आनंदशंकर बापूभाई ध्रुव

ध्रुव, आनंदशंकर बापूभाई : (२५ फेब्रुवारी १८६९–७ एप्रिल १९४२). प्रसिद्ध गुजराती विद्वान, संस्कृत पंडित आणि वसंत मासिकाचे संपादक. जन्म अहमदाबाद येथे व शिक्षण एम्.ए. एल्.एल्.बी. डी. लिट्.पर्यंत. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे ते प्राध्यापक–उपकुलगुरू होते. नवव्या गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, तत्त्वज्ञान काँग्रेसचे अध्यक्ष इ. बहुमानाची पदेही त्यांनी भूषविली. गुजराती साहित्यातील पंडित युगाचे भूषण असलेल्या आनंदशंकरांनी वसंत  मासिक ३०–३२ वर्षे चालविले व गुजराती भाषेची बहुमोल सेवा केली. मणिलालांप्रमाणे गुजराती साहित्यात चिंतनप्रधान गद्य लिहिणारे ते श्रेष्ठ गद्यकार असून त्यांनी नीतिशिक्षण (१९११), काव्यतत्त्वविचार (१९३९), साहित्यविचार (१९४१), दिग्दर्शन (१९४२), विचारमाधुरी (२ खंड–१९५१) आदी ग्रंथांमधून साहित्य, शिक्षण व समाजविषयक चिंतनपर लिखाण केले आहे. आपणो धर्म (१९१६) हा त्यांच्या धर्मविषयक लेखांचा ग्रंथ आहे. हिंदु धर्मनी बाळपोथी (१९१८), हिंदु वेदधर्म (१९१९) हेही त्यांचे धर्मविषयक महत्त्वाचे ग्रंथ होत. रामानुजाचार्यांच्या श्रीभाष्याचा त्यांनी गुजरातीत अनुवादही केला (१९१३). त्यांनी स्वतःच्या विवेचनात ऐतिहासिक, तुलनात्मक व विश्लेषणात्मक अशा तिन्ही पद्धती अवलंबिल्या असून त्यांच्या चिंतनपद्धतीत विशालता, सूक्ष्मता, स्पष्टता व समतोलपणा हे गुण आढळतात. त्यांची भाषा संस्कृतनिष्ठ, सरल आणि प्रासादिक आहे. एक विचारवंत, विद्वान व गद्यशैलीकार म्हणून त्यांना गुजरातीत महत्त्वाचे स्थान आहे.

पेंडसे, सु. न.