बेले, झोआकिम द्यू : (सु. १५२२ – १ जानेवारी १५६०). फ्रेंच कवी फ्रान्समधील ⇨ ला प्लेयाद ह्या प्रसिद्ध कविमंडळाचा एक प्रमुख सदस्य. लेरे येथे एका ख्यातनाम सरदारकुटुंबात जन्मला. प्वात्ये व पॅरिस येथे अनुक्रमे कायदा आणि साहित्य ह्या विषयांचा अभ्यास केला. बेले तरुण असतानाचे कवी रॉंसार ह्याच्याशी त्याची भेट झाली. रॉंसार हा फ्लेयादमधला सर्वश्रेष्ठ कवी. फ्रेंच साहित्याला ग्रीक-लॅटिन साहित्याची उंची प्राप्त करून देणे हा फ्लेयादचा हेतू होता. रॉंसारच्या प्रभावामुळे वेले हा फ्लेयादच्या साहित्यविचाराकडे ओढला गेला. अभिजात ग्रीक-लॅटिन कवी आणि इटालियन कवी पीत्रार्क ह्यांचा प्रभाव फ्लेयादवर होता. १५४९ मध्ये फ्लेयाद ह्या काव्य संप्रदायाचा जाहीरनामा बेलेने लिहिला आणि फ्लेयादचा तो पहिला प्रवक्ता ठरला. ह्याच वर्षी लॉलीव्ह हा त्याचा सुनीतसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यावरील पीत्रार्कचा प्रभाव स्पष्टपणे प्रत्ययास येतो. ऑंतिकिते द रोम (१५५८) आणि रॅग्रे (१५५८) ह्या त्याच्या नंतरच्या काव्यसंग्रहात मात्र पीत्रार्कच्या प्रभावापासून तो मुक्त झालेला दिसतो. १५५३ ते १५५७ ह्या कालखंडात बेलेचे वास्तव्य रोममध्ये होते. तेथील त्याचे अनुभव ह्या काव्यसंग्रहांना प्रेरक ठरले. रोम शहरात विखुरलेले भग्नावशेष पाहून रोमच्या वैभवशाली, भव्योदात्त भूतकाळाचे स्मरण त्याला झाले, तसेच आपणास दिसत असलेले रोम ह्या भूतकालीन भव्यतेशी विसंगत आहे, ह्याचीही दु:खद जाणीव त्याला झाली. उपर्युक्त काव्यसंग्रहांतून त्याच्या या मानसिक अवस्थेचा प्रत्यय येतो. १५५८ मध्येच त्याच्या लॅटिन कविताही पोएमासा ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या. ले झ्य र्ऱ्यूस्तीक (१५५८) हा त्याचा आणखी एक उल्लेखनीय काव्यसंग्रह. व्हर्जिलकृत ईनिड ह्या महाकाव्याच्या चौथ्या व सहाव्या सर्गांचाही फ्रेंच अनुवाद त्याने केला आहे.

बेलेने सुनीत हा काव्यप्रकार फ्रेंच भाषेत लोकप्रिय केला. त्याच्या कवितेतून प्रतीत होणारे गाढ औदासिन्य तसेच आत्मनिष्ठ अभिव्यक्ती व निसर्गप्रेम ह्यांमुळे स्वच्छंदतावाद्यांना तो आपला समानधर्मी वाटला. विख्यात इंग्रज कवी एडमंड स्पेन्सर याने वेलेलच्या काही सुनीतांचे तसेच आँतिकिते रोमचे   रुइम्स ऑफ  रोम ह्या नावाने भाषांतर केले आहे. पॅरिसमध्ये तो निधन पावला.

टोणगावकर, विजया