झां द ला फाँतेनला फाँतेन, झांद : (८ जुलै १६२१–१३ एप्रिल १६९५). प्रख्यात फ्रेंच कवी आणि बोधकथाकार.  फ्रान्समधील शँपेननामक (शांपान्य) प्रदेशातील शॅटोटीअरी (शातो -तियेरी) येथे जन्मला. पॅरिसमधील ‘मॅझॉ द लॉरात्वार’ ह्या महाविद्यालयात त्याने काही शिक्षण घेतले. त्यांनतर चर्चच्या सेवेत जाण्याचा त्याचा विचार होता. तो बदलून त्याने कायद्याचा अभ्यास केला पण कायद्याकडे आपल्या मनाचा फारसा कल नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर सु. दहा वर्षे त्याने आपल्या जन्मग्रामी नुसतीच घालवली व उर्वरित आयुष्य निरनिराळ्या श्रीमंत आश्रयदात्यांकडे व्यतीत केले. अशा आश्रयदात्यांत चौदाव्या लूईचा सधन मंत्री फूके आणि मादाम द ला साब्लयेर ह्यांचा समावेश होतो. १६४७ साली त्याने विवाह केला आणि त्याला एक पुत्रही झाला परंतु पुढे तो आपल्या कुटुंबापासून वेगळा राहू लागला. 

ला फाँतेनची जागतिक कीर्ती अधिष्ठित आहे, ती मुख्यतः त्याने लिहिलेल्या बोधकथावर (फाब्ल श्वाझी मीझ आँ व्हँर, इं. शी. सिलेक्टेड फेबल्स इन व्हर्स). ह्या बोधकथांचे एकूण १२ भाग असून, त्यांतील पहिले ६ भाग १६६८ मध्ये, पुढील ५ भाग १६७८-७९ मध्ये आणि अखेरचा-बारावा-भाग १६९४ मध्ये, ह्या क्रमाने ते प्रकाशित झाले ह्या बोधकथा पद्यात रचिलेल्या आहेत.

 ला फाँतेनच्या आधी होऊन गेलेल्या इसाप (ग्रीक), ए फीड्रस (रोमन) ह्यांसारख्यांच्या बोधकथांत नीत्युपदेश वा तात्पर्य ह्यांना महत्त्व होते. तथापि ला फाँतेनच्या बोधकथांत बोधाला गौणत्व देण्यात आलेले आहे आणि त्याच्या काही बोधकथांत तर बोध हा अभावानेच लक्षात येतो. कथेच्या कलापूर्ण अभिव्यक्तीवर त्याचा मुख्य भर होता. त्या दृष्टीने ह्या कथाकाव्यांवर तो अनेकदा संस्कार करत असे. 

 लवचिक आणि भावगेय शैलीत लिहिलेल्या आपल्या बोधकथांतून त्याने तत्कालीन समाजातील गुणदोषांचे प्रभावी चित्रण केले असले, तरी त्याने रंगविलेल्या विविध व्यक्तिरेखा ह्या सर्वकालीन व सार्वत्रिक अशा मानवी स्वभावांच्या प्रतिनिधी ठरतात. चौदाव्या लूईच्या ऐन कारकीर्दीतील ह्या कवीने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुःखांनाही आपल्या कथांतून वाचा फोडली आहे, त्याचप्रमाणे सरंजामशाहीतील अन्याय्य कायदे व चालीरीती ह्यांवर आपला टीकाकटाक्ष टाकला आहे. त्याच्या बोधकथांचे आणखी एक वैशिष्ट्य असे, की केवळ प्राणिकथा म्हणून जरी त्या वाचल्या तरीही त्या रंजक वाटतात. त्याच्या काही कथांवर अश्लीलतेचाही आरोप करण्यात आलेला आहे. तथापि बोधकथेचे दालन फ्रेंच साहित्यात खुले करून त्याने बोधकथेला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्याचे अनुकरण उत्तरकालात अनेकांनी केले परंतु तुलनेसाठीही त्यांच्या जवळपास येऊ शकेल असा प्रतिभाशाली बोधकथाकार त्याच्यानंतर अद्याप झाला नाही, असे मानले जाते. फ्रेंच साहित्यातील प्रथम श्रेणीच्या दोन सर्वोत्कृष्ट अभिजात कवींपैकी रासीनबरोबर त्याची गणना केली जाते. एडवर्ड मार्श ह्यांनी त्याच्या बोधकथा इंग्रजीत अनुवादिल्या आहेत (फॉर्टी-टू फेबल्स, १९२४ मोअर फेबल्स, १९२५ आणि कलेक्टेड फेबल्स, १९३०). 

 ला फाँतेनच्या अन्य लेखनात आमूर द प्सिके ए द क्युपिदाँ (१६६९). ही कादंबरी आणि काँत ए नुव्हॅल आं व्हॅर (१६६४-७४, इं. शी. स्टोरीज ॲण्ड टेल्स इन व्हर्स) ह्या नावाने प्रसिद्ध झालेला पद्य-कथासंग्रह काही नाटके आणि कविता ह्यांचा समावेश होतो. 

 त्याला १६८४ साली फ्रेंच अकादमीचे सदस्यत्व देण्यात आले. पॅरिस येथे तो निधन पावला. 

 संदर्भ : 1. Hamel, Frank, Jean de La Fontaine, 1911 reprint, 1970.

            2. Sutherland, Monica, La Fontaine : The Man and His Work, Toronto, 1953 reprint, 1974. 

            3. Tyler, J. Allen Parrish Stephen M. Ed. A Concordance to the Fables and Tales of Jean de La Fontaine, New York, 1974. 

            4. Wadsworth, Philip A. Young La Fontaine, 1970.

 टोणगावकर, विजया