एल्यूआर, पॉल : (१४ डिसेंबर १८९५ —१८ नोव्हेंबर १९५२). फ्रेंच कवी. मूळ नाव अझेन ग्रिंदेल. जन्म सेंट डेनिस येथे. गंभीर आजारामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला एका रूग्णाश्रमात दीड वर्ष काढावे लागले. तेथे त्याने गीयोम आपॉलिनेर, रँबो, वॉल्ट व्हिटमन ह्या कवींच्या काव्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो काव्य लेखनाकडे वळला. पहिल्या महायुद्धात त्याने प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे युद्धामुळे उद्‍ध्वस्त होणारे मानवी जीवन त्याने पाहिले होते आणि मानवी दु:खाविषयी तीव्र अनुकंपा त्याला वाटू लागली होती. स्पॅनिश यादवी युद्धाचा आरंभ झाल्यावर पिकासोबरोबर गणतंत्रवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी तो पुढे आला. १९४२ मध्ये फ्रान्समध्ये गुप्तपणे कार्य करणाऱ्या कम्युनिस्ट संघटनेचा तो सभासद होता आणि नाझींच्या प्रतिकाराची भावना चेतवणाऱ्या उत्कट कविताही त्याने लिहिल्या होत्या. ‘Poesie de Resistance’ ही अशा कवितांपैकी विशेष उल्लेखनीय कविता होय.

काव्यलेखनाच्या आरंभी काही काळ तो दादावादाने प्रभावित झाला होता. पुढे मात्र तो अतिवास्तववादी बनला. १९२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अतिवास्तववादी जाहीरनाम्यात तो सहभागी होता. भाषेतील नावीन्याचा शोध घेणे, ही अतिवास्तववादाकडे वळण्यामागील त्याची महत्त्वाची प्रेरणा होती. प्रेम, मृत्यू आणि मानवी दु:ख हे त्याच्या काव्याचे प्रमुख विषय.

त्याच्या काव्याला १९३६ च्या सुमारास वेगळे वळण मिळाले. अतिवास्तववादाची बैठक कायम ठेवूनही साध्या आणि सरळ अभिव्यक्तीचा त्याने स्वीकार केला. त्याची कविता अधिकाधिक उत्कट आणि प्रगल्भ होत गेली. त्याचे महत्त्वाचे काव्यसंग्रह असे : Capitale de la Douleur (१९२६), L’Amour la poesie (१९२९), Les yeux fertiles (१९३६), Les Mains libres (१९३७), An Rendez – vous Allemand (१९४४), Poesie ininterrompue (१९४६), Poemes politiques (१९४८), Une lecon de Morale (१९४९). शारांताँ ल पाँ ह्या शहरी तो मरण पावला.

टोणगावकर, विजया