डेकॅपोडा–२ : क्रस्टेशिया (कवचधारी प्राण्यांच्या) वर्गातील मॅलॅकोस्ट्रॅका या उपवर्गाच्या यूकॅरिडा विभागातील अतिविशेषित प्राण्यांचा गण. डेकॅपोडा म्हणजे दहा पाय असलेल्या प्राण्यांचा किंवा दशपादांचा गण. शेवंडे, झिंगे, चिमोरे, चिंगाट्या (कोळंबी), खेकडे इ. प्राण्यांचा या गणात समावेश होतो. या प्राण्यांमध्ये आढळणारी काही समान लक्षणे पुढीलप्रमाणे होत : डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने शिरोवक्ष हा शरीराचा भाग बनलेला असून त्याचा पृष्ठभाग कठीण कवचाने–पृष्ठवर्माने–झाकलेला असतो. शिरोवक्षाच्या दोन्ही बाजूंना चांगली वाढ झालेल्या क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) कित्येक श्रेणी असून पृष्ठवर्माच्या रुंद झालेल्या दोन्ही बाजू झाकणासारख्या त्यांच्यावर लोंबत असतात. वक्षावर असलेल्या उपांगांच्या जोड्यांपैकी पहिल्या तीन विशेषित झालेल्या असून त्यांचा मुखांगांशी निकट संबंध असतो.

दशपाद प्राणी विविध आकारमानांचे असतात काहींची लांबी १२ मिमी.पेक्षाही कमी असते, तर जपानी ‘स्पायडर’ खेकड्याचा विस्तार जवळजवळ ४ मी. असतो. बहुसंख्य दशपाद जरी समुद्रात राहणारे असले तरी झिंगे, काही जातींच्या चिंगाट्या व काही खेकडे तलाव, नद्या, ओढे इत्यादींच्या गोड्या पाण्यात राहतात. कित्येक खेकडे व शंखवासी खेकडे पाण्यापासून दूर जमिनीवर राहतात. फक्त ठराविक हंगामात अंडी फुटण्याच्या सुमारास ते समुद्रात जातात. पुष्कळ चिमोरे जमिनीवर बिळे करतात. एका जातीच्या खेकडा आपले सगळे आयुष्य उंड झाडांच्या शेंड्यांवर घालवितो.

सर्वसाधारणपणे डेकॅपोडांचे लांब शेपटीचे व आखूड शेपटीचे असे दोन गट पाडता येतात. शेवंडे, चिमोरे, चिंगाट्या यांच्यासारख्या लांब शेपटीच्या जातींचे पृष्ठवर्म कमीअधिक प्रमाणात दंडगोलाकार अथवा दोन्ही बाजूंनी दबलेले असते व त्यावर पुढच्या टोकाकडे तुंड (चंचू) असते. उदर मोठ व स्नायुमय असल्यामुळे संकटातून पार पाडण्याकरिता त्यांना झटकन मागे जाऊन निसटता येते पण याच चविष्ट भागामुळे ते माणसाचे आणि इतर अनेक प्राण्यांचे भक्ष्य बनतात. आखूड शेपटीच्या जातींमध्ये (उदा., खेकडे) पृष्ठवर्म पुष्कळदा रुंद आणि वरच्या बाजूने चपटे झालेले असते. त्याच्यावर बहुधा तुंड नसते. उदर ऱ्हास पावलेले व दुबळे असून वक्षाखाली दुमडलेले असते. मादी अंडी साठविण्यासाठी त्याचा भ्रूणधानी म्हणून उपयोग करते. 

उपांगे : जवळजवळ सगळ्या दशपादांना उपांगांच्या १९ जोड्या असतात. यांपैकी ५ शिरोवक्षाच्या शीर्ष भागावर असतात. पहिली जोडी लघुशृंगिकांची (सांधे असलेल्या लहान स्पर्शेंद्रियांची) असते. लघुशृंगिकेचा देठ तीन खंडांचा बनलेला असून त्याच्यापासून चाबकाच्या वादीसारखे दोन प्रवर्ध (वाढी) निघालेले असतात. काही चिंगाट्यांचा बाहेरचा प्रवर्ध बुडापाशी द्विशाखित (दोन शाखांचा) असतो. उपांगांची दुसरी जोडी शृंगिकांची असते. प्रत्येक शृंगिकांच्या देठाचे पाचपर्यंत खंड असून त्यांच्यापासून एकच लांब प्रवर्ध निघालेला असतो. शृंगिकांच्या मागे मुखाच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे दोन जंभ (जबडे) असतात. ते कठीण व भरीव असून त्यांच्या कडांचा उपयोग भक्ष्य कापून त्याचे बारीक तुकडे करण्याकरिता होतो. जंभावर तीन खंड असलेला एक स्पर्शक (लांब, सडपातळ, लवचिक इंद्रिय) असतो. जंभाच्या मागे जंभिकांची पहिली व दुसरी जोडी असते. या दोन्ही जोड्यांतील उपांगे पानांसारखी चपटी असतात.

शिरोवक्षाच्या शीर्ष भागाच्या मागे वक्षावर उपांगांच्या ८ जोड्या असतात त्यांपैकी एकीमागे एक असलेल्या पहिल्या तीन जंभपादांच्या असतात. पहिल्या जोडीतील जंभपाद जंभिकांप्रमाणेच पानांसारखे चपटे असतात. दुसऱ्या जोडीतील जंभपादांचे खंडसुद्धा चपटे व रुंद असतात, पण पहिल्या जोडीतील जंभपादांच्या इतके त्यांचे स्वरूप प्रारूपिक (नमुनेदार) वक्षीय उपांगांपेक्षा बदललेले नसते, तिसऱ्या जोडीतील जंभपाद चिंगट्यांमध्ये पायांसारखे लांब असतात पण बहुतेक खेकड्यांत त्यांचे स्वरुप बदलून त्यांच्या आधी असणाऱ्या मुखांगांवर त्यांचे झाकण बनलेले असते. वक्षीय उपांगांच्या बाकीच्या पाच जोड्या उरःपादांच्या असतात. ही उपांगे चालण्याकरिता असतात, पण कित्येकदा त्यांपैका काहींचे विविध प्रकारे रूपांतर झालेले दिसून येते. नेहमी आढळणारे रूपांतर म्हणजे या पायांच्या टोकांवर कीले (नखर) उत्पन्न होणे हो होय. लांब शेपटी असणाऱ्या दशपादांमध्ये पायांच्या एक ते तीन जोड्या, क्वचित चार किंवा सगळ्या पाचही जोड्या नखरी असतात. आखूड शेपटीच्या प्राण्यांमध्ये पायांच्या फक्त पहिल्याच जोडीचे अशा प्रकारे रूपांतर झालेले आढळते. पोहणाऱ्या काही प्राण्यांमध्ये, विशेषतः पोहणाऱ्या खेकड्यांमध्ये, काही उरःपाद चपटे व रुंद झालेले आढळतात. त्यांचा पोहण्याकरिता वल्ह्यांसारखा उपयोग होतो. चिंगाट्या, शेवंडे इत्यादींमध्ये पाय मूलतः सात खंडांचे बनलेले असतात पण इतर बहुतेक दशपादांमध्ये दुसरा आणि तिसरा खंड सायुज्जित (एकत्रित झालेले) असतात. कधीकधी पायांच्या एक किंवा दोन जोड्या अल्पवर्धित असतात किंवा मुळीच नसतात.

उदरावरील उपांगांच्या पहिल्या पाच जोड्यांचा उपयोग जवळजवळ सगळ्या लांब शेपटीच्या दशपादांमध्ये पोहण्याकरिता होतो. त्यांना प्लवपाद म्हणतात परंतु नराच्या पहिल्या एक किंवा दोन जोड्यांचे रूपांतर होऊन त्यांची लैंगिक उपांगे किंवा जननपाद बनतात मादीमध्ये बहुधा त्यांचा ऱ्हास होतो किंवा कधीकधी त्या मुळीच नसतात. आखूड शेपटीच्या प्राण्यांमध्ये मादीचे प्लवपाद प्रायः लहान झालेले किंवा रुपांतरित असून त्यांना अंडी चिकटविली जातात. लांब शेपटीच्या जातींमधील नर आणि मादी या दोहोंतही शेवटच्या प्लवपादांची (पुच्छपादांची ) जोडी आणि पुच्छखंड (उदराचा शेवटचा खंड) हे मिळून एक पंख्यासारखी संरचना (पुच्छव्यजन) बनलेली असते. शंखवासी खेकड्याचे पुच्छपाद जाड आणि पिळवटलेले असल्यामुळे या खेकड्यांचे शरीर उदरपादांच्या (गॅस्ट्रोपॉड प्राण्यांच्या) शंखात घट्ट बसते. वस्तुतः सगळ्या खेकड्यांमध्ये पुच्छपाद नसतात.

 

पचन तंत्र : पचन तंत्रात आहारनाल (अन्नमार्ग) आणि पचन ग्रंथी अथवा यकृत-अग्निपिंड यांचा समावेश होतो. आहारनाल इतर बहुतेक क्रस्टेशियन प्राण्यांतल्याप्रमाणेच सरळ नळीसारखा असून त्याचे अग्रांत्र, मध्यांत्र आणि पश्चांत्र असे तीन भाग असतात. पहिल्या आणि तिसऱ्या भागाला कायटिनाचे (शृंगी द्रव्याचे) पण कधीकधी कॅल्सीभूत (कॅल्शियमयुक्त) अस्तर असते. मध्यांत्राचे अस्तर अंतःस्तराचे असते. जठर हा अग्रांत्राचा विस्फारित भाग असून त्याच्या अग्र अथवा उपहृद् भागाच्या अस्तरावर कित्येक कठीण कॅल्सीभूत अस्थिका (पट्ट) व मजबूत दात असतात अस्थिका व दात यांची काही स्नायूंच्या योगाने हालचाल करता येते. या यंत्रणेला जठर-पेषणी म्हणतात मुखातून ग्रसिकेच्या (घसा व जठर यांतील आहारनालाच्या भागाच्या) मार्गाने जठरात आलेले अन्न तिच्या योगाने दळले जाते. जठराच्या मागाच्या भागाला निजठर म्हणतात. याच्या पुढच्या टोकाजवळ कंगोऱ्यांवरून निघालेल्या लांब केसांचे जाळे असते. या जाळ्यातून दळलेले अन्न गाळले जाऊन निजठरात जाते. यकृत-अग्निपिंडापासून एक किंवा अधिक वाहिन्या निघून त्या मध्यांत्राच्या अग्र टोकापाशी उघडतात. यांतून पाचक रस येऊन अन्नात मिसळतो व त्याचे पचन होते. पश्चांत्रात फक्त आतड्याचा समावेश होतो. 


श्वसन : सर्व दशपादांमध्ये क्लोमांच्या कित्येक श्रेणींच्या योगाने श्वसन होते. वक्षाच्या पार्श्व बाजूंवर असणाऱ्या क्लोमकक्षांमध्ये क्लोम असतात. क्लोमांच्या एका संपूर्ण संचामध्ये पार्श्वक्लोम, संधिक्लोम आणि पादक्लोम असे तीन प्रकारचे क्लोम असतात. पार्श्वक्लोम वक्षीय खंडांच्या पार्श्व भित्तींना चिकटलेले असतात संधिक्लोम, उपांगे जिच्या योगाने देहभित्तीला जोडलेली असतात त्या लवचिक संधिकलेला (जोडणाऱ्या पातळ पटलाला) घट्ट जोडलेले असतात आणि पादक्लोम उपांगांच्या पहिल्या खंडाला जोडलेले असतात.

क्लोमकक्षाच्या मागच्या बाजूने त्यात पाणी शिरते आणि क्लोमांवरून वाहत जाऊन ते पुढच्या बाजूने बाहेर पडते. दुसऱ्या जंभिकेच्या सतत हालण्यामुळे पाणी क्लोमकक्षांच्या पुढच्या टोकातून बाहेर ढकलेले जाते. अशा प्रकारे क्लोमकक्षामध्ये पाण्याचा प्रवाह मागून पुढे सतत चालू राहतो पण बिळात राहणाऱ्या जातींमध्ये हा प्रवाह मधूनमधून उलट्या दिशेनेही (पुढून मागे) चालू असतो. जमिनीवर राहण्याकरिता ज्यांचे अनुकूलन (ज्या प्रक्रियेने विशिष्ट परिस्थितीत राहण्यास प्राणी योग्य झालेला असतो ती प्रक्रिया) झालेले आहे अशा खेकड्यांत क्लोमकक्षाच्या आस्तरण-कलेची क्लोमांच्या कार्याला मदत होते. हा कक्ष सूक्ष्म अंगुष्ठिकांनी (बोटांसारख्या संरचनांनी) आच्छादिलेला असून त्याला रक्ताचा भरपूर पुरवठा होत असल्यामुळे तो फुप्फुसाचे कार्य करतो. 

परिवहन तंत्र : हृदय पृष्ठवर्माच्या पश्च भागाखाली असून आखूड व बहुभुजीय असते. हृदयावर रंध्रांच्या तीन किंवा जास्त जोड्या असतात. या रंध्रांमधून हृदयाभोवती असणाऱ्या परिहृद् कोटरातील ऑक्सिजनीकृत (ऑक्सीजन वायूने युक्त असे) रक्त हृदयात जाते. हृदयाच्या अग्र टोकापासून एक व पश्च टोकापासून एक मध्य महारोहिणी निघते, पण यांशिवाय हृदयापासून रोहिण्यांच्या दोन जोड्या निघालेल्या असतात. शरीरातील रक्त मध्य अधर (खालील) भागात असलेल्या मोठ्या उरोकोटरात गोळा होते तेथून ते क्लोमांकडे जाते व तेथे त्याचे ऑक्सीजनीकरण होऊन ते परिहृद्‌ कोटरात जाते आणि या कोटरातून ते हृदयात जाते.

उत्सर्जन तंत्र : सर्व दशपादांमध्ये शृंगिका ग्रंथी अथवा हरित ग्रंथी हे महत्त्वाचे उत्सर्जनेंद्रिय होय. ही ग्रंथी सुटसुटीत असून दशपादांमध्ये तिची संरचना क्रस्टशिया वर्गातील इतर कोणत्याही गटातल्या शृंगिका ग्रंथींपेक्षा जास्त गुंतागुंतीची असते. ती शृंगिकेच्या बुडाशी असून तिचे तीन भाग असतात. (१) अंत्यकोश : याचे पडद्यांनी पुष्कळ खण पडलेले असतात (२) गहन : हे एक नलिकांचे गुंतागुंतीचे जाळे असते आणि (३) आशय व त्याच्यापासून निघालेली एक बाहेर उघडणारी वाहिनी आशय चिमोऱ्यातल्याप्रमाणे साधा व आखूड वाहिनी असलेला असतो किंवा बहुसंख्य चिंगाट्या व खेकडे यांच्याप्रमाणे पालियुक्त (कप्प्यांनी युक्त) असतो. वाहिनी शृंगिकेच्या पहिल्या खंडावर असलेल्या एका लहान उंचवट्यावर बारीक छिद्राने उघडते. खेकड्यांमध्ये हे छिद्र एका झाकलेले असून त्याची उघड-मीट होऊ शकते.

 

तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). हे काहीसे परिवर्तनशील असते. अधर भागात असणाऱ्या तंत्रिका रज्जूवर (मज्जारज्जूवर) अधोग्रसिका-गुच्छिकेच्या (ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिका पेशींच्या समूहाच्या) मागे प्रायः थोड्याच गुच्छिका असतात, परंतु त्यांची संख्या ११ पर्यंतही (वक्षात ५ आणि उदरात ६) असू शकते. बहुतेक खेकड्यांत सगळ्या अधर गुच्छिका सायुज्यित होऊन त्यांची वक्षात एकच मोठी वाटोळी गुच्छिका बनलेली असते आणि तिच्या सर्व बाजूंपासून तंत्रिका निघालेल्या असतात.

आ. १. माइया या खेकड्याचे तंत्रिका तंत्र : (१) मेंदू, (२) परिग्रसिका संयोजक, (३) परियोजी गुच्छिका, (४) वक्षीय गुच्छिका, (५) जठर, (६) आंतरांग तंत्रिका.

ज्ञानेंद्रिये : ज्ञानेंद्रियांमध्ये डोळे, संतुलन पुटी (शरीराचा तोल सांभाळणारे ज्ञानेंद्रिये), गंधतंतू आणि स्पर्शग्राही शूक (लहान राठ केसांसारखी रचना) यांचा समावेश होतो.  बहुतेक दशपादांच्या संयुक्त डोळ्यांचा [⟶ डोळा] चांगला विकास झालेला असून त्यांना देठ दोन, क्वचित तीन खंडांचे बनलेले असतात. कधीकधी या खंडांपैकी एखादा अतिशय लांब असतो. समुद्राच्या खोल पाण्यात, गुहांत किंवा बिळांत राहणाऱ्यांचे डोळे ऱ्हास पावलेले असतात किंवा ते मुळीच नसतात. डोळ्यांचे स्वच्छमंडल-फलक (बाह्य पारदर्शक आवरणाचे भिंगासारखे काम करणारे भाग) चौकोनी किंवा षट्‌कोनी असतात.

संतुलन पुटी दोन असून त्या लघुशृंगिकांच्या बुडाच्या खंडात असतात. त्या पिशवीसारख्या असून द्रवाने भरलेल्या असतात. पिशवी बाहेर उघडणारी किंवा बंद असते. तिच्या अस्तरावर संवेदी केस असतात आणि द्रवात वाळूचे कण (बाहेर उघडणाऱ्या पिशवीत) किंवा कॅल्शियम कार्बोनेटाचे कण (बंद पिशवीत) असतात. गंधतंतू लघुशृंगिकांच्या बाहेरच्या प्रवर्धावर विपुल असतात.

शरीराच्या निरनिराळ्या भागांवर आणि उपांगांवर स्पर्शग्राही शूक असतात. खोल समुद्रात राहणाऱ्या कित्येक दशपादांना अनेक प्रकारची दीप्तिमान अंगे असतात काही चिंगाट्या एक प्रकारचा दीप्तिमान द्रव पदार्थ बाहेर टाकतात.

जनन तंत्र : दशपादांमध्ये लिंगे भिन्न असतात. काही चिंगाट्या उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असलेल्या) असतात, पण त्यांचे पुंयुग्मक (ज्यांच्या युग्मांच्या संयोगाने प्रजोत्पत्ती होते त्या पुंजनन कोशिका) आधी पक्व होऊन शरीराबाहेर पडतात. या स्थितीला पुंपूर्वी उभयलिंगता म्हणतात. वृषणांचा (शुक्राणू उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींचा) काही भाग वक्षामध्ये तर काही भाग उदरामध्ये असतो व वृषण मध्य रेषेवरून एकमेकांना जोडलेले असतात. काही शंखवासी खेकड्यांत मात्र ते पूर्णपणे उदरात असतात ते एकमेकांना जोडलेले नसतात किंवा दोहोंच्या सायुज्यनाने एकच वृषण बनतो. शूक्रवाहक बहतकरून वक्षीय पादांच्या शेवटच्या जोडीच्या पहिल्या खंडावर उघडतो परंतु काही खेकड्यांमध्ये वक्षाच्या शेवटच्या अधरकाला (काय खंडाच्या खालील भागाला) भोक पाडून तो उघडतो. जागा आणि आकार याबाबतींत अंडाशयांचे वृषणांशी साम्य दिसून येते. अंडवाहिन्या प्रायः उरःपादांच्या तिसऱ्या जोडीच्या पहिल्या खंडावर उघडतात पण बहुतेक खेकड्यांत त्या अधरपट्टावर उघडतात.


विकास : अंड्यांचे निषेचन (फलन) झाल्यानंतर त्यांच्या विकासाने नवीन दशपाद तयार होतात. अंड्यातून बाहेर पडणारे पिल्लू डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यपणे क्रियाशील पूर्व अवस्था) असते. चिंगाट्यांच्या फक्त एकाच गटात सगळ्या आद्य डिंभावस्था दिसून येतात. पहिल्या अवस्थेला ‘नॉप्लियस’ डिंभ म्हणतात. याचे शरीर अंडाकृती असून त्यावर एक मध्य नेत्र आणि उपांगांच्या तीन जोड्या असतात. या अवस्थेनंतर ‘मेटॅनॉप्लियस’ ही डिंभावस्था येते. हिच्यात आणखी चार उपांगांचे अल्पविकास (सर्वांत प्रथम ओळखू येणारी अवयवाची अवस्था) दिसून येतात. मूळच्या उपांगांपैकी तिसऱ्या जोडीचे वल्ह्याचे कार्य कमीकमी होत जाऊन ती आद्य जंभांचे स्वरुप धारण करू लागते. ‘प्रोटोझोइया’ या तिसऱ्या डिंभावस्थेत उपांगांच्या सात जोड्यांची पुष्कळच वाढ होते, शरीराचा पुढचा भाग पृष्ठवर्माने झाकला जातो, उदर स्पष्टपणे तयार होते पण सुरुवातीला त्याचे खंड पडलेले नसतात. युग्मित डोळ्यांचे अल्पविकस दिसू लागतात आणि हृदय तयार होते. याच्या पुढच्या ‘झोइया’ या डिंभावस्थेत डोळे सगळ्या बाजूंना फिरवता येऊ लागतात व पृष्ठवर्मावर तुंड तयार होते. सगळी वक्षीय उपांगे निदान त्यांचे अल्पविकस तरी उत्पन्न झालेली असतात आणि उदरावरील उपांगे निदान विशेषतः पुच्छपाद तयार होतात. ‘मायसीस’ या शेवटच्या डिंभावस्थेत चांगली वाढ झालेली वक्षीय उपांगे शृंगिकांच्याऐवजी प्लवांगांचे कार्य करू लागतात. उदर मोठ होऊन ते प्रौढ प्राण्याच्या उदराचे स्वरूप धारण करते.

बहुतेक दशपादांमध्ये नॉप्लियस अवस्था विकास पावणाऱ्या अंड्याच्या आतच संपते आणि अंडे फुटल्यावर त्यातून झोइया डिंभ बाहेर पडतो. पुष्कळ दशपादांत निरनिराळ्या प्रकारचे डिंभ अथवा डिंभोत्तर अवस्था मायसीसची जागा घेतात. खेकड्यांमध्ये झोइया अथवा मेटॅझोइया या शेवटच्या अवस्थेचे ‘मेगॅलोपा’ या अवस्थेत रूपांतर होते. ही अवस्था प्रौढासारखीच असते, पण तिच्यात उदर स्पष्ट असून प्लवपादांचा (उदरावरील उपांगांचा) उपयोग पोहण्याकरिता होतो. गोड्या पाण्यातील दशपादांमध्ये डिंभावस्थांचा आणखी ऱ्हास होतो व कधीकधी तर त्या मुळीच नसतात. गोड्या पाण्यातील बहुतेक चिंगाट्यांमध्ये अंड्यातून झोइयाची उत्तर अवस्था म्हणजे मायसीस अवस्था बाहेर पडते. गोड्या पाण्यातील खेकडे आणि चिमोरे यांच्या अंड्यांतून बाहेर पडणारी पिल्ले प्रौढांचे लहान नमुनेच असतात. याच्या उलट भूचर जाती आपली अंडी समुद्रात घेऊन जातात तेथे ती फुटतात आणि त्यांतून बाहेर पडणारे जीव समुद्री जातींच्याप्रमाणेच निरनिराळ्या डिंभावस्थांतून जातात.

वर्गीकरण : डेकॅपोडा गणाची प्रमुख लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : वक्षीय उपांगांपैकी पहिल्या तीन जोड्यांचे जंभपादांमध्ये परिवर्तन झालेले असते क्लोमांच्या बहुतकरून एकापेक्षा अधिक श्रेणी (पादक्लोम, संधिक्लोम, पार्श्वक्लोम) असतात, लाक्षणिक डिंभ झोइया हा असतो सामान्यतः संतुलन पुटी असते.

डेकॅपोडा गणाचे नॅटँशिया आणि रेप्टँशिया असे दोन उपगण पाडलेले आहेत. नॅटँशिया उपगणातील दशपादांचे शरीर बहुधा पार्श्व बाजूंनी दबलेले असते तुंड असते उदराची चांगली वाढ झालेली असते लघुशृंगिकांवर बहुधा कंटकवर्ध (काट्यासारखी वाढ) असतो शृंगिका-उद्वर्ध (चापट पट्टीसारखी बाह्य कवचाची वाढ) साधारणपणे मोठे आणि तकटासारखे असतात उरःपाद (चालण्याकरिता असलेले पाय) लांब, काटकुळे असून कधीकधी त्यांना बहिःपादांश असतात प्लवपाद बहुधा चांगली वाढ झालेले असून त्यांचे पोहण्याकरिता अनुकूलन झालेले असते. उदा., पॉलिमॉन, पीनियस, पॅरॅटिया.

रेप्टँशिया उपगणातील दशपादांचे शरीर उत्तराधर बाजूंनी चपटे झालेले असते तुंड बहुधा आखूड असते किंवा मुळीच नसते उदराची चांगली वाढ झालेली असते अथवा त्याचा अतिशय ऱ्हास झालेला असतो, परंतु पहिला उदर-खंड बाकीच्या उदर-खंडांपेक्षा नेहमी आखूड असतो लघुशृंगिकांवर कंटकवर्ध केव्हाही नसतो शृंगिका-उद्वर्ध ऱ्हास पावलेला असतो अथवा नसतो उरःपाद मजबूत असून त्यांच्या पहिल्या जोडीच्या टोकावर चिमट्यासारखे नखर (नख्या) असतात प्रौढ प्राण्यांच्या उरःपादांवर बहिःपादांश नसतात अनेकदा १–५ ह्या प्लवपादांचा ऱ्हास झालेला असतो आणि त्यांचे केव्हाही पोहण्याकरिता रूपांतर झालेले नसते. 

आ. ३. रेप्टँशिया उपगणातील काही प्राणी : (अ) एक प्रकारचा खेकडा : रॅनिनॉयडीस लुइशिॲनेन्सिस (आ) स्पॅनिश शेवंडा : सिलेरायडीस इक्विनॉक्टिॲलिस (इ) मोल खेकडा : एमेरिटा टॅल्पाइडा (ई) चिखलातील चिंगाटी : कॅलिॲनिडीया लीव्हिकॉडा.

आ. २. नॅटँशिया उपगणातील दोन दशपाद प्राणी : (अ) पीनियस सेटिफेरस, डेकॅपोडा गणातील हा एक आदिम प्राणी आहे (आ) स्टेनोपस हिस्पिडस, एक समुद्री चिंगाटी.

रेप्टँशिया उपगणाचे पॅलिन्यूरा, ॲस्टॅक्यूरा, ॲनॉम्यूरा आणि ब्रॅकियूरा असे चार विभाग पाडलेले आहेत. पॅलिन्यूरा विभागातील दशपादांच्या उदराची चांगली वाढ झालेली असून त्याच्या मागच्या टोकावर रुंद पुच्छ-व्यजन असते उरःपादांची पहिली आणि तिसरी जोडी सारखी असते क्लोम पुष्कळ असतात तुंड बहुधा आखूड असते अथवा मुळीच नसते शरीर बहुधा दबलेले असते. उदा., पॅलिन्यूरस (शेवंडा), सिलेरस. ॲस्टॅक्यूरा विभागातील प्राण्यांची पुष्कळशी लक्षणे पॅलिन्यूरांसारखीच असतात, पण तुंड बरेच मोठे असते आणि शरीर काहीसे दंडगोलाकार असते. उदा., होमेरस, ॲस्टॅकस (चिमोरा), नेफ्रॉप्स, कँबॅरस. ॲनॉम्यूरा विभIगIतील दशपादांच्या उदराचा वेगवेगळ्या प्रमाणात ऱ्हास होती पुच्छपाद असतात उरःपादांची तिसरी जोडी पहिल्या जोडीपेक्षा वेगळी असते आणि क्लोमांची संख्या प्रायः थोडी असते. उदा., यूपॅग्युरस (शंखवासी खेकडा), बिर्गस (नारळखाऊ खेकडा), गॅलॅथिया, पोर्सेलाना. ब्रॅकियूरा विभागातील दशपादांचे उदर लहान व बरेच ऱ्हास पावलेले असून शिरोवक्षाच्या खाली दुमडलेले असते आणि त्याचा उपयोग फक्त जननकार्यातच होतो पुच्छपाद नसतात उरःपादांची तिसरी जोडी पहिलीपेक्षा निराळी असते आणि क्लोमांची संख्या बरीच कमी असते. उदा., कॅन्सर, पोर्ट्यूनस, युका.

पहा : क्रस्टेशिया खेकडा नारळखाऊ खेकडा, शंखवासी चिंगाटी चिमोरा जठरपेषणी शेवंडा.

संदर्भ : 1. Schmidt, W. L. Crustaceans, Ann Arbor, 1965.

            2. Waterman, T. H. The Physiology of Crustacea, 2 Vols., New York, 1960.  

कर्वे, ज. नी.