फॅब्‍लो : फॅब्‍लो किंवा फाब्ल्यो हा मध्ययुगीन फ्रेंच पद्यकथांचा एक प्रकार आहे. सामान्यतः बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा आरंभ ह्या कालखंडात त्या फ्रान्समध्ये रचिल्या गेल्या. आठ मात्रांच्या वृत्तात लिहिलेल्या ह्या पद्यकथा ३०० ते ४०० ओळींच्या असत. सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रसंगांवर ह्या कथा आधारलेल्या असत त्यामुळे त्यांना एक प्रकारची वास्तववादी पार्श्वभूमी असे तथापि त्यांच्या हाताळणीत मात्र काहीशी ग्राम्यता दिसून येई. त्यांतील विनोदही ढोबळ-आणि काही वेळा बीभत्सही-असे. भोळे, संतापी पुरुष फसव्या, चतुर स्त्रिया आळशी आणि लोभी असे धर्मगुरू ह्यांच्या व्यक्तिरेखा ह्या कथांतून रंगविल्या जात. ह्या कथांतून स्त्रियांबद्दलचा कडवट उपरोध विशेष ठळकपणे व्यक्त होई. ⇨ त्रूबदूर ह्या दक्षिण फ्रान्समधील मध्ययुगीन कवींनी आपल्या कवितेतून नारीपूजनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार घडविला होता आणि स्त्रीचे देवताकरण केले होते. त्याची प्रतिक्रिया ह्या कथांतून व्यक्त झाली असावी, असे काही समीक्षकांचे मत आहे.

ह्या कथा मुळात पौर्वात्य देशांतून आल्या असाव्यात, हे एके काळी मांडले जाणारे मत आज मान्य केले जात नाही. आज उपलब्ध असलेल्या सु. १५० पद्यकथांपैकी काही तर निखालसपणे फ्रान्समध्येच रचिल्या गेल्या असाव्यात. फ्रेंच लोकांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे रीतिरिवाज आणि शब्दप्रयोग ह्यांवरच त्या आधारलेल्या आहेत. तथापि अन्य अनेक कथा अशा आहेत, की त्यांत कोणत्याही प्रदेशाची वा काळातील खास सांस्कृतिक वैशिष्ट्ये नसून कोणत्याही देशाला त्या स्वीकारता येतील.

ह्या पद्यकथांचे बरेचसे कर्तेते मुख्यतः फिरते चारण होते- आज अज्ञातच आहेत. जी थोडी नावे उपलब्ध होतात, त्यां फीलीप बोमान्वार हा विधिवेत्ता ऱ्यूत्‌ब हा कवी ह्यांचा समावेश होतो. उपलब्ध पद्यकथा सहा खंडांत प्रकाशित झालेल्या आहेत (१८७२-९०).

टोणगावकर, विजया