सार्त्र, झां-पॉल : (२१ जून १९०५–१५ एप्रिल १९८०). फ्रेंच साहित्यिक आणि ⇨ अस्तित्ववाद ह्या आधुनिक तत्त्वज्ञानातील एका प्रमुख व प्रभावी विचारसरणीचा तत्त्ववेत्ता. जन्म पॅरिसचा. सार्त्रचे वडील तो अगदी लहान असतानाच वारले. त्यामुळे आपले मातुल आजोबा कार्ल श्वाइत्सर ह्यांच्या घरी तो वाढला. विख्यात जर्मन ईश्वरविद्यावेत्ता, तत्त्वज्ञ आणि मानवतावादी डॉक्टर ⇨ल्बेअर श्वाइत्सर ह्याचे कार्ल हे काका. फ्रान्समधील प्रसिद्घ सॉरबॉन विद्यापीठात ते जर्मनचे प्राध्यापक होते. सोबती-सवंगडी न लाभल्यामुळे सार्त्रचे बालपण तसे एकाकी अवस्थेतच गेले पण पुस्तकांशी त्याने मैत्री केली. ‘पुस्तकांतून माझी विश्वाशी भेट घडली’ अशा आशयाचे विधान सार्त्रने केलेले आहे. सार्त्रचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. Ecole Normale Superieure ह्या पॅरिसमधील नामवंत शिक्षणसंस्थेतून तो पदवीधर

झां-पॉल सार्त्र झाला (१९२९). तेथे विद्यार्थिदशेतच प्रसिद्घ फ्रेंच कादंबरीकर्त्री ⇨ सीमॉन द बोव्हार हिच्याबरोबर त्याचे भावबंध निर्माण झाले. ह्या दोघांनी विवाह केला नाही तथापि परस्परांचे सहचर म्हणून ते आयुष्यभर एकत्र राहिले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सार्त्रने ल हाव्ह्‌र येथील एका माध्यमिक शाळेत अध्यापन केले. तेथे असताना त्याने La Nausee (१९३८ इं. भा. नॉसिआ, १९४९) ही प्रसिद्घ कादंबरी लिहिली. दैनंदिनीच्या स्वरूपात लिहिलेल्या ह्या कादंबरीत सार्त्रच्या लेखनातून पुढे अधिक विकसित स्वरूपात प्रकटलेले अनेक विषय आणि कल्पना आपल्याला आढळतात. ही कादंबरी प्रसिद्घ होण्यापूर्वीच्या काळात –१९३३ ते १९३५– सार्त्र बर्लिन आणि फ्रायबर्ग येथे अभ्यास, संशोधन ह्यांत गुंतला होता. तेथे ⇨रूपविवेचनवादाचा प्रमुख प्रवर्तक ⇨ एटमुंट हुसर्ल ह्याच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडला. रूपविवेचनवादाची पद्घत स्वीकारून त्याने तीन ग्रंथ लिहिले: इमॅजिनेशन : ए सायकॉलॉजिकल क्रिटिक (१९३६ इं. भा. १९६२), स्केच फॉर ए थिअरी ऑफ इमोशन्स (१९३९ इं. भा. १९६२) आणि द सायकॉलॉजी ऑफ इमॅजिनेशन (१९४० इं. भा. १९५०) तथापि १९४३ मध्ये प्रसिद्घ झालेला बीइंग अँड नथिंगनेस (इं. भा. १९५६) हा त्याचा ग्रंथ विशेष महत्त्वाचा मानला जातो.

सार्त्र हा अस्तित्ववादी तत्त्वचिंतक होता. त्याच्या तत्त्वचिंतनावर हुसर्लप्रमाणेच, रूपविवेचनवादी दृष्टिकोण असलेल्या ⇨ मार्टिन हायडेगर ह्या तत्त्ववेत्त्याचा प्रभाव होता. अस्तित्वाचे दोन प्रकार सार्त्रने मानले: स्वरूपसत्ता (बीइंग-इन-इटसेल्फ) आणि आत्मनेसत्ता (बीइंग-फॉर-इटसेल्फ). स्वरूपसत्ता हे अस्तित्व वस्तूंचे, पण वस्तू ह्या खऱ्याखुऱ्या अर्थाने अस्तित्वातच नसतात. त्या केवळ असतात. त्यांना त्यांचे पूर्वनिश्चित असे स्वरूप असते. उदा., खुर्ची. खुर्ची बनविणाऱ्या कारागिराच्या मनात त्या खुर्चीची सुस्पष्ट कल्पना, तिचे निर्मितितंत्र, तिचा उपयोग हे सर्व असते. खुर्चीचा उपयोग निश्चित करणारे तिचे गुणधर्म आणि तिचे निर्मितितंत्र ह्यालाच अस्तित्ववाद्यांच्या भाषेत खुर्चीचे वस्तुसार (एसन्स) म्हटले जाते. खुर्ची निर्माण होण्यापूर्वीच तिचे हे वस्तुसार निश्चित झालेले असते. हीच गोष्ट टेबल, पुस्तक, घंटा, तराजू अशा वस्तूंची. आत्मनेसत्ता हे अस्तित्व माणसाचे. हे खरेखुरे अस्तित्व फक्त मनुष्यप्राण्यालाच लाभू शकते. मनुष्य आधी अस्तित्वात येतो आणि नंतर स्वतःची प्रतिमा घडवीत राहतो. खुर्च्या-टेबलांना स्वतःचे भविष्य घडविता येत नाही. येथे अर्थातच माणसाचे स्वातंत्र्य गृहीत धरलेले आहे. स्वातंत्र्यावाचून तो आपले आयुष्य आपल्या कल्पनेप्रमाणे घडवू शकणार नाही. माणसाचे स्वातंत्र्य त्याला जन्मतःच मिळालेले असते. त्याच्यासमोर अनेक शक्यता पसरलेल्या असतात. त्यांतून निवड करून त्याला आपले अस्तित्व श्रेयस्कर करावयाचे असते. पण निवडीच्या स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडलेल्या कृतीच्या परिणामांची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. शिवाय प्रत्येक मनुष्य आपल्या कृतींतून मनुष्याचीच एक प्रतिमा निर्माण करीत असल्यामुळे आपण जे निर्णय घेतो, त्यांत सारी मानवताच एका अर्थाने गुंतलेली असते. त्यामुळे मनुष्य स्वतःला जसा जबाबदार, तसा तो इतरांनाही असतो. स्वातंत्र्याबरोबर येणारी ही प्रचंड जबाबदारी माणसाच्या मनात खोल परिवेदना (अँग्विश) निर्माण करते. ह्या परिवेदनेच्या जोडीला एकाकीपणाची, निराश्रितपणाची तीव्र जाणीव येऊन मिळते कारण ह्या जगात ईश्वर नाही (अस्तित्ववाद्यांमध्ये ईश्वर मानणारे अस्तित्ववादी आहेत तथापि सार्त्र निरीश्वरवादी होता). ईश्वर नसल्यामुळे कोणतीही मूल्ये पूर्वप्राप्त म्हणता येत नाहीत आणि स्वतःची जबाबदारी टाळता येत नाही. आपल्या अस्तित्ववादी भूमिकेला अनुसरून सार्त्रने नियतिवाद अमान्य केलेला आहे. स्वातंत्र्यासह येणाऱ्या वरील गोष्टी लक्षात घेता स्वातंत्र्य ही शिक्षाच वाटू लागते तथापि आपण आपल्या जबाबदारीवर घेतलेल्या निर्णयानुसार ज्या कृती करतो, त्यानेच आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो. जोपर्यंत असा अर्थ आपण आपल्या अस्तित्वाला देऊ शकत नाही, तोपर्यंत आपले अस्तित्व निरर्थक असते.

सार्त्रला सामाजिक जबाबदारीची तीव्र जाणीव होती गरीब, वंचित माणसांबद्दल कणव होती. ही जाणीव त्याने आपल्या लेखनातून प्रकट केली. एक्झिस्टन्शॅलिझम अँड ह्यूमनिझम (१९४६ इं. भा. १९४८) ही त्याची पुस्तिका त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. आपला नैतिक संदेश देण्यासाठी चार खंडांच्या एका कादंबरीचे लेखन त्याने चालू केले. द एज ऑफ रीझन (१९४५ इं. भा. १९४७), द रिप्रीव्ह (१९४५ इं. भा. १९४७) आणि आयर्न इन द सोल (१९४९ इं. भा. १९५०. ह्या कादंबरीचे अमेरिकेत प्रसिद्घ झालेल्या भाषांतराचे शीर्षक ट्रबल्ड स्लीप असे आहे). ह्या तीन कादंबऱ्या प्रसिद्घ झाल्यानंतर चौथ्या कादंबरीचे लेखन न करता तो नाट्यलेखनाकडे वळला. द फ्लाइज (१९४३ इं. भा. १९४६), नो एक्झिट (१९४४ इं. भा. १९४६), डर्टी हँड्स (१९४८ इं. भा. १९४९), ल्यूसिफर अँड द लॉर्ड (१९५१ इं. भा. १९५३), नेक्रासॉव्ह (१९५५), द कंडेम्ड ऑफ अल्तोना (१९५९ इं. भा. १९६०) ही त्याची नाटके उल्लेखनीय आहेत. सार्त्रचे नाट्यलेखन मुख्यतः त्याच्या तत्त्वचिंतनाचा, वैचारिकतेचा प्रत्यय देणारे आहे. नाट्यलेखनाच्या काळात त्याने द रोड्स टू फ्रीडम (१९४५–४९) ही तीन भागांतली कादंबरीही लिहिली. फ्रेंच साहित्यिक ⇨ बोदलेअर आणि ⇨ झां झने ह्यांच्यावरही त्याने लेखन केले. Les Temps Modernes ह्या सीमॉन द बोव्हारसह काढलेल्या नियतकालिकातही त्याने विपुल लेखन केले.

दुसरे महायुद्घ सुरू झाल्यानंतर सार्त्रला १९३९ मध्ये सैन्यात भरती व्हावे लागले होते. १९४० मध्ये त्याला युद्घकैदी होण्याचा अनुभवही मिळाला. त्यानंतर वर्षभराने त्याची सुटका झाली. दुसऱ्या महायुद्घानंतर फ्रान्समधल्या राजकीय घडामोडींत त्याला स्वारस्य निर्माण झाले. डाव्या मार्क्सवादी विचारांकडे त्याचे मन झुकले. मात्र तो कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झाला नाही. सोव्हिएट रशियाला त्याने भेटही दिली होती तथापि १९५६ मध्ये रशियाने बूडापेस्टमध्ये लष्कर घुसवल्यानंतर साम्यवादाबाबत तो निराश झाला. रशियावर, तसेच रशियाच्या कृतीबद्दल मूग गिळून बसणाऱ्या फ्रेंच कम्युनिस्ट पक्षावर त्याने टीका केली. मार्क्सवादाने व्यक्तीचे स्वातंत्र्य मानले पाहिजे अशी भूमिका त्याने घेतली. त्याला अभिप्रेत असलेल्या समाजवादाबद्दलचे विचार त्याने Critique de la raison dialectique (१९६०, इं. शी. ‘क्रिटिक ऑफ डायलेक्टिकल रीझन’) ह्या ग्रंथात मांडले. ह्या ग्रंथाच्या फक्त प्रस्तावनेचे भाषांतर ‘द प्रॉब्लेम ऑफ मेथड’ ह्या नावाने झाले आहे (१९६३). वर्ड्‌स (१९६३, इं. भा.१९६४) ह्या त्याच्या आत्मचरित्रासाठी १९६४ चे नोबेल पारितोषिक त्याला देण्याचे जाहीर झाले होते तथापि त्याने ते स्वीकारले नाही.

त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात विख्यात फ्रेंच कादंबरीकार ⇨ ग्यूस्ताव्ह फ्लोबेअर ह्याचे अभ्यासपूर्ण चरित्र त्याने लिहावयास घेतले. त्याचे तीन खंड प्रसिद्ध झाले (१९७१-७२).

जवळपास तीन दशके फ्रेंच बौद्धिक जीवनावर आपला ठळक ठसा उमटवणारा सार्त्र पॅरिस येथे निधन पावला.

संदर्भ : 1. Aron, Raymond, Marxism and the Existentialists, 1969.

2. Cohen-Solal, Annie, Sartre : A Life, 1987.

3. Desan, Wilfred, The Tragic Finale : An Essay on the Philosophy of Jean-Paul Sartre, 1960.

4. Desan, Wilfred, The Marxism of Jean-Paul Sartre, 1965.

5. Silverman, Hugh; Elliston, Frederick, Ed. Jean-Paul Sartre : Contemporary Approaches to His Philosophy, 1980.

6. Thody, Philip, Jean-Paul Sartre : A Literary and Political Study, 1960.

७. कुलकर्णी, अ. र. ‘अस्तित्ववादाचे सार्त्रप्रणीत स्वरूप’, नवभारत, एप्रिल, वाई, १९७०.

कुलकर्णी, अ. र.