गॉर्टर, हेर्मान : (२६ नोव्हेंबर १८६४ — १५ सप्टेंबर १९२७ ). डच कवी. जन्म व्हॉर्मरव्हेर येथे. शिक्षण

ॲम्स्टरडॅमला डच साहित्यात ‘१८८० ची पिढी ’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या [→ डच साहित्य] बंडखोर कवींपैकी एक. De nieuwe gids (इं. शी. द न्यू गाइड) ह्या त्यांच्या मुखपत्राच्या संस्थापकांपैकी तो एक होता. स्पिनोझाच्या तत्त्वज्ञानाचे प्रथम त्याला आकर्षण होते. १८९६ मध्ये तो समाजवादाचा कट्टर पुरस्कर्ता बनला. काही काळ तो साम्यवादीही होता.

त्याच्या प्रारंभीच्या काव्यरचनेतून त्याची सौंदर्यासक्ती व कीट्सच्या कवितेचे संस्कार प्रत्ययास येतात. १८८९ मध्ये Mei  हे त्याचे महाकाव्य प्रसिद्ध झाले. शारीर सौंदर्याची अशाश्वतता एका मिथ्यकथेच्या द्वारे स्पष्ट करण्याचा त्यात प्रयत्न आहे. कीट्सच्या एंडिमीयन (१८१८) ह्या काव्याचा त्यावरील प्रभाव जाणवतो. तथापि De School der poezie मधील (१८९७) त्याची कविता प्रयोगशील आहे. त्याने बरीचशी चिंतनशील सुनीतेही लिहिली. Pan (१९१२, विस्तृत आवृत्ती, १९१६) हे त्याचे महाकाव्य मार्क्सवादाच्या त्याच्यावर झालेल्या प्रभावाचे द्योतक आहे. त्याचे गद्यलेखन Verzamelde Werken (आठ खंड, १९४८—५२) मध्ये संगृहीत करण्यात आले आहे. त्यात त्याचे मार्क्सवादावरील निबंधही आहेत. ब्रूसेल्स येथे तो निधन पावला.

मेहता, कुमूद