ऑनोरे द बाल्झॅक

बाल्झॅक, ऑनोरे द : (२० मे १७९९–१८ ऑगस्ट १८५०). जगदविख्यात फ्रेंच कादंबरीकार. तूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला. शिक्षण व्हँदोम आणि पॅरिस येथे. वाङमयनिर्मितीकडे बालपणापासूनच ओढा होता शालेय जीवनात त्याने काही कवितालेखन केले होते. विद्यार्थिदशेत त्याने विविध विषयांचे वाचनही खूप केले होते. पॅरिस येथे काही वर्षे वकिलांच्या कचेऱ्यांतून कारकून म्हणून त्याने काम केले. त्यामुळे कायद्याचे उत्तम ज्ञान तर त्याला मिळालेच परंतु वकिलाच्या व्यवसायातील बारकावे आणि वकिली डावपेच ह्यांचीही कल्पना त्याला आली. १८२५ च्या सुमारास तो प्रकाशनाच्या धंद्यात पडला एक छापखानाही त्याने विकत घेतला परंतु त्याला अपयश आले. तो कर्जबाजारी झाला आणि आर्थिक चणचणीला त्याला आयुष्यभर तोंड द्यावे लागले. पैशाच्या चणचणीतून मार्ग काढण्यासाठीही त्याने काही ग्रंथ लिहिले आहेत. 

बाल्झॅकच्या पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित आधुनिक संशोधकांना १९३६ मध्ये गवसले. स्तेनी ऊले एरर फिलॉसॉफीक हे त्या कादंबरीचे नाव. ही कादंबरी अत्यंत कंटाळवाणी असली, तरी बाल्झॅकच्या पुढील कादंबऱ्यांत आढळणाऱ्या प्रगल्भ चिंतनशील वृत्तीची बीजे तीत आढळतात. ले श्यां (१८२९) ही बाल्झॅकने स्वत:च्या नावाने प्रसिद्ध केलेली पहिली कादंबरी आणि हेच त्याचे पहिले यशस्वी पुस्तक. त्यानंतर त्याने कमालीच्या वेगाने लेखन सुरू केले. १८२९ ते १८४८ ह्या कालखंडात बाल्झॅकने सु. ९१ कादंबऱ्या लिहिल्या कथालेखनही केले नाटकेही लिहिली. पो द शाग्रँ (१८३१, इं. शी. द मॅजिक स्कीन) ही त्याची तात्त्विक स्वरूपाची कादंबरी प्रसिद्ध ऑनोरे द बाल्झॅकझाल्यानंतर पोलंडमधून एका अनामिक स्त्रीचे अभिनंदनपर पत्र त्याला आले. मादाम हान्स्का हे त्या पोलिश स्त्रीचे नाव पुढे त्याला कळले. ती श्रीमंत उमराव घराण्यातील होती. बाल्झॅकचा तिच्याबरोबर पत्रव्यवहार सुरू झाला मैत्री जमली. १८५० मध्ये त्या दोघांनी विवाह केला परंतु तोपर्यंत अतिश्रमामुळे बाल्झॅकची प्रकृती खालावली होती. विवाहानंतर काही महिन्यांनीच त्याचे पॅरिस येथे निधन झाले. 

आपल्या कादंबऱ्यांचे वेगवेगळे गट पाडून प्रत्येक गटाला एक सामूहिक नाव देण्याची कल्पना बाल्झॅकला १८३४ च्या सुमारास सुचली. त्यानुसार आपल्या कादंबऱ्यांचे तीन प्रमुख गट त्याने योजिले:(१)एल्यूद द मॉर्स (मराठी अर्थ-सामाजिक चालीरीती आणि आचारविचार ह्यांचा अभ्यास), (२)एल्यूद फिलॉसॉफीक(मराठी अर्थ-तत्त्वज्ञानात्मक अभ्यास), (३)एत्यूद आनालितीक (मराठी अर्थ-चिकित्सात्मक अभ्यास). ह्या तीन गटांत मोडणाऱ्या बाल्झॅकच्या साऱ्याच कादंबऱ्या १८३४ पूर्वी लिहिल्या गेल्या होत्या, असे मात्र नाही. ह्या तिन्ही गटांना त्याने ‘ला कॉमेदी युमॅन’–म्हणजे मानवी नाट्य–असे सामान्य शीर्षक दिले होते. दान्तेच्या डिव्हाइन कॉमेडीवरून ह्या ‘ह्यूमन कॉमेडी’ची कल्पना सुचली असावी. 

ह्या कल्पनेनुसार १८४२ ते १८५० ह्या कालखंडात बाल्झॅकने आपल्या कादंबऱ्यांच्या आणि कथांच्या सतरा खंडांची एक संकलित आवृत्ती काढली. ह्या कथा-कादंबऱ्यांतील सर्वाधिक कथा-कादंबऱ्या ‘सामाजिक चालीरीती आणि आचारविचार ह्यांचा अभ्यास’ ह्या गटातल्या आहेत. ह्या गटाचेही बाल्झॅकने ‘खाजगी जीवनातील दृश्ये’,‘राजकीय जीवनातील दृश्ये’,‘पॅरिसमधील जीवनातील दृश्ये’,‘ग्रामीण जीवनातील दृश्ये’, असे काही उपगट पाडलेले होते. युजनी ग्रांद्रे (१८३३), ल पेर गोर्यो (१८३४-३५, इं. शी. फादर गोर्यो), लेझिल्युझियॉं पॅर्द्यू (१८३९, इं. शी. लॉस्ट इल्यूजन्स) ह्या त्यांतील काही विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या होत. तत्त्वज्ञानात्मक अभ्यास ह्या गटातील निर्देशनीय कादंबऱ्यांत उपर्युक्त पो द शाथ्रँ ह्या कादंबरीचा समावेश होतो. फिझियॉलॉजी द्यू मारियाज (१८२९ इं. शी. फिजिऑलॉजी ऑफ मॅरेज) आणि पतित मिझॅर द ला व्ही कोंज्युगाल (१८३०, १८४०, १८४५) ह्या दोन कादंबऱ्या चिकित्सात्मक अभ्यासाच्या गटात मोडतात. ह्यूमन कॉमेडीमध्ये अंतर्भूत झालेल्या कादंबऱ्यांतून आणि कथांतून समकालीन फ्रेंच जीवनाचे अत्यंत वास्तव असे चित्रण त्याने केले.  फ्रेंच समाजातील जवळजवळ प्रत्येक थराचे खरेखुरे दर्शन त्याने घडविलेले आहे. त्यामुळे बाल्झॅक हा फ्रेंच साहित्यातील वास्तववादाचा अग्रदूत ठरतो. बाल्झॅकच्या ह्यूमन कॉमेडीतील साहित्यकृतींचे इंग्रजी अनुवाद जॉर्ज सेंट्सबरी ह्याने संपादिले आहेत (आवृ. ४थी, ३६ खंड, १९२९). 

उपर्युक्त ल पेर गोर्यो आणि युजनी ग्रांद्रे ह्या बाल्झॅकच्या अत्यंत श्रेष्ठ म्हणून गणल्या गेलेल्या साहित्यकृती होत. मध्यमवर्गीय जीवनाचे वास्तववादी चित्र त्यांत त्याने रेखाटले आहे. कंजूष वृत्ती आणि अर्थप्राप्तीचा हव्यास ह्यामुळे आयुष्यात दु:खी झालेल्या युजनी ह्या मुलीची ही कथा युजनी प्रांद्रेमध्ये आलेली आहे, तर आपल्या मुलीवरील अतिरेकी प्रेमामुळे दु:खी झालेला बाप-पेर गोर्यो हा ल पेर गोर्योत रंगविलेला आहे. 

कादंबरी लिहिण्याची बाल्झॅकची एक निश्चित पद्धत दिसते. कादंबरीच्या संविधानकाशी संबंधित असलेली गावे, त्यांतील विशिष्ट भाग, तेथील रस्ते, घरे, घरांतील खोल्या, तेथील फर्निचर, तेथील माणसांची दिनचर्या आदींची अत्यंत तपशिलवार वर्णने तो करतो. परंतु हा फापटपसारा नव्हे. कादंबरीतील व्यक्तिरेखा व त्यांचा परिसर ह्यांतील घनिष्ट नाते तो त्यांतून दाखवून देत असतो. 

स्वच्छंदतावादाच्या ऐन उत्कर्षाच्या काळात बाल्झॅक वास्तववादी कथा-कादंबऱ्यांच्या निर्मितीकडे वळला. फ्रेंच भाषेतील,स्वच्छंदतावादी वळणाने लिहिलेल्या, तथाकथित सामाजिक कादंबऱ्यांतून रेखाटलेले जीवन कल्पनामय व आदर्शांकडे झुकणारे असे. बाल्झॅकने ही वाट टाळली. हे श्रेय त्याचे असले, तरी त्याच्या कादंबरीलेखनातले दोषही ठळक आहेत. लिहिण्याच्या विलक्षण वेगामुळे काही भाषादोष आणि क्लिष्टपणाही त्याच्या कादंबऱ्यांत आलेला दिसतो. पुष्कळदा त्याची लांबलचक वर्णने कंटाळवाणी होतात. वेळीअवेळी निवेदनाचा ओघ थांबवून तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म, राजकारण यांवर मतप्रदर्शन करण्याचा मोह त्याला अनावर होतो. तथापि ह्या दोषांची दखल घेऊनही आंद्रे झीद आणि मार्सेल प्रूस्त ह्यांच्यासारख्या श्रेष्ठ फ्रेंच साहित्यिकांनी बाल्झॅकचे श्रेष्ठत्व आणि ऋण मान्य केले आहे. 

संदर्भ : 1. Bertault, Philippe, Balzac and the Human Comedy, New York, 1963.

            2. Bowen, Ray P. Dramatic Construction of Balzac’s Novels, Eugene, Oreg. 1940.

            3. Canfield, A. G. The Reappearing Characters in Balzac’s Comedie Humaine, Chapel Hill, N. C. 1962.

           4. Oliver, E. J. Balzac the European, New York, 1960.

           5. Oliver, E. J. Honore de Balzac, New York, 1964.

           6. Rogers, Samuel, Balzac and the Novel, Madison, Wis., 1953.

          7. Royce, W. H. Balzac Bibliography, 2 Vols., Chicago, 1929-30.

टोणगावकर, विजया