शार्ल-ऑग्यूस्तँसँत-बव्ह, शार्ल-ऑग्यूस्तँ : (२३ डिसेंबर १८०४–१३ ऑक्टोबर १८६९). फ्रें च साहित्येतिहासकार आणि समीक्षक. जन्म फ्रान्समधील ब्यूलोन सरमेर येथे. १८२४ मध्ये वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी तो पॅरिसला गेला तथापि ते शिक्षण सोडून देऊन त्याने स्वतःला पूर्णपणे साहित्यास वाहून घेतले. Le Globe ह्या उदारमतवादी नियतकालिकात तो साहित्यसमीक्षात्मक लेखन करु लागला. ह्याच नियतकालिकात ⇨ व्हिक्टर ह्यूगोच्या कवितांवर त्याने लिहिले आणि ह्यूगोचा अनुग्रह त्याला प्राप्त झाला. ह्यूगोने त्याला आपल्या स्वच्छंदतावादी लेखक-कवींच्या खास वर्तुळात स्थान दिले तथापि ह्यूगोची पत्नी मादाम अदेल हिच्याबरोबर त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे ह्यूगोच्या लक्षात आल्यानंतर त्याने सँत-बव्ह बरोबरचे आपले स्नेहसंबंध कायमचे तोडून टाकले (१८३४). दरम्यानच्या काळात सँत-बव्हचा Tableau historique et critique de la poesie francaise et du theatre francais au XVIe siecle (१८२८, इं. शी. ‘हिस्टॉरिकल अँड क्रिटिकल डिस्क्रि प्शन ऑफ फ्रेंच पोएट्री अँड थिएटर इन द सिक्सटींथ सेन्चरी’) हा ग्रंथ प्रसिद्घ झाला. ह्या ग्रंथात त्याने ⇨ ला प्लेयाद ह्या सोळाव्या शतकातील फ्रेंच कविमंडळातील दुर्लक्षित झालेल्या ⇨ प्येअर द राँसार, ⇨ झोआकिम द्यू बेले ह्यांसारख्या कवींना पुन्हा प्रतिष्ठा तर प्राप्त करून दिलीच शिवाय ह्यूगो आणि त्याच्या अन्य मित्रांची कविकुलपरंपरा प्रबोधनकालाशी निगडित असल्याचेही दाखवून दिले.

काही काळ तो फ्रेंच सामाजिक विचारवंत ⇨ आंरी द सँ-सीमाँ (१७६०–१८२५) ह्याच्या विचारांकडे ओढला गेला होता. मानवीबंधुत्व आणिविज्ञान-तंत्रज्ञान ह्यांवर आधारलेली समाजव्यवस्था अस्तित्वात आल्यास मानवतेचे बरेचसे प्रश्न सुटू शकतील त्यामुळे धर्मोपदेशकांची जागा ह्यापुढे वैज्ञानिकांनी घेतली पाहिजे मध्ययुगात रोमन कॅथलिक चर्चला जे स्थान होते, ते आता वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना मिळाले पाहिजे, अशी त्याची धारणा होती. उपर्युक्त Le Globe ची व्यवस्था हे विचार मानणाऱ्या समूहाकडे आली (१८३०), तेव्हा त्याचे दोन जाहीरनामे लिहून काढण्याची कामगिरी सँत-बव्हवर सोपविण्यात आली तथापि ह्या सँ-सीमाँवाद्यांपासून तो लवकरच दूर झाला. स्वच्छंदतावाद्यांपासूनही तो वेगळा झाला. तो स्वच्छंदतावादाच्या प्रभावाखाली असताना त्याचे जे तीन कवितासंग्रह प्रसिद्घ झाले, त्यांत Vie, poesies et pensees de Joseph Delorme (१८२९ इं. शी. ‘द लाइफ, पोएट्री, अँड थॉट ऑफ जोसेफ देलार्मे’), Consolations (१८३१)आणि Penseesd’aout (१८३७) ह्यांचा समावेश होतो. एका उदास अंतःकरणाचा नाजूक भावाविष्कार घडविण्याचा प्रयत्न त्यांत दिसतो परंतु या संग्रहांतील कवितांना वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ह्यांखेरीज Livre d’amour हा त्याचा आणखी एक काव्यसंग्रह. तो आणि मादाम अदेल ह्यांच्यातील भावबंधाचे बरेचसे तपशील ह्या संग्रहातील कवितांशी निगडित झालेले आहेत. तो आणि मादाम अदेल ह्यांच्या निधनानंतर हा कवितासंग्रह प्रसिद्घ झाला. Volupte ही कादंबरीही त्याने लिहिली. आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाच्या ह्या कादंबरीत वैफल्य, अपराधभावना, धार्मिक आकांक्षा, शरीरसुखाचा त्याग करण्याकडे झुकलेली वृत्ती ह्यांचे प्रभावी दर्शन घडते. मादाम अदेलबद्दलच्या त्याच्या भावनांचे ते वाङ्‌मयीन रुपांतर आहे तथापि ही कादंबरीही फार थोड्यांचा प्रतिसाद मिळवू शकली.

त्याच्या समीक्षालेखनाने मात्र श्रेष्ठ साहित्यसमीक्षक म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. त्याचे बरेचसे समीक्षालेखन Constitutionnel, Moniteur आणि Temps ह्यांसारख्या नियतकालिकांतून झाले. हे सर्व लेखन २८खंडांत प्रसिद्घझाले [Causeries du lundis (१५ खंड, इं. शी.‘मंडे चॅट्स’, १८५१–६२) आणि Nouveaux lundis (१३ खंड, १८६३–७०)]. त्याच्या अन्य समीक्षा ग्रंथांत Critiques et portraits litteraires (१८३६–३९), Portraits contem-porains (१८४६) ह्यांचा अंतर्भाव होतो.

सँत-बव्हने आपली समीक्षापद्घती साहित्याच्या व्यापक अभ्यासावर आधारली होती. व्यापक साहित्याभासातून समीक्षकाचे मन पूर्वगहमुक्तदृष्टीने साहित्यकृतीच्या निर्मात्यावर केंद्रित होते, अशी त्याची धारणा होती. लेखकांचे जीवन, त्याच्या भोवतीची परिस्थिती, त्याचा समाज, त्याचे लेखनहेतू, त्याच्या वेळचे वाङ्‌मयीन वातावरण, त्याचे एकंदर ग्रंथ ह्या सर्वांचा अभ्यास करून साहित्यकृतीची समीक्षा केली पाहिजे, असे त्याचे मत होते. काही पूर्वप्रस्थापित कल्पनांच्या मोजपट्ट्या वापरून साहित्यकृतीची समीक्षा केल्यास त्या समीक्षेचा आवाका संकुचित राहतो, अशी त्याची भूमिका होती. Causeries … … … आणि Nouveaux … … … मधील लेखनातून त्याने मुख्यतः संस्कृतीच्या त्याच्या संकल्पनेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. ही संकल्पना परंपरा, स्थैर्य आणि शिष्टाचार ह्यांवर आधारलेली होती. फ्रेंच संस्कृतीचे सर्वोत्कृष्ट दर्शन मातब्बर आणि सुसंस्कृत स्त्रियांच्या सालाँमधून (दिवाणखाण्यांतून) घडताना दिसते (ह्या सालाँमधून विद्वान, साहित्यिक, कलाकार ह्यांच्या बैठका होत). Portraits … … … मधून त्याने आपल्या साहित्यिक समकालिनांची व्यक्तिचित्रे चिकित्सक दृष्टिकोनातून उभी केली. Histoire de Port-Royal (५ खंड, १८४०-६०) हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ. त्यात त्याने रोमन कॅथलिक चर्चच्या सुधारणेसाठी कॉर्नेलिअस यानसेन ह्याने उभारलेल्या चळवळीचा इतिहास अभ्यासपूर्ण दृष्टीने लिहिला आहे.

सँत-बव्हने प्रसिद्घ माझारिन ग्रंथालयात नोकरी केली होती (१८४०–४८). १८५४ साली College de France मध्ये तो लॅटिन कवितेचे अध्यापन करु लागला तथापि तेथे तो टिकला नाही. १८४४ साली त्याची फ्रेंच अकादेमीवर निवड झाली होती.

पॅरिसमध्ये तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.