सेलीन, ल्वी–फेर्दिनां : (२७ मे १८९४-१ जुलै १९६१). फ्रेंच साहित्यिक. मूळ नाव ल्वी-फेर्दिनां देत्यूश. जन्म पॅरिसजवळच्या कुर्बव्हा ह्या ठिकाणी. त्याच्या घरची परिस्थिती सामान्य होती. १९१२ मध्ये तो लष्करी सेवेत भरती झाला. पहिल्या महायुद्धात त्याला लष्करी सन्मान मिळाला तथापि ह्या युद्धात जखमी झाल्यामुळे त्याला लष्करी सेवेतून मुक्त करण्यात आले. त्यानंतर वैद्यकाचा अभ्यास करून १९२४ मध्ये तो डॉक्टर झाला. ‘लीग ऑफ नेशन’ साठी वैद्यकीय कामगिरीवर तो अनेक ठिकाणी गेला. त्या निमित्ताने त्याला बराच प्रवासही घडला. १९२८ मध्ये पॅरिसच्या एका उपनगरात तो वैद्यकीय व्यवसाय करू लागला. फावल्या वेळात तो लेखनही करीत होता. जर्नी टू द एंड ऑफ नाइट (१९३२, इं. भा. १९३४) ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीने त्याला कीर्ती प्राप्त करून दिली. आयुष्यात काही अर्थ शोधण्याचा एका माणसाचा यातनामय, नैराश्यपूर्ण शोध हा ह्या कादंबरीचा विषय. भाषेचे अशिष्ट, अश्लील प्रयोग असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण भाषाशैली त्याने या कादंबरीसाठी वापरली होती. त्याच्या नंतरच्या फ्रेंच आणि उत्तर अमेरिकन लेखकांवर ह्या शैलीचा लक्षणीय प्रभाव पडला. समाजातील निर्बुद्धपणा आणि दांभिकपणा ह्यांच्याबद्दल सेलीनला वाटणारा संताप आणि उबग ह्या कादंबरीतून व्यक्त झालेला आहे. ही कादंबरी काहीशी आत्मचरित्रात्मकही आहे. ‘डेथ ऑन द इन्स्टॉलमेंट प्लॅन’(१९३६, इं. शी.) ह्या त्याच्या दुसऱ्या कादंबरीत त्याचे बालपणातले आणि किशोरवयातले अनुभव आलेले आहेत. भोवतालच्या जगाबद्दल भ्रमनिरास आणि त्यातून येणारा कंटाळवाणेपणा या कादंबरीत त्याने सशब्द केलेला आहे. त्याच्या लेखनातून प्रकट होणाऱ्या वाढत्या कडवटपणाला ज्यू-द्वेषाचीही जोड मिळाली आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने फ्रान्सचा पराभव केल्यानंतर त्याने जर्मन सैन्याशी सहकार्य केले. १९४४ मध्ये फ्रान्स मुक्त झाल्यानंतर तो जर्मनीतून डेन्मार्कला पळाला पण तिथेही नाझींशी सहकार्य करणारा म्हणून त्याला एक वर्षाचा तुरुंगवास घडला. १९५१ मध्ये त्याला फ्रान्सला जाऊ देण्यात आले. त्याच्या जीवनाची अखेरची दहा वर्षे त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय केला आणि लेखनही चालू ठेवले. ह्या काळात त्याने लिहिलेल्या तीन कादंबऱ्यांत-‘कासल टू कासल’ (१९५७, इं. शी.), ‘नॉर्थ’ (१९६०, इं. शी.) आणि ‘रिगोडॉन’ (१९६९, इं. शी.)- जर्मनीच्या भूमीवरून दुसऱ्या महायुद्धाचे दर्शन घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

१९३० च्या दशकामध्ये सेलीनला प्राप्त झालेली कीर्ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ओसरली. जग हे एक दुःस्वप्न असून हिडिस कुरूपता आणि मृत्यू हेच इथले खरे वास्तव आहे, ह्या भावनेनेच त्याने जगाकडे पाहिले.

मर्दों येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.