ब्वालो-देप्रेओ, निकॉला: (१ नोव्हेंबर १६३६—१३ मार्च १७११). फ्रेंच कवी आणि समीक्षक. ‘व्वालो’, असाच त्याचा उल्लेख सामान्यतः केला जातो. पॅरिस शहरी त्याचा जन्म झाला. पॅरिस विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन त्याने वकीलीचा व्यवसाय सुरू केला. तथापि १६५७ मध्ये तो सोडून देऊन त्याने स्वतःस सर्वस्वी साहित्यास वाहून घेतले. आरंभी त्याने काव्यलेखन केले. १६६० ते १७०५ ह्या कालखंडात त्याने लिहिलेल्या पद्य उपरोधिका सातीर प्रसिद्ध आहेत. त्या लिहीत असताना हॉरिस, जूव्हेनल यांच्यासारख्या प्राचीन रोमन उपरोधकांचा आदर्श त्याच्या समोर होता. ह्या उपरोधिकांचे वाचन तो आपल्या मित्रवर्तुळात करीत असे. ब्वालोच्या काळातील अनेक ख्यातकीर्त साहित्यिकांवर ब्यालोने त्यांतून कठोर हल्ले केले. विशेषतः ‘प्रेस्य’ ह्या वाङ्मयीन संप्रदायातील साहित्यिकांच्या कृत्रिम, आलंकारिक आणि शब्दबंबाळ भाषाशैलीवर त्याचा रोख होता. वाङ्मयीन अभिरुचीला योग्य वळण लावून अस्सल वाङ्मयीन मूल्यांचे महत्व प्रस्थापित करावे, हा ह्या टीकेमागील ब्वालोचा हेतू होता. ब्लावोच्या उपरोधिकांतून धार्मिक नैतिक विषयही आलेले आहेत. त्यानंतर हॉरिसकृत एपिल्सच्या धर्तीवर ब्लावोने ‘एपित्र’ (इं. अर्थ एपिसल्स) लिहिली. त्यांतूनही त्याने इतर अनेक विषयांबरोबर वाङ्मयीन विषयांवरही आपले विचार मांडलेले आहेत. तथापि लार पोयेतिक ही ब्वालोची सर्वश्रेष्ठ काव्यकृती होय. ह्या काव्याचे चार सर्ग असून पहिल्यात काव्यरचनेची सर्वसामान्य तत्वे सांगितली आहेत. दुसऱ्या वर्गात विलापिका, उद्देशिका ह्यांसारख्या ग्रीक लॅटिन साहित्यांतून आलेल्या  काव्यप्रकारांची चर्चा त्याने केली असून तिसऱ्यात शोकात्मिका आणि सुखात्मिका ह्या साहित्यप्रकारांचा विचार त्याने केला आहे. चौथ्या सर्गात साहित्यिकाला त्याने केलेला, सर्वसाधारण स्वरूपाचा उपदेश आहे.

ब्वालोची वाङ्मयीन दृष्टी नव अभिजातावादी होती. उत्तम अभिरुची, स्पष्ट विचार, निसर्गाशी इमान, साधी पण भव्योदात्त शैली, काव्यरचनेच्या नियमांचे कसोशीने पालन ही ब्वालोच्या मते श्रेष्ठ काव्यकृतीची वैशिष्ट्ये होत. ब्वालोने जे नव-अभिजाततावादी विचार मांडले ते त्याच्या समकालीनांनीही मांडले होते तथापि ब्वालोने त्यांना प्रभावी तात्त्विक बैठक प्राप्त करून दिली आणि फ्रेंच साहित्यसमीक्षेचाही पाया घातला. ‘लौंजायनस ऑन द सब्लाइम’(इं.शी.) ह्या एका वाङ्मयविषयक ग्रंथाचे भाषांतर ब्वालोने केले होते. तसेच ल्यूत्रें (इं. शी. द लेक्टर्न) हे एक वीरवीडंबनात्मक (मॉक-हिरॉइक) काव्यही त्याने लिहिले होते. फ्रान्सच्या राजदरबारी, रासीन ह्या श्रेष्ठ फ्रेंच नाटककारबरोबरच, ब्वालोची राजाची अधिकृत इतिहासकार म्हणून नेमणूक झालेली होती (१६७७). १६८४ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची नियुक्ती झाली. पॅरिस येथेच तो निधन पावला.

 टोणगावकर, विजया