झां बातीस्त रासीनरासीन, झां बातीस्त : (डिसेंबर १६३९−२१ एप्रिल १६९९). श्रेष्ठ फ्रेंच नाटककार. जन्म ला फेर्ते मिलाँ येथे. तो अगदी लहान असतानाच त्याचे आई-वडील वारले. त्याच्या आजीने त्याचा सांभाळ केला. आरंभी बोव्हे येथील शाळेत काही शिक्षण घेतल्यानंतर तो पॉर-रोय्यालच्या शाळेत शिकू लागला. ग्रीक-लॅटिन साहित्याचे अध्ययन त्याने येथे केले. त्यानंतर कॉलेज द हारकोर्टमध्ये शिक्षण घेण्यासाठी तो पॅरिसला गेला. अगदी आरंभापासून त्याच्यावर यानसेनी विचारांचे संस्कार झाले. कार्नेलिअस यानसेन ह्या फ्लेमिश धर्म तत्त्वचिंतकाची ही विचारसरणी. मानवाचे जीवन मूलतः पापमय असून ईश्वरी प्रसादाचा लाभ त्याला होतो, तो त्याच्या सत्कृत्यांमुळे नव्हे, तर नियतीच्या पूर्वसंकेतामुळे, हे यानसेनच्या शिकवणीमधील महत्त्वाचे सूत्र होय.

विद्यार्थिदशेतच रासीन फ्रेंच व लॅटीन भाषांत कविता करू लागला होता. पॅरिसला आल्यावर मोल्थेर, ला फाँतेन, ब्वालो ह्यांसारख्या साहित्यश्रेष्ठींशी रासीनचा परिचय झाला. राजदरबारातही त्याला प्रवेश मिळाला. रासीनने धर्मसेवेकडे वळावे असा प्रयत्न त्याच्या काही आत्पांकडून झाला होता परंतु त्याने वाङ्‌मयनिर्मितीलाच वाहून घेण्याचे ठरवले.

रासीनने काही काव्यरचना केलेली असली, तरी त्याची कीर्ती मुख्यतः त्याच्या नाट्यलेखनावर अधिष्ठीत आहे. त्याच्या नाट्यकृतींत ला तेबाईद.. (१६६४, इं. शी. द थीबन्स ऑर द एनिमी ब्रदर्स), आलेक्सां द्र .. (१६६५, इं. शी. अलेक्झांडर द ग्रेट), आंद्रोमाक (१६६७), ले प्लॅदर (१६६८, इं.शी. द लिटिगंटस), ब्रितानिक्यूस (१६६९), बेरेनीस (१६७०), बाझाजे (१६७२), मित्रिदात (१६७३), इफिगेनी (१६७४), फेद्र (१६७७), एस्तॅर (१६८९) आणि आताली (१६९१) ह्यांचा समावेश होतो.

सर्वश्रेष्ठ अभिजाततावादी नाटककार म्हणून रासीनला त्याच्या काळातील दरबारी-मानकरी, समीक्षक आणि नाट्यरसिक ह्यांच्याकडून मोठी मान्यता प्राप्त झाली. रासीनने मुख्यतः शोकात्मिका लिहील्या (‘द लिटिगंट्स’ ही सुखात्मिका आहे). शोकात्मिकालेखनात युरिपिडीझ आणि सॉफोल्किझ ह्या प्राचीन ग्रीक नाटककारांचा आदर्श रासीनसमोर होता. गतकाळातील राजेराण्यांच्या कथांना नाट्यरूप देऊन त्याने त्या रंगभूमीवर आणल्या. मानवी जीवनाचे शोकात्म अंग त्याच्या शोकात्मिकांनी अत्यंत प्रभावीपणे रंगभूमीवर उभे केले. अतिरेकीपणा, क्रौर्य, न-नैतिकता (अमॉरॅलिटी) ह्यांचे जे दर्शन त्याने आपल्या नाटकांतून घडविले. त्याने त्याच्या समकालीनांना धक्के बसले. त्याच्या नाटकांतील वास्तववाद हा अनघड वास्तववाद म्हणून त्याच्या काळी टिकार्ह ठरला होता. प्रभावी व्यक्तीरेखाटन हे रासीनच्या नाटकांचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. उदा., वेगाने घडत जाणाऱ्या घटनांच्या संदर्भात होणाऱ्या मानसिक आंदोलनांचे त्याने इफिगेनी ह्या नाटकात केलेले सूक्ष्म चित्रण ट्रॉयचा पाडाव व्हावा, म्हणून स्वतःच्या मुलीला-इफिगेनीला-बळी देण्याचा प्रसंग ग्रीकांचा सरसेनापती ॲगमेम्नॉन ह्याच्यावर येतो, तेव्हाच्या त्याच्या मनोव्यापारांचे रासीनने केलेले चित्तथरारक चित्रण.

फेद्र ही रासीनची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती मानली जाते. थीस्यूस राजाची राणी फेद्र हिला हिप्पोलीत ह्या तिच्या सावत्र मुलाविषयी वाटणारे वैषयिक प्रेम ही शोकात्मिका घडून येण्यास कारणीभूत होते. हिप्पोलीत आपल्या सावत्र मातेचे हे प्रेम झिडकारतो. दरम्यान तो आरासिया नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडतो. संतापलेली फेद्र हिप्पोलीतने आपल्यावर बलात्कार केला, असा कांगवा करते. हिप्पोलीत हा आरोप पूर्णतः खोटा असल्याचे थीस्यूसला पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा काहीच परिणाम राजावर होत नाही. समुद्रदेव नेपच्यून ह्याचा धावा करून त्याच्या करवी थीस्यूस आपल्या पुत्राचा भीषण वध घडवून आणतो. त्यानंतर स्वतःच्या गुन्ह्याचा आणि परिस्थितीचा ताण असह्य होऊन फेद्र आत्महत्या करते. फेद्रच्या मनातील प्रेम आणि नीती ह्यांविषयीची खळबळ रासीन अत्यंत उत्कट, काव्यात्मरीतीने उभी करतो. अभिजात नाटकाची वैशिष्ट्ये फेद्रमध्ये विलक्षण प्रत्ययकारी रीतीने दृग्गोचर होतात.

फ्रान्सचा राजा चवदावा लूई ह्याने आपला अधिकृत इतिहासकार म्हणून ब्वालोबरोबर रासीनची नेमणूक केली (१६७७). त्यानंतर त्याने रंगभूमी आणि नाट्यलेखन सतत बारा वर्षे सोडले. राजाबरोबर तो प्रवासात तसेच राजाच्या विविध मोहिमांच्या वेळी असे. एस्तॅर आणि आताली ही नाटके बारा वर्षांचा हा दिर्घकाळ संपल्यानंतर त्याने लिहिली. लोकांची दुःखे मांडण्यासाठी त्याने केलेले ‘क्रितीक स्पिरित्युएल’ हे लेखन राजाचा त्याच्यावरील अनुग्रह नाहीसा होण्यास कारणीभूत ठरले. पॅरिस शहरी त्याचे निधन झाले.

भूतकाळात रमणारा रासीन फ्रान्समधील सतराव्या शतकातील सर्वांत लोकप्रिय शोकात्मिकाकार ठरला परंतु मोल्येरप्रमाणे फ्रान्सच्या राष्ट्रीय सीमा मात्र तो ओलांडू शकला नाही. त्याला अखंड शिष्य परंपराही लाभली नाही.

सॅम्युएल सॉलोमन ह्यांनी रासीनच्या सर्व नाट्यकृती इंग्रजीत अनुवादिल्या आहेत (द कंप्ली ट प्लेज−१९६७).

संदर्भ : 1. Abraham, Claude, Jean Racine, 1978.

2. Brereton, Geoffrey, Jean Racine : a Critical Biography, 1973.

3. Lapp. John, Aspects of Racinian Tragedy, 1955.

4. Mourgues, Odette de, Racine : or, The Triumph of Relevance, Cambridge, 1967.

5. Tobin, R. W. Racine and Seneca, 1973.

कुलकर्णी, अनिरुद्ध