बोदलेअर, शार्ल : (९ एप्रिल १८२१ – ३१ ऑगष्ट १८६७). श्रेष्ठ फ्रेंच कवी. तो आधुनिक काव्याचा आद्यप्रवर्तक मानला जातो. बोदलेअरचा जन्म पॅरिस येथे एका संपन्न कुटुंबात झाला. तो सहा वर्षांचा असताना त्याचे वडील निवर्तले व आईने दुसरे लग्न केले. जवळजवळ या वेळेपासून बोदलेअरच्या दुःखी जीवनाला प्रारंभ झाला. लीआँ व पॅरिस येथे शिक्षण झाल्यावर गोत्ये वगैरेंच्या संगतीत ‘कार्त्येलातँ’ च्या परिसरात बोदलेअर अनिर्बंधपणे संचार करीत असे. या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्या सावत्र वडिलांनी त्याची हिंदुस्थानला रवानगी केली, पण वाटेत मॉरिशसला उतरुन तो पॅरिसला परतला. एकविसाव्या वर्षी त्याचा वडिलांच्या इस्टेटीवर हक्क प्राप्त झाला. या काळात तो नियतकालिकांतून नियमितपणे लिहित असे. शिवाय एडगर ॲलन पोच्या लिखाणाने प्रभावित होऊन त्याने त्याच्या लिखाणाचे भाषांतर केले. स्वीड्नबॉर्गच्या गूढवादाचीही छाप बोदलेअरच्या लिखाणावर दिसते.

शार्ल बोदलेअरसुरुवातीपासूनचे त्याचे अतिरेकी व अनिर्बंध वागणे उत्तरोत्तर वाढत गेले. अफु, दारू, स्त्रिया यांच्या नादाने प्रकृतीवरही परिणाम झाला. तीव्र संवेदनांच्या तारेत प्रवेश करण्याकरिता तो अफू, चरस सेवन करी. अखेरीस त्याच्या सावत्र बापाने बोदलेअरच्या राहिलेल्या संपत्तीचा ट्रस्ट करून त्याला महिन्याला ठराविक रक्कम मिळण्याची सोय केली. परिणामी त्याला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागले. अनेक स्त्रियांशी संबंध येऊनसुद्धा झ्यान दीवाल या म्युलेटो स्त्रीशी असलेला त्याचा संबंध शेवटपर्यंत टिकला. या ‘सावळ्या सौंदर्यदेवते’ला बोदलेअरच्या काव्यात प्रमुख स्थान आहे. या स्फूर्तिदेवतेने त्याला दुर्प्रवृत्तीमधील सौंदर्यशोधाची प्रेरणा दिली. बोदलेअरच्या काव्यात प्रमुख स्थान असलेली दुसरी स्त्री म्हणजे मादाम साबात्ये (जिचा त्याने ‘प्रेसिदांत’ असा उल्लेख केलेला आढळतो). त्याच्या दृष्टीने आदर्श व आदरणीय असलेल्या या स्त्रीच्या सहवासात काही निरामय आनंदाचे क्षण त्याने अनुभवले. उदात्त व विकारी असे हे प्रेमाचे दोन ध्रुव कवीच्या स्वभावातील द्वैताचे प्रतीक आहेत.

बोदलेअरच्या १८५७ साली प्रसिद्ध झालेल्या ले फ्लर द्यू माल (‘माल’ या शब्दांत दुर्प्रवृत्तीशिवाय मानसिक रुग्णता हा अर्थही अभिप्रेत आहे) या काव्यसंग्रहातील सहा कविता आक्षेपार्ह ठरुन त्याच्यावर खटला भरला गेला. परिणामी १८६१ सालच्या आवृत्तीमध्ये व बोदलेअरच्या मृत्यूनंतर गोत्येने संपादित केलेल्या आवृत्तीमध्ये या आक्षेप आलेल्या कविता गाळल्या गेल्या. उपर्युक्त दुसऱ्या आवृत्तीत आणखी २५ कविता समाविष्ट केल्या गेल्या. मात्र बेकायदेशीर रीत्या छापलेल्या आवृत्तीत आक्षेपार्ह कविता अंतर्भूत केलेल्या आढळतात. १९४९ साली या सहा कवितांवरील निर्बंध उठला. खटल्यातून सुटल्यावर त्याची परिस्थिती अधिकच वाईट झाली. शेवटी १८६४ साली त्याने पैसा व किर्ती मिळविण्याच्या उद्देशाने ब्रूसेल्सला व्याख्यानांचा दौरा काढला. दोन वर्षे परदेशात हालअपेष्टात काढल्यावर तो पक्षाघाताने आजारी पडला व पॅरिसला परतल्यावर तेथेच मृत्यू पावला.

१८४० पासून लिहिलेल्या व त्यापैकी काही नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कविता बोदलेअरने ले फ्लर द्यू माल या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. ह्या कविता त्याने सहा भागांत विभागल्या आहेत व प्रत्येक भागाला आशयसूचक शीर्षक दिले आहे. वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या व भिन्नभिन्न मनोवस्थांची अभिव्यक्ती असलेल्या या कवितांना एका कवीच्या समर्थ आत्मानुभावाचे दर्शन या दृष्टीने एकसंघत्व व एकात्मता प्राप्त झालेली आहे. ते सहा भाग असे : (१) वैताग व ध्येयस्वप्ने, (२) पॅरिसची जीवनचित्रे, (३) मद्य, (४) दुर्प्रवृत्तीची फुले, (५) बंड, (६) मृत्यू.

पहिल्या भागात कवीच्या मनात सतत चालू असलेला परस्परविरोधी अंतःप्रवृत्तीचा संघर्ष व्यक्त झाला आहे. दुर्प्रवृत्तीविषयीचे विलक्षण आकर्षण (सुखाची भोवंड, अधःपाताची घसरती गती) व आदर्शाप्रत पोहोचण्याची उमेद यांतून कवीचे व्यक्तिमत्व दुभंगण्यापर्यंत पाळी येते. पारंपरिक सौंदर्याची संकल्पना प्रमाण न मानता, जीवनातील हिडीस, ओंगळ, असुंदर गणल्या गेलेल्या गोष्टीतून बोदलेअर सौंदर्यप्रतीती देऊ शकला. पॅरिसमधील जीवन काव्यात्म व अलौकिक अशा सृष्टीच्या विषयांनी भरलेले असल्याचा त्याला साक्षात्कार झाला. मद्याच्या बेहोषीतून त्याने ‘कृत्रिम स्वर्ग’ निर्माण केले व अत्यंत सूक्ष्म व तरल संवेदना शब्दांत टिपून घेतल्या. ध्येये व दुर्प्रवृत्ती या द्वंद्वाविरुद्ध बोदलेअरने बंड केले व सरतेशेवटी मृत्यूच्या मिठीत आसरा शोधला. ही त्याची तळमळ भावनांच्या पातळीवर व्यक्त होते. मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी त्याला असीम कुतूहल आहे. ‘स्वर्ग असो किंवा नरक असो ! अज्ञाताच्या अथांगाचा तळ गाठलाच पाहिजे. काही फिकीर नाही ! अज्ञाताच्या तळाशी नावीन्य नक्की गवसेल’. या अज्ञाताची व पर्यायाने नावीन्याची ओढ रँबोलाही वेधणार आहे.

ह्यूगोच्या मताप्रमाणे बोदलेअरने फ्रेंच काव्यात नवीन ऊर्मी निर्माण केली. पार्नास्यां कवींच्या कलावादी तत्त्वांशी प्रामाणिक राहून, कलेचे प्राधान्य मान्य करूनही, बोदलेअरने प्रतीकवादी कवींना, विशेषतः ‘ले कॉरेस्पाँदास’ या कवितेद्वारा प्रेरणा दिली. यात विशद केलेल्या दृक्, स्पर्श, ध्वनी इ. संवेदनांच्या परस्परसंवादातूनच पुढे रँबोचे ‘संवेदनांचे अराजक’ निर्माण झाले असावे.

कलेचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करताना बोदलेअरने डँडिझमची व पर्यायाने कृत्रिमतेची तरफदारी केली आहे. बोदलेअर हा शहरी जीवनाचा पहिला कवी. शिवाय ‘शापित’ कवीची कल्पना त्याच्या बेनेडिक्‌शन या कवितेत प्रथम आढळते. कलासमीक्षक म्हणून बोदलेअरला साहित्यात विशेष स्थान आहे.

टोणगावकर, विजया