रॉलां, रॉमँ : (२९ जानेवारी १८६६−३० डिसेंबर १९४४). विख्यात फ्रेंच कादंबरीकार, इतिहासकार, नाटककार, चरित्रकार आणि संगीतज्ञ. जन्म फ्रान्समधील क्लामसी ह्या गावात.

रॉमँ रॉलां

एकॉल नॉर्माल स्युपेरिअर द्या शिक्षणसंस्थेत इतिहास विषयात त्याने पदवी प्राप्त केली (१८८९). त्यानंतरची दोन वर्षे त्याने रोममधील पुरातत्त्वविद्या व इतिहास ह्या विषयांच्या एका फ्रेंच अभ्यासकेंद्रात अधिछात्र (फेलो) म्हणून व्यतीत केली. रोम येथे असताना माल्विदा फोन मायझेवग ह्या जर्मन विदुषीबरोबर त्याची मैत्री झाली. ती समाजवादी विचारांची होती व तिच्या मित्र वर्तुळात संगीतकार व्हाग्‌नर आणि तत्त्वज्ञ नीत्‌शे ह्यांच्यासारखे प्रतिभावंत होते. त्यांच्याविषयी ती बोले. ह्या मैत्रीचे उत्कृष्ट संस्कार रॉलांवर झाले. १८९५ मध्ये पॅरिसला परतल्या नंतर एकॉल नॉर्मालमध्ये इतिहास व सॉरबॉन विद्यापीठात संगीताचा इतिहास त्याने शिकविला (१९००−१२). ह्याच सुमारास तो संगीतावर लिहू लागला. इस्त्वार द् लोपेरा आंनरॉय आव्हां ल्युली ए स्कर्लात्ती (१८९५, म. अर्थ ल्युली आणि स्कर्लात्ती ह्यांच्या पूर्वीचा यूरोपीय ऑपेराचा इतिहास), म्युझिस्या दोझुर्दुई (१९०८, म. अर्थ आजचे संगीतकार) हे त्याचे उल्लेखनीय संगीतविषयक ग्रंथ.

त्याच्या नाट्यरचनेत सँ लुई (१८९७, इं. शी. सेंट लुई), आयॅर (१८९८) आणि ल् त्रियाँए द् ला रँझाँ (१८९८, इं. शी. द ट्रायंए ऑफ रीझन) ह्या धर्मविषयक शोकात्मिकांचा अंतर्भाव होतो. ले लू (१८९८, इं. शी. द वूल्व्ह्‌ज), दांताँ (१९००) आणि ल् कातोझं जुय्यॅ (१९०२, इं. शी. द फोर्टीन्थ ऑफ जुलै) ही त्याची फ्रेंच राज्यक्रांतिविषयक नाटके. बेथोव्हन, मायकेलअँजेलो, टॉलस्टॉय ह्यांची त्याने लिहिलेली चरित्रे (१९०३ १९०५ १९११) अत्यंत लोकप्रिय झाली. जां किस्तोफ (दहा खंड, १९०६−१२) ही त्याची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती. १९१३ साली ह्या कादंबरीत ‘आकादेमी फ्रांसज’ने पारितोषिक देऊन गौरविले. अखिल यूरोप खंड ही ह्या कादंबरीची पार्श्वभूमी. जां क्रिस्तोफ हा तरुण जर्मन संगीतकार जीवनातील अडचणींशी निर्धारपूर्वक दोन हात करतो. अपयश आले, तरी तो आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. लोकनिंदा आणि अवहेलनाही तो सोसतो पण जीवनावरचे त्याचे प्रेम अढळ राहते. विसाव्या शतकातील एक श्रोष्ठ साहित्यकृती म्हणून ह्या कादंबरीला मान्यता प्राप्त झाली आहे. जगातील विविध भाषांत तिचे अनुवाद झाले आहेत.

कोलास वडम्याँ (१९१९), क्लेरांबो : इस्त्वावर द्यून काँसियांस लीव्र पांदा ला गॅर (१९२५) आणि लाभ आंशांते (७ खंड, १९२२−३३) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या).

पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात (१९१४−१८) तो स्वित्झर्लंडमध्ये राहिला होता. १९१५ साली ओ दस्यू द ला मॅले (१९१५, इं. शी. अबव्ह द बॅटल, १९१६) हे पुस्तपत्र लिहून त्याने दोस्त तसेच शत्रुराष्ट्रांतील बुद्धिवंतांना शांततेसाठी चळवळ करण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्याला अनेकांचा रोषही पतकरावा लागला.

रॉलांला बौद्ध धर्मामध्ये आणि साम्यवादामध्येही सर निर्माण झाला. त्याच्या वैचारिक परिवर्तनाचे दर्शन त्याने लिहिलेल्या ‘ले प्रेक्यूर्सर’ (१९१९ इं. शी. द प्रिकर्सर्स), कंझा द काँबा (१९१९−३४) (इं. शी. फिफ्टीन यीअर्स स्ट्रगल), ‘पार ला रेव्होल्युस्याँ ला पॅ’ (१९३५, इं. शी. फ्रॉम रेव्हलूशन टू पीस) व ‘एस स्युर लामिस्तीक ए लाक्सियाँ द् लँद’ (१९२९-३०, दोन भाग, खंड ३, इं. शी. इंडियन थॉट अँड अँक्शन) ह्या निबंधांतून घडते.

रॉलांला भारताविषयी आकर्षक व प्रेम होते. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाकडे तो अत्यंत सहानुभूतीने पाहात असे. महात्मा गांधी, श्रारीमकृष्ण परमहंस आमि स्वामी विवेकानंद ह्यांची त्यांने लिहिलेली चरित्रे (१९२४, १९२९, १९३०) यूरोपात तसेच भारतातही लोकप्रिय झाली. त्याचे भारतविषयक अनुभव व विचार त्याच्या जुर्नाललँद (१९२०-४३, इं. शी. इंडिया : ए डायरी) मध्ये समाविष्ट आहेत. त्यात महात्मा गांधी, डॉ. अन्सारी, जगदीशचंद्र वोस, जवाहरलाल नेहरू इ. भारतीय पुढाऱ्यांची विलोभनीय अशी व्यक्तिचित्रे आढळतात. गोवा मुक्तिलढ्याचे अध्वर्यू त्रिश्ता व ब्रागांझद कुन्या यांची रॉलांशी जवळीक होती.

आल्बेअर श्वाइत्सर, ॲल्बर्ट आइनस्टाइन, रिचर्ड स्ट्राउस, बर्ट्रड रसेल , रवींद्रनाथ टागोर अशा जागतिक कीर्तीच्या व्यक्तींशी रॉलांने केलेला पत्रव्यवहार काय्ये रॉमँ रॉलां (१९४८, इं. शी. रॉमां रॉलां : नोटबुक) ह्या नावाने ग्रंथरूप झालेला आहे.

फ्रान्समध्ये गाजलेल्या ⇨ड्रायफस प्रकरणात खोट्या आरोपांवरून जन्मठेपेची शिक्षा झालेला फ्रेंच लष्करातील ज्यू अधिकारी कॅप्टन आल्फ्रेड ड्रायफस ह्याची बाजू खंवीरपणे उचलून धरून फ्रेंच सैन्यातील ज्यू विद्वेष उघडा पाडणार्यां त रॉलां होता. फॅसिझमचा विरोधक आणि महान शांततावादी म्हणूनही त्याला जागतिक कीर्ती लाभली होती. एकमेकांना विरोध करणाऱ्या जगभरच्या राष्ट्रांमध्ये एक दिवस जरुर सुसंवाद निर्माण होईल, अशी त्याची श्रद्धा होती.

१९१९ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला. व्हेझले येथे तो निधन पावला. विख्यात जर्मन साहित्यिक श्टेफान त्स्वाइख ह्याने लिहिलेले रॉलंचे चरित्र ईडन पॉल आणि सिडर पॉल ह्यांनी इंग्रजीत अनुवादिले आहे. (१९२१).

संदर्भ :

  • Starr, William; T. A Critical Bibliography of the Published Writings of Romain Rolland, Evanston, 1950.
  • Starr, William; T. Romain Rolland : One Against All-A Biography, 1971.

लेखक : सरदेसाय, मनोहरराय