविता लिहिली. ज्यामुळे नवी कविता जुन्या लोकात बदनाम होते, ते विद्रूपता, बीभत्सता वगैरे सारे नमुने बऱ्याच प्रमाणात या कवितेत आहेत. सुंदरतेच्या स्थानी विरूपता येते, शिवाच्या स्थानी अशिव येते पण ते कलात्मक रूप घेऊनच. आजच्या कवितेची ही प्रणाली गुलाम मोहंमद शेख यांच्या कवितेपासून सुरू झाली. ते चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

लघुकथा आणि कादंबरी या दोन्ही प्रकारांत स्पृहणीय लेखन करणारे साहित्यिक म्हणजे चंद्रकांत बक्षी (१९३२—   ) व मधुराय होत. दोघेही कलकत्त्याचे. १९६३ च्या सुमारास लिहिलेल्या चंद्रकांत बक्षी यांच्या आकार या कादंबरीने एक नवे वळण प्रकट केले. या नव्या वळणाचा आविष्कार त्यांच्या पॅरेलिसिस या कादंबरीतही झाला आहे. त्यांच्या लघुकथाही या नव्या वातावरणाच्या निदर्शक आहेत. मीराएक सांजनी मुलाकात हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह होत. आजही त्यांची साहित्यनिर्मिती चांगल्या तऱ्हेने चालू आहे.

कादंबरीचे दुसरे प्रवाही वळण मधुराय यांच्या चेहरा (१९६६) या कादंबरीत दिसून येते. या कादंबरीने कादंबरीकथनाची पद्धतीच बदलून टाकली. मधुराय यांचे कथालेखनही असेच नव्या वळणाचे आहे. बांशी नामनी एक छोकरी हा त्यांचा कथासंग्रह. कुमारनी अगाशी हे त्यांचे नाटक अतिशय लोकप्रिय आहे. एक फूलनुं नाम आपो तो हीही त्यांची कृती प्रख्यात आहे.


आजच्या साहित्याची महत्त्वाची उदाहरणे म्हणून रघुवीर चौधरी यांच्या अमृता या कादंबरीचा आणि तमसा या काव्यसंग्रहाचा निर्देश करता येईल. नुकतीच प्रसिद्ध झालेली वेणु वत्सला ही त्यांची कादंबरीसुद्धा गाजत आहे. रघुवीर चौधरींनी आपल्या अमृतामध्ये बुद्धीच्या माध्यमातून अंतरोर्मींच्या यशस्वी प्रवासाचे चित्र रेखाटले आहे.

या काळातील यशस्वी कथालेखिका सरोज रमणलाल पाठक या होत. विराट टपकुं (१९५५) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. आजच्या कथालेखिकांमध्ये सरोज पाठक यांचे स्थान फार मोठे आहे. रमणलाल पाठक या प्रसिद्ध कथाकारांच्या सरोज पाठक पत्नी. दोघांनीही एकेक कादंबरीही लिहिली आहे पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. रमणलाल पाठक हे कथासमीक्षकही आहेत. नव्या शैलीच्या चांगल्या कथा सुवर्णा भट्ट यांनी लिहिल्या आहेत.

राधेश्याम शर्मा यांच्या फेरो या लहानशा कादंबरीने स्पृहणीय यश संपादन केले आहे. बिचारां या कथासंग्रहातील कथांमधूनही त्यांचे कौशल्य चांगल्या तऱ्हेने प्रकट झाले आहे.

पिनाकिन दवे यांनी विश्वजित वगैरे चांगल्या कादंबऱ्या तसेच लघुकथाही लिहिल्या आहेत. पण लघुकथेचे एक नवे वळण नागालँडमध्ये राहणाऱ्या किशोर जाधव या तरुण कथाकाराच्या कथांमध्ये दिसते. प्रागैतिहासिक अने शोकसभा या त्यांच्या कथासंग्रहामध्ये अतिवास्तववादी कथांचे अनोखे स्वरूप आढळते. नुकताच सूर्यारोहण ह्या त्यांच्या नवीनतम कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. पूर्वीच्या काळातील कथांपेक्षाच नव्हे, तर अलीकडच्या सुरेश जोशी वगैरेंच्या कथांपेक्षाही त्यांच्या कथालेखनाचे स्वरूप अगदीच वेगळे व नवे आहे. त्यात दुर्बोधता असली, तरीही त्यांचे सामर्थ्य लपून राहत नाही. विभूत शाह, इवोडेव, प्रफुल्ल दवे वगैरे आजच्या कथालेखकांनाही प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.

भगवतीकुमार शर्मा हे बहुतेक नवीनतम प्रवाहांपासून अलिप्त आहेत. पडछाया संग प्रीत ही अनोख्या स्वरूपाची कादंबरी त्यांनी लिहिली आहे. त्यांनी चांगल्या कादंबऱ्या व कथा लिहिल्या आहेत व त्यांचा लौकिकही चांगला झाला आहे. महेश दवे यांचा वहे तुं आकाश हा अगदीच वेगळ्या प्रकारचा पण सुंदर कथांचा संग्रह होय. शशी शाह यांनी चांगल्या कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

नवीनतर कविता : कथा-कादंबरी या क्षेत्रांत साहित्यनिर्मितीला इतके उधाण आलेले दिसते खरे पण विशेष महत्त्वाचा बदल कवितेच्या क्षेत्रात झाला आहे. सुरेश जोशी, गुलाम मोहंमद शेख यांच्या कवितेहून अगदी वेगळी आणि गुणवत्तेत उणी ठरणार नाही, अशी कविता लाभशंकर ठाकर आणि सितांशू यशश्चंद्र यांनी गेल्या काही वर्षांत लिहिली आहे. गेल्या काही वर्षांतील अतिशय शक्तिशाली कवी लाभशंकर ठाकर हे होत. ‘वही त्रती पाछळ रम्यघोषा’ व ‘माणसानी वात’ या कवितांमुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. सितांशू यशश्चंद्र यांचा ओडिश्वसनुं हलेसुं (१९७५) हा कवितासंग्रह. गेली काही वर्षे भाषा व लय यांविषयी केलेल्या प्रयोगांमुळे ते प्रसिद्ध झाले आहेत. या काळात छंदरहित कवितेचेही खूप प्रयोग झाले. ‘तडको’ ही लाभशंकर यांची कविता खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी चांगल्या कथा आणि दोन-तीन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत पण कथाकार किंवा कादंबरीकार म्हणून त्यांचा तितका लौकिक नाही. इतर मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी ‘रे मठ’ ही साहित्यसंस्था स्थापन केली. त्यांपैकीच पण तरीसुद्धा त्यापासून दूर अशा, रावजी पटेल यांनी अश्रुघर आणि झंझा या सुंदर कादंबऱ्या लिहिल्या आणि विशिष्ट स्वरूपाच्या कविताही लिहिल्या. दुर्दैवाने अठ्ठाविसाव्या वर्षीच त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अंगत हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ऐन तारुण्यात मृत्यू पावलेला दुसरा एक चांगला कवी म्हणजे मणिलाल देसाई. रानेरी हा त्यांचा सुंदर काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.

तरुण आणि हयात कवींमध्ये आदिल मनसुरी यांचे स्थान अनोखे आहे. त्यांनी गझलांचा एक नवाच आविष्कार घडविला आहे. त्यांच्या निर्मितीत गझलाने फार्सी-उर्दू स्वरूपापेक्षा वेगळ्या व अभिनव अशा प्रकारच्या मंजुळ लयीचे रूप घेतले. मनहर मोदी आणि चिनू मोदी यांनीही गझलांचे मनोज्ञ विलास दाखविले आहेत.

मनहर मोदी, चिनू मोदी, आदिल, राजेंद्र शुक्ल, मनोज खंडेरिया, श्याम साधू वगैरेंनी गझलांशिवाय इतर काव्यप्रकारांत दर्जेदार लेखन केले. काव्याला संपूर्ण नवे रूप देणारे रमेश पारेख व अनिल जोशी हे अगदी तरुण कवी आहेत. त्यांनी लयमधुर आणि अर्थसघन गीते लिहिली आहेत. सौराष्ट्री बोली आणि लोकसाहित्य याचे सूर व लय असलेली कविताही त्यांनी लिहिली आहे. कदाच हा अनिल जोशी यांचा काव्यसंग्रह आहे व क्यां हा रमेश पारेख यांचा.

त्यांच्या काव्यात तथाकथित अशिव, बीभत्स असे काही नाही. कविता पुन्हा आपल्या राजमार्गावर येत आहे. सुधीर दलाल यांनी कथा लिहिल्या आहेत. व्हाइट हॉर्स हा त्यांचा कथासंग्रहही याच वळणाचा पुरावा  होय.

या सर्वांहून वेगळा, उज्ज्वल भवितव्य असलेला आणि या भवितव्याचे आशादायक बहर ज्यांच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष दिसतात, असा कवी यशवंत त्रिवेदी होय. क्षितिज ने वांसवन हा त्यांचा काव्यसंग्रह. हसमुख पाठक व नलिन रावळ यांनीही उत्तम निर्मिती केली आहे. चंद्रकांत टोपीवाला यांची कविता आणि समीक्षा प्रसिद्ध आहे. सुमन शाह, शिरीष पंचाल, प्रकाश मेहता व दीपक मेहता हे दर्जेदार समीक्षक होत.

नाटक वगैरे : पण काव्य हेच नवीन अभिव्यक्तीचे एकमेव माध्यम नाही. लघुकथा, कादंबरी यांशिवाय नाट्यक्षेत्रातही नव्या लेखण्या सरसावलेल्या आहेत. लाभशंकर ठाकर व सुभाष शाह या दोघांनी मिळून एक उंदर अने जदुनाथ हे खऱ्या अर्थाने मृषा वा व्यस्ततावादी नाटक लिहिले आहे. चिनू मोदी, आदिल मनसुरी, रमेश शाह, विभूत शाह, फकीर महमद मनसुरी वगैरेंनी एकांकिका प्रकारात दर्जेदार लेखन केले आहे. बकुल त्रिपाठी यांनीही नाट्यलेखन केले आहे. ते ज्योतींद्र दवे यांच्यानंतरचे यशस्वी विनोदी लेखक होत.

दिगीश मेहता यांनी उत्तम निबंध लिहिले आहेत आणि आपणो घडीक संग ही वेगळ्याच प्रकारची कादंबरीही लिहिली आहे. चिनू मोदींनीसुद्धा शैला मजमूदारलीला नाग या समर्थ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. विनोद भट्ट यांचा विनोदी लेखक म्हणून चांगला लौकिक झाला आहे. वाडीलाल डगली यांचे काव्य आणि निबंधलेखन उल्लेखनीय आहे.

भोळाभाई पटेल व अनिरुद्ध ब्रह्मभट तसेच राधेश्याम शर्मा व रघुवीर चौधरी हे या पिढीतील चांगले समीक्षक आहेत. अनिरुद्ध ब्रह्मभट यांनी ॲरिस्टॉटलच्या ‘काव्यशास्त्रा’चे गुजराती भाषांतर केले आहे. सितांशू यशश्चंद्र यांनीही काही चांगले समीक्षालेखन केले आहे. यशवंत दोशी हे ग्रंथ या समीक्षेस वाहिलेल्या मासिकाचे संपादन करीत आहेत.

नवीनतर कादंबरीलेखनाचा मान श्रीकांत शाह यांचाच आहे. अस्ती ही त्यांची कादंबरी सर्वथा आणि सर्वार्थाने नवीन निर्मिती होय. ज्योतीष जानी हे उगवते कवी, समीक्षक व कथाकार आहेत. त्यांची आखडी ए चडी चाल्या हसमुखलाल ही कादंबरी औपरोधिक लेखनातील एक नवाच प्रयोग आहे. दिलावर सिंह जाडेजा व जसवंत शेखडीवाला हे समीक्षक आहेत. गीता पारीख (१९२९—   ) ह्या नव्या पिढीतील लेखिका आहेत पण नव्या पिढीच्या लेखनाची वळणे त्यांनी अंगीकारलेली नाहीत. त्या बऱ्यापैकी कवयित्रीही आहेत. फादर वॉलेस या ख्रिस्ती स्पॅनिश धर्मगुरूचे गुजरातीतील निबंधलेखन उत्कृष्ट आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्याने आपले कसदार स्वरूप विशेषत्वे प्रकट केले आहे. त्यात सर्व साहित्यप्रकार समृद्ध झालेले दिसतात. त्यातून या कालाचे स्वरूप आणि भावी काळाची चाहूल दोन्ही उत्तम रीतीने प्रकट झाली आहेत. या वाटचालीवरून भावी काळातील गुजराती साहित्याबाबत विशेष अपेक्षा बाळगावयास हरकत नाही.

संदर्भ : 1. Divetia, N. B. Gujrati Language and Literature, 2 Vols., Bombay, 1921, 1932.

           2. Jhaveri, K. M. Further Milestones in Gujarati Literature, Bombay, 1924.

           3. Jhaveri, K.M. The Present State of Gujarati Literature, Bombay, 1934.

           4. Jhaveri, M. M. Milestones in Gujarati Literature, Bombay, 1914.

           5. Maharashtra State Gazetteers, Language and Literature Vol., 4th Chapter, Bombay, 1971.

           6. Munshi, K. M. Gujarat and Its Literature, Bombay, 1954.

           7. Scott, H. R. Gujarati Poetry, Bombay, 1914.

           8. Tripathi, Govardhanram, The Classical Poets of Gujarat and Their Influence on Society and Morals, Bombay, 1958.

           ९. शर्मा, गिरधरप्रसाद, गुजराती साहित्य का इतिहास, आग्रा, १९६२.

ब्रोकर, गुलाबदास (गु.) कालेलकर, ना. गो. (म.)