झीरोदू, झां : (२९ ऑक्टोबर १८८२–३१ जानेवारी १९४४). आधुनिक फ्रेंच नाटककार, कादंबरीकार आणि निबंधकार. बेलाक, ऑट-व्ह्येन येथे जन्मला. शिक्षण शातोरू आणि पॅरिस येथे. जर्मन साहित्याचा उत्तम व्यासंग. त्याचा प्रभाव त्याच्या साहित्यनिर्मितीवरही दिसून येतो. राजनैतिक खात्यात तो काही काळ अधिकारी होता.

अत्यंत आत्मपर आणि संस्कारवादी (इंप्रेशनिस्टिक) शैलीत लिहिलल्या त्याच्या कादंबऱ्यांमुळे तो प्रथम प्रसिद्धी पावला. सूझॉन ए ल् पॅसिफिक (१९२१, इं. भा. सूझॉन अँड पॅसिफिक, १९२३) व सिगफ्रीद ए ल् लिमुझँ (१९२२, इं. शी. सिगफ्रीद अँड लिमुझँ), जुलियॅत ओ पेई देझॉम (१९२४) आणि काँबा आव्हक लांज (१९२७, इं. शी. कंबॅट विथ द एंजल) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या.

१९२८ मध्ये झीरोदू नाट्यलेखनाकडे वळला. सिगफ्रीद  हे त्याचे पहिले नाटक सिगफ्रीद… ह्या त्याच्या उपर्युक्त कादंबरीवरच आधारलेले आहे. आंफित्र्यो ३८ (१९२९), अँतॅरमेझ्झो (१९३३, इं. भा. द एंचांटेड, १९५०), ला गॅर द् त्र्वा नॉरा पा लिय (१९३५), ओदीन (१९३९) आणि ला फॉल द् शाय्यो (१९४५, इं. रूपांतर ‘द मॅडवूमन ऑफ शाय्यो’, फोर कंटेपररी फ्रेंच प्लेज १९६७ – मध्ये समाविष्ट) ही झीरोदूच्या उल्लेखनीय नाटकांपैकी काही होत.

स्वप्नसृष्टीचे दालन खोलण्यासाठी नाटक हे एक प्रभावी साधन आहे, अशी झीरोदूची धारणा होती. काहीशा अद्‌भुत, अतिमानवी, परिकथासदृश वातावरणात वावरणारी पात्रे त्याच्या नाट्यकृतींत आढळतात आपल्या नाटकांसाठी लोककथा–मिथ्यकथांचा, तसेच इलिअडसारख्या अभिजात महाकाव्यकथेचा उपयोगही त्याने करून घेतलेला आहे तथापि त्यांतून मानवी समस्या आणि संघर्ष ह्यांचेच दर्शन तो घडवितो. उदा., ला गॅर द् त्र्वा… मध्ये ट्रोजनांनी ग्रीकांशी युद्ध करावे की करू नये, हा प्रश्न उभा करून युद्धाच्या अनर्थकारकतेवर प्रकाश टाकलेला आहे. ह्या नाट्यकृतीतील हेक्टर युद्धाला कंटाळलेला आहे. हेलनला ग्रीकांच्या हाती द्यावे आणि शांतता टिकवावी हा आपला विचार तो ट्रॉयमधील युद्धखोरांच्या विरोधाला यशस्वीपणे तोंड देऊन अमलात आणण्याच्या विचारात असतानाच एका दारुड्याचे आगमन होते आणि परिस्थितीला विपरीत वळण लागून युद्ध सुरू होते. ला फॉल द् शाय्यो  ह्या वरवर विनोदी वाटणाऱ्या नाटकातून आधुनिक संस्कृती व तिच्यात आढळणारा नैतिक भ्रष्टाचार ह्यांवर प्रखर टीका केलेली आहे. बाई खुळाबाई  हे ह्या नाटकाचे मराठी रूपांतर सुभाष जोशी ह्यांनी केलेले आहे. एक जलपरी आणि मानव ह्यांची विलक्षण हृदयस्पर्शी प्रेमकथा ओदीनमध्ये आलेली आहे, झीरोदूची नाट्यभाषा म्हणजे काव्यात्म आणि प्रतिभासंपन्न शैलीचा एक उत्कृष्ट नमुना होय. त्याने काही समीक्षात्मक लेखही लिहिले आहेत. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Inskip, Donald, Jean Giraudoux : The Making of a Dramatist, New York, 1958.

    2. LeSage, Laurent, Jean Giraudoux : His Life and Works, University Park, Pa., 1959.

टोणगावकर, विजया