अँडरसन, कार्ल डेव्हिड : (३ सप्टेंबर १९०५ — ). अमेरिकन भौतिकी विज्ञ. १९३६च्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये अध्ययन करून १९२७ मध्ये बी. एस्. आणि १९३० मध्ये पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. १९३० नंतर आजपावेतो ते कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सदस्य आहेत. १९३९ मध्ये त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली.

१९३० मध्ये त्यांनी विश्वकिरणांमुळे (बाह्य अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिशय भेदक किरणांमुळे) वातावरणात निर्माण होणाऱ्या आयनीकारक (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणाऱ्या) कणांचा तीव्र चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या बाष्पकोठीच्या [ →कण अभिज्ञातक] साहाय्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. आयनकारक कणांमुळे बाष्पकोठीत तयार झालेल्या मार्गांचे चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या विचलनाच्या (बदलाच्या) दिशेचे निरीक्षण करून अँडरसन यांना त्या कणावरील विद्युत् भाराचे चिन्ह ठरविणे शक्य झाले. १९३२ च्या सुमारास त्यांना विश्व किरणांमध्ये नेहमीच्या (ऋण विद्युत् भारित) इलेक्ट्रॉनाशिवाय धन विद्युत् भारित इलेक्ट्रॉन असतात, याचा निर्णायक पुरावा मिळाला. या नवीन कणाला ‘पॉझिट्रॉन’ असे नाव देण्यात आले. डिरॅक यांनी आपल्या इलेक्ट्रॉन-सिद्धांतामध्ये या प्रकारच्या कणाचे भाकीत केलेले होते, परंतु प्रत्यक्षात यापूर्वी या कणांचे निरीक्षण झालेले नव्हते. या शोधाकरिता अँडरसन यांना १९३६ मध्ये व्हिक्टर हेस या विश्वकिरणांसंबंधी मूलभूत संशोधन केलेल्या दुसऱ्या शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. १९३७ मध्ये विश्वकिरणांसंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी व नेडरमेयर यांनी मेसॉन या मूलकणाचा शोध लावण्यात यश मिळविले [→ मूलकण].

भदे, व. ग.