काम्यू, आल्बेअर : (७ नोव्हेंबर १९१३ – ४ जानेवारी १९६०). श्रेष्ठ फ्रेंच साहित्यिक. अल्जीरियामधील माँडॉव्ही येथे जन्म. पहिल्या महायुद्धात वडील ठार झाल्यानंतर आईने त्याचे पालन केले. क्षयाच्या गंभीर आजारामुळे अल्जिअर्स विद्यापीठातील शिक्षणक्रम सोडून द्यावा लागला. तत्त्वज्ञान, वाङ्‍मय आणि रंगभूमी हे त्याचे आस्थेचे विषय. १९३४ मध्ये तो कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झाला परंतु मतभेदांमुळे लवकरच तो पक्ष त्याला सोडावा लागला. १९३२च्या सुमारास त्याने लेखन करावयास सुरुवात केली होती. L’envers et l’endroit (१९३७, इं. शी. द टू साइड्स ऑफ द कॉइन) आणि Noces (१९३८, इं.शी. न्यूप्शल्स) हे दोन छोटे निबंधसंग्रह, ही त्याची पहिली दोन पुस्तके. मानवी जीवनातील एकाकीपणा, शून्यता आणि मृत्यूची अटळता ह्या मूलभूत प्रश्नांचे चिंतन ह्या निबंधांतून आढळते. १९३८ मध्ये प्राध्यापक होण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि Alger Republicain ह्या वर्तमानपत्रासाठी तो काम करू लागला. १९४० मध्ये तो पॅरिसला आला आणि Paris-Soir ह्या पत्रासाठी त्याने काम केले. १९४३ मध्ये पॅरिस पडल्यानंतर जर्मनांचा प्रतिकार करण्यासाठी उभारलेल्या गुप्त संघटनेत तो सामील झाला. ह्या संघटनेच्या Combat ह्या गुप्तपत्राचा तो संपादक झाला. पॅरिस मुक्त झाल्यानंतर हे पत्र उघडपणे अवतरले. त्यानंतर १९४७ पर्यंत तो त्याचा संपादक होता. विख्यात अस्तित्ववादी तत्वज्ञ ð झां पॉल सार्त्र ह्याच्याशी त्याची मैत्री ह्याच काळात जुळली.

आल्बेअर काम्यू

काम्यूचा पिंड कलावंताचाच असल्यामुळे भोवतालच्या राजकीय परिस्थितीला वेळोवेळी प्रामाणिक प्रतिसाद देत असतानाही त्याची सर्जनशीलता सदैव जागृत राहिली. एका हौशी नाटकमंडळीची स्थापना करुन तिच्याद्वारे अनेक नाट्यकृती त्याने रंगभूमीवर आणल्या. त्यासाठी काही प्राचीन ग्रीक नाट्यकृतींची त्याने रुपांतरे केली होती. श्रेष्ठ दर्जाच्या काही फ्रेंच कादंबर्‍यांच्या रंगावृत्त्या तयार केल्या होत्या. ह्या नाटकांची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यांतील प्रमुख भूमिका तो स्वतः करीत असे. रंगभूमीच्या विविध तांत्रिक अंगांचे त्याला उत्तम ज्ञान होते. L’etranger (इं.भा.द आउटसाइडर, १९४६) ही त्याची पहिली कादंबरी १९४२ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्याच वर्षी त्याचे Lemythe de Sisyphe (इं.भा.द मिथ ऑफ सिसिफस…, १९५५) हे तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. सारे विश्व मृषा (ॲब्सर्ड) किंवा निरर्थ असून विवेकाच्या आधारे त्याचा अर्थ लावता येणार नाही, ह्या जाणीवेची गडद छाया द आउटसाइडर ह्या कादंबरीवर परसलेली आहे. मिथ ऑफ सिसिफसमध्ये तत्त्वज्ञानापुढे असलेली खरी समस्या फक्त आत्महत्येचीच आहे, असा विचार प्रथम मांडून त्याने आत्महत्येची तात्त्विक चिकित्सा केली आहे. आत्महत्या ही जशी शारीरिक तशी वैचारिकही असू शकते. उदा., विश्वाची निरर्थकता जाणवलेले विचारवंत जेव्हा धर्मश्रद्धेकडे धाव घेतात, तेव्हा त्यांनी स्वतःच्या विवेकाची हत्या केलेली असते. पुढे एका मुलाखतीत स्वतः अस्तित्ववादी असल्याचे निःसंदिग्धपणे नाकारुन मिथ ऑफ सिसिफस तथाकथित अस्तित्ववादी तत्त्वज्ञांविरुद्ध असल्याचे काम्यूने स्पष्ट केले आहे. सिसिफसच्या ग्रीक मिथ्यकथेत त्याला आधुनिक जगातील अर्थशून्य मानवी जीवनाचे प्रतीक आढळले.

एरव्ही निरर्थ असलेल्या विश्र्वात माणसाचा वर्तनक्रम कसा असावा, ह्यासंबंधीची विधायक नीतिनिष्ठ भूमिका L’Homme revolte (१९५१, इं.भा. द. रिबेल, १९५४) ह्या त्याच्या गाजलेल्या ग्रंथात प्रत्ययास येते. काम्यूला अभिप्रेत असलेला बंडखोर तत्त्वनिष्ठ आहे. राजकीय उद्दिष्टांसाठी हिसांचाराचे समर्थन करणार्‍यांना ह्या ग्रंथात त्याने उत्तर दिले होते. काम्यूने स्पेनमधील फ्रॅंको राजवटीच्या निषेधाबरोबरच रशियातील स्टालिनच्या अपकृत्यांचाही निषेध केला. महात्मा गांधींच्या अहिंसक स्वातंत्र्यलढ्याबद्दल आस्था दाखविली. मात्र ह्या भूमिकेमुळे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही विचारसरणींचे लोक त्याला दुरावले. १९५६ मध्ये अल्जीरियातील यादवी युद्ध प्रकर्षाला पोहोचले असताना त्याने केलेले शांततेचे आवाहन व्यर्थ ठरुन स्वतःच्या मातृभूमीतच तो एकाकी पडला.

नाटक-कथा-कादंबरी आदी काम्यूचे लेखन त्याच्या तत्त्वचिंतनाचेच कलात्मक रुप होय. La Peste (१९४७, इं.भा.द प्लेग, १९४८) ह्या कादंबरीमध्ये प्लेगच्या तडाख्यात सापडलेले ओरान शहर आणि मानवतावादी भूमिकेतून रोगपीडितांची सेवा करणारा एक डॉक्टर आहे. नाझीवादाचा यूरोपीय राष्ट्रांनी केलेला प्रतिकार हा प्लेगच्या प्रतीकाचा त्याला अभिप्रेत असलेला एक अर्थ.

Caligula (१९४४, इं.भा. १९४८) मध्ये जीवनाच्या निरर्थकपणाने भारलेल्या आणि निव्वळ लहरीप्रमाणे क्रूर, विध्वंसक कृत्ये  करून आत्मनाश ओढवून घेणार्‍या रोमन सम्राटाचे भेदक चित्रण आहे. विवेकाची कास धरून विश्वाचा अर्थ लागत नाही त्याचप्रमाणे सम्राट कॅलिगुलाच्या कृत्यांना तर्कशुद्ध युक्तिवादाने खोडून काढता येत नाही. मात्र असे असूनही इतरांना त्याचा प्रतिकार करावाच लागतो. ईश्वरशून्य, मृषा जगात माणसाला स्वतःची नैतिक मूल्ये निर्माण करता येतात, ही काम्यूची धारणा होती. ह्या नाटकातून ती ध्वनित होतेच.

काम्यूच्या इतर उल्लेखनीय साहित्यकृतींपैकी काही अशा : कादंबरी La Chute (१९५६, इं.भा.द फॉल, १९५७).

नाट्यकृती –Le Malentendu (१९४४, इं,भा.क्रॉस पर्पज, १९४८), Le,Etat De siege (१९४८), Les Justes (१९५० इं.भा.जस्ट असॅसिन्स, १९५८), Requiem Pour une nonne (१९५७, विल्यम फॉक्नरच्या एका कादंबरीवर आधारित), Les Possedes (१९५९, इं.भा.द पझेस्ड, १९६०, डॉस्टोव्हस्कीच्या कादंबरीवर आधारित).

कथासंग्रह –L’Exil et le royaume (१९५७, इं.भा. एक्झाइल अँड द किंग्डम, १९५८).

स्वतःचे चिंतन तो वह्यांमधून नोंदवून ठेवीत असे. १९३५ ते १९५१ पर्यंतच्या त्याच्या वह्यांचा इंग्रजी अनुवाद कार्नेट्‌स ह्या नावाने दोन भागांत प्रसिद्ध झालेला आहे (कार्नेट्‌स १९३५-१९४२, १९६३ आणि कार्नेट्‌स १९४२-१९५१, १९६६).

१९५७ मध्ये वाङ्‍मयाचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. तिसाहून अधिक भाषांत त्याचे साहित्य अनुवादित झालेले आहे.

सां येथे एका मोटार अपघातात तो निधन पावला.

संदर्भ :  1. Bree, Germaine, Albert Camus, New York, 1964.

2. Cruickshank, John. Albert Camus and the Literature of  Revolt. London, 1959.

3. Hanna, Thomas, Thought and Art of Albert Camus, Chicago, 1958.

4. Parker, Emmett, Albert Camus, the Artist in the Arena, Madison, (Wis), 1965.

5. Thody, Philip, Albert Camus : A Study of His work, New York, 1959.

कुलकर्णी, अ.र.